4.साठवण….

 

 

गावाकडे प्रपंचाला, जगण्याला आणि शेतीपाण्याचा सारा सौरात करायला लागणाऱ्या वस्तू गावातीलच कुशल कामगार तयार करायचे. प्रत्येकाकडे काहीना काही हस्तकौशल्य असते. परंपरेने आलेले किंवा गरज म्हणून विकसित झालेले असते. सहसा कोणताही कृत्रिम कच्चा माल वापरला जात नाही. परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध काय आहे? आणि याचा उपयोग कसा करता येईल? या सर्व प्रकारच्या वस्तू काही एक दिवसात तयार झालेल्या नसतात. चूकत, अनुभवत हळूहळू परिपूर्ण होत असतील नाही का! प्रयत्न महत्त्वाचा ठरतो.

…..एक एक गवरी रचून केलेला हा  उडवा पावसात भिजू नये म्हणून त्यावर इरलं झाकतात. यासाठी अगोदर लाकडाची बांधणी करून आणि एकेक लाकूड बाजूने उभं करून हा उडवा झाकून घेतात. वरून शेण,माती,राख यांनी सारवून निरगुडीच्या झाडाच्या फांद्यापासून बनवलेलं इरलं झाकण्यासाठी वापरतात.
या इरल्याने हा उडवा बंद करून टाकतात. आतमधील जळण अगदी सुरक्षित राहत. कितीही पाऊस आला तरी भिजत नाही. वर्षभर वापरता येत.

निरगुडी/ निर्गुडी ही औषधी वनस्पती म्हणून सर्वांनाच परिचित आहे, परंतु याचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग गावाकडे केला जातो. निरगुडीच्या फांद्या घेऊन आणि सिंधीच्या झाडाचे फोक घेऊन धान्य साठवण्यासाठी विविध आकार आणि प्रकाराची साठवणीचे साहित्य, भांडे तयार करतात. कनगी, सलूदं, डाल, बुट्टी, पाटी, मटकुलं, कुरकुलं, टारलं बनवतात आणि वेगवेगळ्या साठवणीसाठी वापरतात. फांद्या एकमेंकात गोलाकार गुंफून आवश्यकतेनुसार या साठवण्यांना आकार देतात. वेगवेगळ्या आकारावरून आणि उपयोगावरून त्यांची नावे पडली आहेत. कनगीमध्ये वर्ष दोन वर्ष धान्य टिकते. प्रत्येक घरात असणारी ही कनगी लादणीच्या अलीकडच्या खोलीमध्ये ठेवली जाते. जिथे हवा खेळती राहील अशा खोलीमध्ये ही कनिंग असते. साधारण कमीतकमी 25 ते 30 पोती धान्य बसेल एवढा तिचा आकार असतो. घरातील आवश्यकतेनुसार छोटा, मोठा आकार बनवला जातो.
एवढी मोठी कनगी ठेवायची कशी? भुईला लागून ठेवली तर धान्य सरदळणार, किडे होणारच! हे टाळण्यासाठी मग चौरंग, पाटाचा जसा आकार असतो तश्या चौकोनामध्ये लाकडाच्या मोठ्या मेढ तयार करून ठेवतात. मेढ म्हणजे मजबूत, जाडसर, लांबट लाकडाच्या छोट्या तुकड्याच्या वरच्या बाजूला व्ही आकारांमध्ये विभागणी केलेली असते. मुलांच्या खेळण्यातील गुल्लेर कसे असते अगदी तसेच. या मेढ रोवल्यानंतर प्रत्येक मेढीवर एक अशी चार मजबूत लाकडे ठेवली जातात. यावर कमीत कमी अंतर ठेवून एकमेकांना लागून पसरट फळ्यांसारखी लाकडे ठेवतात. यालाच माचोळी असे म्हणतात. मोठ्या कनिगीला वरपर्यंत एकूण तीन किंवा फारच उंच असेल, मोठी असेल तर  चार फुगीर खाचा बाहेरच्या बाजूने केलेल्या असतात. या खाचांचा उपयोग धान्य टाकण्यासाठी, काढून घेण्यासाठी चढताना होतो. एका खाचेच्या आधाराने पाय ठेवून दुसऱ्या खाचेचा हाताला आधार घेत वर चढून जाता येते. मग धान्यात उडी मारायची.

गावाकडच्या मांजरी फार हुशार! लपण्यासाठी ही जागा राखीव ठेवतात. या मांजरी पिल्लांसकट निपचित पाय ताणून पहूडलेल्या असतील आणि आपली उडी मध्येच!! ही मजा दुसरीकडे कोठेही शोधून सापडणार नाही. एखाद्या कवडश्या मधून खोलीत येणारा उजेड त्यात चुलीच्या धूरामुळे अंधूक झालेला असतो. आपल्याला दिसत नसले तरी मांजरीला दिसते.  मांजर, पिल्ले आणि आपण दोघांनाही क्षणभर लक्षात येत नाही काय करावे? पळून तरी कुठे आणि कसे जायचे? घाईघाईने जेवढा जास्त प्रयत्न उडी मारण्याचा आणि वर चढण्याचा तितका पाय खोलवर त्या धान्यात रूतणार ! नुसता गोंधळ आणि गलका मांजरीची म्याव म्याव आणि आपली आरडाओरड, यामध्ये चपळ मांजर जिंकते, क्षणात अंदाज घेते आणि उडी मारून पसार होते.
हे निरगुडीच्या फांद्या पासून तयार झालेल्या साठवण्यांना अगोदर शेण, माती आणि राख यांचा चिखल करून, मिसळून लिंपण करायचं असतं. एकावर एक थर देत मजबूत बनवायची असते. उन्हात चांगली वाळवून झाली की पांढऱ्या मातीचा पोतरा द्यायचा असतो. मग ही कनगी माचोळीवर आणून ठेवतात. कनगीच्या आतून बुडाला भोरगे टाकतात. भोरगे म्हणजे अंबाडीपासून वळून तयार होणाऱ्या दोरीने बनवलेल्या पोत्यांचे तुकडे, फाटलेले भाग होय.
हे भोरगे अंथरायचे आणि त्यावर खडे मिठाचा एक थर द्यायचा आणि मग पिवळे, बाजरी, हायब्रीड किंवा ज्वारी जे काही वर्षभर लागणारे धान्य आधी उन्हामध्ये खनंग वाळवून घ्यायचे. हे धान्य वाळल्यानंतर याला खेड्यात धान्य वाळून खोट झालं असे देखिल म्हणतात. हे वाळवलेले धान्य या कनगीमध्ये साठवण्यासाठी ठेवतात. हे ठेवत असताना धान्याचा हातभर थर झाला की कडुनिंबाचे पानं, छोट्या फांद्या, किंवा फाटा यांचा एक थर देतात सोबत थोडसं खडेमीठ आणि पुन्हा धान्याचा थर असे वरपर्यंत पोत रिचवत यायचे, भरत यायचे. हे धान्य असंच उघड ठेवत नाहीत. या कनगीला झाकण लावतात. कनगीच्या झाकणाला झापडी म्हणतात. पावसाळ्यामध्ये या झापडीला थोडीशी सांद ठेवलेली असते. उन्हाळ्यात मात्र ही शेण, माती, राखेने सारवून, लिंपून हवाबंद केलेली असते. याला पेंड घालणे असे म्हणतात. तसेच ज्या धान्याचे पुढच्या वर्षीसाठी बी भरण करायचं म्हणजे पेरण्यासाठी जे धान्य जपून ठेवायचे असते यासाठी हा झापडीचा आणि पेंड घालण्याचा प्रकार फार प्रचलित आहे. तूरी, मटकी, तीळ, ज्वारी पैकी जे पेरणीचे धान्य ठेवायचे ते कसं काळजीपूर्वक निवडतात पहा! ज्वारी कापणीला आल्यानंतर मोठी, दाणेदार, पांढरीशुभ्र, कणसं निवडून बाजूला ठेवायचे. खळं न करता, कणसं फक्त बडवायचे, वाळवायचे आणि गंधक टाकून सलूदाला झापडी लावून ठेवायचे आणि थेट पुढच्या पेरणीलाच काढायचे. यासाठी मोठा सलूद वापरतात. सलूद म्हणजे करंड्याच्या आकाराचे भांडे. निरगुुुडीच्या फांद्यांपासून तयार केलेले, याचे लहान मोठे आकार करता येतात. लहान आकारांच्या सलूदामध्ये गव्हाच्या कुरडया आणि डाळीचे पापड ठेवतात. डाल म्हणजे मोठं टोपलं, पाटी म्हणजे छोट टोपलं हे रानात भाकरी घेऊन जायला आणि गोठ्यातल शेण, चिपाड उकांड्यावर टाकायला वापरतात… म्हणूनच कदाचित डोक न वापरता आणि जीव ओतून काम न करणाऱ्यांना पाट्या टाकायचं काम करता का? अस म्हणत असू!
मटकुलं म्हणजे हंडी सारखा आकार असणार भांड, यामध्ये ज्वारी, बाजरीच्या पापड्या आणि डाळी ठेवतात.
कांदे, लसण, मिरच्या किंवा इतर पिकणारा भाजीपाला ठेवण्यासाठी बुट्टीचा आणि डालीचा वापर करतात. डालभर फळ, भाज्या सामान गुत्तपद्धीने घेण्याची पद्धत असते.
या सर्व आकारातील सुंदर प्रकार म्हणजे कुरकुलं! अगदी छोटसं टोपलं याचा उपयोग काय? सरव्याच्या शेंगा गोळा करण्यासाठी.
भुईमुगाच्या सरव्याच्या शेंगा म्हणजे भुईमूग उपटून झाला, शेंगा तोडून झाल्या तरीदेखील, भुईमुगाच्या मुळाशी शेंगा लागत असल्यामुळे जमिनीत वितभर खोलवर काही शेंगा अडकून पडलेल्या असतात. लोखंडी उकरी घेऊन   शेंंगा  गोळा करायच्या हे कुरकुलं शेंगा टाकायला सोबत ठेवाायचे, काम करायला सोपं जातं.
परसात सांभाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा आणि ते झाकण्यासाठी तयार करतात ते टारलं. हे टारलं उपड ठेवायचं असतं म्हणून याचा आकार मोठ्या टोपल्या सारखा पण उलटा असतो. तोंडाजवळ मोठा आणि खाली बुडाला किंचित छोटा असा आकार असतो. टारल्याला मात्र शेणामातीने, राखेने लिंपत नाहीत ते हवा खेळती ठेवण्यासाठी मोकळे ठेवलेले असते…
आपण वापरतो आणि माहिती असलेले बांबूची दुरडी, सूप, फुलारी, शिंके फारच आवड असेल तर छोट्या छोट्या टोपल्या, फूलदानी वगैरे वगैरे…. शोभेच्या वस्तू…

क्रमशः पुढील लेखात….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

13 thoughts on “4.साठवण….”