संवाद….

बालविकसनामध्ये विविध प्रकारच्या विकासाबद्दल आपण शाळेत शिक्षक या भुमिकेतून विचार करतो. परंतू या भुमिकेला आपली एक व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची भुमिका नकळतपणे जोडल्या जातेच. म्हणून मुलांना समजून घेणाऱ्या कृती या तटस्थपणे, नियोजित करून अनुभव बनवता आल्या पाहिजेत. या कृतींचा आधार आणि मार्ग मानसिक विकासातुन जात असतो. यासाठी मानसिकतेला परिणाम करणारी बालकांची व शिक्षकांची भावनिकता आणि शालेय सामाजिकता त्या अनुषंगाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्वप्रथम शिक्षक म्हणून विचार करत असताना त्यांचा बालकांशी येणारा संबंध व  बालकांच्या दृष्टीने शिक्षकांचे वर्तन या सर्व परस्परक्रिया समजून घेणे महत्त्वाचे ठरते. भावनात्मक मनाची सामाजिक आरोग्यता व त्यानुसार प्रतिसादात्मक वर्तन म्हणजे एखाद्याची मानसिकता म्हणता येईल. या बालमनावर परिणाम करणारे घटक उदा. स्वची जाणीव, शारीरिक ठेवण व आरोग्य यामध्ये अनुवंशिकता, कुंटुंब व संस्कार, शेजारी, शाळा, सहकारी मित्र मैत्रिणी, शिक्षकांचे वर्तन ,परिसरात घडणाऱ्या घटना यासारखे असंख्य घटक आहेत जी शिक्षक व बालक दोघांवरही परिणाम करत असतात. सहसा भावनांक जास्त असलेल्या व्यक्ती इतरांच्या भावना समजून घेतांना त्यामध्ये  सामावून जात लवकर विचलित होऊ शकतात किंवा स्वतः त्या मध्ये गुंतून राहू शकतात. हा थोडा फार दोष म्हणता येईल. तटस्थपणे पण योग्य, प्रमाणशीर भावनिकतेने समजून घेणे हे कौशल्य आहे. घडणाऱ्या घटना, अडचणी किंवा आपापल्या क्षेत्रातील कर्तव्य इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा निश्चितपणे अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने पार पाडत असतात म्हणून अश्या लोकांनी आपण भावनिक आहोत म्हणून वाईट वाटून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. या भावनिकतेमुळे दैनंदिन संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे, समजून सांगण्याचे कौशल्य प्राप्त होण्यास सकारात्मक मदत होते असे वाटते. फक्त स्वतः यामुळे विचलित न होता या संवेदनशीलतेचा उपयोग विद्यार्थी विकसनामध्ये अध्ययन अध्यापन सहाय्यक तंत्र म्हणून कसे वापरले जाते यावर याचा परिणाम आणि महत्त्व ठरते. कोणत्याही भावनेचा निचरा होणे महत्त्वाचे असते मग भावनेनुसार हे वर्तन घडत असते. कोणतीही गोष्ट प्रमाणात योग्य वाटते परंतु अति रडणे, हसणे,ओरडून बोलणे, चिडणे, रागावणे किंवा विद्यार्थ्यांना मारणे, खोड्या करणे, अबोल होणे हे वर्तन मानसिक आरोग्यात बिघाड होण्याचे लक्षण असते. हे लक्षात येत नाही आणि आले तरी आपल्या काही पुर्वग्रह दुषित विचारामुळे ते आपण स्विकारत नाहीत. म्हणजे कधी कधी विद्यार्थी घडवत आलेले प्रसंग,अनुभव, चुका, यश, अपयश आपल्यालाही शिक्षक म्हणून सक्षमपणे घडवतच असते. एका विद्यार्थ्याचा अनुभव त्याच पद्धतीच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगात येऊ शकतो. शैक्षणिक प्रकियेमध्ये शिक्षक या नात्याने आपल्याकडून या मानसिक विकसनामध्ये परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विद्यार्थी कोणत्याही स्तरावरील असो, शाळेत प्रवेश केल्यानंतरचा पहिला दिवस त्या दिवशीचे शाळेतील वातावरण, शिक्षकांनी दाखवलेला सक्रिय सहभाग, शिक्षकासोबतचा प्रथम परिचय, घडणारे संवाद या सगळ्या गोष्टीचे कुतूहल असते हे नवीन,अनोळखी मुलं कायम आठवणीत ठेवत असतात. विद्यार्थी शिक्षक दैनंदिन संवाद यामध्ये रांगेत उभे रहाण्यापासून ते शाळा सुटल्यावर घरी जाईपर्यंत, विद्यार्थ्यांकडून काय बोलल्या जाते आणि काय ऐकल्या जात आहे हे हळूहळू माहिती करून घेणे रंजक असते. त्यांचे हे व्यक्त होणे,निरीक्षण करणे त्यांना जाणून घेण्यासाठी खूप उपयोगी पडते उदा. खूप बडबड करणारा उत्साही विद्यार्थी अचानक अबोल राहू लागला तर! वर्गात शिकवत असताना कायम खोड्या करणारा विद्यार्थी केवळ सारखे सारखे शिक्षा करून बदलत नसतो तर त्याचा संवादातून कायम पाठपुरावा नेमके कारण शोधावे लागते, कधी त्याला अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत सहभाग घेऊन त्यावर लक्ष ठेवून निरिक्षण करावे लागते. बोलते करण्यासाठी त्यांचा चांगला परिचय, संवाद अगोदर केलेला असावा लागतो. काय नसते त्यांच्या या बालविश्वात ?……त्यांनाही शाळेच्या नियंत्रित व्यवस्थेत स्वतःला बसवताना जड जाते, छोट्या छोट्या गोष्टींचे समायोजन करताना अडचणी येतात उदा.वेळेत डबा संपवणे, सर्वांसोबत अभ्यास, स्वाध्यायमधील गती प्राप्त करणे, अगदी स्वतः च्या सामानाची आवराआवर करणे. वर्ग मित्रांनी खेळात सहभागी करून घेणे….प्रयत्न सुरू असतात… कधी धांदल उडते… स्वतःला सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी घास भराभर तोंडात कोंबल्या जातात तर कधी खोटे कारण पोट दुखण्याचे…वही हरवल्याचे…विसरल्याचे…सारखे वह्यांचे कोरे कागद फाडणे, दुसऱ्याची वस्तू खराब करणे…मुळात हे गुण त्यांचे नसतात मुलं निरागस असतात हे चुक आहे हेच लक्षात येत नाही… आपलं चूकलं की, कुठेतरी रागावणे, नकार , आणि मारणे याची भिती असतेच ही भिती कमी करणे महत्त्वाचे…. यासाठी विद्यार्थी-शिक्षक सहवास सहज केलेली चौकशी, लक्षात ठेवून केलेला विनोद या विनोदातून सांगितलेला अवगुण आणि खाली मान घालून मान्य करत हसत हसत पळून जाणारी ही मुलं, तर कधी पाठातील गोष्टी, उदाहरणे विद्यार्थ्यांची नावे घालून सांगणे यामधून वाईट, चांगल्या सवयी, आहार किंवा अपेक्षित ,आवश्यक बाब गुंफून नक्की सांगता येते.कधी जवळ येतात ही मुलं ? विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेली मान्यता… छोट्या कृतींना दिलेली तात्काळ प्रतिक्रिया…. विद्यार्थी उत्साहाने सांगताना, प्रश्न विचारत असताना दिलेले उत्तर… कधी कधी चुकून नकळत त्यांचा हिरमोडही होऊ शकतो. मधल्या सुट्टीत सोबत केलेले जेवण…मस्त गप्पा मारतात ही मुले… या गप्पांसाठी प्रश्नावली, विषय नियोजित करावेत परंतु मुलांना मात्र सहजता वाटावी… आपण रोज किमान एक… दोन… विद्यार्थ्याशी नक्कीच तरी संवाद करू शकतो. यातून उलगडत जाते हे बालविश्व…कधी अचानक दिलेली गृहभेट..तर कधी मुलांना न कळू देता आपल्या घरी भेटीसाठी पालकांना बोलावणे…वर्गात संवाद करत असताना त्यांना जाणवणारे आणि अनुभवायला मिळणारे अध्ययन अनुभव यामध्ये आपला सहभाग उदा.कृती, उपक्रम घेत असताना आपणही सहभागी व्हावे, विद्यार्थी विषयातंर्गत माहिती, स्वतः चे मनोगत व्यक्त करत असताना आपणही बोलावे, सांगावे त्यांना शिक्षकाचे मत ऐकताना उत्सुकता वाटते, मजा येते, मुले हसतात…त्यांना कुतूहल असते बाईगुरूजी दररोजच्या अभ्यास व्यतिरिक्त काय सांगतात नवीन माहिती. उदा. आवडीचा खाऊ सगळ्यांचा कोणी बनवायचा ? नियोजन करता येते मिळून शाळेत खाऊ बनवण्यासाठी…. म्हणजे पाठ्यपुस्तक, शालेय नियोजन या व्यतिरिक्त इतर संवाद सुरू केला की अबोल मुले सुद्धा संकोच जाऊन बोलू लागताच. कधी कधी विद्यार्थी घरातील खेळणी पालकांना न सांगता दप्तरात घेऊन येतात. उत्सुकता असते नवीन खेळणी मित्र मैत्रिणीला दाखवायची.शाळेत आणली म्हणून रागवण्याऐवजी… मुलींना जर सांगितले तुमची बाहूली आणि खेळभांडे शाळेत घेऊन या बर! मला पहायची आहेत …आणि मुलांना गाडी किंवा त्यांच्या आवडीचा खेळ…इतका उत्साह दाखवतात ही मुले मग याचा उपयोग कौशल्याने करून घेतांना सांगायचे की या या पद्धतीने अभ्यास पूर्ण करणाऱ्या, सांगितलेले ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच वर्गात हे साहित्य आणता येईल.
मग मुले खूप खूश होतात.. व्यक्त व्हायला लागतात… मनमोकळा संवाद करू लागतात… आवडीनिवडी, समस्या सांगू लागतात.. खरे बोलतात..आणि ऐकायला लागतात….अनेक गोष्टी  बालमनावर परिणाम करत असतात. संवाद जर नसेलच तर मग नकळत शिक्षकांच्या आज्ञा टाळणे, शिकवत असताना दुर्लक्ष करणे, गप्पा मारणे यांसारख्या कृती विद्यार्थ्यांकडून हळूहळू घडायला हळूहळू लागतात आणि याचा परिणाम वर्गातील अध्यापनाच्या वेळी एकाग्रता, वर्गातील शांतता, सामूहिकता अध्यापनाची सलगता, यावर निश्चितपणे होत असतो. याचा एकंदरीत क्षमता विकसनामध्ये परिणाम होत असतोच. या सर्व गोष्टींकडे सजगपणे लक्ष देण्याची गरज आहे. काळ बदलला तसे काही परिमाणे आणि परिणाम ही बदलत आहे. विभक्त कुटुंब, बदलती सामाजिक परिस्थिती, व्यक्ती स्वातंत्र्ययाच्या अवाजवी अपेक्षा, मनोरंजनाची चुकीची साधने म्हणजे त्याचा योग्य उपयोगाची जाण नसणे, किंवा सध्याची कोरोनामुळे होणारे या शैक्षणिक वर्षातील परिणाम. यासाठी आवश्यकता आहे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने समजून घेण्याची. यासाठी फार काही अवघड सायास करावे लागतात असे नाही.अगदी छोटी छोटी कृती देखील विद्यार्थ्यांच्या मनात कायम सकारात्मक बदल घडवून आणते. पण यासाठी आपल्याला निरीक्षण, परीक्षण आणि समीक्षण योग्य करता आले पाहिजे म्हणजे आपल्या संवादाची आणि कृतीची दिशा ठरेल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटेल बाई , गुरूजींचे माझ्या किती बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष असते तसेच विद्यार्थी स्वतःहून संवाद करण्यास उत्सुकता दाखवेल. परिणामी सुसंवाद निर्माण होऊन कायम स्वरूपी गुरूशिष्यांंचे नाते दृढ होण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात विद्यार्थी, पालक यांच्या समुपदेशनाची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून स्वतःचे मानसिक आरोग्य चांगले ठेवून आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत कश्या पद्धतीने तासातील रचना, मनोरंजनात्मक खेळ, उपक्रम आणि संवाद याबद्दल सकारात्मक विचार करावा लागतो. शैक्षणिक संकल्पना व त्यावर आधारित उपक्रम, नेमकेपणा, निश्चितपणे असावा लागतो. कारण या सर्वांचा सकारात्मक दृश्य परिणाम अनुभवास येतच असतो. वर्गातील वातावरण निर्मिती, सहजता आणि विद्यार्थ्यांची वाढलेली एकाग्रता किंवा शिक्षक सांगतील ते आपण ऐकावे आणि आचरणात आणावे यासाठीची कठिबद्धता आणि नियम पालनासाठी स्वतः हून क्रियात्मक वर्तन आपसूकच विद्यार्थ्यांकडून घडते.  शिक्षकांनी मानसिकता आणि शाळेतील उत्साह आणि समाधान टिकवायचे असेल किंवा तो कमी होऊ द्यायचा नसेल तर कोणत्याही भौतिक गोष्टींवर अवलंबून राहू नये. त्या क्षणिक आनंद देऊन जातील परंतु खरे समाधान हे या निरागस मुलांचे हसणारे, आनंदी चेहरे आणि प्रतिसाद आणि सहवास यामधून मिळू शकते. कदाचित कधी यामध्ये अडचणी आणणारी परिस्थिती असू शकते, कधी सहकार्य नाही, कधी न स्विकारणे, अपयश, प्रबलनाची कमतरता किंवा चांगल्या गोष्टी दुर्लक्षित होणे किंवा मुद्दाम करणे,अपयश किंवा यासारख्या इतर कोणत्याही शिक्षकांना विचलित करणाऱ्या समस्या असू शकतात. प्रयत्न करताना येणारे अनुभव मात्र विद्यार्थ्यांना उपयोगी होतातच शिक्षक विद्यार्थी संवाद जेवढा प्रभावी , योग्य पद्धतीने होतो तेवढी विद्यार्थी विकसनाची कोणतीही  प्रक्रिया योग्य व प्रभावी होण्याची सुरुवात असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

13 thoughts on “संवाद….”