म्हणूनच आंतरक्रिया शब्द रूढ झाला असेल !
हृदय भरून येते, ह्रदय सद्गदित होते, हृदयात धडकी भरते, “कृष्ण सुदामाची गोष्ट ऐकली की मित्रता पाहून हृदय भरून येते”. ” भरताचे, लक्ष्मणाचे बंधूप्रेम ऐकले की हृदय सद्गदित होते”. “कृष्णाचे विराट रूप पाहून पुर्ण सभेत काही जणांच्या हृदयात धडकी भरली.”…….
पुरूष सुद्धा कोमल हृदयी असतो…तर स्त्री कठोर हृदयी असू शकते !
देवाचे दर्शन घेताना ते रूप, ती मुर्ती का भावते? केवळ सुंदर सजवलेली असते म्हणून ? नाही ! त्या मुर्तीच्या रंग, रूपाच्या पुढे जाऊन जी भावना हृदयात जाणवते त्यालाच तर भक्तीने हृदय ओतप्रोत भरले म्हणतात यामुळेच तर सावतामाळी यांना बागेत, शेतातही विठ्ठल जाणवतो, तर गोरा कुंभार यांना चिखल तुडवताना तर तुकाराम महाराजांना अगदी माळरानावर, डोंगरावर जाऊन सुद्धा भक्तीत तल्लीन होता येत होतं….कारण बाह्यरूप पहाण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी कुठे जायची आवश्यकता राहिली नाही…. भक्ती हृदयस्थ झाली होती…साक्षात परमेश्वरासोबत ये हृदयीचे ते हृदयी घडले असेल का ? भक्तांची अडचण ओळखून… पंढरी सोडून भक्तांच्या ओढीने विठ्ठलाला यावेच लागले असेल….दोन्ही बाजूंनी ओढ लागते ती याचमुळे…. आणि यामुळे तर परमेश्वराच्या हृदयावर राज्य करण्याचे भाग्य या संत मंडळींना लाभले असेल का ?
हृदयाला हात घालणारी… ह्रदयाचा वेध घेणारी……गोष्ट हृदयातली हृदयापासून सुरू होऊन हृदयातच जपली जात असते….. काय असतं नेमकं हे ? रसग्रहणात्मक कार्यक्रमाचे शीर्षक की केवळ एखाद्या स्पष्टीकरणासाठी व्याख्यानातील वाक्य… कार्यासाठी, भावनेसाठी वापरलेली शब्दांची किमया, अर्थापर्यंत जाण्यासाठी हृदयातूनच विचार करावा लागेल. कोणती प्रक्रिया होत असेल नेमकी हृदयात मग ? प्रत्येक अनुभवाची जाणीव होते तिथे म्हणजे नक्कीच हृदय संवेदनशील असते, ज्याच्या हृदयाला पाझर फुटतच नाही तो पाषाण हृदयी म्हणतात ते उगीच नाही !…. संवाद करत असताना आपण सहज म्हणतो माझ्या मनात हेच होतं! माझ्या डोक्यातच कसं आलं नाही ! हृदयात सुद्धा जाणिवा असतात, भाव असतो हा भाव एका हृदयातून दुसऱ्या हृदया पर्यंत गेला की संवाद, भाषा, औपचारिकता, वस्तुनिष्ठता काही काहीच उरत नाही. फक्त समाधान, आनंदमय होतं रहात सगळं ! ऐकणे, बोलणे, पाहणे, आतून मनापासून होते म्हणूनच कदाचित आंतरात्मा एक होणे म्हणत असतील का ? आई बाळाकडे खरेतर कौतुकाने पाहत नसते! ती हृदयातून पाहते, ऐकते, बोलते, म्हणून तिचं बाळ तिचं हृदयच बनून जाते आणि खोडकर, हट्टी, रडके, बाळ सुद्धा प्राणप्रिय होते. खूप दिवसांनी भेटले की जाडी वाढलेले बाळ सुद्धा जाड झाले आहे हे साध्या डोळ्याने दिसतही असते आईला, पण या साध्या डोळ्याने पाहतच नाही कधी. आई हृदयातून पाहते म्हणून तिचा मोठा झालेला बाळ ही तिला बारीक, खराब, खूपच रोड झाला वगैरे वाटते. मुलगाही समजून घेतो आईच मन कळत असतं म्हणून तो ही विचार करतो मनातूनच आई म्हणतीये ना ! मग खरंच असेल ! फार मजेशीर प्रवास ये हृदयाचे ते हृदय होणं…माझं, तुझं, आपलं, परकं हा भेदच मिटतो…
असाच विचार प्रत्येक आईने गरीब, निराधार, कुपोषित बालकांच्या बाबतीतही केला तर ? मनातून, हृदयातून….माझं स्वतः चं बाळ सोडून किमान एकतरी बाळ! या लहान हृदयांपासून सुरुवात केली की, ती निरागसता….त्यांना असलेली आपली आवश्यकता…हृदयातून एकदा आपल्या पर्यंत आली की…..मग ये हृदयीचे ते हृदयी …यशोदा कृष्णासारखं…
मग गुणदोषासहीत स्विकारतो आपण एकमेकांना… वैयक्तिक इर्षा, द्वेष, अपेक्षा, स्वार्थ गळून पडतो… डोकं लावून, समजावून उपयोग नसतो. व्यवहार आणि दुनियादारी पेक्षा जाणीवा महत्वाच्या वाटतात… राबवून घेण्यापेक्षा राबण्यात आनंद मिळतो… सुख मिळवण्यापेक्षा… देण्यात आनंद…दुःखातही समाधान मिळते… स्वार्थापेक्षा त्यागात आनंद मिळतो… जिंकण्यापेक्षा हारण्यात मजा…खरच..हा प्रवास उलटा पण…जीवनाचा अर्थ सुलट, खरा करणारा…. इथे पटवून देण्यात काही एक अर्थ नसतो एकदा एक झालं की एकच विचार, परस्परपूरकच होणार, कृतीतून दिसणार, असाच विचार निस्वार्थी प्रेमातही असेलच ! राधाकृष्णाच्या नात्यामधे अल्प भेटीनंतर…श्रीकृष्ण द्वारकेला गेल्यानंतर एकदाही भेट न होता देखील… किती विश्वास, त्याग, एकमेकांना आदर्श जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे, एकमेकांचे गुरूच ठरले…
कोणत्याही भौतिकतेची, सहवासाची, सुखाची कोणतीही अपेक्षा एकमेकांकडून केली नाही… कर्तव्याच्या प्रेमाला प्राधान्य जीवनात… समजून घेणे महत्वाचे..केवळ ये हृदयीचे ते हृदयी मुळेच..
कृष्ण सुदामाची मैत्री…एकमेकांना समजून घेणे…न मागता न बोलता…मदत..निस्सीम प्रेम…केवळ ये हृदयीचे ते हृदयी जाणवत समजत होते म्हणूनच घडले….
ही उदाहरणे परमेश्वराने कोणता संदेश देण्यासाठी आपल्या समोर ठेवली असतील !
कोणत्या परिस्थितीत कोणाच्या बाबतीत हे घडेल सांगता येत नाही !
विधवांचे प्रश्न, पिडीतांचे प्रश्न, अनाथ, निराधार बालकांचे प्रश्न सोडवणारे समाजसुधारक आणि समाजसेवक, देशासाठी प्राणांची आहूती देणारे देशभक्त, सीमेवर लढणारे सैनिक.. त्यागमुर्ती व्यक्ती..
कुष्ठरोगी रूग्णांची सेवा…एवढच काय….रस्त्यावरील बेवारस प्राण्यांची.. देखील सेवा…ते दुःख, त्या जाणीवा स्वतःच्या समजून.. अश्या
कितीतरी समाजबांधवांसाठी अनामिकपणे…रात्रंदिवस असंख्य व्यक्ती काम करतात, कष्ट करतात.. …कोणती जाणीव असेल ? कोणत्या भावनेने हात पुढे करत असतील ? आपलं मानलं की सेवाभाव उरतो…हा आपलेपणा..येतो तो केवळ आतून, मनातून….
ये हृदयीचे ते हृदयी…झाल्यावरच !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
14 thoughts on “ये हृदयीचे ते हृदयी….”
हृदयस्पर्शी
‘आनंद … देते – घेते, ते हृदय..’ बाकी सगळा व्यवहार, व्यापार आणि बंध.
छान मांडलाय विषय. आणि सर्वांत शेवटचा भाग सामाजिक संवेदनशीलता प्रगल्भ करतोय.
छान चिंतनिका वाचण्यासाठी मिळाली
All written work 👌👌
खरय,खूप छान👌
हृदयाची गोष्ट हृदयातून आली आणि ती हृदयाने वाचाली आणि खरच हृदय हेलावले…खुप छान मांडणी केलीय …प्रतेक विषय कमी शब्दात पण काळजात घुसले
अप्रतिम
खूप छान👌🏻👌🏻🙏
खूप छान
सुंदरच
👍खूप छान
marmik chintan
खूप सुंदर लिहिलं हो!! एवढ्या
व्यापातुन कधी वेळ काढून लिहिलय? ग्रेट च आहात मस्तच लिहिता👍👍🤝🤝