मातृतिर्थ….

 जन्म मुहूर्ताऐवजी स्वराज्य मुहूर्तावर जन्माला आलेले कन्यारत्न म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ. युगायुगांचा अंधार दूर करणारी ही कन्या. अशा योगावर जन्माला आलेली शक्ती सर्वगुणसंपन्न असते. स्वकर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडविते. जन्माचा काळ पारतंत्र्याचा परंतू दोन पिढ्यांपर्यंत मनामनात हिंदवी स्वराज्याची मशाल पेटती ठेवून विजय पताका फडकावली. याचा आनंद समाधान आणि हे वैभव पाहणाऱ्या जिजामातेचे भाग्य थोर आहे.

अगदी लहानपणापासूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समर्थपणे वाटचालीतले वेगळेपण जाणवते. राजघराण्यातील जन्म असल्यामुळे मिळालेले संस्कार अनुकरणातून, निरीक्षणातून आचरणात आलेले व्यक्तिमत्व राजमातेला शोभणारे आहे. बालपणापासूनच हुशार, बोलण्या, वागण्यातील धीटपणा विलक्षण होता. लढाईचे शिक्षण व प्रात्यक्षिक सराव, घोड्यावर बसून रपेट मारणे, हत्तीच्या अंबारीत बसून भालाफेक करणे, निरनिराळी शस्त्रे चालवणे, युद्धाचे नियोजन करणे, शत्रूपक्षाची कोंडी करणे, गनिमिकावा या सर्वांमध्ये कौशल्य मिळवलेले होते. राजवाड्यामध्ये निष्ठावंत पंडितांची ज्योत तेवत होती. या ज्योतींच्या प्रकाशाने जिजामातेची राजनीती, हिंदू धर्मावरील श्रद्धा, निपक्षपाती न्यायदान, आत्मविश्वास, धैर्य यांसारख्या विचारांची बैठक तयार होत होती.

प्रत्यक्ष जबाबदारी आल्यावर …. सासरी आल्यानंतर… शूर, पराक्रमी, ऐश्वर्यसंपन्न पतीचे कौतुक आणि आदर होता. जेवढा अधिकार मोठा तेवढीच कर्तव्याची जबाबदारीही मोठी असते याचीही जाण होती. या जाणिवेतूनच तर त्याग, ममत्व, कर्तव्यकठोर स्वभाव, धडाडी निर्णयक्षमता आणि कणखरपणा आला होता. अनेकजण पराक्रमी असले तरी सगळीकडे पारतंत्र्य होते स्वसाम्राज्य, स्वराज्य नव्हते. यासाठीची धडपड, हतबलता जीजाऊंनी जवळून पाहिली होती. त्यांना अस्वस्थ करत होती. त्या काळी स्त्रियांना स्वतःचे रक्षण करता यावे म्हणून सर्व विद्येत पारंगत करत असत. प्रसंगी स्त्रियांनी खंबीरपणे सामना करावा. खऱ्या अर्थाने समानतेचा दर्जा देत आत्मसन्मान वाढवत होते. त्या विपरीत परिस्थितीत स्त्रियांच्या बेअब्रूंमुळे निर्माण होत असलेली चीड, श्रद्धास्थानांचे भंजन मुघल साम्राज्याच्या विरोधात उभे राहण्यासाठी या माऊलीला बळ देत होते. अशा सर्व मातांची मातृशक्ती त्यांच्यामध्ये एकत्रित झाली होती. खऱ्या अर्थाने हे मातृतिर्थ आहे. स्व ची जाणीव देते.

पारतंत्र्यातील पराक्रमी पुरुषांची, वीरांची हतबलता या सर्वांवर एकच मार्ग हिंदवी स्वराज्याची स्थापना. हे दुर्दम्य ध्येयस्वप्न त्यांनी पाहिलेले आहे. यासाठी मनामनात स्वराज्य प्रत्यय जागृत करायचा. प्रत्येकाला शेवटच्या श्वासापर्यंत कसे लढायचे याची प्रेरणा देऊन हळूहळू स्वराज्य मार्गावरून कसे घेऊन जायचे याचा वस्तुपाठ म्हणजे आऊसाहेब. खरेतर हे त्यावेळचे अशक्य, भव्यदिव्य भगवतकार्य होते. या कार्यासाठी आदिशक्ती, आदिमायाचे साक्षात रूप जिजामाता होत्या. दिव्यसामर्थ्याचा साक्षात्कार. असे भगवतकार्य करण्याची महत्त्वाकांक्षा, शुद्ध भावना, व शुद्ध विचार आणि त्याच्या मुळाशी शील, भक्ती असेल तर दुर्दम्य ध्येयस्वप्न पूर्ण करण्यासाठी साक्षात परमेश्वर मदतीला येत असतो. आई तुळजाभवानीच्या कृपेने आशीर्वादाने सर्व संकटांना पार करत थोर शिवराय, बाळ संभाजींना घडवत स्वतःदेखील तेवढ्याच सक्रिय होत्या. कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्षपणे स्वराज्याची घडी व्यवस्थित रहावी यासाठी दक्ष होत्या. त्यांच्या त्यागातून, प्रयत्नातून, संस्कारातून कितीतरी पिढ्यांपासूनची गुलामगिरी संपुष्टात आली. त्यांच्या छत्रछायेखाली सर्व माताभगिनी, जनता समाधानाने नांदत होती. त्या खऱ्या अर्थाने माऊली आणि सावली होत्या. सासर माहेरच्या आलेल्या राजकीय वैरापुढे त्यांना कर्तव्य श्रेष्ठ होते म्हणूनच तर योग्य बाजू घेत आजीवन शपथ सोडली नाही.

पुत्र कर्तुत्ववान असला की मातेची कुस खऱ्या अर्थाने उजवली जाते असे म्हणतात आणि मातेची कुस सर्वार्थाने संपन्न असली की कर्तृत्ववान पुत्र पोटी जन्माला येतो. स्वराज्य निर्मितीचे ध्येय माझा हाच पुत्र साकार करू शकतो! कठीण काळातही स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याची जिद्द याच पुत्रात निर्माण होईल अशी त्यांना शिवरायांबद्दल खात्री होत होती याचसाठी शिवराय घडवले… सहवासाने घडले जीवन!…. शुर शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी या तीन पिढ्यांमधील महान दुवा एकच जिजाई ! स्त्रीशक्तीचे प्रेरणास्त्रोत…. आशीर्वाद… मातृतिर्थ. स्वराज्य मुहूर्तावर जन्म झालेल्या या मातृतिर्थाने स्वराज्य अभिषेकाचा सोहळा, दुर्दम्य ध्येयपूर्तीचा सोहळा प्रत्यक्ष पाहूनच पूर्णविराम घेतला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

16 thoughts on “मातृतिर्थ….”