मनुष्य गौरवदिनाच्या निमित्ताने…

आज मनुष्यगौरव दिनाच्या निमित्ताने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या *दशावतार* ( प्रकाशक- सद्विचार दर्शन) या पुस्तकाचा परिचय लेख स्वरूपात सादर करत आहे.

उत्तम तत्वज्ञानी, भारतीय परंपरागत साहित्य, पुराणं, संस्कृती याविषयी योग्य कार्यकारण भावाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करून अगदी सहजतेने, सोप्या पद्धतीने नवीन पिढीला रुचेल, पटेल, समजेल आणि ते स्विकारेल अशा पद्धतीने मांडणी असल्यामुळे त्यांची पुस्तके मला खूप आवडतात.
परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दशावतार या पुस्तकात; सांस्कृतिक दृष्टिकोन ठेवून  विष्णूचे दहा अवतार या विषयावर जी प्रवचने केली आहेत ती पुस्तक रूपाने सदविचार दर्शन यांनी प्रकाशित केलेली आहेत.
या पुस्तकामध्ये सांस्कृतिक याचा अर्थ आपल्या ऋषीमुनींनी जी भारतीय संस्कृती रचली तसेच हिंदू धर्माबद्दलचा इतिहास या अर्थाने ते सांस्कृतिक शब्द घेतात. भगवंताला अवतार घेण्यासाठी कोणती पार्श्वभूमी लागते? ईशशक्ती केव्हा व कशासाठी साकार होते? या प्रश्नांची उत्तरे  मिळतात.  पुराणातील आपल्याला अवघड वाटणाऱ्या संकल्पना ते दैनंदिन जीवनातील अतिशय साधी सोपी उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगतात. अध्यात्मातील, पौराणिक ग्रंथातील ज्या रूपक कथा , चमत्कारिक कथा आहेत त्याचे बौद्धिक विश्लेषण करून शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगतात. हे पुस्तक वाचताना मला तरी असेच वाटत राहते. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे व दरवेळी नवीन अनुभव देणारे अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे. या पुस्तकातून त्यांनी वाचकांना एक प्रकारे विनंती केली आहे की आपले वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत यासारखे अनेक पौराणिक ग्रंथ वाचून आपल्या धर्माबद्दलची खरी माहिती जाणून घ्यावी. ती इतरांना व भावी पिढीला द्यावी. त्याचे शिक्षण द्यावे कारण सध्या इतर धर्मीय व परकीय शक्तीची कटकारस्थाने ही हिंदू धर्माला बाधित करत आहेत. त्याचा अपप्रचार करीत आहेत. अंधश्रद्धा पसरवीत आहेत. डॉ. मुर, डॉ. मॅक्समुलर यासारखे अनेक परकीय विचारवंत तर वाटेल तसे आपल्या आदर्श व्यक्तींबद्दल लिहून आपल्या आदर्शांचा अपमान करीत होते असे नेहमी घडू नये म्हणून आपण मूळ ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी ते म्हणतात की आपण सर्वांनी लहानपणी रामायणातील चमत्कारिक कथा ऐकल्या आहेत. साठ वर्षाचे होत आलो तर त्याच कथा ऐकणार का? तर त्या ऐवजी या रूपक कथा मागील सत्य जाणून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ रामायणातील अहिल्याची गोष्ट अहिल्या शिळा झाली आणि रामाने तिचा उद्धार केला या प्रकारे ते सध्या चमत्कारिक वाटणाऱ्या सर्व रूपक कथांचे विश्लेषण करून यामागील सत्य सांगतात. त्यामुळे केवळ आपण अंधश्रद्धेपोटी विश्वास न ठेवता पूर्ण सत्य जाणून घेतले पाहिजे. विष्णूंच्या दहा अवतारांबद्दल काही बुद्धीवंत, सामान्य लोकांच्या मनात अनेक शंका व गोंधळ उडालेला आहे असे त्यांना वाटते. ही प्रवचने वाचून गोंधळ, शंका दूर होतील. कारण प्रत्येक अवताराचे स्पष्टीकरण अतिशय साध्या सोप्या भाषेत तर दिलेच आहे कारण ते त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मत्स्य, वराह, कुर्म हे अवतार तर पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या प्रगतीपर्यंतच्या उत्क्रांती वादावर आधारित आहेत असे स्पष्टीकरण देतात. त्यामुळे आपण निश्चितच आश्चर्यचकित होऊन जातो. ते म्हणतात विश्वात सर्वात सूक्ष्म घटक अणुरेणूंचे रहस्य उलगडण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली तर या विश्वाचा निर्माता आणि त्याचा अवतार समजायला तर हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. अवताराचे स्पष्टीकरण देताना ते मुलगा वडिलांची गोष्ट सांगतात. ईश्वराचा आवेश प्रवेश समजून सांगताना शिवाजी महाराजांमधील भवानी प्रवेश, अंशावतार मध्ये ऋषीमुनी अगस्ती, वशिष्ठ, वेदव्यास, पतंजली तर प्रत्यक्ष अवतारामध्ये राम, कृष्ण. पुढे प्रत्येक अवतारांचे सूक्ष्म स्पष्टीकरण दिलेले आहे. ते प्रत्यक्ष वाचल्यानंतर अधिक समजेल. ते अवतार म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम , श्रीकृष्ण, बुद्ध व कलियुगात होणारा अवतार म्हणजे कल्की. पुस्तकातील खास नमूद कराव्या अशा काही निवडक गोष्टी आहेत. हिमालयाच्या पश्चिम बाजूला कांगडा जिल्ह्यात मनाली हे गाव आहे तेथे मनु ऋषींचा आश्रम कुलू होता. ते महान तपस्वी होते व ज्ञानी होते. ही घटना सुमारे आजच्या युगाच्या निर्मितीपासून काही लाखो वर्ष जुनी आहे. त्याआधी भारतातील समाज हा भटक्या स्वरूपात होता. समूहाने राहणार होता व स्त्रीला पुरुषासोबत फिरणारा एक प्राणी असे मानणारा होता. या सर्व मानव जातीला वर्गवारी देण्याचे काम त्यांनी केले. तसेच स्त्रीला पूजनीय स्थान देण्याचे काम या ऋषींनी केले. म्हणजेच त्या काळात रानावनात भटकणाऱ्या समूहांना स्थिरता देण्याची काम त्यांनी केले व ईश्वरवाद निर्माण केला. त्याचा प्रसारही केला. ज्या काळात पृथ्वीवर इतर देशांची निर्मितीही झाली नव्हती त्यावेळी भारतात मानवजातीला स्थिर करण्याचे काम या ऋषींनी केले. अशा प्रकारची वेगळी दृष्टी देणारी माहिती प्रत्येक अवतारात आहे. त्यांचे वर्णन योग्य दाखले व समर्पक कथा देऊन अतिशय सुंदर असे केलेले आहे. शेवटच्या अवतारात म्हणजे कल्की अवतार. हा अवतार या कलियुगात होणार आहे असे आपली पुराणे सांगतात. आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की सगळीकडे अन्याय, भ्रष्टाचार, खोटेपणा, अत्याचार होतो आहे मग देव का येत नाही? देव आहे मग? याबद्दल आपल्यालाच प्रश्न विचारून ते अंतर्मुख होण्यासाठी शास्त्रशुद्ध विवेचन करतात. आपल्याला विचार करावयास भाग पाडतात. आपल्याला आपले आध्यात्मिक मूल्यमापन करावयास लावतात. मला वाटते हेच या पुस्तकाचे खरे यश आणि साध्य आहे. वरील स्पष्टीकरण देताना ते म्हणतात नवस केल्याने देव येतो का? चोरी केलेल्या पैशाची समान वाटणी करायला देव येतो का? वैयक्तिक सुखदुःख सोडवायला येतो का? तर याचे उत्तर निश्चित नाही असेच आहे. कारण माणसाचा जन्म हा केलेल्या संचित कर्माची फळे भोगण्यासाठी आहे. त्यापासून सुटका नाही. मग देव येतो कधी? तर भगवद्गगीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदाही धर्मस्य प्रमाणे ज्या ज्या वेळी धर्म संकटात येईल. पृथ्वीवर ईश्वराला मानणाऱ्या लोकांवर भीषण संकट येईल. त्या त्या वेळी ईश्वर अवतार घेऊन येईल. किंवा त्यावेळी धर्म कार्य करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी तरी तो येईल. पण देवाला अवतार घ्यावासा वाटेल अशी पार्श्वभूमी तयार झाली तर तो येईल. ही पार्श्वभूमी तयार कशी होईल? तर ईश्वर यावा यासाठी आपला प्रयत्न किती प्रामाणिक आहे यावर ते ठरते. यांत्रिक पद्धतीने प्रार्थना केल्याने नाही. तसेच धार्मिक कार्यात त्या ठिकाणच्या लोकांचा किती सहभाग आहे.  ते कार्य कोणत्या प्रकारचे आहे याचे सुंदर उदाहरणही ते देतात. राम अयोध्येतच का जन्माला आला? अवतार घेण्यासाठी वामनाने आई म्हणून आदितीचीच निवड का केली? तर त्या काळात आजूबाजूचा स्वैराचार पाहून आदिती रोज देवाची प्रार्थना करायची की खा! प्या!  मजा करा हेच जर जीवन असेल! ईश्वरवादाचा जर कोठेच अंश नसेल तर हे देवा!! मला पुत्रच नको देऊस. मला आई करू नकोस! पण तिची त्या मागची भूमिका ईश्वराला कळाली. देवाने जन्म घेण्यासाठी हीच जागा योग्य आहे विचार केला आणि विष्णूचा वामन अवतार जन्माला आला. असे सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे दाखले ते प्रत्येक अवतार का झाला? कुठे झाला? त्यांनी केलेले कार्य त्यावेळीची सामाजिक परिस्थिती याचे ते साधक आणि बाधक दोन्ही बाजूंनी विचार व्यक्त करून  विशद करतात.  कल्की हा विष्णूचा दहावा अवतार असेल. हा अवतार घेऊन भगवान विष्णू समाजाला निष्कलंक, दिव्य, भव्य बनवतील अशी आमची पुराणे सांगतात. ते असे म्हणतात की विश्वातील सर्वात सूक्ष्म घटकांचे रहस्य उलगडायला माणसाला जर हजारो वर्षे लागली तर विश्वाचा निर्माता आणि त्याचे अवतार समजायला आपण बुद्धीचाही वेग वाढवला पाहिजे. म्हणजे मग सर्व काही प्रकाशमान दिसेल परोक्ष, भुत, भविष्य ज्ञान प्राप्त होईल. पुढे ते प्रश्नचिन्ह देतात म्हणजे आपण किती अल्प आहोत. ईश्वरापासून, त्याच्या जाणीवेपासून किती दूर आहोत असे वाटायला लागते. ईश्वर कोणत्या स्वरूपात व्यक्त होतो, हे अवतार थोडक्यात समजावण्यासाठी हे एक दाखला सांगतात उदा. एखाद्या माणसाचा मुलगा आहे तो माणूस म्हणजे ईश्वर व मुलगा म्हणजे जनसमुदाय, समाज, भक्त असे थोड्यावेळासाठी समजू. हा मुलगा लांब परगावी शिकायला आहे. तो अडचणीत आला आहे हे वडिलांना कळले तर वडील प्रथम काय करतील? तर त्या गावात आपले कोणी आहे का! त्यांना फोन करतील, कळवतील अडचणीत त्याला मदत करा म्हणतील. त्याला अल्पकाळासाठी कोणी मदतही करतील त्याला तशी बुद्धी होणे म्हणजे ईश्वरी शक्तीचा एखाद्याच्या शरीरात प्रवेश होणे असते. हा अल्पकाळासाठीचा प्रवेश म्हणजे आवेश असतो. (उदा. शिवाजी महाराजांमध्ये युद्धाच्या वेळी भवानीचा संचार होत असे.) दुसरं हा मुलगा थोडा अधिक संकटात सापडला तर वडील काय करतात! स्वतः कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या जवळच्या खास माणसाला मदतीसाठी पाठवतात. संकट दूर करायला सांगतात. तसेच वेदव्यास, वशिष्ठ यासारखे अनेक ऋषी म्हणजे देखील ईश्वरवादी निर्मितीसाठीची खास माणसेच आहेत यांना म्हणावयाचे अंशावतार आणि जेव्हा मुलावर गंभीर संकट येते तेव्हा मात्र ज्याप्रमाणे प्रत्यक्ष त्या मुलाचे वडील त्या गावाला जाऊन त्याची मदत करतात. त्याचप्रमाणे या पृथ्वीवरची संकटे जेव्हा गंभीर होतात. तेव्हा राम,कृष्ण यासारख्या अवतारातून प्रत्यक्ष प्रभू ईश्वरच प्रकट होतात. आपला पिता, आधार बनूनच आपल्यासाठी येतात.
एक प्रकारची आकस्मिक ओढ लागते व आपण पूर्ण एकाग्रतेने सर्व गोष्टी वाचन करू लागतो. कदाचित अध्यात्मिक पुस्तकाची ती किमया असेल किंवा ते पुराणे इतकी अर्थभरीत, दिव्य आहेत की आवड असणाऱ्यांसाठी अशी पुस्तके म्हणजे मेजवानीच. पुढे त्यांनी एक दहाअवतारांचे अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे. प्रत्येक अवताराचे स्पष्टीकरण इथे परिचयात देता येणे शक्य नाही. कारण मला असे वाटते माझी ती योग्यताही नाही. ते प्रत्यक्ष वाचल्यानंतर अधिक स्पष्ट होतील. पण ज्या काही खास स्मरणार्थ राहिलेल्या व नवीन  गोष्टी ज्या मला सांगाव्याशा वाटल्या त्या लिहीत आहे. ईश्वरी शक्तीचा दुसरी गोष्ट भक्त प्रल्हाद आणि त्याचे वडील हिरण्यकश्यप सर्वांना माहीत आहे.  नरसिंह अवताराची आपण जी गोष्ट ऐकली त्यामध्ये अर्धे शरीर मानवाचे व चेहरा सिंहाचा असा देव आणि तो खांबातून प्रकट होतो व त्या राक्षसाला ठार मारतो. मुळात पूजनीय दादा म्हणतात की अलीकडच्या काळात काही लोकांनी पुराणातील कथांना चमत्कारिकतेचीच जास्त जोड दिली,  त्या प्रसारित केल्या याचा बुद्धिवंतांना काही अर्थ लागत नाही असे वाटते की बुद्धिवादी लोक स्वीकार करत नाहीत. यासाठी ते सांगतात की ही कथा सत्य आहे. असत्य नाही. फक्त ती आपल्यासमोर चुकीच्या पद्धतीने आली आहे. नरसिंह अवताराबद्दल ते म्हणतात हिरण्यकश्यप हा नास्तिक होता व जडवादी होता. त्याच्या राज्यात देवाचे नाव घेणे गुन्हा होता. ईश्वर भक्ती करणाऱ्यांना तो अतिशय कडक शासन करीत असे. त्याच्या अत्याचाराच्या भीतीने लोक त्याच्या समोर देखील येत नसत. त्याला भिऊन राहत असत. नेमका स्वतःचाच मुलगा ईश्वरवादी निघाला म्हणून त्याने त्याचीही गय केली नाही व त्याला मृत्यू दंडाची शिक्षा दिली. हे सर्व राजसभेमध्ये घडत होते.  त्या दोघांचा वाद चालू होता तो म्हणजे आस्तिक आणि नास्तिक वाद. हा वाद चालू असताना हिरण्यकश्यप त्याला म्हणाला कुठे आहे तुझा देव? आता या क्षणी येथे आहे का? त्याने देवालाच आव्हान दिले होते. तेथे असलेल्या सर्व ईश्वरवादी लोकांच्या अस्मितेचा तो प्रश्न होता. कुठे आहे देव म्हणून त्याने देवाच्या अस्तित्वावावरच प्रश्न निर्माण केला होता. अशावेळी समोर देव येणार नाही तर कधी येणार! त्या लोकातील एका जटाधारी, अकराळविक्राळ दिसणाऱ्या पुरुषाच्या शरीरात अंशावतार रूपाने देवाने प्रवेश केला .म्हणजेच ईश्वरवादी तत्वज्ञान व वृत्ती इतकी तीव्र  झाली आणि नरसिंह अवतार जन्माला आला. त्याने हिरण्यकश्यपचा पोट फाडून नाश केला. शेवटी आपले अलौकिक असे कार्य ईश्वर हे आपल्या भक्तांच्या मार्फतच पूर्ण करून घेत असतात. असे अंगावर रोमांच आणणारे, मंत्रमुग्ध करून टाकणारे अनेक दाखले माहिती प्रत्येक अवतारातील आहेत. जोपर्यंत राम आणि कृष्णावर निष्ठा आहे तोपर्यंत संस्कृतीनिष्ठ दैवी निष्ठा टिकून राहील. मानव जीवन उन्नत होईल. पूजनीय बापू केवळ अंधश्रद्धेने सर्व गोष्टीवर विश्वास, श्रद्धा ठेवायला लावत नाहीत. सर्व पातळीवर म्हणजे बौद्धिक, शास्त्रीय असे विश्लेषण करून अध्यात्माकडे आपल्याला आकृष्ट करून घेतात. हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. शेवटच्या उतारा म्हणजे कल्की अवतार संबंधित ते म्हणतात की आता वेळ येऊन पोहोचली आहे. देवाने विष्णूने अवतार घेण्याची. मग देव का येत नाही? पुढे आपल्याला अंतर्मुख होण्यासाठी त्यांनी अनेक प्रश्न विचार विचारलेले आहेत.  या कलियुगामध्ये एक आदर्श धर्मगुरू आणि आदर्श विचारवंत त्या सर्वश्रेष्ठ गुरूला व राजाला मानवांचा शासक म्हणून प्रस्थापित करतील. जगाला निष्कलंक करतील. त्यानंतर कलियुग समाप्त होईल आणि परत सत्य युगाचा प्रारंभ होईल. खरंतर भगवान येण्याची वेळ होऊन गेली आहे. कारण धर्म मुख्य ज्या गोष्टीवर आधारित असतो त्या म्हणजे ईश्वरासंबंधी विचार, सिद्धांत, कुटुंबसंस्था, अर्थकारण राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या सर्व गोष्टीतून धर्मविरोधीच कामे होत आहेत. म्हणून समाजाने आता ईश्वरी कार्यासाठी वेळ दिला पाहिजे. असे त्यांना वाटते ते म्हणतात की पूर्वजांचे अनुभव लक्षात घ्यावे. धर्म शक्तीची अभेद्य अशी भिंत तयार करा. ईश्वराला अवतार घेणे भागच पडेल. आपण नेहमी असा विचार करतो की; मी एकटाच काय करू शकतो? सगळ्यांनीच करायला पाहिजे? यासाठी एक छानशी गोष्ट सांगतात ते म्हणतात एका संध्याकाळी सूर्य मावळतिकडे निघाला आणि पृथ्वीवरच्या लोकांना विचारू लागला ;की मी बारा तासासाठी जाणार आहे. मी नसताना माझे काम कोण करणार आहे? जगाला प्रकाशित करण्याचे काम! त्यावेळी बुद्धिमान लोक म्हणतात आमचे काम वेगळे आहे हे काम आम्ही करू शकत नाही. व्यापारी लोक म्हणतात वेळ नाही. सत्ताधारी म्हणाले सत्ता, खुर्ची सांभाळणं किती डोकेदुखीचं काम आहे हे कधी करणार!! सर्वांनी नकार दिला एवढ्यात दोन पैशाची मातीची पणती म्हणाली,” हे प्रभू! तुम्ही निश्चिंत रहा!! मी जळत राहील, माझे जीवन जाळून जगाला प्रकाशित करीन! तुमच्या जवळूनच घेतलेल्या शक्तीने जोपर्यंत माझे जीवन चालत राहील तोपर्यंत मी जळत राहील! आपल्यालाही या मातीच्या पणतीची भूमिका घेऊन ईश्वरी कार्य, भक्ती करायची आहे. या पुस्तकाची समीक्षा किंवा त्या पुस्तकाबद्दल सांगण्याएवढी माझी बुद्धिमत्ता नक्कीच नाही. माझ्यासारख्याने अध्यात्मिक पुस्तकांची समीक्षा करणे तर अशक्यप्राय गोष्ट! मी या पुस्तकाची समीक्षा केली नाही तर जे मला पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटले, सांगावेसे वाटले सर्वांनी हे वाचावे असे वाटते. त्याचा हा छोटासा प्रयत्न काही संदर्भाचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी इतर पुस्तकांचा देखील दाखला घेतला आहे. उदाहरणार्थ:- कर्माचा सिद्धांत, गीतासार, पंचमाता. आवडीच्या विषयावर आपण वाचतोच तेच सांगण्याची संधी जर अशा दिनविशेच्या निमित्ताने मिळाली तर त्यासारखा योग तो काय असतो….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “मनुष्य गौरवदिनाच्या निमित्ताने…”