मधला मार्ग….

मधला मार्ग काढण्याचे कौशल्य म्हणजे तडजोड…. मला काय वाटते? यापेक्षा योग्य काय हे समजले की तडजोड करायला सोपे जाते. समाजमान्य व्यवस्था सुरळीत व्हाव्यात म्हणून जेवढे आवश्यक आणि शक्य होते तितकी तडजोड नक्कीच करावी. व्यवस्थापनातील आदर्श यशाचा मार्ग आहे. हे व्यवस्थापन समाजमान्य व्यवस्था म्हणजेच कुटुंब, नातेवाईक, कामाचे ठिकाण, परिसरातील व्यक्तींशी समायोजन, सामाजिक क्षेत्रातील गट, आपले कर्तव्य वगैरे सर्वच क्षेत्रात…. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती समाजशील म्हणून सहभागी होतो त्या त्या ठिकाणी हे कौशल्य उपयोगी पडते. तडजोड करणे म्हणजे अपमान, कमीपणा नाही किंवा मागे जाणेही नाही. आपले स्वप्न, आशा, आकांक्षा यांना मुरड घालणे नव्हे. जीवन व्यवस्थापनातील आदर्श यशाचा मधला मार्ग आहे. या मार्गावरून स्वतःला घेऊन जात असताना ही वाटचाल तडजोडीतून पूर्ण होत असते. एकाकी निर्णय उपयोगाचा नसतो कदाचित तो नकळत दबाव निर्माण करू शकतो. यासाठी संघटित निर्णय घ्यायला वेळ लागेल पण योग्य असा असतो. सर्वांच्या बाजू समजून घेणारा असतो. प्रत्येक जण स्वतः सक्रियपणे सहभागी असल्यामुळे मान्यता मिळवलेला असतो. “माझ्या सारखेच सगळे असावेत”. ” सर्वांनी मला माझ्या स्वभावासहं स्वीकारावं”. असे शक्य आहे का? म्हणूनच इतरांना समजून घेण्याआधी स्वतःला समजून घ्यावे. मी काय करत आहे? आणि नेमकं कशासाठी करत आहे? आयुष्यामध्ये मी स्वतःला कोणत्या स्थानावर पाहू इच्छितो/ इच्छिते? यामुळे योग्य त्या ठिकाणी, योग्य तडजोडी करणे सोपे जाते आणि ती तडजोड केली आहे असे न वाटता हे माझ्यासाठी, माझ्या सर्वांसाठी आवश्यकच होते. असा विचार सुरू होतो. कारण स्वयंपूर्ण कोणीच नसतो. तसे बनण्याचा प्रयत्न मात्र कमी अधिक प्रमाणात असू शकतो. यावर मात्र तडजोडीचे स्वरूप ठरते. परंतु तडजोड करणे म्हणजे क्षमता असतानाही संधी नाही म्हणून क्षमताच गमावून बसणे नव्हे. तडजोड म्हणजे आपले योग्य असतानाही वारंवार कायमचे शांत होऊन नकारात्मकता स्वीकारणे नव्हे. कधी शांत रहावे आणि कधी स्वाभिमानी हे समजलं की तडजोडही कळते. थोडक्यात मोडेन पण वाकणार नाही असा गर्व जाऊन यापुढे वाकणार नाही हा स्वाभिमान कोणत्या मूल्यांच्या बाबतीत बाळगावा हे समजले की तडजोड समजली. कदाचित यामुळे कधीकधी गैरसमज होऊ शकतात. इथे केवळ कृती योग्य, आत्मविश्वास, आपलं खरं असून चालत नाही. यासोबत सहनशीलता ही असावी लागते. संयम असावा लागतो. कारण प्रत्येकजण असा विचार करणारा नसतो प्रसंगी नुकसानही सोसण्याची तयारी असावी लागते. यामुळे समाधान मिळते. तडा जाईपर्यंत जोडणी कशासाठी? जोड असला की काही कारणाने वारंवार तडा जाणार हे ध्यानात ठेवून, अंदाज घेत हळूहळू  एकसंघता कशी येईल ? हा स्पष्ट विचार असावा आणि त्या दिशेने प्रयत्न असावेत. व्यक्तिविशेष असू नये तर व्यवस्थेत काय बदल करता येईल हा विचार असावा. यासाठी मतपरिवर्तन करण्याचे कौशल्य कामी येते. हे मतपरिवर्तनासाठी ठरवून केलेले प्रयत्न, मार्गदर्शन, समुपदेशन आणि कृती यामुळे काही अंशी शक्य होते. याचा अर्थ तडजोड करूच नये व तडजोडच करावी असा एकांगी निर्णय व विचार होत नाही. कशाची तडजोड करावी? आणि कशाची नाही? याचे भान आले की तडजोडीसाठी समजूतदारपणा, नम्रता, लवचिकता, सभ्यता आणि सहनशीलता आपोआपच येते. तडजोडीसाठी अडथळा असतो तो अहंकाराचा, मीच बरोबर आहे, वर्चस्व वृत्ती, मुळात या सर्व विचारांशी संबंधित गोष्टी असतात परंतु हे वैयक्तिक विचारच सामुहिक तडजोडीसाठी अडथळा किंवा उपयोगी ठरतात. तडजोड म्हणजे आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणे होय. परंतु संपूर्ण नातं मात्र कधीच तडजोड म्हणून आयुष्यात असू नये. काहीवेळेस समोरचा तडजोडच करणारा नसेल तर ती गोष्ट सोडून देणे योग्य. आयुष्यात सर्वच प्रश्न सुटत नसतात काही सोडून द्यावे लागतात हीसुद्धा एक तडजोडच असते. हे सर्व व्यक्तीच्या नियंत्रित विचारांवर अवलंबून असते. हे नियंत्रीत विचार तडजोडी मुळे शक्य होतीलही परंतु यामुळे परिस्थिती प्रत्यक्षात नियंत्रित होत नसते तर ती आपल्यासाठी आपण सोयीस्कर बनवतो. यासाठी फक्त आपण प्रयत्नशील असावे किंवा असू शकतो. तडजोड दोन्ही बाजूनी असेल तर यामध्ये स्वतःसहीत सर्वांचा फायदा असतो. परंतु एकाला कायम परिस्थिती स्वीकारून तडजोडच करावी लागत असेल कायम समजून घेण्याची परिस्थिती असेल मग मात्र तणाव निर्माण होतो. वाईट परिस्थिती तडजोडीने चांगली होऊ शकते परंतु बदलता येतेच असे नाही. चांगली का होते? तर ते स्वतःहून परिणामांचा विचार करून केलेली असते. निर्णयांना स्वीकारलेले असते. त्यात समाधान, आनंद शोधणे, आहे त्या व्यवस्थांचे रक्षण करणे, आणि कार्य तडीस नेणे हे हेतू किती साध्य होतील ठरते. कदाचित आज जे आहे त्याच्यात समाधान मानणे म्हणजे एक प्रकारे आशा-आकांक्षाची, भविष्याची केलेली तडजोड होय. कायम तडजोडच करावी लागत असेल तर मग मात्र गांभिर्याने विचार करावा लागतो. वारंवार केल्या जाणाऱ्या तडजोडीने सुद्धा स्वतःची ऊर्जा, बुद्धी, वेळ, प्रयत्न, यांचा उपयोग होतो परंतु व्यर्थ बिनकामाच्या गोष्टींसाठी जास्त प्रमाणात उपयोगात येण्याची शक्यता संभवते. परंतु यातून मार्गच निघत नाही असं कधीही होत नसतं. सक्षम आणि सकारात्मक विचारांवर हे ठरतं. कधीकधी दशा बदलण्यासाठी दिशा बदलणे सुद्धा तडजोडच आहे . परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत स्वतःहून हे बदल स्वीकारणे, परिस्थितीशी समायोजन करणे म्हणजे तडजोडच आहे. हा मधला मार्ग व्यक्ती, परिस्थिती यावरच ठरतो. व्यक्ती स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी किती सजग आहे, समजूतदार आहे यावरच ठरते. हा समजूतदारपणा येण्यासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव असावी लागते. वैयक्तिक आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचा आणि  व्यवस्थेचा विचार करावा लागतो. असे एकात एक व एकावर एक आधारित ही जोडसाखळी असते. ही साखळी जितकी सहज जोडता येते  तितके सहजपणे सर्व भुमिका पार पाडता येतात. ताणतणावाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा मधला मार्ग….दुर्लक्षित करून चालत नाही दैनंदिन व्यवहारात याचा परिणाम होतो व प्रयत्नपूर्वक बदलता ही येतो….

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 thoughts on “मधला मार्ग….”