भाव बदलला की सगळेच बदलते….
माणसे बदलत नसतात ! काही काळानंतर ती प्रत्यक्षात कशी आहेत समजायला लागते. आपली दृष्टी कोणत्या धारणांनी पहाते, जाणते यावर तात्काळ आणि तात्पुरता काढलेला निर्णय असतो. कधी कधी दिसते तसेच नसते….परंतु आपलेही चुकीचे असू शकते हेच मुळात आपण स्विकारत नाहीत. जेवढी माहिती तेवढाच व्यक्ती परिचय. तटस्थपणे व समीक्षण विरहीत जाणून घेणे मोठे कौशल्य आहे. हे क्वचितच पहायला मिळते. कारण आपल्या धारणा एवढ्या सत्य समजतो की कधी कधी सत्यापासून दूर जातो आणि धारणेलाच सत्य समजू लागतो.
जीवन जगण्यासाठी दिले आहे. सत्य शोधण्याचा प्रवास असेल कदाचित.. म्हणून कोणताच निर्णय, माहिती, ज्ञान, समज, धारणा वगैरे सत्य असत नाही. त्यात निरंतर भर पडत असतेच.
आपण समजतो परिस्थिती बदलली. सृष्टी सुद्धा निरंतर बदल स्विकारतेच की! कधी बहरते, कधी मोहरते, तर कधी ओसाडते. हा निसर्गनियम आपण का स्विकारू शकत नाही ? केवळ जीवनाचे बहरणे, मोहरणे याचाच अट्टाहास ! कायम यासाठी अट्टाहास करत असताना नकळत ताण येत असतो. कायम एकच स्थिती राहणे शक्य आहे का? परिस्थिती कोणतीही असो बदलणारच असते हे एकदा लक्षात आले की आपणही सहजपणे सगळे स्विकारायला लागतो.थोडक्यात काय तर लादले की ओझ वाटायला लागतं, झेलले की निसटून जाऊ शकते आणि याउलट स्विकारले की जबाबदारी, आवड, समाधान, विश्वास वगैरे वगैरे…. तीच गोष्ट पण फक्त विचारात बदल.
बदल होत रहाणे प्रवाही असण्याचे लक्षण आहे. प्रवाही असणारे पाणी स्वच्छ, नितळ असते. एकाच स्थितीत थांबलो की सगळच थांबते. गती, स्थिती, किंवा परिस्थिती जागच्याजागी रहाते मग हळूहळू साचलेपण यायला लागते, गढुळपणा वाढतो… विचारांचे डबके साचले की, कशाचाच उपयोग होत नाही. सगळंच आटून बसते. अगदी त्या डबक्यासारखे हळूहळू आपले अस्तित्व कोरडंठक्क, भेगाळलेल्या मातीच्या पोपडासारखं वरवर निघत रहात…. जमिनीशी नातं गमावून स्वतः सोबत भोवताल वेदनादायक….
स्वच्छ, सुंदर, नितळ,निखळ, खळाळून वाहणारे पाणी सर्वांनाच हवे असते. मग प्रयत्नही सर्वांचेच व्हायला नको का!! मोकळेपणाने, प्रामाणिकपणे आपापल्या कामात कार्यमग्न राहून किंतु, परंतु सोडून हसत,हसवत दुःख काठाला लावत वाहता आले की प्रवाही होता येते. आपोआपच आपण पुढे पुढे सरकायला लागततो. स्वतःहून त्यात सहभागी होता आले पाहिजे…. प्रवाहीपणा असणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. यासाठी हे बदल होणे याची अपरिहार्यता असते. जगणे आणि प्रवाहीपणे जगणे यात हाच फरक आहे. जगणं केवळ स्वतः पुरते मर्यादित होऊन बसते. हळूहळू संकोचते याउलट प्रवाहीपण अनावश्यक काठाला लावत पुढे जात भोवताल आनंदी करत जाते…
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
5 thoughts on “प्रवाहीपणा हवाच !….”
मनातील भावतरंग अतिशय सुरेखपणे उमटत जात आहेत. शब्दांकन सुरेख
खूप छान लिखाण👍👌
सुरेख!
wastadarshi sunder wichar
थांबला तो संपला👍👌