प्रतिमा आणि प्रतिभा….

जागतिक पुस्तक दिन असो की वाचन दिन किंवा साहित्याशी संबंधित कोणताही दिन पुस्तकांची, वाचन संस्कृतीच्या साधकबाधक विचारांची चर्चा, सुविचार, महत्त्व आणि मतं वगैरे याशिवाय पोरका वाटणारचं !! म्हणून जरा काय चाललय?

वाचन संस्कृती पुर्वापार होती, आहे आणि रहाणार… यात तीळ मात्र शंका नाही. वाचन कधी वैयक्तिक तर कधी सामुहिक परंतु प्रवाह मात्र अखंडपणे सुरू आहे. अगदी प्राचीन काळापासून उपलब्ध असलेली पौराणिक ग्रंथसंपदा, आश्रमातील सामुदायिक मौखिक मंत्रपठण, गावोगावी आयोजित पौराणिक कथा, पारायण यांचे सामुदायिक वाचन होत असते…म्हणजे कधी आपल्याला वाचता येत नसले तरी सर्वांसोबत वाचन होऊन जाते. वाचन संस्कृती जपण्यासाठी ही व्यवस्था असेल. घरात वाचन होत असलेल्या कथा, कहाण्या सुद्धा किती आवडीने, भक्तिभावाने वाचल्या जातात. व्रताच्या निमित्ताने सांगितल्या जातात. पाळणा, ओव्या म्हणजे सगळं पुस्तकात नसले तरी पिढीदर पिढी हे श्रवण, भाषण हस्तांतरण सुरूच आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.. जिथे विविध स्वरुपातील वाचन हे आपल्या दैनंदिन जीवनाचेे अविभाज्य अंग आहे. महत्त्वाचे आहे  हे लक्षात येते.

खरेतर या वाचन संस्कृतीचे चर्चाप्रवाह कधी थांबणारे नसतात. काळानुसार, समाज व्यवस्थेनुसार अनेक गोष्टींचा संगम या प्रवाहात होतो. व्हायला लागतो. संगमच म्हणावा लागेल कारण नवनवीन विचार, पद्धती काळाप्रमाणे एकत्र येतात आणि प्रवाह सर्वांना सामावून घेत पुढे पुढे जात असतो. चांगले, वाईट सर्व सामावून घेत शेवटी चांगले तेवढे टिकवतो.  मुळ प्रवाह कधी आटत नसतो. यामुळे पुर्वी होते आता नाही या पेक्षा बदललेले स्वरूप लक्षात घ्यावे लागते. पुस्तक, वाचन, लेखन, एकंदरीत साहित्य सर्वांचा मिळून एकत्रित प्रवाह  बनतो व या वाचनसंस्कृतीला दिशा देत असतो. यावरून भाषा, मातृभाषा, कोणते साहित्य वाचनीय, दर्जेदार वगैरे अशी विभागणी देखिल सुरू होते. प्रत्येक लिखित नवनिर्मिती ही वाचकासाठी साहित्याचा अविष्कार असते व ती कोणत्याही समीक्षणाने बदलत नसते. केवळ वैयक्तिक पातळीवर स्वतःचे मत असू शकते. ही चर्चा आणि मतं कधी कधी वाचन, पुस्तक यांंचा तठस्थपणे विचार, विषयांना डावलून लेखक, अनावश्यक गोष्टींचा ऊहापोह केला जातो. अगदी पुस्तकांना देखिल वेगवेगळ्या विचार धारा कप्प्यात बसवतात.. साहित्यिक दृष्टीने समजूनही घेता येईल परंतु साहित्य अश्या पद्धतीने बंदिस्त असते का? नक्कीच नाही !!

व्यक्ती ज्या अनुभव, भौगोलिक परिस्थिती, समाज, काळात, विचारांनी, प्रसंगानी समृद्ध झालेली आहे, तोच अनुभव व्यक्त करणार, प्रत्येकाने एकाच पठडीत बसावे, याच पद्धतीने लिहावे, हेच वाचावे म्हणजे मूळ साहित्य वृत्तीला छेद देण्यासारखे आहे…. हा विषय जोरदार आहे म्हणून हेच वाचले, लिहिले पाहिजे तरच  मी चांगला वाचक, लेखक वगैरे असे काही नसते आणि असू नये.  कारण तरच  खरी अभिव्यक्ती होत राहील नाहीतर बाकी मुखवटे तर भरपूर आहेतच की ! जो अनुभव कागदावर उतरून काढण्यासाठी उस्फुर्तपणे तयार असतो काय फरक पडतो कोणी लिहीला, कोणत्या भाषेत लिहिला…शेवटी तो वाचकाला कोणत्या पातळीवर घेऊन गेला हेच महत्त्वाचे ! सर्जनशीलता, वास्तविकता किती हा सर्वात मोठा मुद्दा असावा. अश्या विविध अभिव्यक्तीला वळण द्यायचे कोणी ! लिहिणाराने की वाचणाराने? आणि असे ठरवून वळण देता येत नसते कारण लेखनीशी प्रामाणिकपणा असणे हा वाचकाशी प्रामाणिक असण्याचा पहिला नियम असतो. अगदी जे आहे जसे आहे तसे व्यक्त होणाऱ्या पुस्तकांना प्रामाणिक असून देखिल टिकेचा धनी विनाकारण व्हावेच लागलेले आहे. ग्रामीण, स्त्रीसाहित्य, बालसाहित्य, कल्पनारम्य… प्रकार कोणताही असू देत ! खरा वाचक, वाचता वाचता एकांतात सुद्धा वाह ! क्या बात है ! म्हणून दाद देतच असतो. मग क्षणभराने कधी कधी भुमिका, औपचारिकता, विचार गट वगैरे त्याला स्वतःची व्यक्तिविशेषणं लावून कधी कधी दर्जेदार साहित्याला सुद्धा अनावश्यक आयाम लावतो. विनाकारण अट्टाहास!

वाचने म्हणजे वाचनेच असावे तटस्थपणे !
पूर्ण वाचन झाल्यावर आपोआपच प्रतिसाद निर्माण होत असतो, देत असतो, तो खरा वाचक…. जो काही अभिप्राय असेल तो खरा असेेेल.
हे असे वाचनानंतरचे मत पूर्वग्रहदूषित नसते…ते खरे समीक्षण देखिल असते… चांगला वाचक चांगला समीक्षक असतो.

समोर येणारा रद्दीचा कागद सुद्धा फेकता फेकता वाचल्या जातो. वाचणारासाठी तो नवा वाचन अनुभव असतो. खास मखमली कापडी पिशवीत जपून ठेवलेले पुजनीय ग्रंथ वारंवार वाचल्या जातात, दरवेळी नवीन ज्ञान झाल्याचा भास होतो. जीवनाचे तत्त्वज्ञान रस्त्यावरून भरकटू देत नाहीत.. जुनीपुरानी फाटकी पत्रे सुद्धा पुन्हा पुन्हा वाचली जातात. मुलांच्या जपून ठेवलेल्या वह्या सुद्धा कालांतराने किती भावनिकतेने वाचल्या ,पाहिल्या जातात.
सध्याचेच पहा आज एक वर्ष होत आले आपली सकाळ वर्तमान पत्राशिवाय कशी जाणवत आहे…ही वर्तमानपत्र वाचनाची तहान कशानेेेच भागत नाहीये. प्रसन्न सकाळ, चहा आणि वर्तमानपत्र प्रत्येकजण कमतरता अनुभवत आहे.
प्रत्येकजण काहीतरी वाचत असतोच… कमी अधिक प्रमाण असते. बस्स एवढेच !!

यासाठी पुर्ण वाचनसंस्कृती धोक्यात आहे, हल्ली मुुुलं वाचत नाहीत ! वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. काल्पनिक नकारात्मक विचार आणि मुले वाचतच नाहीत काय करावे? असा विचार करण्यापेक्षा आजची पिढी काय वाचत आहे हे लक्षात आले तर हा प्रवाह पुर्वीपेक्षा विस्तारला आहे. खूप मोठा होतो आहे हे नक्कीच लक्षात येईल.

म्हणून सहज एक नजर काय वाचतात हल्ली मुलं, मुली… तरूण पिढी. कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
हो ! फक्त प्रकार बदलले आहेत….
कमी वेळात, हातासरशी येणारी, साहित्यिक आवश्यक तंत्रज्ञान असलेले साधनं उपलब्ध आहेत. सर्वांना हवी देखिल आहेत. फक्त काहीजण नाक मुरडून स्विकारतात तर काहीजण काळाची पावलं ओळखून इतकाच फरक आहे. प्रवासात पुस्तकाचे ओझे नको म्हणून, audio books, e-book, tab, Kindle.. कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत.
खूप पाल्हाळ लावुन लांबलचक काल्पनिक कथेत रमणारी पिढी नाही आहे हे मान्य करावे लागेल… त्यांना तात्काळ परिणाम देणारी, थोडक्यात, कमी वेळात खूप माहिती उपलब्ध असणारं अस काहीतरी आवडतयं ! आवडत्या लेखकांचे दररोजचे blog writing वाचते ही पिढी, real life hero चे आत्मचरित्र वाचते… Success story वाचायला आवडतात… अगदी मनापासून दाद देेते…  सध्या तर अभ्यास पुस्तकांंचे वाचन करून स्वयंअध्ययन पद्धतीने शिकत देखील आहे.  विविध कलांची माहिती  वाचते, आदर करते. आत्मसात करण्याचा प्रयत्न देखील मनापासून करते. प्रत्येकजण स्वतःच्या कामासोबत एक कला देखिल शिकतात.  एवढेच काय  दिसामाजी काहीतरी लिहीत जावे या उक्तीप्रमाणे स्वतःबद्दल, निसर्ग पर्यटन, दिवसभरातील विशेष गोष्टी, एखादं छोटंसं यश, मित्र-मैत्रिणींचा, आई वडिलांचा वाढदिवस, आलेला वाईट प्रसंग… अगदी मोकळ्या मनाने दररोजचा दररोज पोस्टच्या माध्यमातून काही ना काही लिहितात देखील.. कुठे प्रवाह बंद पडलाय? वाचन आणि लेखन सुद्धा अव्याहतपणे सुरूच आहे… यातूनच तर साहित्यिक, लेखक , वाचक तयार होणार आहेत दुसऱ्या परग्रहावरून थोडीच येणार आहेत. On line trend मध्ये काय आहे. कोणता विषय सगळ्यात जास्त चर्चेत आहे. दररोजच्या दररोज वाचते ही पिढी…फक्त गेेम आणि फॅशन विषयी वाचत नाही..  आरोग्यदायी आहार विषयक रेसिपी सुद्धा वाचते, नवनवीन प्रयोग करून पहाते. दरवेळी आईवडील सोबत थोडीच असतात. वाचूनच शहाणी होत आहेत. Time machine,  star war सारख्या वैज्ञानिक कथा वाचतात. अगदी सगळी माहिती update ठेवतेय पिढी, वाचतेय आणि ते सुद्धा वरवरची माहिती नाही बरं ! अध्यात्म, योगा, नैसर्गिक जीवन पद्धती, काय काय म्हणजे कोणताच विषय यांना निषिद्ध नाही फक्त पुस्तकाचे स्वरूप बदललय….वेगवेगळ्या app, site च्या  माध्यमातून, digital publication आणि विविध platform च्या माध्यमातून हे सुरू आहे… वेगवेगळ्या साईटवर विविध भाषेतील रूपांतरित अगणित पुस्तके उपलब्ध आहेत. जागतिक ग्रंथालय नजरेच्या टप्प्यात आले आहे.  आपण वस्तू  कश्या निवडतो तसचं पुस्तक निवडायचे…. त्याबद्दलची विविध वाचकांची अभिप्राय, मतं वाचायची पुस्तकाच्या अंतरंगात काय आहे ते  दोन-तीन पानात वाचून काढायचे. आवडले ठीक, नाहीतर दुसरे पुस्तक चाळायला तयार…. काय निष्कर्ष ? म्हणजे वाचकांची कमी आधीही नाही आताही नाही.  ही काही उदाहरणेे सांगितली आहेत.. प्रत्यक्षात यापेक्षा बऱेेच पर्याय आणि व्यासपीठ उपलब्ध आहेत.

सध्या तर या काळात सगळ्यात जास्त पुस्तके वाचली जात आहेत. प्रत्यक्ष लेखकाशी बोलता येते, चर्चा करता येते, अभिप्राय देता येतो. आणखी काय हवं वाचनाची आवड असणाऱ्यांना !!

वाचनवेड्यांची सुखाची कल्पना एकच असते. मस्त पहाटे  उठावे. बाजूला आवडीच्या विषयाची पुस्तकं,  कोरी पाने,  वाटेल तेव्हा लिहून काढलेले टिपणकागदं, मस्त अक्षर येणारा पेन, सगळा आवडीचाच पसारा…. चहा किंवा कॉफी आणि वाचत बसणे…कंटाळा आलाच तर पुस्तक बदलणे, नाहीतर लिहित बसणे… आणि हे सगळं करताना कोणीही अडथळा करू नये… आणि रात्री झोपेपर्यंत असाच वेळ पुस्तकात आणि लिहिण्यात निघून जावा… बस्स !! पुन्हा तशीच पहाट…. आणखी काय हवे?

अश्या वाचनप्रेमींचे group सुद्धा खूप क्रियाशील आहेत… अगदी साहित्यप्रकारानुसार ते ठराविक लेखकांच्या वाचकवर्गाचे सुध्दा ! नेमके आपल्याला काय हवय? माहिती असायला हवं. शोध घ्यायला वेळ पुरणार नाही इतकी विविधता आणि उपलब्धता. दैनंदिन लेखन, वाचन, पुस्तक परिचय सुरूच असतो. एकमेकांना कोणतेे पुुुस्तक वाचावे ! वाचलेल्या पुस्तकात काय आहे ! याविषयी विचारांची देवाण-घेवाण सुरु असते. वाचनसंस्कृतीचे अभिसरण नाहीतर काय आहे… आपल्या पिढीपेक्षा खूप प्रामाणिकपणे व्यक्त होते ही नवीन पिढी.. अगदी दिलखुलासपणे सहभागी होते वाचन, लेखनात…अभिव्यक्तीमध्ये.

आपल्या समोर समाजमाध्यमातून, साहित्यामधून काय येणार ? हे आपण ठरवू शकत नाहीत… दिशाभूल, फसवी विचारसरणी, आभासी सत्य, विचलित अवस्था तर सकारात्मक, संवेदनशील, सामाजिक, मनोरंजक वगैरे अगदी सर्व प्रकार येत रहाणार !
वाचत जावे… फक्त वाचत जावे….हाती येईल ते, नजरेस पडेल ते … कोणी लिहिले ? का लिहिले ? हेतू काय ? कोणते साहित्य वाचतो आहे ?  लगेच समीक्षक होण्याची आवश्यकता नसते.
हा स्वतःच्या आणि इतरांच्या प्रतिमेचा प्रश्न होऊ नये तर काय वाचतो, किती वाचतो हा स्वतःच्या प्रतिभेचा प्रश्न झाला पाहिजे…..उत्तर स्वतःकडून मिळतच असते.
साहित्यात चौकटी ठरवल्या की मग ती वाचन मर्यादेची  चौकट… चौकटीबाहेरचे विचार करू देत नाही… वाचनात सर्वसमावेशकता येत नाही….
सर्व प्रकारचे साहित्य जाणून घेणे हे साहित्याच्या अभ्यासासाठी व वाचन समृद्ध होण्यासाठी देखिल उपयुक्त असते. चांगला वाचक होण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न यशस्वी करतात.
ठराविक काळानंतर तर कोणतेच प्रश्न देखिल उपस्थित होणार नाहीत. कारण हे वाचनं, पुस्तकं, आपोआप शिकवतात. ती दृष्टी तयार होत असते…

राजहंसासारखे पाण्यातून दूध नक्की वेगळे करता येते. कारण सर्व प्रकारचे वाचनच तिथपर्यंत घेऊन जात असते.  शेवटी यासाठी काय?  पुस्तके, हाती पडेल ते साहित्य वाचत राहणे महत्त्वाचे….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

16 thoughts on “प्रतिमा आणि प्रतिभा….”