दिवसाचे सोपस्कार करून झाले.घरातील सर्वजण,भेटायला येणारे नातेवाईकांचे रडणे, सांत्वन ऐकून, बोलून, थकून झोपले होते….ती मात्र आज समाधानाने,भयमुक्त होऊन बाळाकडे पाहून शांत झोपली होती. तिचा संसार नव्याने सुरु होणार होता. एका तपानंतर शांत चेहरा उत्साही दिसत होता. सगळा भूतकाळ विसरणार होती. ठरवून केलेलं अगदी सगळंकाही. तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता!कामाला गेल्यावर घरी तरुण पोरीला कोणी सांभाळायचं ? टांगती तलवार ! हुशार, चुणचुणीत पोर वनिता…. शिक्षणाचं दार अर्धवट बंद करून… आईवडिलांनी संसाराचं दार उघडून दिले.
नव्याचे नऊ दिवस सरले ! गोड कौतुकही झाले. वनिता संसारात चांगलीच रमली होती. कामाची सवय, उरक, आवड पहिल्यापासूनच होती. लहान वयात भावाला सांभाळणे, शाळेसोबतच घरातील आणि शेतीतील कामांची ही ओळख होती. वनिता सासरच्या सगळ्यांची आवडती बनली होती. लहान मुलांपासून ते घरातील आजेसासू पर्यंत लाडकी झाली होती. सगळ्यांचीच ताई झाली होती. सासरे जरा जास्तच लाड करायचे त्यामुळे वनिताला वडिलांचीही आठवण येत नव्हती. पहाटे सडा-सारवण पासून रात्री बाज टाकण्यापर्यंतची सगळी कामे मन लावून करायची. सगळे व्यवस्थित चालले होते. अशा गुणी वनिताला नवरा जीवापाड सांभाळणार नाही तर नवलच ! खूप जीव लावायचा. तिच्या छोट्या छोट्या आवडी जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा. आई-वडील भेटून गेले. पोरीचा भरला संसार पाहून निश्चिंत झाले होते. हे सगळं रोखून पाहणारी नजर मात्र वनिताच्या बारीक नजरेतून सुटत नव्हती, पण ती ठरवून दुर्लक्ष करायची. सुरुवातीला तिच्या लक्षात येत नव्हतं पण चहा देतांंनाचा होणारा स्पर्श चुकून का मुद्दामून असेल? असे छोटे छोटे प्रश्न तिला दिवसभर सतावत असत. एका घरात राहणारी एवढी माणसं ! प्रत्येकवेळी कुठे कुठे आणि काय काय लक्षात ठेवणार? सगळी वडीलधारी मंडळी. उगीचच वनिताचे मन वरमलं. स्वतःलाच तिनं समजावून सांगितलं काहीतरीच काय! जीव लावणारी जीव लावून घेणारी वनिता आपल्या कामात पुन्हा गुंग झाली. पाच सहा वर्ष झाले घरात पाळणा हलत नव्हता. नातेवाईक, शेजारणी, माहेरवाशिनींंना तिच्या पेक्षा जास्त घोर लागला होता… देव देव, गंडे-दोरे, नवस सगळं करून झाले होते. मुलाला आणि सुनेला दवाखान्यात जा असे सांगण्यापेक्षा, सासरे भलते-सलते उपाय सांगू लागले. वडीलकीच्या नात्याने वनिता ऐकू लागली होती पण धरलेला हात आणि केलेली बात…. ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता सासऱ्यांना बाहेरचे लोक मात्र सल्ला देऊ लागले, “किती दिवस वाट पाहायची?” मुलाचे दुसरे लग्न लावून देऊयात ! वनिता आता एकदम शांत झाली होती. घरात फारशी बोलत नसे. लवकर काम आटोपून शेतात जायची. शेतातलं काम आटोपून संध्याकाळ व्हायच्या आत घरी यायची. आता सासरा आणि ती एकत्र काम करताना कधीच दिसत नव्हते. नवरा बायकोची कधी नव्हे ती रोज भांडणं व्हायला लागली.
एक दिवस घरातील चित्र अचानक बदललेले घरात तिच्या भोवती धूप, अंगारा काय काय हवं ते सगळ हजर ! शेजारच्या बाया माळपरडी घेऊन जमा झालेल्या होत्या. देवी अंगात आलेल्या वनिताला शांत करू लागल्या होत्या. एरव्ही वनिताचं म्हणन ऐकून घ्यायला वेळ नसलेले घरातले गडीमाणसांसहीत सगळे…कोप होऊ नये म्हणून… देवी काय म्हणत आहे? काय मागत आहे ? लक्ष देऊन ऐकू लागले. वनिताच्या अंगात आलेली देवी “एकांत” मागत होती. कोणत्याही पुरुषाची, घरातल्या एकाही पुरुषाची सावली माझ्यावर पडू देऊ नका म्हणून ओरडून-ओरडून पुन्हा पुन्हा सांगत होती. एकदम शांत असलेली वनिता आज दुर्गेच्या अवतारात, भवानीच्या अवतारात असल्यासारखी दिसत होती. लांबसडक मोकळे केस, गोल मोठे कुंकू. डोळ्यात मात्र स्वरक्षणासाठी घेतलेला देवीचा आधार दिसत होता. एकवटलेली हिंमत दिसत होती. तिला मार्ग सापडला होता. आता बहुतेक हाच मार्ग तिचे कवचकुंडल बनणार होता. रोखणाऱ्या नजरेसहित सगळे तिचं दर्शन घेत होते. आदरयुक्त घाबरून तिच्यापासून थोडं अंतर ठेवून वागत होते. हे आता ठराविक दिवसांत सर्वांच्या सवयीचे झाले होते. नवराही तिची पुन्हा एकदा काळजी घेऊ लागला होता. मित्रांच्या सांगण्यावरून दोघेही नियमित दवाखान्यात जाऊ लागले होते. अशातच तिला दिवस गेले. घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले होते. अंगात देवीचा संचार झाल्यानंतर जोरजोरात ओरडणारी, आकांडतांडव करत फिरणारी, कधी देवीचा कोप झालाय! सांगून समोरचे हळदी-कुंकूवाचे ताट दोन्ही हाताने उधळून… रडून-रडून शरीर थकले कि निष्प्राण झाल्यासारखी तासनतास झोपणारी वनिता, आता पूर्ववत होऊ लागली होती. पोटातल्या बाळाची काळजी घेऊ लागली होती. देवीचा संचारही कमी होऊ लागला होता. माहेरी आली, आता संचार पूर्ण बंद झाला होता, म्हणून पुढील काही महिने बाळ तिच्याचपासून सुरक्षित राहावे म्हणून सासरच्या लोकांनी राहण्याची खुशीने परवानगी दिली होती. संचार म्हणजे कुंडलिनीचे कंपन असे काही जण मानतात. पण या कंपनामुळेच… या देवीच्या संचार मार्गामुळे.. ती स्वतःला सुरक्षित ठेवत होती. आता बंद झाल्यामुळे बाळ सुरक्षित असा इतरांचा समज…पण या दोन्हीही समजांमुळे बाळ आणि वनिता सुरक्षित. हळूहळू वनिता आता पहिल्यासारखी मूळ स्वभावात येऊ लागल्याचे इतरांना जाणवत होते. कामातील व्यवस्थितपणा, राहण्यातील टापटीपणा वगैरे वगैरे… सगळं ठरवून केल्यासारखं पुन्हा पूर्ववत होऊ लागले होते. बाळ आणि आई दोघांनाही बाळसे येऊ लागले होते.
एक दिवस भरदुपारी बातमी येऊन धडकली…. वनिताच्या सासऱ्यांचा अपघात झाला आहे आणि अपघात इतका भयानक कि सासरे जागेवरच मरण पावले होते. जवळचे नातेवाईक गोळा झाले. अचानक सगळी तयारी करून वनिताला निघायचे होते. तयारी झाली सासरी आली. छिन्नविच्छिन्न झालेल्या सासऱ्याच्या देहाचे अंतिम दर्शन कोणाला घेता आले नाही. याची खंत आणि अश्रू वनिताच्या डोळ्यात कोणालाच दिसले नाहीत. झोपलेल्या लहानथोर सगळ्यांवरून पुन्हा एकदा मायेने नजर फिरवत फिरवत… बाळावर नजर स्थिर करत शांतपणे झोपेतून उठल्यानंतर वनिता संसारासाठी सज्ज झाली होती. तिने स्वतःच स्वतःसाठी कवच-कुंडल बनवले होते. या कवचकुंडलानेच पावित्र्याचे रक्षण केले होते. अचानक झालेल्या त्या नजरेच्या पहिल्या वारा पासून ते शेवटच्या अपघातापर्यंत…
अश्याच शक्ती आणि युक्तीची कवचकुंडले देवी नक्कीच देत असेल का ? अबोलबालिकांना, मुलींना,स्त्रीयांना !!
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
9 thoughts on “देवीचे कवचकुंडल….”
अशीच शक्ती पेक्षा युक्ती वापरणे सध्या गरजेचे आहे.💐
शब्दांवाचून उमगते
खरचं !अनावश्यक शब्दांचा वापर न करताही.. शब्दांशिवाय..समजले, उमगले… अवतीभवती च्या कितीतरी अबोलींची अवस्थांची जाणवली,आठवली
हजारो वनितांची ही व्यथा आहे,पण ज्याचा त्याने मार्ग काढला की सगळं सोपं होतं!
र्हद्यस्पर्शी
कथालेखन शैली उत्कृष्ट, उत्सुकता वाढवणारी संदेश देणारी👌👍शांतपणे धीरगंभीर करणारी
इलुसा हा देह किती खोल डोह… चेहऱ्या मागचे चेहरे अबोल👍👌👌👌💐
कवचकुंडलाचं गुपीत..छान उलगड 👌👌
शक्ती पेक्षा युक्ती चांगली.. सुंदर लिहिले आहे👌👌👌
खूप सुंदर लेख.. अगदी सगळं चित्र समोर उभा राहतं..