थेट निसर्गातून प्रक्षेपण….

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सृष्टीची निर्मिती केली असेल असे संकेत आणि वातावरण आपण अनुभवतो. हा अनुभव एकदा मनाला जाणवला की, पुढील ऋतूंमधील सगळ्या निसर्ग व्यवस्था, बदल सृष्टी निर्मात्याने किती विचारपूर्वक घडवल्या आहेत हे देखिल लक्षात येते. या वसंतऋतू पासून सगळा निसर्गपट नजरेसमोर येवून मनामनात रमतो आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी निसर्ग साद घालत असतो. ही साद ऐकू येणारे हा निसर्ग अनुभव घेण्याचे टाळत नाहीत. अवतीभवती, डोंगर, दरी, रस्त्याच्या बाजूला, माळरानावर….कुठेही हे वसंताचे बहरणे सुरु झाले की प्रतिसाद देतातच. मोहक, शांत, निवांत क्षण, उत्साही, सळसळणारा, बहरणारा, गंधीत, मुग्ध, ज्याला जसा भावतो तसा जाणवतो… कितीतरी अलंकारिक शब्दांनी कौतुक करतात.  पर्यटन, विविध अर्थभरीत सुक्ष्म छटांचे निसर्ग छायाचित्र, पक्षीनिरीक्षण, वनभोजन, पायी फिरून, यासारख्या अनेक गोष्टी आपण करत असतो. कृतज्ञतेची भावना म्हणून विविध सण, दिनविशेषांच्या निमित्ताने पुजा, विधी करत असतो. याही पुढे जाऊन निसर्गाप्रती कर्तव्य म्हणून वृक्ष संगोपन, संवर्धन, संरक्षण, पक्षी, प्राण्यांसाठी अन्न पाण्याची देखिल सोय करतो. तर यापुढे जाऊन निसर्ग आणि मानवी जीवन कसे एकरूप आहे याची अनुभूती देखिल घेतो. अनुभूती घेण्यासाठी मात्र निसर्गमय व्हावे लागते. सुक्ष्मातले सुक्ष्म वेचण्याची दृष्टी हवी असते. आपण निसर्गाचा एक छोटासा अंश आहोत. आपले अस्तित्व त्याचाच एक भाग आहे म्हणून त्याचे सर्व नियम आपल्याला लागू आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे कृत्रिम  बदल आपण करू नये. शक्य असेल तर विधायक हातभार लावावा….विघातक विचार, प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास केवळ निसर्गाचा होणार नाही, तर पर्यायाने मानवी जीवन नाशाकडे जाईल. आपल्या पूर्वजांनी किती समर्थपणे ,समर्पक पद्धतीने सगळी व्यवस्था लावून दिली आहे. ती फक्त सांभाळून पुढच्या पिढीला द्यायची आहे.

निसर्गाच्या माध्यमातून सृष्टी काय संदेश देत आहे ! हे ओळखण्याचा प्रयत्न सतत करू शकतो.

सृष्टी आणि दृष्टीचा संगम, हा संगम समजावयाची आणि जगण्याची दिशा देण्याची जबाबदारी तीन ईश्वरीशक्तींवर आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर….. ब्रह्मनिर्मितीला भगवान विष्णू विविध अवतार घेऊन सृष्टीला सांभाळत रचनावादी कार्य पूर्णत्वास घेऊन जातात. या सृष्टी रचनेत कधी विघ्न येते, बिघाड होतो, चांगले काही लयाला चालले आहे अशी शंका जरी निर्माण झाली तेव्हा भगवान शंकर क्रोधित होऊन वाईट शक्तींना भस्म करून पुन्हा पूर्वस्थिती निर्माण करतात. सर्व काही पूर्वपदावर आणून ठेवतात. आपल्याला असे पारंपारिक दाखले, कथा माहिती आहेत. खरेतर या तीनही शक्ती परस्परपूरक सृष्ट कार्य करत असतात, म्हणून अवघ्या सृष्टीची रचना अश्या पद्धतीने केली आहे की, ज्यामुळे सर्व मानवी जीवन योग्य संदेश घेत जीवन व्यतीत करतील.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताआधी वर्षभरातील वाद, द्वेष मोकळेपणाने व्यक्त करून, वाईट विचार भस्म करून, जे जे नष्ट करण्यासारखे आहे ते विसरुन नव्याने सुरुवात करण्यासाठी होळी असते. एकमेकांच्या रंगात मिसळून रंगून जाणे. व्यक्तीव्यक्तीतील भेद मिटवून मानव आणि भगवान कृष्ण जिथे एकाकार होतात तो होळीचा, रंगपंचमीचा दिवस भव्य आणि दिव्य असणारच. अशी एकरूपतेची भावना या दिवशी होणे म्हणजे खरेतर सृष्टी निर्मितीचा दिवस साजरे करण्याची पूर्वतयारी असते. हा सकारात्मक विचार, आनंद, उल्हास घेऊन सृष्टी निर्मितीच्या दिवसाचे स्वागत करायचे असते. गुढीपाडव्यापासून निसर्ग प्रसन्न संकेत अनुभवायला देत असतो. निसर्ग उत्साहात फुलून स्वागताला तयार असतो….

कोवळी पालवी मृदू, मुलायम…
पिवळे गहिरे सोनस्फटिक…
मोहोरले आम्र, गंधीत आसमंत…
कोकीळ छेडे, तालस्वर निवांत..

शिशिर आणि वसंत फार जवळचे दोघे मिळून पानगळीच्या दुसऱ्याच क्षणी या नववर्षाच्या स्वागताला तयार असतात. काही झाडे तर फुलण्यासाठी इतकी अधीर असतात, जसे पळस, चाफा, बहावा, सावर…. पानांपेक्षा फुलेच जास्त. भरभरून सौंदर्य उधळण्याच्या स्पर्धेपेक्षा निसर्गोत्सव मनामनात विलोभनीय, मुग्ध करण्याकडे यांचे लक्ष जास्त असते . प्रत्येकाचे वैभव वेगळे पळस भडक रंगात डोंगरात उठून दिसणारा. अगदी नजरेच्या टप्प्यात येत नसला तरी रंग स्वतःहून लक्ष वेधून नजरेस पडणारा. सावर वृक्षाला तर सावर रे… सावर रे… म्हणण्याची वेळ येते.
आठवतय? बारीक पांढऱ्या रंगाच्या तंतुमय तलम रेषा, हात लावला तर गायब होतील इतक्या नाजूक, विटकरी रंगाचा मध्यभागी गोल ठिपका. आपले लक्ष नसताना हा नाजूक चांदणठिपका अलगद नजरेसमोर येतो. हळुवारपणे तो हातावर उतरवून घेण्यासाठी त्याच्याकडे पहात पहात… मागे धावत हाताशी धरून, परत हळुवार फुंकून पुन्हा वर वर उंच दूरवर आकाशात जाणारा! आठवला? (आठवला असेल नक्की!)
या सावराच्या नवनिर्मितीसाठी फिरणाऱ्या केसराला लहान मुले म्हातारी म्हणतात. सावराच्या झाडाची पाने गळू लागली की लाल रंगाची बोंडे येतात. या सगळ्या कळ्या अतिशय मनमोहक अशा फुलांमध्ये परावर्तित होतात. फुललेली फुले लाल भडक ताऱ्याप्रमाणे भासतात. कावळा, मैना, चिमण्या, पोपटांना… आकर्षित करतात. एकीकडे गुलमोहर हिरव्या, पोपटी पालवीमधून नाजूक केशरमय तुरे घेऊन स्वागताला उभा असतो. बहावा राजेशाही थाटात पिवळे, सोनेरी एकमेंकात गुंफवलेले सोन स्फटिकांचे घोस लटकवून एखाद्या राजाप्रमाणे दिमाखात उभा असतो. रानशेवगा नाजूक, बारीक फुलांची नक्षी तयार करत आडबाजूंना सजवत असतो. उरल्यासुरल्या डोंगरावर कडुलिंबाच्या मोहोराची नक्षी शेवग्याच्या फुलांपेक्षा बारीक नक्षी काढण्यासाठी तयार असतो. कडूनिबांच्या या मोहोराचा गंध कडू नसतो. मोगऱ्याची फुले दिवसरात्र सुगंधाची लयलूट करत असतात. सुकले तरी कितीतरी दिवस दरवळणारी ती नाजूक फुले! म्हणून तर सर्वांच्या आवडीची. ही आपली आवड जपण्यासाठी तर निसर्ग त्यांना फुलवतो. या सर्वांमध्ये आपले स्थिर अस्तित्व दाखवत असतो तो शांत, निवांत चाफ्याचा मुक्ततेचा, प्रसन्नतेचा सुवास. हा निसर्ग कितीतरी पटीने आणि पद्धतीने सौंदर्य मुक्तपणे उधळून बहाल करत असतो. हा निसर्ग अनुभवताना कशाचे भान राहत नाही. स्वतःचे अस्तित्व देखील जाणवत नाही. निसर्गमय होणे म्हणजे याहून दुसरे काय असते?

निसर्गाचे अस्तित्व फुलवण्यासाठी ही वसुंधरा सुंदर होते. जीवन सुंदर कसे करायचे असते! हा संदेश देण्यासाठी स्वतःहून ओसाड होऊन स्वतःच्याच अस्तित्वाचा काही काळ त्याग करते, झडते, पालवीने पुन्हा उगवते, फांदी फांदी मोहरते, कळ्या, फुले, फळांनी फुलते बहरून येते…शेवटी या सर्वांचे दान करते, दुसऱ्यासाठी सर्व काही अर्पण करून पुन्हा तेच ऋतूचक्र… जीवनाचे देखील असेच असते. नववर्षाचे स्वागत करत करत…यातून जीवनाचा संदेश देण्यासाठी तर हा वसंत फूलत नसेल ना !!                                                                          या शुभमुहूर्ता आधी, गुढीपाडव्याच्या दिवशी आणि नंतरचा हा सृष्टी संकेत दृष्टीत आला पाहिजे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या भारतीय पंचांग, दिनदर्शिका तयार करण्याची पद्धतींचा विचार केला की लक्षात येते त्या केवळ दिनदर्शिका नाहीत तर दिशादर्शक आहेत. अगदी निसर्ग,ऋतू, सण,जीवन यांची सांगड घातलेली आहे.

पहिला मास म्हणून अग्रस्थानी श्रीरामांचा जन्म या सृष्टीला सुस्थितीत ठेवण्यासाठी आदर्श रामराज्याची कल्पना हिंदू मनामनात आजही जागृत आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म देखिल चैत्रातला भक्तीभावाने सेवेत अर्पण होण्याचे प्रतीक, रक्षण करणाऱ्या यक्षदेवतेचा अवतार, यासाठी खेडोपाडी गावाच्या सीमेवर मंदिरांची निर्मिती आणि हनुमान मूर्तीची स्थापना असते. मांगल्य, आदर्शांचे असे जीवनातील सर्व प्रसंग निर्माण करणारी ही तिथी, हा नववर्षाचा दिवस… या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ प्रतीक असलेल्या या दिवसापासून प्रत्येकजण संकल्प करत असतो. प्रत्येक सजीवांचा सार्वत्रिक अनुभव चांगला व्हावा हीच ईश्वराची इच्छा असते. यासाठी पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी पुढेही जाव्यात यासाठी प्रयत्नशील राहण्याने देखील आनंद मिळतो.
नवीन वर्षाच्या थेट निसर्गातून प्रक्षेपित होणाऱ्या शुभेच्छा!

 

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 thoughts on “थेट निसर्गातून प्रक्षेपण….”