आपल्यावर किती ओझी आहेत ! असे प्रत्येकाला वाटते. कोणाला कशाचेही ओझे वाटू शकते. पती, पत्नी, पुत्र, असल्याचेही तर फॅक्टरीचा मालक किंवा नोकर असल्याचेही, काही जणांना तर दुसऱ्याला किती ओझे आहे याचेही ओझे वाटते! अशी कितीतरी ओझी केवळ मनात, विचारात मानलेली आणि समजलेली असतात. या समजण्यामुळे मात्र मनाचा जडपणा वाढतो. ही सर्व ओझी, जडपणा फेकून देता आला पाहिजे.
कोणालाही रोज तीच तीच कामे करून कंटाळा येतो. मन मरून जाते. त्यापेक्षा काही विशेष करता येते हे विशेष करण्यासाठी आपण आहोत. हे विशेष म्हणजे काही वेगळे नसते तर जे शेष राहिले आहे, रहाणार आहे यासाठी छोट्या छोट्या गोष्टी नाविन्यपूर्ण आणि आनंदानेे करणे असते. प्रत्येक वेळी जगावेगळे फार मोठे घडत नसते. जेे काम करतो तेच आवडीने करणे. आवडीचे काम शोधणे काहीतरी चांगले करत रहाणे महत्त्वाचे. यासाठी चिंतन आवश्यक असते. थोडे अंतर्मुख बनून, शांतपणे आत्मपरीक्षण करून, कुठपर्यंत आलो आहोत ? कुठे आहोत? हे शोधून काढायचे आणि कुठे जायचे आहे? ते नक्की करायचे.
पहिल्यांदा कामे करत राहा. समोर असतील, पडतील आणि येतील ती कामे करावी लागतात. हा कामाचा आणि व्यक्तींचा अनुभव आपल्या कामाची दिशा ठरविण्यासाठी उपयोगी पडतो. या दृष्टीने प्रत्येक काम हे केवळ काम न राहता व्यक्तीला विकसित करण्याचा प्रयोग असतो. माणसाला माणूस म्हणून जिथे गौरव मिळतो तिथे मजुरालाही प्रतिष्ठा मिळते या दृष्टीने विचार केल्यास या कार्याचे, कामाचे कार्यमग्नतेचे तीन प्रकार जाणवतात. एक सामान्य माणसांचा कर्मव्यवहार कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच करावा लागतो. भौतिक जगासाठी आवश्यक आहे. दुसरा स्वतःसोबत दुसऱ्यांच्या विकासासाठी काहीतरी चांगले निर्माण करण्यासाठी. तिसरा आत्म्याच्या प्रसन्नतेसाठी कार्यमग्न राहणे या तीनही प्रकारात कामाचे, कर्माची अनेक उपप्रकार देखील असतात. हे उपप्रकार व्यक्तीनुसार, विचारानुसार ठरतात. छंद, आवड , गरज, नाईलाज, जगरहाटी, जबाबदारी , काम करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून स्वीकारणे यासारख्या पद्धतीने काम करणारे बहुसंख्य असतात. या बहुसंख्य आणि पहिल्या प्रकारात मात्र थकवा, कंटाळा, नकारात्मकता, अपेक्षा, इच्छा, द्वेष, ईर्षा, कौतुक, तुलना वगैरे यासारखे अनेक विचार, स्पर्श लवकर होतात व कामाला, कार्याला अडथळा करू शकतात. परंतु पुढील दोन प्रकारची कार्ये आणि कामे यामध्ये मग्न राहणे म्हणजे आनंदसोहळा असतो. याचा अनुभव घेता यायला लागला की पहिल्या प्रकारातील व उपप्रकारातील विचारस्पर्श गळून पडू लागतात. वरील दोष आणि मनाचा जडपणा घालवण्यासाठी महान स्त्री-पुरुषांचे स्मरण, वाचन करायचे असते. कोणत्याही परिस्थितीचे मूळ स्वरूप समजून घ्यायचे असते. मनाची उंची वाढविण्यासाठी, डळमळीत होत असलेल्या कर्मश्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी याचा नक्की उपयोग होत असतो. यासोबतच तटस्थपणे स्वतःचे आत्मपरीक्षण, प्रसंगी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. खरेतर स्वतःहून स्वतः मध्ये बदल करत जाणे अपेक्षित असते. हा प्रतिसाद कार्यमग्नतेसाठी आवश्यक असतो. ही कार्यमग्नता येण्यासाठी फार अवघड, गहन, न समजणारे तत्त्वज्ञान, तात्विक बैठकच असावी असे काही नाही. अगदी सोप्या उदाहरणांमधून हा प्रवास लक्षात आला पाहिजे.
उदाहरणार्थ- बालपणापासून आत्तापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकजणांनी कधी ना कधी… एकदा तरी जत्रेचा अनुभव घेतलेला आहे, पाहिलेली आहे.
मी अनुभवलेली, पाहिलेली मुकूंदराज स्वामी समाधीस्थळी भरणारी जत्रा….. काय जाणवले आज मला यामधून ? त्यावेळचे आपले विचार आणि त्या अनुभवातून आता प्राप्त झालेले विचार यामध्ये नक्कीच फरक आहे. काही जण गर्दी असते म्हणून टाळतात, काहीजण निवांतक्षणी दर्शन घेऊ म्हणून जत्रा संपल्यावर जातात, काहीजण शक्य झाले तर पाहू म्हणतात संधीची वाट पाहतात, एकटे कशाला ? कोणी सोबत असले तरच जाऊ, तर काहीजण असा विचार करतात सगळे जात असतील तर जाऊच ! किंवा काहीजण जत्रेत काय ! हौसे, नवशे आणि गवसे जातात. तिथे आपल्या सारख्या प्रतिष्ठित, हुशार ज्ञानी वगैरे लोकांनी जाण्याची जागा नाही असेही मानणारे असतात. लोक काय म्हणतील ! या जत्रेतील स्थिती आणि जगाची कार्यमग्न रहाण्याची अवस्था मला तरी सारखीच वाटते.
मोठी जत्रा भरलेली आहे. ज्या देवळाभोवती जत्रा भरलेली आहे. त्या मंदिरातील देवाचे, मूर्तीचे दर्शन तर आपल्याला घ्यायचे असते. त्या विशेष दिवशी आपल्याला भगवंताची भेट घ्यायची असते. आशीर्वाद मिळणार! हा विश्वास असतो. हे प्राप्त करण्यासाठी आपण घरातून निघताना सर्व तयारी करून, आवश्यक ती कामे करून ,अपेक्षित वेळेमध्ये लवकर दर्शन व्हावे म्हणून, उपलब्ध वाहना नुसार बाहेर पडतो. मग त्या वाहनातून उतरून चालायला लागतो. यानंतर या गर्दीत प्रवेश होतो. कोणी जत्रेत खेळ, खेळणी पाहतो. कोणी त्याचा आनंदही घेते. उलटेसुलटे होण्याचे प्रयोग आपण स्वतः किंमत देऊन स्वतःवर करून घेत असतो. एखादी खेळणी फारच आवडली तर सोबतही घेतो. पण आपण तिथे थांबत नाहीत ते क्षणापुरते आकर्षण वाटते पुढे निघतो…. स्वस्त वस्तूंचा फेरीवाला ओरडून काहीतरी घ्या म्हणून सांगत असतो. एखादा जादूगार सांगत असतो “बघा, बघा! अजब दुनियेचा गजब खेळ! फक्त पाच रुपयात. कुठे छोटीशी सर्कस सुरू असते.अगदी काही ठिकाणी तर गाढव भविष्य सांगते आणि काहीजण लक्षपूर्वक ऐकतात. गोड, तिखट पदार्थ खाण्याची इच्छा व्हावी अशी पदार्थांची मांडणी केलेली असते. मधूनच एखादा विणाधारी विणेचा मंजूळ स्वरनिर्माण करत गर्दीतही शांतपणे, स्वतःमध्ये तल्लीन होत, सावकाश फिरत असतो. गर्दीमुळे आपल्या सारखी घाई त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही. प्रसादाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, हार-फुले काय काय असतं ! प्रत्येकजण आपले काम करत असतो. आपली भूमिका निभावत असतो.आचार, विचार, संस्कार, बुद्धीप्रमाणे, कुवतीप्रमाणे… जीवनव्यवहार नुसार…..
भक्तीगीतांचा आवाज कानावर येतो. कधी लहान मुलांचा हट्ट, रडणे, हरवणे….तर पती-पत्नींचे बोलणे देखील कानावर पडते. काठी सोबत वयस्कर देखील असतातच. प्रत्येकजण स्वतःमध्ये मग्न. ज्याची त्याची जत्रा!! आपल्याला कोणी उत्साहात, कोणी घाईगडबडीत, तर कोणी शांतपणे…. आपण फक्त क्षणभरासाठी तिथे राहू शकतो. थांबतो का ? नाही, पुढे चालायला लागतो.
सगळ्या प्रलोभनांना दूर ठेवत मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबतो. तिथे गर्दी असणारच एक मिनिटाच्या दर्शनासाठी मग संयम, प्रतीक्षा, स्मरण, रांगेतील इतरांशी बोलणे सुरू होते. ओळखीचा असेल तर गप्पा आणि सूर जुळले की मग या प्रतीक्षेच्या, संयमाच्या काळात देखील चांगली चर्चा, विचारांची देवाण-घेवाण होते. या लोकांच्या गर्दी सोबत विचारांची गर्दी असते.
जत्रा काय अन् जीवन काय ! दोन्हीं दर्शनाच्या पूर्वीची विचार अवस्था आणि दर्शन घेतल्यानंतर येणारे विचार या मधला जो फरक आहे तो सारखाच आहे. आपण घरापासून केलेला प्रवास, जत्रा, जत्रेतील अनुभव, प्रलोभन, संयम, प्रतीक्षा, विचारदर्शन महत्त्वाचे आहे. या दर्शनासाठी, या प्राप्तीसाठी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग्न होऊन, मन लावून कृती करत असतो. हे मन लावून कृती करत राहणे म्हणजेच तर कार्यमग्नता होती. मग्न होतो, ओढ होती वेळ गाठायची होती, गर्दी ,गर्दीतील चोरी, धक्का, त्रास टाळण्यासाठी किती नियोजन करतो आपण…लवकर उठण्यापासून ते अगदी रांगेत संयमाने ताटकळत असताना देखील आपली नजर, विश्वास आणि आता आपण पोहोचणार हा आनंद… हे समाधान म्हणून त्या दिवसभराच्या कष्टाचा, कामाचा काही थकवा जाणवत नसतो. ते सगळे मन लावून, जीव ओतून करत असतो. तरीसुद्धा जत्रेचा पूर्ण अनुभव कधी मिळतो. ही तयारी करत असताना आणि सर्वात शेवटी ! पण कायमस्वरूपी….
या मधल्या खेळण्या, खाऊ, पदार्थ, जादू, सर्कस,भेटणारे लोकं…..यात क्षणभर आनंद होतो. समाधान असते का!नक्कीच नाही !
दर्शन घेतल्यानंतर वापस येताना आपण रमतो का त्या जत्रेत, समोर असलेल्या वस्तू आणि गोष्टींत ? मग मात्र पावले भराभर पडायला लागतात… समोर फक्त राहिलेले काम दिसते….कामाचा वेग वाढत जातो. असेच काहीसे जीवनाचेही असते. जत्रेत केवळ हौसे, नवसे आणि गवसे जातात असे म्हणतात हे हौसे, नवसे त्या जत्रेतील प्रलोभनाला बळी पडतात. केवळ त्याच्याच आकर्षणापायी दरवर्षी पुन्हा पुन्हा फेरी करतात. याउलट हे गवसे म्हणजे कोण ? यांना काय गवसते? या अनुभवातून ते जत्रेतून मंदिराकडे जाताना आणि येताना कुठेही न अडकता, लक्ष न देता, अपेक्षित प्राप्ती करत असतात. याच पद्धतीने तर जीवनाचे असते हे जीवन दर्शन होण्यासाठी प्रलोभने, आकर्षण, इच्छा, विचारांची गर्दी टाळून, प्रसंगी गर्दीचा त्रास सहन करून, त्या ओढीने कार्यमग्न राहून, भोवताली गर्दी असणारच हा विचार घेऊन, पुढे चालू लागतात. या गर्दीतून येणारे अनुभव अनेक प्रकारचे असतात. परंतु जीवन दर्शनाच्या ओढीने, ध्येयाने, चांगले तेवढे ऐकत, घेत तो अर्थ प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न करत राहतात. हा अर्थ प्राप्त झाला की मग मात्र ज्याप्रमाणे मंदिरातून दर्शन झाले की कोठेही न रमता, कोणताही विचार मनात न राहता आपण थेट घरी येतो तसाच हा प्रवास असतो. प्रथम आवश्यक कामे, मग समोर येणारी सगळी कामे, गोष्टी दर्शनासाठी आवश्यकच आहेत असे वाटू लागते.
शेवटी हे सगळं टाळूनही काम करत रहाणे. आपल्याला जायचे आहे न मग आपणच केले पाहिजे… हा विश्वास कार्यमग्न राहण्यासाठी प्रेरणा देत असतो. जत्रेसाठी जसा प्रवास तसाच जीवन दर्शनाचाही अनुभव…. वापस आल्यानंतर घरी येऊन जसे निवांतपणे आपल्या कामाला लागतो. त्याच पद्धतीने कार्यमग्नतेेेही आपण निवांत, समाधानाने कार्य करीत रहातो. म्हणून तर या जीवनाच्या जत्रेत सुद्धा सगळे आकर्षण टाळून कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यु ही विश्रांती…शेवटी काय ज्याची त्याची जत्रा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
27 thoughts on “ज्याची त्याची जत्रा….”
👌💐👌 खूपच छान लेख.
मुकुंदराज स्वामींच्या मंदिराभोवतीची जत्रा आठवली , बालपणीचा तो अनुभव जीवनदर्शन साठी उदाहरण…सर्वांच्या अनुभवातील उदाहरण.. पण अर्थ खूपच सुंदर मांडला आहे.
सहजपणे पण गंभीर अर्थ
छान
apratim lekkh
जीवन जत्रेत, लक्ष कोणत्याही गोष्टी मुळे दुर्लक्षित न करता पुढे जाणे👍
👍👌
सुंदर विवेचन
👌🏻👌🏻💐💐
👍
खूप छान
खूप सुंदर लेख आहे.
👌👌👌👌
Awesome writing🙏🙏
आज अंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिन
आणि मराठीचे अाद्यकवी मुकुंदराज यांच्याा समाधीचे दर्शन घडले
योगाायोग
लेख सुंदर,..,.,
👌👌खुपच छान लेख 👍
[21/02, 2:43 pm] Ranjita Mane: लेखन आवडलं, अगदी जत्राच डोळ्यासमोर आली ….👌👌
[21/02, 2:45 pm] Ranjita Mane: विचार खुप छान माडंलेस
खुपच छान
खुपच छान
कार्यमग्नतेचे उदाहरण सह स्पष्टीकरण खुप छान 👌👌🏻👌👍
मनाला भावलेला लेख छानच
खुप छान जत्रेच चित्र डोळासमोर उभे राहिले
वाचून ती यातल्या व तिथले वातावरण अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले.त्या उदाहरणातून कार्यमग्नता स्पष्ट केल्याने अर्थ अगदी मनावर ठसला.
यात्रा ऐवजी चुकून यातल्या झालं
atishay sunder madani wastawadi wicharanchi
atishay sunder madani wastawadi wicharanchi
छान,जत्रेच्या वर्णनामुळे लहाणपण आठवले
शेवटी दर्शन महत्वाचे.. त्याला पहाता यायला हवं, जत्रेत स्वतःचे किंवा स्वतःला विकणारा आणि मौज, मस्ती, खेळ, वस्तू खरेदी करणारा दोघेही एक आनंद देत-घेत असतात. आईचे बोट धरून, बापाच्या खांद्यावर बसून, कुणी मित्रांच्या गळ्यात गळा घालून तर मैत्रीणींची सोबत धरून … जत्रा माणसं जवळ करते, नाती स्नेहपूर्ण आणि मौजेतही देव पहायला शिकवते.. खरंय जत्रा ज्याची त्याची..