विविध उत्सवांमुळे सर्वांनाच आनंद होत असतो. परंतू केवळ आनंद मिळवणे हाच एकमेव हेतू सण, उत्सव यांच्या रचनेमागे नसतो. यानिमित्ताने जीवनदर्शन होत असते.अशी एखादी रात्र जी मानवी मनात, जीवनात नाविन्य, आनंद घेऊन येते. सुप्रभात घेऊन येते. अश्या रात्री जागर करून स्वतः मध्ये जागरण करता येईल का! रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. तमोगुणाचे आच्छादन असते. आपण ज्ञानाला प्रकाश व अज्ञानाला अंधकार असेही म्हणून देखील संबोधतो त्याच अर्थाने समाजात, मनात कधी नकारात्मकता वाढत असते. यामुळे आलेले नैराश्य काय! आणि मनुष्य सत्यापासून, सभ्यतेपासून, चारित्र्यसंवर्धनापासून दूर जाऊ लागला काय! मग दुराचार, स्वैराचार सर्वत्र वाढू लागतो. ती सुद्धा अज्ञानाची रात्र असते फक्त समजली पाहिजे. अशाच वेळी माणसातील वाईट वृत्ती, स्मृती, दृष्टी, कृती, कर्म, संकल्प, स्वभाव, संस्कार यामध्ये असलेली, आलेली दानवता संपवून त्यांच्यात दैवी गुणांची स्थापना करण्याचे महान कार्य देवीकडून होते. देवी अर्थात देवता. सहाजिकच असा प्रश्न पडतो अशी कुठली शक्ती देवीकडे असते? ज्यामुळे त्यांचे नवरात्रीत पूजन केले जात असेल. या वेगवेगळ्या शक्ती कोणत्या असतील! नवरात्री संबंधी काही कथा प्रचलित आहेत त्यातील सर्वाधिक प्रचलित कथा ही महिषासुर दैत्याची. त्याच्या वधाची आहे. हा राक्षस अतिशय बलशाली होऊन माजला होता. शक्तीच्या बळावर सर्व मनुष्य व देवतांना त्राही त्राही करून सोडले होते. दैवी विचारांचा प्रभाव अस्पष्ट बनत होता. दैवी वृत्ती असलेले लोक भयभीत झाले होते.धैर्य, आत्मविश्वास गमावलेल्या आणि हतबल व निराश झालेले बळी पडलेले देव परमात्म्याला शरण गेले. त्यांची असहाय्य, निशस्त्र अवस्था पाहून देवांच्या शक्तीने ईश्वराने एक कन्या स्त्रीरूपी, आदिशक्तीच्या रूपाने प्रकट केली. या आदिशक्तीमध्ये एवढे सामर्थ्य निर्माण केले की ती सक्षमपणे, खंबीरपणे, आत्मविश्वासपूर्वक अस्त्र शस्त्रांनी सज्ज होऊन त्या सर्वांना सामोरी जाणार होती. त्रिनेत्री व अष्टभुजाधारी होती. महिषासुरासोबत नऊ दिवस नऊ रात्री अखंडपणे युद्ध करून तिने महिषासुराचा संहार केला. असुरीवृत्तींचा अंत करून दैवी शक्तीची प्रतिष्ठापना करून देवतांना अभय दिले. यादृष्टीने विचार केला तर लक्षात येईल की रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा हे मंदबुद्धीचे प्रतीक आहे. तो केवळ स्वतःचे तेवढे सुख पाहतो. सगळीकडे काही प्रमाणात हीच वृत्ती पसरलेली दिसते. परिणाम स्वार्थी, प्रेम विरहित, भावनाशून्य होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आपली अशी धारणा आहे की राक्षस किंवा असुर म्हणजे भयानक अक्राळविक्राळ रुप असलेले पण खरे पाहता कोणत्याही प्रकारच्या वासना आणि भौतिकतेत रममान होणारे ते असूर… अशाप्रकारे अनियंत्रित वृत्तींवर अंकुश ठेवण्यात यशस्वी होणारी ही देवी म्हणून कदाचित देवीला सिंहावर विराजमान झालेली दाखवतात. सिंह हा हिंस्त्र राजा त्याच्या जवळ जाण्याचे सहसा कोणी धाडस करत नाहीत किंवा उत्सुकही नसते. परंतु त्यावर देवीने आसनस्थ होणे म्हणजे त्या हिंस्त्र प्रवृत्तींच्या सर्वांना काबूत ठेवण्याची शक्ती तिच्याकडे आहे. याचेच हे प्रतीक आहे. पराधीनता न स्वीकारता परिस्थितीवर अधिकार, वर्चस्व गाजवण्याचे हे कार्य फक्त देवीच करू शकते. देवीच्या हातात अस्त्र-शस्त्र आयुधं दाखवली जातात. देवी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तिच्या रेखाटलेल्या रूपाप्रमाणे आणि घेतलेल्या अवताराप्रमाणे मूर्ती, चित्र, मुखवटा, तांदळा उभा राहतो. हे प्रथम दर्शनी प्रत्येकाच्याच बाबतीत घडते. चक्र, शंख, पद्म, बाण, तलवार, धनवृष्टी, मोहकरूप, अलंकारिकरूप विविध वस्त्ररूप, उग्ररूप यांच्या विविध छटा समोर येतात ज्या रूपात दिसते तशीच वाटते. देवीत असलेला भाव आपल्यापर्यंत पोहचतो का ! काहीच न मागता, नवस न करता फक्त भक्तीभाव ठेवून दर्शन घेऊन आपल्यातही तिच्या शक्तींचा अंश आहे ही शक्ती अंश रूपाने ती आपल्यात देत आहे अशी भावना स्त्रियांमध्ये निर्माण होते का ! आपणच आपल्याला सांगू शकतो. खरे तर ज्ञानाच्या अनेक शस्त्रांनी आणि शास्त्रांनी युक्त अशी देवी आहे. ज्ञानाचा शंखध्वनी करते. चिंतनात मग्न असते. वेळ पडली तर शस्त्र त्रिशूळ हाती घेते. कलाविष्कार सादर करते. सर्व विकारांचा नाश करणारी असते. देवीच्या अवयवांना देखील कमळाची उपमा दिलेली आहे जसे करकमल, चरणकमल, मुखकमल, नयनकमल वगैरे कमळ हा अनासक्तीचा आदर्श आहे. महिमा दर्शवणारा आहे. प्रकाशाचे पूजन आणि जीवनाचे दर्शन घडवणारे आहे. म्हणूनच देवी देवतांनी पद्म कमळाचा स्वीकार केला असावा. देवीच्या प्रत्येक शस्त्रात खरंतर संदेश दडलेला आहे. प्रत्येक वेळी शस्त्राचा वापर समोरच्यावर प्रहार करून त्याचा संहार, नाश करण्यासाठी नाही तर या सगळ्या प्रतिकांच्यां दर्शनाने भक्तांनी स्वतःमध्ये स्वतःहून बदल करण्यासाठी तर ही शस्त्रे देवीने प्रतीक म्हणून वापरली नसतील ना ! म्हणूनच देवीला अष्टभुजाधारी दाखवले जाते. या अष्टभुजा आदिशक्ती मधले सामर्थ्य अधोरेखित करणारी प्रतीकच आहेत. आदिशक्ती कडे असलेल्या या शक्ती कोणत्या ? ज्यामुळे त्यांच्या जीवनात महानता येऊ शकली. विस्ताराला आवरून घेण्याची शक्ती, देण्याची शक्ती, सर्व काही सहन करण्याची शक्ती, विस्ताराला योग्यवेळी समेटण्याची शक्ती, सर्व काही सामावून घेण्याची शक्ती, योग्य-अयोग्य, सत्य-असत्य पारखण्याची शक्ती, निर्णयशक्ती, धैर्याने सामना करण्याची शक्ती, सहयोगाची शक्ती, प्रसंगी क्षमा करण्याची शक्ती, योग्य तो कठोर दंड करण्याची शक्ती…. यासारख्या अनेक शक्ती तिच्यामध्ये सामावलेल्या आहेत. परंतु याचा अभिमान, गर्व, अहंकार न बाळगता कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी सर्वांना सामावून घेण्यासाठी विविध रूपात अवतारात ती प्रकट होऊन आस्थेला, भक्तीला समर्पित होते. म्हणूनच तर दुर्गेच्या रूपाने दुर्गुणांचा, आसुरी वृत्तींचा संहार करणारी जगदंबा बनवून सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी. श्री लक्ष्मीच्या रुपाने धनधान्य, सुखवस्तू प्रदान करणारी. सरस्वतीच्या रूपाने ज्ञान, बुद्धी, संगीत, कला प्रधान करणारी. शीतला मातेच्या रुपाने सर्वांना शीतलतेचा स्पर्श करणारी. गायत्रीच्या रूपाने पवित्रतेचे दान देणारी पार्वतीच्या रुपाने सदैव निरंतर शिवस्मृती रममान होणारी. अन्नपूर्णा मातेच्या रुपाने सर्वांचे यथायोग्य पालन करणारी. संतोषी मातेच्या रुपाने सर्वांना संतुष्ट करणारी. कालीच्या रुपाने काम, क्रोध, मोह या विकार रुपी असुरांना समाप्त करणारी. जिच्या विक्राळते पुढे राक्षसही नतमस्तक होतात अशी सर्वांना कलंक मुक्त करणारी ती काली. ही सर्व शिवशक्तीची रूपं आणि या रुपांचे, या शक्तींचे अंशतः तयार झालेली रूपं, साक्षात अवतार म्हणजे आपल्या संस्कृतीतील काही महान स्त्रिया. देवींपेक्षा कणभर कमी नव्हत्या. सीता, कुंती, द्रौपदी, कौशल्या, अहिल्या, शकुंतला, यशोदा, देवकी, झाशीची राणी, जिजामाता, अहिल्याबाई, यासारख्या अनेक महान मातांमध्ये नक्कीच देवीचा अंश असला पाहिजे ! त्याशिवाय का त्या एवढे महान कार्य करू शकल्या. खऱ्या अर्थाने त्या त्या काळानुसार परिस्थितीवर मात करत धर्मसंस्कार, ईश्वरवाद टिकवून ठेवू शकल्या. या अनुषंगाने त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या देवींचे स्मरण व चिंतन करूयात अशाच पद्धतीच्या सध्याच्या काळात सुद्धा अनेक महिला, मातृशक्ती हे काम करतच असतात हे चिंतन, स्मरण, दर्शन आणि पूजन करत असताना आपण या नऊ दिवसात काय करतो. जागरणं, उपवासं, सात्विक अन्नग्रहण, अखंड दीपप्रज्वलन…. आजकाल तर दिवसागणिक रंग बदलतो….असे बरेच काही दृश्य स्वरूपात. आपापल्या कुलधर्म आणि कुलाचार याप्रमाणे यथासांग विधी अगदी भक्तिभावनेने मनापासून पार पाडत असतो. ते करायला हवं कारण ते भक्तिभावाने केलेलं स्वतःचे समाधान असते. अध्यात्मिक वातावरण निर्माण करत असते जे इतरांना, पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी प्रेरणादायी असते. उत्सवातील एवढा उत्साहच उपयोगाचा आहे का ? रात्रभर जागे राहणे, निद्रेचा त्याग करणे यातून जागृतावस्था येऊ शकते का? अशा किती रात्री आपण जागू शकतो ? आणि अशा रीतीने जागे राहून खरच काही परिवर्तन आपल्यात होईल का ? निश्चितच नाही! मन, बुद्धीने जागृतावस्था येणं हेच खरं तर जागरण आहे. अज्ञानातून स्वतःला जागे करणे म्हणजे जागरण आहे. ही जागृतता, हे जागरण फक्त नऊ दिवसच का ! आणि हे ज्ञान काही ठराविक गोष्टींचेच का ? हे ज्ञान मिळवणं हे सर्वांगाने, सर्वार्थाने योग्य होण्यासाठी या सर्व कृती मागचा नेमका अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्या अर्थाने या कृतीपेक्षा त्या कृतींच्या मागच्या वृत्ती आणि विचार समजून घेतले पाहिजेत. उपवास करणे म्हणजे भोजनाचा त्याग करणे. शरीराला कष्ट दिल्याने आत्म्यात खरी शक्ती भरू शकेल का ? उपवास करणे म्हणजे आयुर्वेदिक दृष्टीने शरीराला दिलेला आवश्यक आराम आहे. तो ज्याच्या त्याच्या मानसिक, शारीरिक आवश्यकतेनुसार उपयुक्त आहे. परंतु उपवास याचा अर्थ परमेश्वराच्या जवळ राहणे असा होतो. मग हा उपवास हे परमेश्वराच्या जवळ राहणे केवळ नऊ दिवसच का ? नेहमीकरता दैनंदिन व्यवहार करत ही विचारांची पवित्रता ठेवू शकतो. त्याच्याजवळ कायमचे राहू शकतो. त्याचप्रमाणे अखंड दीप आपण देवीसमोर नऊ दिवस नऊ रात्री किती काळजी घेऊन तेवत ठेवतो. दिवा विझला तर किती नाना शंका मनात घेत असतो. अपशकून मानत असतो. परंतु खरे तर या अखंड दीपप्रज्वलनाने देवी आपल्याला सांगत तर नसेल ! बुद्धी रुपी ज्योत सदैव जागृत असावी. ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या जीवनात राहावा. आणि ही ज्योत तेवत राहावी म्हणून मी प्रयत्नशील असावे. ज्याप्रमाणे दिवा विझू नये म्हणून प्रयत्न करतो त्याच पद्धतीने ही बुद्धी रुपी ज्योत सुद्धा विझू नये म्हणून मीच प्रयत्नशील असावे. कारण जर बुद्धीरूपी ज्योत विझली तर पुन्हा आपण विकारवश झालेले असू याचे प्रतीक म्हणून हे दीप प्रज्वलन. मग हेही फक्त नऊ दिवस न राहता अव्याहतपणे चालूच असावे. देवीच्या भोवती विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. भोंडला, गरबा-दांडिया वगैरे याचाही अर्थ हाच की आपल्याला एका हाताने दुसऱ्या हातावर टाळी वाजवून साथ देत हे खेळ खेळत सामाजिकता जपायची असते. प्रत्येकाला आपलं मानून आपल्या संयोगाचा हात प्रत्येकाच्या हातात दिला गेला पाहिजे. तेच खऱ्या अर्थाने स्वभाव, संस्कार, सहकार्य, सामाजिकता होईल. सर्वांच्या प्रगतीचा रास आपोआपच रचल्या जाईल. म्हणून नवरात्रीत देवीला आवाहन तर करायचेच पण ते गुण व शक्ती यावी यासाठी प्रयत्न करायचे. चांगल्या गुणांचे सर्जन करून वाईट वृत्तींच्या विसर्जनाचा प्रयत्न करायचा. अशा या मनाच्या जागरणाने खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस आणि रात्र जागृत होईल…
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
13 thoughts on “जागरण कशाचे?….”
अतिशय सुंदर, मार्मिक, आशयपूर्ण, व शास्त्रीय विवेचन.सद्यस्थिती, व्याव्हरिकता, ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व, शास्त्रीय महत्त्व सर्वच मुद्द्यांची सुरेख मांडणी.महत्वाचे म्हणजे नवरात्र प्रत्यक्ष व्यवहारात कसे साजरे करावे हे छान सांगितलेत.देवीच्या हातातील शस्त्रांचा अर्थ ही नेहमीपेक्षा वेगळा.मनाला भावणारे विवेचन.🙏💐
खूप सुंदर देवीच्या सर्व आयुधांची प्रतीक तसेच वाहन इत्यादी मधून खूप सुंदर अर्थपूर्ण रीतीने त्याचे विवरण केल्या गेले आहे तसेच त्यातून स्त्री शक्तीचे महत्त्व चांगल्या पद्धतीने विशद होते सुरुवातीला मनाची अवस्था सध्याच्या काळात कशी ठेवावी त्याचेही जागरण होते खूप सुंदर 👌🌹
अध्यात्माच्या असे विश्लेषण अगदी सुंदर
👌👌👍👍
छानच
अर्थपूर्ण लेखन केले आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ व्यवस्थित समजून समजावून दिला आहे.
स्त्री शक्तीची दर्शन👌👍
खूप छान
सहज समजेल अस अर्थ पूर्ण लेखन 👌👌👌
आयुधांचे खूप छान स्पष्टीकरण व अर्थ, वैचारिक दृष्टिकोन अगदी सहज मनावर प्रभाव पाडतो… पटतो
व्वा, खूप छान….
खूपच सुंदर माहिती व लेखन👌👌
नवरात्र उत्सव व कालसंगत प्रेरणांचा शोध घेतला आहे.विविध शक्तींचा बोध होणे व निरामय जीवनासाठी आध्यात्मिक समृद्धीकडे नेणारे चिंतन….