जगावे आणखी जगावे…

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते.
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते.

कधी दाटू येता पसारा घनांचा,
कसा सावळा रंग होतो मनाचा..
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा….

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?
( रचना:- संदीप खरे )

हारलेल्या मनाची नेमकी अवस्था संदीप खरे यांच्या सुंदर गीतातून उलगडतेय असे मला वाटते.

परवा 11संप्टेंबर जागतिक आत्महत्या दिन होता असं फिरणाऱ्या संदेशातून समजले…..

चुलत भावाची आठवण झाली.

साधारण तेराव्या वर्षी पहिल्यांदाच आत्महत्या हा शब्द ऐकला…

सगळं डोळ्यासमोर घडत होत…

जीव वाचवण्यासाठी इतरांची धडपड, उपचारादरम्यानची वस्तुंची जुळवाजुळव, डॉक्टरांच्या जलद हालचाली आणि आणि एका क्षणात सगळं स्तब्ध!

सोबत वाढलेले, जगलेले क्षण आणि दिवसभर कोणालाही थांगपत्ता लागू न देता, गुपचूप exit ?

भोवती फक्त प्रश्न आणि प्रश्न चिन्ह फिरत होते. मोठे कोणी काही आम्हाला सांगतही नव्हते… काही प्रश्न कायम अनुत्तरीतच राहिली….

आज पाठीमागे पाहिले असता, त्या घटनेनंतर अनेक अश्या घटना घडल्या त्या बद्दल चर्चा ऐकल्या अन् त्या त्या दिवशी दैनंदिनी मधे उलगडा करण्याचा प्रयत्न होत होता…

शरीराने संपण्यापूर्वी मनाने संपणे असते का!

समाधी म्हणजे एक प्रकारे शरीराने स्वतःला संपवून टाकणे असते की? ज्ञानाच्या सर्वोच्च पातळी प्राप्त झाल्याने पुन्हा या जीवनातील सोपस्कारांना व्यर्थता येत असेल ?
तर कधी स्वतःहून जगावे आणखी जगावे असे वाटत असतानाच मरण पत्करण्याची अपरिहार्यता निर्माण होते नेमकं काय असतं हे स्वतःला संपवणं?
भावनिक, मानसिक पातळीवर समजण्याच्या कोणत्या पातळीपर्यंत आपण आयुष्याला नेऊन ठेवलेलं असतं. असं काही असतं का? असं काही घडतं का?
स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करताना, नाकातोंडात पाणी जात असताना आणखीन स्वतःला बुडवण्याचा स्वतःचाच प्रयत्न आणि पंख्याला लटकवून घेताना यातना होत नसतील का? तरी या यातना सहन करत अनैसर्गिक मृत्यूला का सामोरे जावे असे वाटते?

निर्ढावलेल्या काहीजणांच्या अगदी वरवर येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिली नसेल! तोंड लपवायची पाळी आली असेल! महिला असेल तर मग विचारूच नका! मग एकदम चारित्र्यावर बोट ठेवले जाते. याशिवाय दुसरी कारणं असू शकत नाहीत का?अश्या प्रतिक्रिया, चर्चा ऐकल्या की विचार येतो….
कदाचित व्यक्त व्हायला, बोलायला, समजून घ्यायला, रडायला, या सर्व तणावमुक्त करणाऱ्या गोष्टींसाठी जागाच शिल्लक राहिली नाही की हे जग,आयुष्य, प्रश्न, ती अवस्थाच नको म्हणून मग आत्महत्या होत असतील. प्रत्येक आत्महत्या घडली की नंतर सहसा या प्रकारची प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांकडून येतेच की? परंतु अगोदरच ही अवस्था समजून घेणारी नात्यातील ठिकाणं आता कमी झाली आहेत. आतून पार कोलमडून जाणे, आत्मविश्वास संपणे, यातूनही मार्ग असू शकतो हा आशावाद संपणे,
आता समस्येतून सुटका नाही, या परिस्थितीत मी कसा जगू/ कशी जगू?. दूर्धर, असह्य दीर्घकालीन आजारपण, अस्वस्थता, दडपण, भिती, दबाव, टोकाचा अन्याय, अत्याचार तर कधी क्षणिक भांडण, राग अगदी शुल्लक अपयश कारणं असंख्य… व्यक्तीपरत्वे वेगवेगळी.
चूक बरोबर पेक्षा व्यक्ती महत्वाची नाही का? गेल्यानंतर महत्त्व सांगत बसण्यापेक्षा, दुःख आळवत बसण्यापेक्षा थोडं समजून घेतलं तर बिघडलं कुठे? भावनिक गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. जगण्याची इच्छा असूनही जीवन संपवण्याची अपरिहार्यता का जाणवते? कायमचा उपाय म्हणून असा शांततेचा पूर्ण विराम का हवा असतो?
आत्मघात, आत्महत्येचा पर्याय निवडताना नेमकी मानसिक अवस्था काय होत असेल? या वैफल्यग्रस्त मानसिकतेत असताना ती व्यक्ती भयंकर तणावग्रस्त असते. या तणावातून आत्महत्येचे सततचे प्रयत्न होत असतील का?

विचांराची स्थीरता, आचरणातील मर्यादा, नको त्या गोष्टींचा सोस तर कधी अपयश,आत्मसन्मानाला ठेच आणि न बदलता येणारी परिस्थिती सगळा गुंताच होऊन बसतो. पण स्वतःला मार्ग सापडता आला नाही तरी किमान घालून दिलेल्या, मार्गावर चालून पहायला काय हरकत आहे!

जन्म मरण आपल्या हातात नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे. समोर आलेलं ताट सारावच लागतं. आपल्या हातात काय आहे? कर्ता करविता तोच परमेश्वर! हेही दिवस सरतील, भोग कुणाला चुकलेत का? सगळे दिवस सारखे नसतात, कधीतरी दिवस पालटतील म्हणजे नेमकं काय? कितीही संकट आले तर वरील पद्धतीने विचारसरणी अवलंबली की धीर, आत्मविश्वास येतो. जवळच्यांनी सांत्वना केली,धीर दिला की अधीरता संपून तो क्षण तरी निघून जातो. कधी यातून थोडा बहुत धीर मिळत असेल.अशी मानसिकता तयार करणे नैराश्य अवस्थेत उपयुक्त असते. धर्म, शिकवण, रूढी परंपरेतून सकारात्मकता मिळते. समुपदेशन, आधार यापेक्षा वेगळा काय असतो? श्रद्धा असणाऱ्या गोष्टींपासून हळूहळू दूर गेलं की गोंधळलेली अवस्था निर्माण होते. विचारांना स्थिरता हवी असेल तर धर्म  विचारसरणीला पर्याय नाही. इथे श्रद्धा केवळ धार्मिक भावनेतून अभिप्रेत नाही तर जीवन मूल्यांची देखील श्रद्धा असू शकते. ज्यांच्यासाठी आपण उमेदीने कामं, कष्ट करत असतो. आयुष्यातील वेळ खर्ची घालतो. यातून कधी हतबलता येते. प्रामाणिक, कष्टाळू, त्यागी वृत्ती आणि संवेदनशील व्यक्तींचा भावनांक जास्त असतो कारण कामामध्ये भाव ओतलेला असतो. त्यामुळे आलेले अपयश, विवंचना, सततचे अपमान, दुर्लक्ष, अवहेलना ,वापर आणि संघर्ष हळूहळू अश्या अनेक कारणांनी विचलित होऊन मुल्यांपासून दूर जाऊन आत्मकेंद्रीपणा वाढायला लागतो. एकटेपणात रमणे, गर्दी, गोंधळ,चर्चा, सामाजिकते पासून विभक्त होत होत याच संवेदनशीलतेला वेगळे स्वरूप देखिल प्राप्त होऊ शकते. सततचा संघर्ष असणारी, विशेष व्यवसाय करणारी, पालकांची मुले समाजाशी तुटकपणे याच कारणाने वागतात. कौटुंबिक समस्या मध्ये पालकांमधे जर पराकोटीचा विसंवाद असेल मुलांना समजूनच घेतले जात नसेल… तर विश्वास आणि आधार निर्माण होत नाही. घर म्हणजे केवळ भौतिक सुविधांचे एकत्रिकरण होते. पुर्वी एकत्र कुटुंबात या समस्या कमी प्रमाणात होत्या.
आपलेपणा, माणूस म्हणून प्रत्येकाला किमान काही गोष्टींचे स्वातंत्र्य, प्रांजळपणा, विश्वास, यासारख्या गोष्टीपेक्षा खरे खोटे, चुक बरोबर,अहंकार, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना म्हणजे आजकाल स्टेटस वगैरे… Maintain करावे लागते. याला मुळ आधाराऐवजी
दिखाऊ स्वरूप प्राप्त झाले की, त्यामुळे सर्व काही अगदी आदर्शवत असूनही अवहेलना, दुर्लक्ष, अपमान, कटकारस्थान घडायला लागली की कदाचित नकारात्मकता वाढत असेल. सर्व प्रसंग अगदी दररोजच्या जीवनात आजूबाजूला दिसणारे,जाणवणारे असेच आहेत. यासाठीच की नेमकी काय अवस्था असेल?

शेवटी दिवसागणिकच आयुष्य जगतो आपण, हे समजून घेण्याचा खटाटोप. समजा वयानुसार समज वाढते असे म्हणतात तर मग अगदी दहावीच्या मुलांच्या वयोगटापासून ते वृद्धावस्थेत पर्यंत ही मानसिकतेत हा विचार दिसून आला नसता. म्हणजे वय, परिस्थिती ,अडचणींपेक्षा वातावरण आणि मनाची अवस्था बदल करण्यात यशस्वी होणे महत्त्वाचे आहे. तो क्षण  टळेपर्यंत समजून घेणे महत्त्वाचे असते. आयुष्यातील बिकट परिस्थिती असह्य असली तरी तो संकटाचा क्षण टळला, वेळ सरली की त्याची तीव्रता ही कमी व्हायला लागते. अश्यावेळी साथ देणाऱ्या माणसांची जागा त्या व्यक्तीच्या जीवनात सर्वोच्च ठिकाणीच असते. कोणत्याही नात्याच्या बंधनात असण्याची गरज नसते. फक्त संकटासोबत येणाऱ्या नकारात्मक विचारांची मालिका खंडित व्हायला हवी. एका ठराविक मर्यादेनंतर
अनुभव, ज्ञान, नातेवाईक, जबाबदारी, आजूबाजूचे वातावरण याचा परिणाम फारसा होत नाही.
आतून, स्वतः हून बदल झाला तर ठीक नाहीतर…. सहनशीलता कमी होत चाललेली दिसतेय. मनाला ग्रहण लागायला आजकाल वेळ लागत नाही….

नेहमी शांत आणि अलिप्त असणाऱ्या, परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या ताई जेव्हा अचानक भावनिक होऊन आपल्या जवळ रडू लागतात, स्वतःमध्ये विरघळलेल्या आत्महत्येच्या विचारांना वेगळं करतात. तेव्हा वाटतय सुसंवाद साधण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

आपल्या अवतीभवती असे कुणी असलेच तर हे ग्रहण सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 thoughts on “जगावे आणखी जगावे…”