विश्वातील सूक्ष्म घटक अणूरेणूंचे रहस्य उलगडण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली. या विश्वाचा निर्माता आणि त्याच्या कृतींमागचा हेतू समजायला हजारो जन्म देखील कमी पडतील. मनुष्याची अल्पबुद्धी, अनेक शंकांनी विस्तारलेली आहे. या शंका, बुद्धी हे संभ्रम दूर करण्याचे काम अनेक अवतारांमध्ये भगवंतांनी केलेले आहे. यासाठी भगवंताच्या अवतारांमधील कृतींचा हेतू लक्षात घ्यायला हवा. भगवान श्रीकृष्णाने बालपणीच्या खेळण्यातसुद्धा भव्यता आणि दिव्यता आणली. ज्याच्या जीवनात श्रद्धा निर्माण झाली आहे त्याला हा भगवंताचा खेळ समजतो आणि उमजतो. जीवनात मेळ बसायला सुरुवात होते. यासाठी आत्मश्रद्धा निर्माण झाली पाहिजे, आत्मविश्वास हवा मग प्रभूश्रद्धा निर्माण होते. श्रद्धयामयोsयं पुरूषो यो यच्छ्रदधःस एव सः।
माणसाच्या जीवनात श्रद्धा असली पाहिजे. भगवंताने माझ्यावर दया का दाखवावी? नाही ! त्याने माझ्यावर प्रेम करावे असे वाटले पाहिजे. भगवंत आपल्याला शेवटपर्यंत सोडून देत नाही, टाकूनही देत नाही. दुर्योधनावरही दयेची दृष्टी होती पण तो शेवटपर्यंत बदलला नाही, सुधारणा केली नाही. भगवान श्रीकृष्ण शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिले. जीवन बदलायचे म्हणजे प्रथम विचार बदलावे लागतात. विचारांची तेजस्विता, चैतन्य स्वीकारले तरच जीवन तेजस्वी बनते. कारण शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. मृत्यूनंतर अंतिम संस्काराने नष्ट होणारच आहे मागे रहाते ते फक्त चैतन्य… या अंतिम संस्काराच्या आधी हे चैतन्यमय संस्कार होणे अपेक्षित असते…भगवंत प्रयत्न करत रहातात… यासाठी आपणही प्रतिसाद द्यायला तत्पर असले पाहिजे, ती श्रद्धा रूजण्यासाठी स्वतःला सिद्ध करता यायला हवं, किमान मनोभावे प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे. यासाठी विचारांना प्रभु आवडला पाहिजे.
भद्रं कर्णेभिःश्रुणुयाम देवाः।
कानांवर भद्र विचार, उच्च विचार जाऊ द्या.
हेच खरे शिक्षण, हेच खरे वांड;मय आहे. पांढर्यावर काळे करणे याचे नाव शिक्षण नाही ! जे माणसाच्या जीवनाला ध्येय देते, ध्येयनिष्ठा देते तेच खरे शिक्षण, तेच खरे जीवनाचे साहित्य, साधन. असे ध्येयनिष्ठ जीवनच श्रद्धा, तेजस्विता देते मग साक्षात भगवंताने निर्माण केलेले साहित्य, साधन कसे असेल? संकल्प, ध्येय जीवनार्थ, मार्गदर्शक, अस्मिता, श्रद्धा जय गीता, सार्थ श्रीमत् भगवतगीता
पृथ्वीदेवीने देखील विचारणा केली आहे हे, “भगवंता ! परमेश्वरा ! प्रारब्ध भोगीत असलेल्या मनुष्याच्या हृदयामध्ये तुझी भक्ती कशाने उत्पन्न होईल? ” ईश्वर कोणत्या पद्धतीने व्यक्त होत आहे? आणि का? हे समजून घेण्यासाठी मनोभावे भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. निश्चल मनाने अठरा अध्याय म्हटले की हा अर्थ, ही भक्ती नक्कीच उत्पन्न होईल. स्वतः स्वतःचा अर्थ शोधत, जीवनानुभव घेत, हेतूसदृश्य कर्म, विचार इथपासून जो विचारांची सुरुवात करेल त्याला योगेश्वर श्रीकृष्ण समजेल आणि त्यालाच राजलक्ष्मी, विजय, शाश्वत कल्याण आणि उत्तम नीती अथपर्यंत भगवंतासहीत साथ देतील. परंतु हे निरंतर सुरु असले पाहिजे या इथं आणि अथं च्या मध्ये आहेत कर्मयोग, भक्तियोग, सांख्ययोग, संन्यासयोग, ध्यानयोग, ज्ञानविज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजयोग, विभूतियोग, विश्वरूपदर्शनयोग, सगुणभक्तियोग, क्षेत्रक्षेत्रज्ञयोग, गुणसूत्रविभागयोग, पुरुषोत्तमयोग, श्रद्धात्रयोविभागयोग, आणि मोक्षसंन्यासयोग….. यासाठी पूजनीय गीता वारंवार समजून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी नवा अर्थ नवे आत्मज्ञान जागृत करणारी आहे. आत्मज्ञानाचा बौद्धिक स्तर वाढता ठेवून जीवनाच्या भक्तीजाणिवा श्रद्धाभाव वाढवत जाणारी गीता श्रद्धेय आहे….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
7 thoughts on “चैतन्यगीता….”
👌सोप्या भाषेत सांगितले आहे ,मार्गदर्शक म्हणून वाचावी. छान!
महान ग्रंथसंपदा श्रद्धेने समजून घेता आली पाहिजे
👌 अध्यात्मिक लेखनामधील वेगळा विचार, अगदी सहज विचारप्रवृत्त करतो
छान👌👌
श्रध्देय, अनुसरनिय आणि अनुकरणीय.. गीतेचे महत्ता तीच्या संदेशानुसार जगण्यातच आहे खरी.. आपण सहज पण सखोल विवेचन करता…..
चैतन्य गीता—विचार मंथन छान
🙏🙏🙏