सहपरिवारास भोजनाचे आमंत्रण…. इथे कोणताच सोहळा, प्रसंग एका कुटुंबाचा नसतो. फक्त कुटुंबच साजरं करत नाही तर गावाने गावाला दिलेला आणि सगळ्यांनी मिळून पूर्णत्वास नेलेला क्षण असतो. सामूहिकता, आपुलकी असते. सगळ्यांचा आनंद, कष्ट, सहभाग,असतो. सप्ताह, हनुमान शक्ती, लग्न, असो की दुखःद प्रसंग….. कोणताही कार्यक्रम सगळं स्वयंपूर्ण असतं. खूप मजा येते हे काम करत असताना. कार्यक्रमात आपली काय सोय आहे ? हे पहाण्यापेक्षा, आपण काय सोय करू शकतो हा विचार केला जातो. आणि त्यानुसार कामाचे वाटप केले जाते. हे काम वाटप कोणी करत नाही तर स्वतःहून ठरवले जाते. ज्याच्या घरी कार्य आहे त्याला माहिती देखील नसते की, पारावर ( ग्रामदेवतेच्या मंदिराच्या मोठ्या ओट्यावर) काय चर्चा सुरू आहे ? यजमानाच्या परस्पर ठरतं सुद्धा कोण काय करणार ! एखाद्या घरी विवाह प्रसंग असेल आंब्याच्या डहाळ्यांचा सुंदर मांडव घातला जातो. चुना आणि काव ( खेड्यातील दरवाज्यांना दिला जाणारा नैसर्गिक रंग ) या दोन रंगातच, ज्याला निसर्गतः थोडेफार रेखाटता येते तो सारवलेल्या भिंतीवर तुराटीला नाहीतर सनकाडीला ( तुराटी म्हणजे तुरीच्या झाडाची वाळलेल्या मोठ्या काड्या आणि सनकाडी म्हणजे अंबाडीच्या वाळलेल्या काड्या ) कापूस गोल-गोल गुंडाळून काही शुभचिन्हे, देवांचीशस्त्र काही चिन्ह, नावे, विविध आकारातील पांढरे ठिपके, रेघोट्याच्या साह्याने तयार होणारे काही आकार, हाताच्या पंजाच्या मोर किंवा चक्रीफुल… जसे जमेल तसं. सारवलेली भिंत सुंदर रंगवली जाते. उपलब्ध साहित्यात, सर्वांना समजून घेत मनापासून केलेली प्रत्येक तयारी फार मजा येते. जेवणाच्या तयारीची गंमतच वेगळी प्रत्येकाच्या घरी टोपलंभर तिंबलेली कणिक दिली जायची आणि प्रत्येकाच्या घरातून चूलीवर तयार झालेल्या चपात्यांच्या शीग लागलेल्या दुरड्या पारावर जमा व्हायच्या. तोपर्यंत पारावर मोठं चूलवन पेटवलेलं असायचे. बाजेवर पसरलेला हातसडीचा तांदळाचा भात… बिना पॉलीशच्या डाळीचे वरण… सगळ्यात महत्त्वाचा बुंदी पाडणारा आणि त्याचे मदतनीस आणि पाकात गडबड होऊ नये म्हणून त्यांची धावपळ आणि मेळ बसवतानाची मजेशीर बडबड …. तीन तासातच स्वयंपाक तयार… थोडीशी परिस्थिती बरी असेल तर भाजी वगैरे …..नाहीतर मग सुरुवात पंगतीची… मानकरी,भजनीमंडळ, वयस्कर, बालगोपाळ आणि सर्वात शेवटी हे कष्टकरी…. प्रत्येकाने आपापले ताट, वाटी घेऊन यायचे आणि पंक्तीला बसायचे. वाढप व्यवस्था तरुण मंडळी… हा स्वतःच्या घरचे ताटवाटी आणि पेला घेऊन जायचा प्रकार पहिल्यांदा करणाऱ्याला संकोच वाटतो. आपणच आपल्या हातात ताट घेऊन जायचे आणि जेवायला बसायचे म्हणजे ! पण चुलबंद आवतन म्हणजे घरी काहीच बनणार नसतं… हे माहिती झालं की हळूहळू सवय होते. पाराच्या समोर देवासमोर जेवायला बसायचे. ताट वापस जाताना स्वतः स्वच्छ घासून-पुसून घेऊन जायचे. अन्नाचा एकही कण वाया घालवायचा नाही. समजा स्वयंपाक उरलाच तर, परत प्रत्येक घरी थोडा थोडा प्रसादा सारखा वाटून टाकायचा. केलेले गडंगण सगळ्या गावाचे… हलकी वाजवत वाजवत पूर्ण गावातून हे खाद्यपदार्थ फिरवले जायचे. पुन्हा तेच! घरोघरी वाटायचे आणि सर्वांनी मिळून खायचे. आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं शिकावं ते या पद्धतीतूनच… इथे संग्रह करून ठेवायचा नाही आणि आहे ते सर्वांनी वाटून खायचे… नवरी माहेरी जाऊन आल्यानंतर खास सांजोऱ्याची तेलची ….याची सुद्धा चव प्रत्येक घरी चाखली जायची दोन्ही गावातील स्त्रिया किती सुगरण आहेत हे यावरून ठरणार असतं ! कारण या तेलच्या सुद्धा अनेकजणींनी मिळून मिसळून केलेल्या असतात. कोर (चतकोर) का होईना पण प्रत्येक घरी याचं वाटप होणारच. अशा कितीतरी बारीक-सारीक गोष्टींतून सर्वांसोबत मिळून-मिसळून देत घेत आनंदाचा क्षण साजरा करणारे गावं या गावातील ही चूलबंद आवतनं ….खूप काही देऊन जाते, शिकवून जाते. हे केवळ आनंदाच्या प्रसंगी होते असे नाही तर दुःखाच्या प्रसंगीसुद्धा हीच आपुलकी, माया, प्रेम….सांत्वना, मदत, सहसंवेदना… त्या घरांमध्ये चूल बंदच असते. मात्र हे आवतन न सांगता, न बोलता शांतपणे दुःखात सहभागी होते…भाकरीची चवड घेऊन दुःख हलके करायला रोज दिलेले असते. वेदना… शोक… झालेल्या त्या घरातील, सगळी कामं सुरळीत होईपर्यंत… हे ताट समोर आणून केलेले सांत्वन असते. गोड न लागणारे जेवण, टाकून देत असलेला घास… पुन्हा मायेने पाठीवरुन हात फिरवत खायला लावत असतो. सुखदुःखात सामावून घेणारी ग्रामीण भागातील बंद होत चाललेली… पूर्ण गावात एकोपा ठेवण्यासाठी… एकमेकांना मदत करणारी पद्धत जवळपास बंद होत चाललेली दिसून येते… काही ठिकाणी केवळ काही कामापुरते एकत्रीकरण दिसते परंतु तो चूलबंदचा आग्रेव ( आग्रह) आता कोणी फारसा करत नाही…. काही कामांसाठी एकत्रीकरण होते परंतू औपचारिकता जाणवतेच !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
14 thoughts on “1.चूलबंद आवतनं….”
खूप सुंदर 👌👌
Khup chan likhan👌👌👌
पंगतीचे तयारी चे चित्र आणि संदेश भावतोय मनाला
निरीक्षणदृष्टी सुक्ष्मातील सुक्ष्म ओळखणारी , टिपणारी आणि मांडणारी आणि वाचत असताना प्रत्यक्ष अनुभवापर्यंत घेऊन जाणारी अर्थ अलगद उलगडून सांगणारी..
सामाजिकता ग्रामीण संस्कृती, पद्धती हीच हेच खरे भारतीयत्व💐
हे बंध रेशमाचे, मायेचे, प्रेमाचे प्रेमाने जपले पाहिजेत 👌👍💐
सुंदर लिखाण
खूप छान लिहीतेस
पूर्वीच्या या पद्धतीमुळे एकोपा वाढण्यास मदत व्हायची, प्रेम ,काळजी दिसून यायची अप्रतिम विश्लेषण!
खरचं जुन्या दिवसाांची आठवण येते.खूप छान
गेले ते दिन गेले….
चुलबंद आवतनं जुन्या आठवणीत घेवून गेल
खूप छान लिहिले आहे !!!
गावातील लोकांचे एकमेकांशी असलेले आपुलकी
चे नाते आता Professional झाले आहेत.
खूप सुंदर लेखन. अप्रतिम लेखन..मस्त माहिती.👍
डोंगर शेळकीला हीच प्रथा आहे अजुनही.लहाणपणीची आठवण आली.👌👌👌