काय फरक पडतो?….

 

कोणत्याही ठिकाणी, कुठेही  काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो.

अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील आपण शिकत असतो. कधी चुकांमधून शिकत जातो. 

काही व्यक्ती, काही अनुभव मात्र कायम स्मरणात राहतात. जेव्हा आपल्याला गोड बोलून काम करून घेतात. आपलाच घात होतोय हे झाल्यानंतर कळते. आपल्या सोबत विश्वासाने बोलून आपल्यालाच कटकारस्थानात गोवणारी काही माणसे…. वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणारी माणसे…..  फार फरक पडत नसेल, पण ही वृत्ती एका पिढीकडून नकळतच दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. थोरामोठ्यांचा ज्ञानाचा, अनुभवाचा मान नक्कीच असावा, करावा. परंतु केवळ मेंढरासारखे मागे यावे आणि लाळ घोटेपणाची अपेक्षा करत असतील तर मात्र त्यांचे नेतृत्व झुगारुन देण्याची हिम्मत असावी लागते, नाहीतर कर्तव्याचा कोंडमारा होतो. काहीजण खोट्या गोष्टी सांगून नवीन पिढीची दिशाभूल करत असतील तर त्याला नकार आणि प्रतिउत्तर देण्याची शक्ती असलीच पाहिजे.  स्वतःच्या नेतृत्वाने दुसऱ्यातील गुण ओळखून अनेक नेतृत्व तयार करण्याची योग्यता असलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रिय होत असते. मी, माझं, मला पेक्षा आम्ही, आपण, आपले असा विचार जेव्हा होईल तेच खरे गटकार्य. भलेही त्यांंचे वैयक्तिक कौतुक कोणी करणार नाही. त्यांंनी दिलेली प्रेरणा, विचार, मदत, सल्ले, समजून घेतलेल्या अडचणी,  सोबत काम करणाऱ्या व्यक्तींंच्या कायम मनात घर करत असतात. आदर निर्माण करत असतात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार करत असतात. माणसे जोडली जातात. अशी माणसं जीव ओतुन तुमच्यासाठी काम करतील आणि स्वतःचा सुद्धा क्षमतेनुसार विकास करतील. 

 नोकरी आणि सेवा यामधे हाच फरक आहे.

खूप मोठं काही करायची गरज नाही. जे काम करतो ते प्रामाणिकपणे करत रहा, कायम समाधान सोबत राहील. काही व्यक्तींच्या शब्दांंतून  मोठेपणा जाणवत नाही की, मीच बरोबर! तुम्ही चूक! असा भावही नसतो. गोड बोलण्यापेक्षा स्पष्टपणा दिसतो, अशी माणसे खुनशी नसतात, ठरवून काटा काढणारी वृत्ती नसते. सगळ्या सोबत संवाद सारखाच असतो. वर्तनात तटस्थपणा असतो. व्यक्तींंपेक्षा कामाला महत्त्व असते, वैयक्तिक हेवेदावेे यांना थारा नसतो. योग्यतेची निवड केली जाते. आहे ते ज्ञान पुढच्या पिढीकडे देण्याची वृत्ती असते. म्हणून अश्या आदरणीय व्यक्ती कायम स्मरणात राहतात.  यातून स्वतःला घडवणे महत्त्वाचे.

आपण काय शिकलो? या सगळ्यांंमधून… शेवटी हेच महत्त्वाचे असते.

सगळ्यांना थोड्याफार फरकाने अनुभवातून जावेच लागते. आपल्या कामांचा आनंद कमी होता कामा नये….

परंतु नकारात्मक विचार करणारे याऊलट विचार करू लागतात. मग सुरू होतात भुमिका, मुखवटे आणि येतो नाटकीपणा. हो ! होकार ! आणि आहे त्याचा स्विकार. जे चाललय ते चालू द्या. शक्य तेवढ सांभाळून घेत कधी सहन, कधी सहभागी, कधी इच्छा नसताना, कधी बळी पडून, कधी दबावाने, कधी पर्याय नसल्याने, कधी मूकपणे. खरच हेच वागणं म्हणजे आपण असतो का?…. याचा विचार केला पाहिजे. एखादे काम उभारीने हातात घ्यावे आणि केवळ एखादा प्रसिद्ध होईल, कौतुक होईल, फक्त विरोध म्हणून , कोणी ते अपयशी ठरण्यासाठी जीव तोडून कारस्थान करावे. आपण बळी पडावे पुन्हा उठावे पुन्हा नवीन प्रयत्न, पुन्हा तेच यापेक्षा आपण आपला मार्ग बदलला तर ! याचा अर्थ हा असतो का? कधीच नाही ! कारण जे बदलतात ते खरे नसतातच ! याउलट  चांगले अनुभव, चांगल्या व्यक्ती, त्यांचे मार्गदर्शन स्मरणात ठेवून आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत राहणे, जगणे योग्य ! स्वतःच्या आनंदात इतरांनाही आनंद देत, कायम समाधानी आणि उत्साही आणि सकारात्मक…..फक्त दिशा बदलून ! शक्य होईल का? नक्कीच नाही ! कारण परिस्थितीनेेेे बदलणे आणि परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे यामध्ये फरक असतोच. यश येईल नाही याची चिंता कशाला ? प्रयत्नच केला नाही तर !  मग व्यक्ती आणि परिस्थितीचे दुःख करत बसण्यालाही काय अर्थ ? 

नकारात्मक विचार करणारांनी खोटे लेप, मुखवटे धारण केलेले असतात. जे खंबीर असतात ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आत्मविश्वासपूर्वक काम करतात. यशापयशाचा विचार न करता ते कोणत्याही व्यक्तींमुळे, परिस्थितीमुळे विचलित होत नाहीत उलट तेवढ्याच ताकदीने, जोमाने घेतलेले कार्य, जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत असतात. वेळ प्रसंगी सर्वांचा विरोध घेण्याची तयारी असते. सर्व अनावश्यक गोष्टींना बाजूला सारून, दुर्लक्ष करून ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची प्रवृत्ति असते. यामुळेच तर अशा व्यक्तींना संकटसुद्धा संधी वाटत असते. केलेला विरोध, दिलेला त्रास हेेे होणारच आहे. गृहीत धरलेले असते. संघर्ष सुद्धा त्यांना प्रेरणा देत असतो,  जिद्द देतो, नवीन जाणीव देत असतात,  अनुभवाने समृद्ध करत करत सक्षम बनवत असतात. यामुळेच तर परिस्थिती कशीही असली तरी, कोणत्याच गोष्टीने काम करणाऱ्याचे अडत नसते. यासाठी स्वतःवर विश्वास असावा लागतो आणि काम करत असताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. योग्य काम करत राहणे हेच समाधान असेल तर कोणत्याही गोष्टींनी काय फरक पडतो ? काहीही फरक पडत नसतो ! 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

20 thoughts on “काय फरक पडतो?….”