कशासाठी ?….

भगवंताचा अंश नसलेला एक अणूसुद्धा नाही. त्याच्या अस्तित्वाचा वादच निरर्थक आहे. परंतू समज असा की  , मृत्यूनंतर देव भेटतो…. म्हणून मृत्यू स्विकारतं का कोणी? कोणी तसे करूही नये. जन्मभर पूजा, प्रार्थना, भक्ती कशासाठी ? त्याच देवाला प्राप्त करण्यासाठी… जो नंतर भेटणारच आहे!
भगवंत इथेच आहे. सर्व सोपस्कार आपल्यात बदल व्हावेत म्हणूनच. त्याच्यात बदल करण्याची काय आवश्यकता आहे ! भक्ताला भेटावं,  असा भाव त्याच्यात निर्माण व्हावा लागतो मग मात्र अंश ते पूर्ण स्वरूपात  जाणवतो. ओळखता आलं पाहिजे. प्रभू श्री रामाला अयोध्येतच जन्म का घ्यावा वाटला असेल? वामनाने आई म्हणून आदितीचीच निवड का केली असेल? पार्श्वभूमी आणि प्रयत्न, जाणीव आपण कमी पडतो. म्हणजे जेवढी भक्ती तेवढी प्रचिती. विनाकारण त्याग, त्रास नशिबाला आलेले भोग यासारख्या कल्पनांच्या दुःखाने भरून जातो. हे सगळं देवाला, आपल्याला देऊन पुन्हा भेटायचं होत तर त्याने इथे पाठवलं कशाला? जीवन जगण्यासाठी कर्म, अर्थ, सत्य शोधण्यासाठी मुळात काही गोष्टी गृहीत धरूनच आपण जगत असतो.हे असचं आहे ! हे तसच असतं ! आणि या गोष्टींनीच भरून जातो….आणि यातच भरून वाहतो. 
योग्य वेळी रिक्त होता आलं पाहिजे, कोणतीही इच्छा न रहाणे आणि कोणतीही इच्छा नसणे यामध्ये हाच फरक आहे. काय नश्वरतेचे आणि काय ईश्वरतेचे !…हे  समजून घेण्याचा प्रयत्न केला की फरक लक्षात यायला लागतो. मूळ ईश्वरवाद समजून घेण्यासाठी  किमान प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. यासाठी कोणत्याही धार्मिक-अध्यात्मिक गोष्टींचे मूळ स्वरूप लक्षात यायला हवे.सर्व शंका दूर  होतात. मुळात शंकाच राहत नाहीत आणि मग हा सगळा अट्टहास कशासाठी हे लक्षात यायला सुरुवात होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

11 thoughts on “कशासाठी ?….”