कथा गोष्टींची….

“वेद,पुराणगोष्टी, कथा कशासाठी!
ब्रम्ह, तत्व, आत्म, गूढ सांगण्यासाठी.
आकलन आवाक्यात आणण्याचे,
जटील सुलभ करण्याचे कथा तंत्र
जाणले ऋषीमुनींनी हाच सक्षम मंत्र.
पुढे अखंड जपला थोरामोठ्यांनी
भक्ती, वाणी आणि संस्कारांनी
सध्या मात्र गोष्ट चिंतन,मननाची,
थोडा बदल करण्याची…….
गोष्टीत सामर्थ्य कशाचे!
संस्कार रंजकपणे करण्याचे.
बालपणीचा काळ सुखाचा
आजीची भाजी,चिऊ-काऊ जेवायला, रात्री चांदोमामा,विक्रमवेताळ भीतीला.”
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बालपणापासूनच या गोष्टीने केलेली सुरुवात बालविश्वाची साथ, सोबत शेवटपर्यंत या ना त्या स्वरूपात असते. असाहा हा मजेशीर, छान सर्वांना हवाहवासा वाटणारा गोष्टीं, कथा, कहाण्यांचा प्रवास ऐकून, वाचून सोबत करत असतो. लहान असताना मित्र-मैत्रिणींच्या गराड्यामध्ये गोष्टी सांगायची चढाओढ असायची. भुताखेतांच्या, कोणाची फजिती झालेल्या, बालविश्वातील सर्व भावभावनांचा उत्साह या गोष्टींमध्ये असायचा. कधी मनाने रचल्याही जायच्या आणि यामध्ये या गोष्टीतील उत्सुकता ताणून धरायची सांगतो सांगतो, हं हं सांगते सांगते म्हणून सुरु करायची… आणि सांगायचीच नाही…भाव खाऊन जायची गोष्ट सुद्धा…. आत्ता सांगते म्हणायची आणि आजीला कंटाळा आला की मग आजी म्हणायची,” एक होता सांगू आणि एक होता नकू, सांगू चढला झाडावर! खाली कोण राहिलं? मग सगळे झोपेने आधीच पेंगूळलेले डोके, डोळे… लगेच उत्तर देणार “नकू” मग आजीचे उत्तर नको तर नको गोष्टच नको, झोपा आता ! अशी एकमेकांची मजा घेत गोष्टी सांगितल्या जायच्या मग त्यातील एखादं नातवंड हळूच म्हणायचं आता मी सांगू का गोष्ट,” एक होता पोष्ट , झाली माझी गोष्ट आणि किमान एकतरी गोष्ट रोज रात्री ऐकायचीच.आजीच्या गोष्टींमध्ये वेगळाच बाजं असतो तर बोलीभाषेतील लोककथा ऐकणे म्हणजे हसून हसून पुरेवाट होते..ती सांगण्याची पद्धत, आवाजातील विशिष्ट शब्दांचा काढलेला हेल म्हणजे त्या गोष्टींचा प्राण असतो. या गोष्टी स्थानिक पारंपरिक जीवनानुभव पुढच्या पिढीला देत असतात. कथांचे प्रकार किती ! प्रत्येकीची शैली वेगळीच…. अगदी गुजगोष्टी, कानगोष्टी सुद्धा तणावमुक्तीसाठी उपयोगी असतात. माहिती, ज्ञान, कुतूहल, आश्चर्य, भिती, संस्कार, संस्कृती, आदर्श, प्रेरणा, अभिव्यक्ती, समस्या मांडणी त्यातून मार्ग, मनोरंजन, विनोद, संदेश, दुःख,वेदना, विरह, आनंद, प्रेम,जिद्द…. कितीतरी भावभावना या कथांमधून व्यक्त होतात. एकाचा अनुभव दुसऱ्याला उपयोगी होतो. विस्ताराला समेटण्याचे कौशल्य आले की कथा, गोष्ट तयार होत असते. अवघड काही सांगायचे असले की या गोष्टींचा उपयोग सोपे करून सांगण्यासाठी फार छान होतो. व्यक्ती. प्रसंग यांचे उदाहरण समोर ठेवलेले असते कधी सत्य तर कधी काल्पनिक पद्धतीने म्हणून तर ते मनाला भिडते आणि भावते. हे सांगण्याचे कौशल्य जेवढे प्रभावी तेवढे ते कान देऊन ऐकले जाते. मन एकाग्र करून वाचल्या जात असते. आपल्याला सहज प्रश्न पडतो अध्यात्मामध्ये एवढ्या गोष्टी कथा कशा ? तर ऋषी-मुनींनी जाणले होते आत्मज्ञान, ब्रह्म, संस्कार, जीवनाचे तत्वज्ञान सांगायचे असेल तर सोपे करून सांगण्याचा, सर्वसमावेशक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे कथा-कहाण्या. कोणतीही कथा पहा, त्यामध्ये काय असते? तर नीतिमत्ता सोडली, संस्कार सोडले की नुकसान मग हालअपेष्टा मग पश्चाताप मग आशीर्वादाने परत सगळे पूर्ववत आणि सुरळीत.
हा प्रयत्न आजही विविध कथा प्रकारातून आहेच. पण तेच तेच म्हणून अर्थ, उद्दिष्ट बाजूला होते. आजच्या पिढीला त्या कंटाळवाण्या वाटू शकतात. अति काल्पनिक उदाहरणे दिले तर मूल कल्पना करू शकत नाही. त्याला नवीन स्वरूप दिले तर त्यांच्या भोवतालचा किंवा त्यांचा सहसंबंध निर्माण होणारे त्यांच्या आवाक्यात येणारे अनुभव आहेत ते कल्पना करु शकतात. असे अनुभव अशी उदाहरणे यामध्ये सांगितली तर नक्कीच मुले ऐकतील.
उदा. आटपाट नगर होते,
त्यात बंडूचे ही घर होते,
बंडू भारी खोडकर आणि हट्टी,
सर्व उपाय करून झाले !
तो काही ऐकेना, मग काय ठरवले?
आपण सारे ऐकुया,
एकदा काय झाले…….
वगैरे वगैरे पुढे सवयी, प्रसंग, त्याचा परिणाम, उदाहरणे आपल्याला सांगायची असलेली गोष्ट सांगून,
बंडू सारखे कोण आहे ? हे असे विचारून योग्य अर्थ सांगून गोष्ट पूर्ण करायची.फार मजा येते. मुले गालातल्या गालात हसत कधी मान खाली घालून कधी नजर चोरून तर कधी बिनधास्तपणे मान्य करत असतात. कोणतीही गोष्ट मुलांच्या दररोजच्या दैनंदिन व्यवहारातील, अनुभवातील, जगत असलेले उदाहरणे असले की मुलं लक्ष देऊन ऐकतात. ही त्यांचीच गोष्ट असल्याचे वाटते.
म्हणून तर मग शेवटी,
“साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण”.
असा करून शेवट केलेला असतो. याचा अर्थ काय !तर दीर्घ स्वरूपाचे उत्तर लघु करून सांगणे उदा. साठ उत्तरे पाच उत्तरातच देता येण्याचे कौशल्य या कहाण्यांमध्ये आहे आणि ती संपुर्ण फळ देणारी, उत्तर देणारी, शंकांचे निरसन करणारी आहे असा असू शकतो. किंवा व्यक्तीने साठ वर्षे वयाच्या आयुष्यात सक्रियपणे जगत असताना उपयोगात येणारे संस्कार, संस्कारक्षम वयात पाचव्या वर्षापासूनच कथा, गोष्टी, कहाण्या स्वरूपात ऐकायला हवेत. त्याची सुरुवात व्हायला हवी. विस्तारित कथनाला थोडक्यात मांडून त्यातून परिपूर्ण,संपूर्ण अनुभव सांगून नेमके उद्दिष्ट म्हणजेच फलश्रुती सुफळ होणे. यासाठी या कथा आणि गोष्टी आजी-आजोबा, आई-बाबा थोरामोठ्यांनी, बाई गुरुजींनी या फलदायी उपयुक्त आणि संपूर्ण सांगायला हव्यात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

10 thoughts on “कथा गोष्टींची….”