चालायला लागले की पायाखाली काटे असणार, येणारच…. तरीही संघर्ष करत दृष्टी वर उचलती ठेवली की क्षितिज खुणावत असते. पायातले काटे टोचत नाहीत तर गती वाढवतात…. क्षितिजाकडे जाण्याची.
क्षितिजाचे खुणांवणे भारावून टाकणारे असते. प्रत्येकाचे क्षितिज असतेचं पण आपण दृष्टीचा कोन बदलायला बहुधा तयार होत नाहीत. आकार, रेषा, व्याप्ती हा दृश्यभाग परंतु क्षितिज दृश्य नजरेस पडण्या अगोदर….न दिसणारा पण असणारा अदृश्यकोन तयार करावा लागतो… आणि म्हणून जर योग्य तो कोन तयारच झाला नाही तर हे आपले क्षितिज नजरेत येत नाही. हा कोन बदलायला आणि तयार करायला सुरुवात केली की हे क्षितिज आणि आपल्यातले अंतर कमी व्हायला लागते. मुळात क्षितिज ही कल्पना असते. ते दिसते, भासते पण अशी कोणतीही रेषा नसते. निसर्गाने हे आभासी क्षितिज का तयार केले असेल? कदाचित ‘आशावादी क्षितिजरेषा’ असते जिच्या दिसण्याने आणि असण्याने आयुष्याच्या प्रवासाची गती आणि स्थिती बदलते. क्षितिज कधीच भेटणार नसतं कारण भेटल्यानंतर, कोणतीही गोष्ट प्राप्त केल्यानंतर हा प्रवास थांबणार असतो. म्हणजे धडपड, कष्ट, प्रेरणा थांबून शिथिलता येणार असते हे तत्व निसर्गाला माहिती आहे. म्हणूनच निसर्गाची निरंतर बदलाची, समृद्ध होण्याची प्रक्रिया मानवी जीवनातही यावी म्हणून ऋतू बदलाप्रमाणे या बदलत्या प्रवासाचा आनंद जो असतो तो आयुष्याला प्राप्त व्हावा. प्राप्त होऊन ऊर्जा, प्रेरणा, अर्थ, समजावा यासाठी निसर्गदेवतेची आभासी चमत्कारी, सुंदर, रचना. या क्षितिजरेषेच्या अर्थामुळे आयुष्यात इंद्रधनू रंग भरले जातात. हा इंद्रधनू देखील आभासीच पण निसर्गाचा आणखी एक चमत्कार. चमत्कारी, सुंदर, रचना… पाणी आणि ऊन यांचा मिलाफ काय सांगत असतो? सूचित करीत असतो? डोळ्यातील पाणी आणि डोक्यावरचे ऊन (कष्ट, त्रास) एकत्र आले की नजरेत सुद्धा हा इंद्रधनुष्य दिसत असतो. त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते. तरच आयुष्यात आपल्या आकाशातील क्षितिज आणि इंद्रधनू स्पष्ट दिसतात. एकदा हा दोन्ही आकाशातील इंद्रधनूक्षितीजाचा कोन आणि अनुभूती आली की, येणाऱ्या अडचणी, कठीण प्रसंग या.. अश्रूंमधून… पावसाच्या धारांप्रमाणे वाहून जातात…पण गेलेतरी ढगाळलेले…काहींसे बरसलेले पाणी काचेसारखे… आरपार निर्णय करत करत….खंबीर बनत… आणि ऊन्हा प्रमाणे कष्टातही जीवनात कसे रंग भरावे! असा संदेश नजरेतील इंद्रधनुष्य देत असतो. दृष्टीच्या ज्या कोनातून हे ऊन, हे अश्रू पाहायला पाहिजेत तसे पाहिले नाहीत की मग मात्र काळा किंवा पांढराच रंग दिसणार. ज्याची त्याची दृष्टी किती वर आणि सर्वव्यापी आहे यावर ठरते. निसर्गनियमानुसार कोन तयार झाला, केला तरच हा चमत्कार घडणार असतो. हे सगळं आपल्याच मनःपटलावर परावर्तित होणार असतं. मग किती अंशाचा कोन लागत असेल? स्वतःला पूर्ण व्याप्त करणारा अनुभव, भाव, जाणिवा, ऊर्जा यांच्या रेखांकित वर्तुळाची व्याप्ती वाढविणारा अंशतः नाही तर पूर्णतः दृष्टीकोन लागतो. तरच जीवनाच्या पूर्ण रंगाचे इंद्रधनुष्य तयार होईल. स्पष्ट दिसणारे इंद्रधनुष्य तयार होईल. या स्पष्टपणातूनच इंद्रधनुषी आशावादी दृष्टिकोन निर्माण होत असतो. इंद्रधनुष्य एकाच रंगातून अनेक रंग निर्माण करण्याचे कौशल्य, ऊर्जा, कितीही अडथळा आला तरी ताकदीने पुन्हा परावर्तित होऊन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करत असतो सोबतच संदेश देत असतो. हे निसर्गनियम, चमत्कार, सुंदर रचना आपल्यासाठीच बनवले आहेत. आपण दृष्टी वर करून पाहतच नाहीत. केवळ आखून दिलेल्या एकमेकांच्या समांतर रेषा पाहण्यात आणि पुसण्यात गुंग. दृष्टी वर उचलण्यासाठी, क्षितिजाकडे झेप घेण्यासाठी स्वतःला, पायांना जमिनीवरच ठेवावे लागते. मगच तो प्रकाश, ती किरणं तो सूर्य, क्षितिज, इंद्रधनु विलोभनीय दिसत असतो. खरेतर क्षितिजाकडे जाताना रस्ता अनोळखी असतो. तर इंद्रधनू निर्माण करण्यासाठी किरणांना अवकाशातील उजेड आणि अंधाराचा खेळ खेळत, आरपार करतच तितक्याच ताकदीने परावर्तित व्हावे लागते. तरच स्पष्टपणा येतो तसंच आयुष्यातही असतं. प्रत्येकाची अनोळखी वाट प्रत्येकाला चालावीच लागते. काटे, खाच-खळगे यांचे दुःख करत बसून जमत नसते. इंद्रधनू प्रमाणेच आधी ऊन-सावली, पाणी अंधार यांच्यासारखेच कष्ट, समाधान, अश्रू, संकटे यांना पार करून तितक्याच ताकदीने परावर्तित होऊन अनेक रंगांनी समृद्ध व्हावं लागतं. भोवताली हे रंग भरणं, आपल्यासोबतच ज्यांचं आयुष्य रंगहीन आहे, दुःखीकष्टी आहे, त्यांना आपलं हे क्षितिज आणि इंद्रधनुषी प्रेरणा, ऊर्जा, सकारात्मक दृष्टी आणि दृष्टी वर उचलण्यासाठी कदाचित मदत करणार असतं…..
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
10 thoughts on “इंद्रधनुष्य…”
निसर्ग आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध लेखणीतून सुंदर भावपूर्ण व्यक्त होतो आहे.. निसर्गाकडे पहाण्याचा वेगळा दृष्टिकोन…वाचनाची उत्सुकता वाढवतो👌
Vichar varsha👌
दृष्टी आणि सृष्टीच नातं सांगणारं स्फुट.. छान…
खूपच परिपूर्ण लेख आहे..मनस्वी अभिनंदन
Apratim. Ayushachya watevar yenare anubhav agdi sahaj aani sopya bhashet vykt zale aahet.
अभ्यासपूर्ण छान
अभ्यासपूर्ण चिंतन,उद्बोधक!
👌👌👍👍😊
सुंदर लिहिलंय. ‘आशावादी क्षितिजरेषा’ ही एक नवी आणि सकारात्मक दृष्टी आहे. आवडलं.
खरंच खूप छान लिहिले आहे