कमी शब्दांत परिणामकारक, विस्तारित अर्थ लपलेली रचना निर्मितीचे, एकापेक्षा एक सरस जादूगार…. त्यांच्या शब्द मांडणीतून आपल्याला समजणारे अनेक अर्थ.. या प्रतिभा वाचनीय असतात. त्यांचा अर्थ शोधण्यात अवर्णनीय असा आनंद असतो. हे जादूगार भाषेच्या पलीकडे असतात. त्यांच्या रचनांना भाषेचे कोणतेही बंधन आडवे येत नाही. भाषेतील सामर्थ्य आणि हे साहित्य समर्थपणे अगदी कमी शब्दांची मांडणी करून वाचकासमोर अनेक अर्थासाठी ठेवलेले असते. आपण अपेक्षित अर्थापर्यंत पोहोचलो की नाही हा सुद्धा प्रश्न पडतो ? आणि या अर्थांचा शोध लागेपर्यंत आपण शोध घेतो. तोपर्यंत स्वस्थता लाभत नसते. वाचणारा प्रत्येकजण अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. कधी आपल्या भावना या शब्दांमध्ये शोधत असतो तर कधी ऐकून, वाचून भावनांना वाट करून देत असतो. स्वतःचा अनुभव इतरांचाही असेल का? हा विचार करत असतो. तटस्थपणे तर कधी व्यक्तीनिष्ठ ही अर्थ लावले जात असतील परंतु रसग्रहणाच्या सर्वोच्च पातळी पर्यंत पोहोचलेल्या या रचना भावगर्भ असतात. काही काव्यप्रकार, कविता समजणे जरा कठीण का जात असेल ? कारण आपण फक्त शब्द, शब्दांचे अर्थ वाचत असतो याही पलीकडे जाऊन म्हणजेच शब्दांच्या पलीकडले…. त्याचप्रमाणे अर्थांच्या पलीकडेही अर्थ….. असतात. कवीला, नेमके काय म्हणायचे आहे, सांगायचे आहे?
कधी कधी शब्द जुळवणे इतके चपलखं असते की बाण निशाण्यावर तंतोतंत लागावा, इतका तो समर्पक अचूक मांडलेला असतो. शब्दांची निवड अशी त्या मागचे तंत्र… आयाम…. केवळ अभिव्यक्तीच्या माध्यमातून धागा धागा उकलत जाऊन विन कशी आहे ? हे समजून घ्यावे लागते. अनेक अर्थांमधील योग्य अर्थांपर्यंत पोहोचण्यासाठी तितक्या दृष्टिकोनातून ते साहित्य वाचणे, समजून घेता येणे आवश्यक असते. इथे वाचक या भूमिकेपेक्षा सर्वांगाने त्या लिहिणाऱ्याच्या भावनेचा, मनाचा तटस्थपणे विचार असतो. हा अभ्यास विषय अर्थकिमयेचा झाला की मग केवळ रसास्वादासाठी वाचन होत नाही. हे शोधलेले अर्थ इतरांनाही समजावेत हे काव्य सौंदर्य इतरांच्या मनात सामावले जावे. कदाचित यापेक्षाही काही वेगळा भावार्थ असू शकतो. आपण शोधलेल्या अर्थ अंतिम नसतो, इथे चूक-बरोबर हा हेतूही नसतो तर त्या अर्थांना विस्तारित जाणे, व्यक्त स्वरूप देता देता अर्थापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचे समाधान मिळवणे. ही शब्दांची जादुगिरी आश्चर्यचकित करून सोडते. कवी मनाचा शोध घेत घेत स्वतःलाही वाचनातून आनंद देते…आपल्या सोबत सर्वांना अर्थांपर्यंत…घेऊन जाण्याचा प्रवास आनंददायी असतो. कवी ग्रेस, बा.सी.मर्ढेकर,ना.धो.महानोर,भा. रा. तांबे यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता अशाच जादुगिरी करणाऱ्या … चाचपडत, शोधत शोधत गेल की…अनेकार्थ सांगणार… प्रत्येक वेळी नवीन भावविश्व उलगडणार…खोल,अथांग गुढ, निसर्गाच्या प्रतिमांचा वापर करून, मनाने मनाशी निसर्गाच्या माध्यमातून केलेला आर्त संवाद ….
अशाच गुणवैशिष्ट्याने नटलेला एक हायकू किंवा हाइकू हा काव्यप्रकार… जपानी भाषेतून मराठी, हिंदी, गुजराती आणि सिंधी भाषेमध्ये आलेला आहे. तीन ओळी आणि जवळपास सतरा शब्दावयवांचा, अक्षरावयवांचा हा काव्यप्रकार आहे. अतिशय शांतपणे गहन अर्थ सांगितलेला असतो. तत्त्वज्ञान सांगणारा हा काव्यप्रकार. मुख्य विषय निसर्ग असतो. निसर्गाच्या प्रतिमांमधून व्यक्त होणारा अतिशय तरल, समर्पक, चिंतनशील, सूक्ष्म अनेक अर्थांचा दीर्घ विस्तार करायला लावणारा प्रकार आहे. मराठी कवयित्री शिरीष पै यांनी मराठी काव्य सृष्टीमध्ये या काव्यप्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. निसर्गातील एखादी घटना, क्षण, पद्धत, निसर्ग नियम….. यासारख्या निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टी…. अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म शोधून आपल्या मानवी जीवनाचे साधर्म्य साधणारे असे हे शब्दबंध असतात. प्रतिमांचा वापर करून केलेले वर्णन असते. काही तरी गूढ असे सांगण्याचा प्रयत्न असतो. या काव्यप्रकाराने मनात, भावविश्वात अर्थांची तार छेडली जाते. तो क्षण अत्यंत कमी शब्दात नेमकेपणाने मांडलेला असतो. भारतीय भाषांमध्ये हा प्रकार आला आणि थोडेसे स्वरूप बदलले. शब्दांची मर्यादा कधी कधी थोडीशी वाढलेली असते. कधी तीन तर कधी चार ओळीत हा प्रकार रचनाबद्ध होतो. अर्थांची गोडी अवीट आहे. मनाला,बुद्धीला भुरळ पाडते, अचंबित करते. अर्थ शोधत असताना नवनवीन जीवन प्रदेशात घेऊन जाते. पहिल्या दोन ओळीत जी कल्पना असते त्याला एकदम धक्का देणारी तिसरी ओळ…. अचानक अर्थांचे वळण घेणारी असते. गतीमान शब्दबंध रचना म्हणजे हायकू. मराठी साहित्यात कवयित्री शांता शेळके, अंजली पोळ, सुचिता कातरकर, कवी राजन पोळ, पु.शि.रेगे, सुरेश मथूरे, तुकाराम खिल्लारे इत्यादींनी सुंदर अशा रचना केल्या आहेत. तर हिंदीमध्ये कवी रवींद्रनाथ ठाकूर, करुणा प्रभामय, सत्यभूषण वर्मा, सुधा गुप्ता यांनी देखील सुंदर असे लेखन केले आहे. हा काव्यप्रकार दिसायला अगदी छोटा,अर्थ मोठा आणि करायला तितकाच अवघड असतो. समजून घेताना सोप्याकडून अवघडाकडे असे तंत्र उपयोगात येते.
उदा. विचार प्रदूषण
नष्ट हिरवे वन
जपणार किती, कोण !अर्थः
१.एखाद्या व्यक्तीचे विचार दूषित असतील, विचारांमध्ये कोणताही दुषित विचार आला असेल तर स्वतःच्या आयुष्यात स्वतःहून हळूहळू उत्साह, आनंद नष्ट होतो. कमी होत जात असतो. ह्यासाठी दुसऱ्यांनी कितीही समजून सांगून उपयोग नसतो. जाणीव आणि स्वीकार स्वतःच करावा लागतो तेव्हाच त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःहून बदल होत असतो. फरक होत असतो. नाही तर सगळं नष्ट झाल्यातच जमा असते.
दुसऱ्यांनी किती काळजी घेऊन जपावे आणि काय उपयोग.
२. हे विचारांचे दूषित होणे स्वतःचे आयुष्य, स्वतःचा आनंद तर कमी करतेच परंतु ज्यांच्याशी संबंध येतो, सभोवताली दुसऱ्या व्यक्तींना देखील त्रास होतो. सामाजिकता न जपता दूषित वर्तनाने, विचाराने चांगल्या गोष्टी नष्ट होऊ शकतात. नष्ट होण्याच्या दिशेने प्रयत्न होत असतात. अशा व्यक्तींची संख्या वाढली की चांगला प्रयत्न करणाऱ्यांकडून किती प्रयत्न होऊ शकेल!
३. इथे शब्दशः अर्थ घेतलेला आहे परिसर, निसर्गाबद्दल प्राणी, पशूपक्षी, झाडे…. यांचा पर्यावरणवादी दृष्टीने विचार केला गेला आहे. जर पर्यावरणच्या दृष्टीने विचार केला गेला नाही. तर ही सगळी हिरवाई, जंगले नष्ट होणार आहेत. काही व्यक्ती किती जीव तोडून प्रयत्न करत आहेत. कुणी किती जपावे…यात स्वतःची भुमिका देखील अधोरेखित केली आहे… यासोबतच आपल्या सहभागाचा इतरांनीही विचार करावा.
४. अन्याय,अत्याचार ग्रस्त मुलींचे आयुष्य सुद्धा या विचारांच्या प्रदुषणाने गढूळ होत असते. नष्ट होत असते. कित्येक वेळेस अस्तित्व प्रस्थापित होण्याअगोदरच सगळे कोवळे, हिरवे भावजीवन उद्ध्वस्त झालेले असते. त्यांना परत त्यांच्या मूळ स्वभावात, मूळवृत्तीमध्ये, कृतीत आणण्यासाठी कितीही प्रयत्न झाले तरी ते फार अवघड होऊन बसते. त्यांच्या या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःहून स्वतःचेच प्रयत्न कामी येतात. असाही संदेश दिलेला आहे हे विचारांचे प्रदूषण होऊ नये म्हणून कोणाला किती प्रयत्न करावे लागत असतील, तसेच किती जपावे लागत असेल…. याची कल्पना न केलेली बरी. तीन ओळीतून स्पष्ट करून संदेश दिलेला आहे की प्रत्येक कृतीला, वर्तनाला चांगल्या विचारांची बैठक असावी लागते. विचारच व्यक्तीच्या कृतीमध्ये उतरत असतात. म्हणून हे विचारांचे प्रदूषण होणे टाळल्या गेले पाहिजे. यासाठी आपण किती प्रयत्न करायचे ते आपणच ठरवलेच पाहिजे. हे सगळे नष्ट होण्याअगोदर प्रयत्न केले पाहिजेत. हे अर्थ आणि याशिवाय आणखी काही अर्थ शोधण्यासाठी हेे शब्द बंधनातून मुक्त असतात…..
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
9 thoughts on “अर्थबंध….”
सुंदर रचना आणि अर्थ अतिशय रोचक
छान….
क्या बात है 👌 छान माहिती आणि रचना
👌👌
खरयं विचाराचे प्रदुषण टाळणे गरजेचे आहे.गैरसमजातुनच नात्यात दुरावा यायलायत्यामुळे विचार चांगले असणे फार महत्वाचे.
शब्द व त्यांचे विविध प्रकारचे अनंत अर्थ….👌👍👍
अर्थवलये आणि त्यातून निर्माण होणारे तरंग 👌👍
छानच
👌🏻👌🏻