अर्थपूर्ण खेळ…. भाग२

         निसर्गतः आपोआप बालकांकडून घडणारे खेळ, खेळल्या जाणाऱ्या क्रिया, कृती त्यांना बंधन घालतो. साचेबद्ध, नियंत्रित दिशा देतो त्यामुळे मुले गोंधळून जातात किंवा नेमके स्वतःला काय पाहिजे हेच समजत नाही पण जे समोर आहे ते नको असते….तेच तेच पर्याय कंटाळवाणे वाटतात. यापैकी काही उदाहरणे म्हणजे मुलगा असला की बॅट बॉल गाडी आणि मुलगी असली की भातुकली, बाहूली तर कधी खेळण्याच्या संग्रहामध्ये सुद्धा पालकांची आवड आणि निवड असते. मूल कधी खेळणी सोडून त्याच्या खोक्याशीसुद्धा अगदी एकाग्र होऊन खेळत असते. केवळ महागड्या खेळण्या, काही ठराविक खेळण्यांची निवड….. यापेक्षा समोर सर्व पर्याय ठेवायला हवेत आणि स्वतःहून बालक कोणत्या वस्तूंकडे आकर्षित होतो हे पाहायला हवे. हळूहळू नेमका कल आणि आवड लक्षात येण्याची ही सुरुवात असते. म्हणजे केवळ खेळणीच्या संग्रहापेक्षा उपलब्ध वस्तू, जागा, परिसर याचा उद्देश नवनवीन वस्तूंचे दृष्टीसमोर आणणे, दाखवणे, निरीक्षणात्मक नजर तयार करणे, हातांचे, बोटांचे स्नायू बळकट करणे, एका जागी स्थिर बसणे, लक्षपूर्वक ऐकणे या गोष्टींसाठी हेतुपूर्वक वस्तूंचा खेळ खेळणे आणि खेळवणे घडत गेले ही बालकांकडून स्वतःहून ग्रहणशील शैक्षणिक वर्तन घडू लागते. यासाठी कोणत्याही तयार खेळणी पेक्षा त्याचे सुटे भाग जोडून तयार करता येणारी वस्तू, चढता उतरता क्रम, एकंमेकात गुंफण्याचे लहान मोठे गोल, विविध आकार आणि रंग याचा वापर असलेल्या क्रियाशील खेळण्या, वाळूतील रंगीत खडे, शंखशिंपले संग्रह, रंगीत कपड्यांचा उपयोग, वाळूचा खोपा, चिखलाच्या वस्तू जशा जमतील तशा तयार करू द्याव्यात. हातांची स्मरणशक्ती सर्वात जास्त असते त्यामुळे वेगवेगळे आकार, स्पर्श मुले हाताळतील तेवढे समृद्ध होत जातात. भाज्या, फळे, भोपळ्याची साल, विविध बिया, वेगवेगळी पाने, देठ, काड्या यांचे आकार करणे. वेलची जायफळ, लवंगा, डाळी कडधान्य हे वेगवेगळे पदार्थ हाताळायला मिळाले पाहिजेत. दगड, पाणी, वाळू, माती, लाकडाचे तुकडे अशा नैसर्गिक गोष्टींचे आकर्षण असते. बागेत, शेतात, घरातील परसबागेत…. शेंगा, पाने-फुले यांचे विविध आकार, वास, स्पर्श मुलांना अनुभवता येतात. मुलांना असा हिरवा तास दिवसातून अर्धा तास नक्कीच देऊ शकतो. असे विविध रंगाचे तास आपण त्यांच्यासाठी  तयार आणि उपलब्ध करू शकतो. निसर्गाच्या सहवासात त्यांनी राहायला हवे त्यातून त्यांच्या मनात कितीतरी गोष्टी पेरल्या जातात. मनाची ही ग्रहणशील अवस्था, प्रत्यक्ष अनुभवावी लागते. काठावर उभे न राहता अनुभवात उडी मारावी लागते. हे आपल्या दृष्टीने रिकामेपण, खेळ, निवांतपणा, एखाद्या गोष्टीमधील रमणे, फावला वेळ म्हणजे निष्क्रियता नसते, हा वेळ कधीच वाया जात नसतो…. यासाठी परिपूर्णतेची अपेक्षा करू नये. जसे जमेल तसे अनुभव देत जावे. पुढे देखील शाळेतील कोणताही उपक्रम पालकांनी करू नये तर मुलांना अनुभव घेण्यासाठी आवश्यक तेथे फक्त मदत करावी. ही काही उदाहरणे आहेत यासारख्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात कल्पकतेने त्याचा वापर आपण करू शकतो. जोपर्यंत मुल औपचारिक शिक्षण घेण्यायोग्य होते त्याआधी हे घडायला हवे. वरील सर्व गोष्टी करत असताना पालकांना मात्र ‘मालक नव्हे पालक’ हे लक्षात ठेवून या गोष्टी कराव्या लागतात. माझी एक मैत्रीण आहे याबाबतीत मला तिचे आजही फार कौतुक वाटते. तिच्या घरातील मुलांची खोली म्हणजे त्या मुलांचे विश्वच. उपलब्ध जागेत सर्व काही देण्याचा तिचा प्रयत्न विशेष होता. पूर्ण खोली रिकामी आणि कोपऱ्यात मुलांना घेता, ठेवता येतील अशा पद्धतीने सर्व वस्तूंची रचना केलेली होती. मुलांनीच खेळणी, वापराच्या वस्तू मांडणे खेळणे, आणि परत आवरून ठेवणे. हे स्वातंत्र्य मुलांना हळूहळू घरातील, शाळेत आणि सर्वच बाबतीत सवय करत असते. कारण या अनुभवातून, प्रत्यक्ष कृतीतून आलेला नियम ते शिकत असतात.
बाहेरील मुलांसोबत खेळ सुरू झाला की, सुरू होते ती मैत्री. हे खेळणे सुद्धा फार प्रिय असते याबाबतीत एक आठवते आम्ही काही मैत्रीणी मिळून प्रत्येक सुट्टीला कोणाही एकीच्या घरी सर्वजणींचे मुले दोन दिवस एकत्र ठेवत असू….पुर्ण सुट्टी फक्त मित्रांसोबत हा आनंदच वेगळा!
सहसा घडते काय दंगा, खोड्या खेळ याचा त्रास होतो. “आता मांडी घालून, हाताची घडी तोंडावर बोट, एक शब्द बोलू नका”. पुन्हा आवाज आला तर बघा! ओरडणे, रागावणे मार… वगैरे वगैरे सुरू होते. तरी मुले ऐकत नाहीत फक्त ऐकल्यासारखे करतात आणि पुन्हा गोंधळ सुरू करतात. सध्या तर सर्रास मुलांचे घरात बोलणे सुरू असते मी का करू? मला खेळू दे! पालक विचार करतात आमच्या लहानपणी असे नव्हते, पण आईबाबा, आजी आजोबा सर्वांनीच समजून घ्यायला हवे आपल्या खेळाची वेळ किती होती ! आणि आपल्या पाल्याच्या खेळाची अवस्था काय आहे? नैसर्गिक उर्मी, उत्साही शक्ती , खेळकर वृत्ती कशामुळे कमी होत आहे? आधीच टीव्ही, मोबाईल, शिकवणी यामुळे नष्ट होत आहे. बालकांच्या या नैसर्गिकतेला योग्य प्रकारे व्यक्त होता नाही आले की, नकळत ताण येत असतो. मुलं वेगवेगळ्या रूपात व्यक्त करत असतात. खेळून थकून आले तरी खेळल्यामुळे शांत झालेले असतात, एकाग्रता वाढते, वाव दिल्यामुळे आज्ञाधारकपणा वाढतो. त्यांचा खेळ त्यांच्यासाठी अर्थपूर्ण असतो. तो निवांतपणा असतो त्यावेळी कुठलाही दबाव त्यांच्यावर नसतो म्हणून एकाग्रतेने केलेली क्रियाशीलता असते. ती वरवरची करमणूक नसते तर खेळाच्या माध्यमातून ते गंभीर प्रयत्न करत असतात. कदाचित स्वची जाणीव स्वतःहून केलेली विकासाची धडपड असते. यातूनच तर ते मोकळे होतात कितीतरी गोष्टी मिळवतात.
वस्तूंंची वाटणी, व्यायाम, आनंद, समवयस्क सोबत समायोजन, अनुकरण, नवीन गोष्टींचा स्विकार करण्याची तयारी, नवनवीन अनुभव…..
यापुढील खेळ सुरू होतो तो शाळापुर्वतयारी आणि शाळेत
क्रमशः….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

10 thoughts on “अर्थपूर्ण खेळ…. भाग२”