काल संचिताची भेट झाली, झोपाळा खेळतांना नाक आणि तोंडाला भरपूर लागले होते. आईकडे खेळायला जाण्याचा हट्ट करून लगेच खेळायला गेली…. शस्त्रक्रिया झाल्यामुळे महिनाभर दवाखान्यात असलेला रोहन हातावरच्या प्लास्टरवर देखील गाडी चालवायचा…गंमत म्हणजे अर्जुनला स्वतःचे दिनक्रमाचे वेळापत्रक तयार कर असे सांगितले तेव्हा सगळ्यात जास्त वेळ खेळासाठी लिहिला आणि सांगितला….. त्यामध्ये बदल करण्याची त्याची इच्छा नव्हती. एवढा खेळ का आवडतो मुलांना ? खेळाचे एवढे काय महत्त्व बालविश्वात असेल? प्रत्येकाचा खेळ, खेळांची आवड, खेळण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. या पद्धतीवरून नक्की काही गोष्टी लक्षात येतात. हे लक्षात घेऊन त्यांना समजून घेणे त्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. ‘खेळणे त्यांचे अर्थपूर्ण अवकाश असते.’. मानसशास्त्रानुसार वयाच्या पहिल्या आठ वर्षांमध्ये त्यातही विशेषतः पहिले तीन वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. सुरुवातीचे शिकणे, हा खेळ आईच्या गर्भापासून सुरू होतो. तेव्हापासून बालकांची खेळाशी आणि खेळण्यातून शिकण्याची नाळ जोडलेली असते. मूल जन्म घेतल्या क्षणापासून संपर्कात येणाऱ्या वस्तू, व्यक्तींपासून सुद्धा शिकत असतात. बाळ पाळण्यात असताना सर्व प्रथम समोर, वर दिसत असतो चांदवा त्यातील रंग सुद्धा ठरलेले लाल, हिरवा, पिवळा, निळा. पाळणा हलला की हलणाऱ्या त्या रंगीत चिमण्या बाळाला रंगांची ओळख देऊ लागतात. या वयात त्याच्या दृष्टीस दिसू शकतात त्याच रंगांचा वापर यासाठी केलेला असतो. रंगाची ओळख, एकटक पाहणारी नजर फिरती करायला लागतात. या वयात मुलांच्या बाबतीत गैरसमज करून घेतलेला असतो, मुले म्हणजेे चिखलाचा गोळा ! त्याला काय समजते? बोलता येते का? खूपच लहान आहे वगैरे वगैरे…. औपचारिक शिकणे, शिकवणे नसले तरी शिकण्याची प्रक्रिया नकळत आत्तापासूनच घडत असते. आईचा स्पर्श, पहाणे, ऐकणे, यापासून सुरुवात होते साधारणपणे काय काय समजते या मुलांना? आईच्या आणि इतरांच्या स्पर्शातील फरक बाळाला कळतो, टाळी वाजवल्यावर त्यादिशेने मान वळवणे. मोठा आवाज आला तर दचकणे व आईने जवळ घेतल्यानंतर सुरक्षित वाटणे, अंगाई गीत ऐकून झोपणे.भूक लागली की चेहऱ्यावरील हावभाव बदलणे तरीही लक्षात आले नाही की मग रडणे… यासारख्या अनेक क्रियांना आपण सहज समजतो परंतू बालकांची ही धडपड असते. नैसर्गिक शिकणे असते. समोर येणाऱ्या गोष्टी, वस्तू, आवाज, व्यक्ती तो ओळखत असतो. आपण शिकवतो का ? नक्कीच नाही ! म्हणजे तो चिखलाचा गोळा नसतो. या वयापासून बालकांच्या मेंदू मार्फत ग्रहणक्षमता, आकलन, ओळख, भूकेची जाणीव, फरक, प्रतिसाद व्यक्त होत असतो. त्याला जे समजते ते त्याच्या शक्य असलेल्या कृतींमधून तो व्यक्त होत असतो, करत असतो. हे त्याला समजण्यासाठी आपण कोणतीही औपचारिक कृती करतो का ? नाही ! त्याच्या रडण्याचे सुद्धा अर्थ….. भूक लागणे, काहीतरी शारिरीक त्रास असणे, अंथरूण ओले असणे किंवा त्याला त्रासदायक असलेली कोणतीही गोष्ट झाली की रडते. फक्त भाषा त्याला येत नसते पण भाषेचे श्रवण कौशल्य शिक्षण सुरूच असते. निसर्गतः ध्वनी, आवाज येत असतो तो जमेल त्या प्रयत्नातून आवाज करू लागतो. हळूहळू मुले स्वतःच्या हातापायांशी, जावळाशी खेळतात, हातात वस्तू धरणे, त्यांच्याशी खेळणे तोंडात घालून चव बघणे, फेकून बघणे, पकडण्याचा प्रयत्न करणे… या सारख्या अनेक प्रयोगांची मालिका सुरूच असते. आपल्याला सरावाने वस्तू ओळखता येतात. केवळ स्पर्शाने, पाहिल्याने वस्तू ओळखू नाही आली की बालक ती वस्तू तोंडात घातल्याशिवाय राहत नाही कदाचित याशिवाय त्याला ज्ञान होत नसेल म्हणून या वस्तू हातातून, तोंडातून हिसकावून घेऊ नये त्यांचे शिक्षण चालू असते. वस्तू ओळखण्याचे, पाहण्याचे प्रयत्नशील प्रयोग असतात. वस्तू स्वच्छ ठेवणं एवढंच आपण करू शकतो. प्रत्येक वस्तू, सगळे जगच त्यांना नवीन असते. बालकांच्या नजरेस पडणारी प्रत्येक वस्तू त्याच्यासाठी “ओळखण्याच्या प्रयोग असतो”. या वयात सुद्धा निरीक्षण केले की, लक्षात येते काही ठरावीक वस्तूंना पाहून मूल हसते, एकाग्रतेने बराच वेळ हाताळते. काही आवाज करणाऱ्या वस्तू, रंग यांना घाबरते व पाहून रडते…यामागे सुद्धा कारण आहे… आपण त्यांच्यासमोर त्यांना नको असलेल्या वस्तू कश्यापद्धतीने घेऊन गेलो हा प्रथम अनुभव त्यांच्या स्मरणात असतो यामुळे घडू शकते. प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी ज्ञानेंद्रियामार्फत, हात पाय यांच्यामार्फत, स्पर्श करून…. या खेळण्यातून ओळखणे सुरू असते. हे खेळ खेळणे म्हणजे त्यांचे शिक्षण असते. हळूहळू ते रांगू लागले, बोलण्याचा प्रयत्न करू लागले की ही क्रियाशीलता वाढत जाते. काय काय मजा करतात ही मुले! अशी धडपड आणि प्रयत्न करू दिले की, घरभर पीठ, मिरची, पालक देठाची चव, भरलेले सांडणे, विचित्र आवाज काढणे, उश्यांचे घर…म्हणजे कोणत्या वस्तूंचा वापर करतील सांगता येत नाही. म्हणजे खेळणीपेक्षा त्याच्या खेळकर वृत्तीला जपावे नाहीतरी अनेक घरात आपण पहातो खेळण्या शोकेसमध्ये शोभिवंत वस्तू म्हणून ठेवलेल्या असतात. या खेळात लागले पडले की, भिंतीला, फरशीला का? मारले म्हणून खोटे रागावले की क्षणात सगळे विसरून पुन्हा खेळायला तयार… यालाच आपण प्रेमाने बाळलीला वगैरे वगैरे म्हणतो. त्यांची ही धडपड खूप आवश्यक असते. ती त्यांची नैसर्गिक प्रेरणा असते. या वयात मुले हातांनी जेवढ्या गोष्टींना स्पर्श करतात, ओळखतात, त्यांना जाणवतात तितक्या त्यांच्या मेंदूतल्या पेशी एकमेकींना जोडल्या जातात. त्यांचे जाळे तयार होते आणि त्यामुळे मुलांची समज वाढते, अर्थ कळतात, बुद्धी वाढते, आकलन वाढते, निरागसता जपली जाते…. अकाली बालपण हिरावून घेतल्या जात नाही, मुले तणाव विरहीत बाल्यावस्था जगतात आणि असे ओळखण्याचे प्रयोग पालक म्हणून जेवढे अनुभवायला देऊ तेवढा मुलांचा विकास समृद्ध होत जातो.
क्रमशः
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
11 thoughts on “अर्थपूर्ण खेळ…. भाग १”
यादृष्टीने कधी पाहिले नाही….👍👌👌👌
पालकांसाठी खूप छान मार्गदर्शन
तुमचे पालकत्व पाहिले आहे, वेगवेगळे प्रयोग देखील आम्हाला नेहमी उपयोगी पडतात .
शिक्षक म्हणून मुलांना समजून घेताना लक्षात आले आहे खूप छान ताई💐👌👍👍
प्राथमिक वर्गात तुमचे मुलांवरील वैयक्तिक लक्ष त्यांच्याशी संवाद खूप काही शिकवून जातो
आदर्श पालकत्वासाठी उपयुक्त असे सखोल आणि अभ्यासपूर्ण लेखन….
तुम्ही आदर्श शिक्षक आहात तसेच आदर्श पालक ,आदर्श लेखिका त्याच बरोबर एक आदर्श व्यक्ती आहात आणि महत्वाचे म्हणजे माझ्या साठी एक आदर्श मैत्रिण आहात 👍👍
बाळाच्या विकासाच्या दृष्टीने खूप छान मार्गदर्शन केले आहे
Soham Dnyaneshwar Jogdand
खुप छान
Khup chan mahiti ahe