तू का गेला पंढरीसि ?….


संतांच्या भक्तीतून प्रकटलेले साक्षात्कार अर्थ….

संतांचा भगवंतासोबत एकाकार झाल्यानंतरच्या अनुभूतीतून त्यांना काय जाणवते? कोणत्या भावनेपर्यंत ते पोहोचतात? त्यांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू कोणता असतो? नेमके कोणत्या अवस्थेत असतात ही संतमंडळी? आणि याच अवस्थेत कायम कसे राहू शकतात? असे अनेक प्रश्न मला संत साहित्य वाचताना पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील संतांचे साहित्य वाचताना, समजून घेत असतानाच मिळतात.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार…. यासारख्या सिद्धी प्राप्त अनेक संतांचे साहित्य, आर्त, तरल भक्ती दर्शविते. अगदी दैनंदिन व्यवहार, उदाहरणे, कामे करत करत भक्तीत तल्लीन होऊन परमोच्च अनुभव प्रचिती देणारे या संत मंडळीचे अनुभव याद्वारे व्यक्त होतात. मन, बुद्धीच्या पुढे जाऊन भक्तीमार्गावर घेऊन जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या साहित्यात आढळते. हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. ह्या आपल्या प्रयत्नांची क्षमता, आपण भक्तीच्या, श्रद्धेच्या कोणत्या पातळीवर आहोत याची जाणीव होण्यासाठी हे साहित्य जणू परीक्षक असतात.

अभंगांचा, ग्रंथांचा शब्द… शब्द… अनुभवला पाहिजे. भक्तीमार्गात याचे अनुभवार्थ आपले सोबती असतात. जसजसे अर्थांच्या खोलवर जायला लागतो भगवंताच्या भक्तीचा रंग आपल्यावर चढायला लागतो. हे एकरंग, एकार्थ, एकरूप होणे… हा भावनेचा ओलावा कायम राहायला हवा यासाठी आपणच नाहीतर ! कोणी प्रयत्‍नशील राहायचे? भगवंताचे अनोखे दर्शन होण्यासाठी केवळ मंदिराच्या पायऱ्या चढून चालतील का? आपल्या दृष्टीने पहिली पायरी कोणती? शेवटची कोणती? कोणी ठरवली?

शरीर, भावना, स्वतःचे अस्तित्व, भौतिक जग सर्व काही विसरून अपार श्रद्धेने, निरिच्छ मनाने, निःसंशय बुद्धीने, भक्तीने ओतप्रोत भरलेले हृदय घेऊन…. बसल्या ठिकाणी भगवंताला आठवावे. त्याच्या कोणत्याही, आपल्या आवडीच्या रूपाला आठवावे काय जाणवते! सगळीकडे तोच असतो. मग हात जोडले जातात ते समाधानाने धन्यवादासाठीच ! जे आहे ते त्याचीच कृपा ! आता काहीच उरलेले नसते कारण भगवंत आणि आपण वेगळे नसतोच. त्याने आपल्याला स्वीकारलेले असते. कारण या भक्तिभावनेपर्यंत आणण्यासाठीच तर सर्व काही तो नियोजित करत असतो. ईश्वर आणि नश्वर यातला फरक कळेपर्यंत मन व शरीराचे तर कधी मन व बुद्धीचे द्वंद्व सुरू असते. भगवंताला समजून घेण्याच्या आपल्या क्षमता कमी पडतात म्हणून आलेल्या संकटांना, त्रासाला, दैनंदिन जगण्याला दोष देत, त्रास करून घेत, नशीब, दैव, नवस, पूजापाठ करून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. खरे तर या सर्व धर्मव्यवस्था व्यक्तींमध्ये बदल व्हावा, या सर्व आचरण करण्यायोग्य गोष्टींचा सकारात्मक परिणाम आपल्यावर व्हावा म्हणून विचारपूर्वक योजल्या जात असतात. या करत असताना भगवंताला प्रलोभित करण्याची कुठेही आवश्यकता नसते. त्याची तशी योजनाही नसते. तो निर्विकार, निर्लेप, निराकार आहे. त्यानेच सर्व काही निर्माण केलेले असल्यामुळे त्याचे त्यालाच परत करण्यासारखे असते. याची त्याला काय गरज आहे? मग त्याला आवड कशाची आहे? काय हवे आहे? हे तो धर्माद्वारे सांगत असतो.

धर्म म्हणजे आचरणा योग्य कृती. या अवस्थेपर्यंत प्रत्येकाला घेऊन जाण्यासाठी भगवंत प्रत्येकाची सोबत करत असतो. त्याने निर्माण केलेल्या, त्याचाच अंश असलेल्या वस्तू, व्यक्ती, साहित्य सुद्धा सहाय्यक म्हणूनच काम करत असतात. निरंतर आपल्या मनावर संस्कार करत असतात. केवळ कर्मकांड, क्रिया म्हणून याकडे न पाहता आपल्यावर संस्कार करणारी प्रक्रिया म्हणून पहावे लागते. परंतु हे फक्त सहाय्यक असू शकतात. बदल स्वतःलाच करावा लागतो. हा बदल तात्पुरता, क्षणिक, स्वार्थासाठी, ऐहिक सुखासाठी असेल तर भक्ती भावनेचा रंग, लेप गळून पडतो. कारण तो फक्त बाह्य शरीराला लागलेला असतो. या अश्यापद्धतीचा भक्तिभावनेचा लेप म्हणजे भगवंताचे अनोखे दर्शन होण्याची खरेतर पहिली पहिली पायरी सुद्धा नाही !

यापेक्षा मी भगवंत मानत नाही म्हणणारे परवडले !! त्यांच्या वाक्यातून निदान हे तरी सिद्ध होते की, भगवंत आहे फक्त तो स्वतः मानत नाहीये एवढेच!! आपण मानतो, मग जाणत का नाहीत ? अनुभवले तरी खरा अर्थ का समजून घेत नाहीत ? वर्तनबदल का जाणवत नाहीत? कारण तो लेप आहे फक्त जो वरवरचा, बाह्यस्वरूपात लावलेला आहे.

एकरूप, एकसंघ, एकरंग झाल्याशिवाय समजून येत नाही. हे सगळे होण्यासाठी काय लागते! ते तयार झालेले हृदय  असेल तर इतर कोणी काही सांगण्याची आवश्यकता राहत नाही. कारण प्रत्यक्ष तोच आपल्याला सांगत असतो. आपल्याकडून कर्म करून घेत असतो यासाठी तशी बुद्धी, मनही देत असतो. असे मन, ह्रदय तयार करणे आणि हे तयार करण्यासाठी व्यक्तींनी एकमेकांना मदत करणे, तयार झालेली हृदये, मने त्याच्या चरणी समर्पित करणे हे त्याला हवे आहे. भगवंताला हवे असलेले हे असे आपले रूप, जसेच्या तसे निर्लेप राहिले की हे पाहून भगवंत प्रसन्न होतो. त्याला आनंद होत असतो. हा आनंद भगवंताला देत देत आपणही आनंदी होतच असतो. अशा व्यक्ती साधू, संन्याशी, त्यागी ,वारकरी, संत, योगी, महर्षी, विभूती, तपस्वी बनत असतील. तर काहीजण संसारात राहूनही त्या भगवंताला आनंद देत असतील आणि घेत असतील. काहीजण भगवंताच्या, धर्माच्या अनोख्या दर्शनाने आपल्या क्षमतेनुसार अर्थ लावत स्वतःसोबत जगाच्या कल्याणाचा विचार करत असतील. मार्गक्रमण करत मार्गदर्शनही करत असतील. भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण, जागरण, पूजा…यासारख्या आपल्याला आवडणाऱ्या कृतीच का? हे केल्यानंतर, पार पाडल्यानंतर पुढे काय? या पुढची कोणती कृती असेल? पुढची पायरी कोणती असेल? मला भगवंताच्या आणखी जवळ जाण्यासाठी, मी काय केले पाहिजे असा विचार यायला हवा! तो येतच असतो. कारण एक एक पायरी चढत वर जावेच लागते आपण मूळ वैकुंठवासी आहोत. इथला प्रत्येक पायरीचा प्रवास तोच पूर्ण करून घेतो. जोपर्यंत भगवंताच्या साक्षात्काराचा समजलेला अर्थ आत्मसाक्षात्कारापर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला सोडत नाही. विविध अनुभव, विचार, दृष्टी, घटना, व्यक्ती या सर्वांचा तो खेळ मांडतो. या खेळातून त्याला आपल्याला शिकवायचे असते. त्याला स्वतःला प्रसन्न करून घ्यायचे नसते.

आपण किती आणि कधी शिकतो यावर आपल्या भक्तीच्या श्रद्धा पातळीचे परीक्षण तो करत असतो. यातून आपल्याला प्राप्त झालेल्या पातळीनुसार आपले कर्म, जबाबदाऱ्या तो ठरवतो. म्हणून तर काही ठराविक लोकांच्या हातून चांगले सत्कार्य घडतात. स्वतःचा त्रास, सत्य, जगासमोर न मांडता सर्वांचा विचार करतात. ज्यांची दान देण्याची इच्छा असते त्यालाच तर दान देण्यायोग्य बनवतो. अशी कितीतरी उदाहरणे आपण पाहतच असतो.
अशा अनुभवातून, अनुभूती मध्ये घेऊन जाऊन आपल्याला भक्तिमय करणारा व भगवंताचे अनोखे दर्शन घडवणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग,

पंढरीचे भूतं मोठें। आल्या गेल्या झडपीवाटे।।१।।
बहू खेचरीचें रान।जातां वेडें होय मन।।२।।
तेथें जाऊं नका कोणी।गेले नाही आले परतोनि।।3।।
तुका पंढरीसि गेला। पुन्हा जन्मा नाही आला।।४।।

भगवंताच्या भक्तीने इतके भारून टाकले आहे की, स्वतःला पूर्ण विसरून, इतरांना तो वेडेपणा वाटावा अगदी भुताने झपाटल्या सारखी अवस्था आणि त्यातून होणारे साध्य…. या अभंगातून ते सांगतात.

पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाच्या अस्तित्वामुळे अवघी पंढरी विठ्ठलमय होऊन भारावल्यासारखे वातावरण आहे. ते मनावर, स्वतःच्या अस्तित्वावर इतके गारुड करते की, भान विसरुन अगदी भुताने झपाटल्या सारखे या भक्तीने झपाटून वर्तन घडते आहे. अशी ही अवस्था आहे. या ठिकाणी प्रचलित भूत, झपाटणे हा शब्द कोणत्याही लौकिक अर्थी भूतासाठी घेतलेला नाही. परकायेत एखादी शक्ती जशी प्रवेश करते तसे विठ्ठल दर्शनाने शरीराची अवस्था तर जाणवतेच. त्याही पुढे जाऊन भक्तीभूत मन, बुद्धी, हृदयाला देखील वश करत आहे. मग अशी अवस्था प्राप्त होते की संत तुकाराम महाराज कुठेही बसलेले असोत अगदी डोंगरावर, रानात, ओसाड जमिनीवर… कितीही दुःखात असो.. त्यांना कशाचेच, स्वतःच्या अस्तित्वाचे देखील भान राहत नाही. त्याच ठिकाणी विठ्ठल आला आहे. त्याच ठिकाणी भेट घडते आहे. विठ्ठल सोबत आहे. अगदी प्रसन्न होऊन त्यांच्याकडे पाहत आहे. मग संत तुकारामांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतील आणि वाणीतून विनासायास ओघवते आत्मसाक्षात्कारी अर्थशब्द बाहेर पडत असतील. आज तेच तर आपण ग्रंथ, अभंग, गाथा यामधून वाचतो, अनुभवतो. खरेतर संत साहित्य केवळ वाचनाने समजत नाही तर ते संतांनी कोणत्या भक्ती भावनेतुन लिहिले आहेत ? या शब्दांच्या भावार्थातून समजून घेतले, घेण्याचा प्रयत्न केला की, आपल्यालाही या समजून घेण्याच्या प्रयत्नातून देखील आनंद मिळतो.

हे पंढरीचे भूत, वेड लागणे खूपच मोठे आणि विस्तारित आहे. आपण जन्माला येतो आणि जातो. या प्रत्येक जन्मातील प्रत्येक श्वासावाटे हृदयाच्या स्पंदनामध्ये हे भूत हे वेड लागले तर फार अवघड आहे. प्रत्येक वेळी जन्म असेपर्यंत प्रत्येक श्वासासारखी सोबत करणारे आहे. आणि हृदय जिवंत असेपर्यंत धडधडत असते तसे हे विठ्ठल भक्तीचे भूत या श्वासांच्या, हृदयाच्या झडपा मधून देखील धडधडत राहणार!! मग या भुताला लिंबलोण, मिरची किंवा कोणताच उतारा असू शकत नाही. कोणीही या भक्तिमय भुताचा उतारा करू शकणार नाही, इतके ते प्रभावशाली आहे. मग ते आपल्याला कायमचे सोबत घेऊन जाते. म्हणजे नेमके कुठे घेऊन जाते ? तर या विठ्ठलाचाच भाग बनवून जाते. जन्ममरणाच्या फेर्‍यात पुन्हा अडकवत नाही. आपण त्याच्यामध्ये इतके विलीन झालेले असतो की, मोक्ष प्राप्त होतो. ईश्वरचरणी अर्पण होईपर्यंत हे भूत आपल्यामध्ये  निवास करते. धर्माचरणापासून…. ईश्वरचरणापर्यंतचा हा प्रवास हे विठ्ठल भक्तीचे भूतच घडवून आणते. या भक्तीचे हेच तर खरे कार्य! ईश्वरप्राप्ती पर्यंतचा प्रवास घडवून आणणे.

या भक्तीच्या भुताने तुकाराम महाराजांना झपाटले तर होतेच शिवाय ‘खेचरी’ हा एक योगीक क्रिया शब्द आहे. खेचरी मुद्रा ही एक सर्वोच्च, उत्कट अशी योगीक क्रिया आहे. ही मुद्रा आपल्यासारखे साधारण कोणीही लावू शकत नाही. अहंकार, स्वार्थ नसलेला, वासना विरहीत, स्वअर्पित, ऐहिक सुखातून बाहेर पडलेला, पवित्र हृदयी, अगदी सर्व मानवी जीवनाचे लेप गळून पडलेला, शांत, संयमी, श्रद्धाळू कदाचित दैवी अंश असलेली व्यक्ती असेल ! अशी व्यक्तीच मग ती कोणीही असो त्याला ही मुद्रा लागते, जमते, लाभते… ध्यानामध्ये सर्वोच्च अवस्था प्राप्त करून जिथे सर्व काही संपते…. तिथे, त्याच्यापुढे ही खेचरी अवस्था सुरू होते. या अवस्थेतून सुरू होतो यापुढील प्रत्यक्ष भगवंताच्या अनुभूतीचा, जाणिवेचा प्रवास…. इथपर्यंत येण्यासाठी अट्टाहास करावा लागतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात,
याज साठी केला होता अट्टाहास।

पुढे काय घडते? सगळा अट्टाहास संपतो, प्रयत्न संपतात… पण भगवंत हवा असतो. अगदी याचना, धावा, ओढ, आस….काय म्हणतात ते सगळे सुरू होते…. डोळ्यात अश्रू आणि जिथे आहोत त्या ठिकाणाहून भगवंताच्या अर्थसाक्षात्कार ! आता काही मागायचे नसते, तर या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, भगवंताची प्रचिती येण्यासाठी, भगवंताला शरण जाणे असते. त्याच्या चरणावर समर्पित होण्याचा क्षण आणि आपली ही अवस्था यात एका क्षणाचा विलंब नको असतो म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात
‘टाळ-मृदंग उत्तरेकडे माझे गाणे दक्षिणेकडे’।।
दक्षिण दिशा कशाचे प्रतीक आहे? यामध्येच अर्थ आहे.
तर संत कान्होपात्रा देखील म्हणतात,
नको देवराया अंत असा पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। भेटीची एवढी ओढ, प्राण जायची वेळ आणि अवस्था वाटावी इतकी तीव्रता!!
तू शरणार्थी, भक्त म्हणून माझा स्वीकार कर !
अशा अवस्थेतून तुकाराम महाराज बाहेर येऊ इच्छित नाहीत म्हणून इतरांना सांगतात. तिथे कोणी जाऊ नका पुन्हा कोणी परतून वापस येत नाही.
हे दोन अर्थाने ते सांगतात. एक अर्थ, एकतर जाण्यायोग्य बनून जा. हे योग्य, योगी बनणे याची अवस्था स्वतःच्या अनुभवातून सांगितली आहे. आणि दुसरा अर्थ ते म्हणतात हा अट्टाहास सोसवत नसेल तर जाऊच नका ! पण गेलात तर वापस येणार नाहीत, ही भीती दाखवत नाहीत तर खरा अर्थ सांगतात. पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाहीत. मोक्ष मिळणार तुमचे हे समर्पण भगवंत स्वीकारणार याची ते खात्री देतात. एक तर जाऊ नका आणि गेलात तर वेडं होण्याचा अट्टाहास असावा. एकदा ही अवस्था संपली की पुन्हा येणारच नाहीत हा विश्वास असावा. कारण एकदा योग्य बनून गेले की मोक्ष मिळतोच. सगळ्या पायर्‍या चढून भगवंताचे चरणदर्शन आणि समर्पित होण्याची अवस्था काय असते ! या भक्तीच्या भुताने झपाटले जाणे आणि खेचरी मुळे वेड लागणे. या अवस्था त्यांनी या अभंगातून सांगितल्या आहेत. असे निश्चित वाटते, जाणवते. या भक्तीच्या भुताच्या प्रभावातून, खेचरीच्या संमोहित वेडातून आणि अट्टाहासातून जर बाहेर पडले तर पुन्हा काहीच उपयोग नसतो. म्हणून ते वारंवार सांगतात की तिथे जाऊ नका कोणी त्या अवस्थेपर्यंतचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. जाता आलेच तर हे भूत, हे वेड विठ्ठलाच्या चरणावरच नेऊन ठेवते.
नाहीतर!!

शेवटी ते म्हणतात हा अट्टाहास करायचा नव्हता ,चरणावर समर्पित व्हायचे नव्हते मग तु का पंढरीसी गेला?? ते आपल्याला प्रश्न विचारतात. स्पष्ट शब्दात सांगतात, कशासाठी जातोस पंढरपूरला? वारीला? जर ते पंढरीचे भूत तुला झपाटून टाकत नाही, तुझ्या मध्ये प्रवेश करत नाही, जिवंतपणीच सर्वकाही नश्वर ते सोडून तुला पुढची अवस्था प्राप्त करून घेता नाही, तर कशाला जातोस पंढरपूरला ??
तुकाराम महाराज आत्मचिंतन करायला लावतात. देवदर्शनाला कशासाठी जायचे असते याचा विचार करायला लावतात. स्वतः विषयी सांगतात मी पंढरीला गेलो…

तुका गेला पंढरीसी… पुन्हा जन्मा नाही आला।
ते पंढरीला गेले, त्या भक्तीच्या महाभूताने भारावून टाकले, इतके झपाटले आता भगवंतात विलीन झाले आहेत,आता पुन्हा जन्माला येणार नाही! आला नाही! भगवंताने त्यांना हृदयात स्थान दिले आहे. ओतप्रोत भक्तीने भारलेले अस्तित्व, वेड विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले आहे…

संत साहित्यातून, शब्दांशब्दांतून
मनामनात भक्तीचा अखंड अनुभव देणाऱ्या सर्व आत्मज्ञानयोगी संतांना श्रद्धेय वंदन…

।।जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना कोटी कोटी प्रणाम।।

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

14 thoughts on “तू का गेला पंढरीसि ?….”