2. लादनीपासून अंगणापर्यंत…

मागच्या वाड्यातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे ऐकून गोधडीतून डोकं बाहेर काढून, डोळे किलकिले करुन वर पाहिलं डोळे भरून आभाळ दिसायचे. धुरकट केशरी, काळसर निळे, मातकट पिवळ्या  रंगाच्या आभाळाखालून लगबगीने  पूर्वेकडून पश्चिमेकडे शाळेसाठी निघालेले कावळे, बगळे, चिमण्या, पोपटांचे रंगीत थवे उडायचे.  झोपाळलेल्या डोळ्यांना हे सगळं अंधुक अंधुक दिसायचे पण पहायला खुप आवडायचे आणि मग जाग यायची. आपल्या आजूबाजूला पहायचे घरातील मोठे कोणीच नसायचे. सगळे लवकर उठून कामाला लागलेले असायचे. लादनीवर फक्त आम्ही  चिल्लर पार्टी आणि आमच्या रात्रीच्या अर्धवट राहिलेल्या महत्त्वाच्या विषयांची गप्पा सुरू व्हायच्या. थंडगार पडलेली गोधडी पुन्हा पुन्हा घुमटून घेऊन लोळतलोळत मस्त गप्पा…. रात्रीच्या भुताच्या गोष्टी, पिंपळाच्या झाडावरचे घुबड, शेताच्या वाटेवरचा चकवा, आज दिवसभर काय करायचे, कोणाच्या शिवारात आणि शेतात खायला काय उपलब्ध आहे! यावर कोणत्या शेतात जायचे आहे हे ठरविणे, काल झालेले भांडण, अर्धवट डाव, राज्य, चिडवणे वगैरे वगैरे यावर चर्चा व्हायची. काहीही निष्कर्ष न निघणारी चर्चा करत करत त्या सगळ्या अंथरूण-पांघरूणाच्या जमतील तश्याच घड्या घालून प्रत्येकी एक याप्रमाणे खांद्यावर टाकून आम्ही खाली उतरायला निघायचो. आमची फक्त काम करणाऱ्या नातवंडाची रांग वेगळी आणि बाकी घोळका वेगळाच. बहिणी एकीकडे आणि भाऊ एकीकडे असे दोन गट होणारच. समजा एखाद्या भावाला आमची कीव आली म्हणून आमच्या बाजूने झालाच तर त्याची  ठरलेली चीड “बायकूभान्या नाव सुबान्या”. कोणत्या भावाच्या डोक्यात मदतीचा विचार येईल? कारण पुन्हा दिवसभर तेच ऐकून घ्यायचे कशाला उगीच ! ….. मग खाली अंधाऱ्या लादनीत उतरणार्‍या एक एक पायर्‍या वरून चालायचो. त्या जुन्या पायर्या तळव्यांना थंडगार मऊ लागायच्या. आजी सांगायची,” तुझ्या आज्ज्याच्या बापानी बांंधून काढलेली ही लादनी,वाडा,ओसरी, दरवाजे खुप जुनं आहे सारं.” पायर्यांच्या दोन्ही बाजूला काळ्यापाषाणांची भिंत आहे. त्या भिंती तेलकट झालेल्या आहेत. त्याला धरून त्या अंधारात घाबरल्यामुळे  राम राम राम म्हणत म्हणत  पायाने पायरीची खोली चाचपडत एकएक पायरी उतरायचो. घोळक्यातील  एखादा मध्येच मांजरीचा आवाज काढायचा, चित्रविचित्र आवाज काढून घाबरवत रात्रीच्या भुताच्या गोष्टींचा संदर्भ आवाज, राक्षसी हसण्याचा प्रयत्न करायचा भितीदायक आवाजाचे सगळे प्रयोग करण्यासाठी आमचे ठिकाण म्हणजे या माळवदावरून खाली लादनीत उतरणार्या पायऱ्या होय. ज्याला लादनीतील शेवटची पायरी कशी उतरायची समजले तो सुटला! सुटका झाल्यासारखे ओरडतच लादनीत सगळ्यात आधी हजर व्हायचा. चढण्या उतरण्याच्या अनुभवाने माहिती होते कुठे, कोणते सामान ठेवले आहे. पहिल्यांदा लादनीत प्रवेश करणारा  बरोबरं पाळण्याच्यावर असलेल्या वळणीपर्यंत पोहचायचा. मग त्या उंच वळणीवर अंथरूण-पांघरूण टाकण्याचा आमचा सगळ्यांचा निष्फळ प्रयत्न व्हायचा. जमेल तसे गोधडी वळणीवर टाकून बाहेर यायचं…त्या आधी येता येता त्या पाळण्याला कोणी लटकून एखादा झोके घ्यायचे, नाहीतर मेंढीच्या जावळाच्या केसापासून केलेली पाळण्याची सोल टोचत नाही म्हणून त्याला धरून एखादातरी झोका व्हायचाच…. तीन पिढ्या जपलेला सिसमाचा लाकडी पाळणा खुप सुंदर होता. मधोमध बाळकृष्णाचा फोटो व कलाकुसर केलेला होता. पाळण्यामध्ये बाळ असलं अन् आमच्या आवाजाने उठलं की जो आधी पकडल्या जाईल त्याला एखादी चापटी आणि बाळ पुन्हा झोपेपर्यंत त्याच्या नावाचा घरात गजर! हा गजर ऐकत बाहेर आलं की समोर दिसायची आज्जी… आमची बाई… आम्ही सगळे तिला बाय म्हणायचोत. माहिती नाही बाईचं बाय कोणी केले ?… तिच्या लाकडी पेटीतल्या आरशात बघत गोल ठसठशीत कुंकाला नवीन दिवसाचा पुन्हा एकदा कुंकूलेप आवडीने कोरत बसलेली असायची. लुगड्याचा पदर बोटात गुंडाळून कुंकू गोल गरगरीत करायची. आमच्या सगळ्यांचा आवाज तिला गेला की, दिसलो की आम्ही खाली टेकायला उशीर ठरलेलं वाक्य कानावर पडायचंच, “पारूसं तोंड घीऊन बसू नका! जा सुदरा तोंड धुवा….

आमच्यापैकी दोन-चारं जण तरी आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून लादनीच्या मोठ्या, पसरट चौकटीवर ठाण मांडून बसायचो.. त्या दरवाजाच्या बाहेर आलेल्या पितळी गोल चक्राला फिरवायचं नाही तर समोर काय चाललय त्याचं निरीक्षण करत कडीचा आवाज करायचा. त्या सागवानी दरवाजावरून हात फिरवला की मऊ,गुळगुळीत स्पर्श व्हायचा.

चुलीसमोर उभ्या केलेल्या भाकरीने चुलीतला जाळ जरा कोंडला गेला की काकू फुकणीने फुंकायची सूंऊऊऊ आवाज यायचा मग धूर सगळ्या परवारात पसरायचा. चुलीतला जाळ भाकरी भाजायला गती पकडायचा आणि तो पसरलेला धूर थोडा धुराड्यातून, थोडा मोठ्या दरवाज्याकडे आणि बाकीचा उरलेला आमच्या डोळ्यात, नाकातोंडात भरून जायचा. डोळ्यात धूर चुरचुरायचा तरीही डोळे चोळत चोळत, पाणी पुसता पुसता पुन्हा  बारीक करून ते सगळं निरखून पाहायला खूप आवडायचं. त्या चौकटीच्या दोन्ही कडेला मोठमोठे स्टूलसारखे चौकोनी चिरे बसवलेले आहेत ज्यावर लहान मुलांना आरामशीर बसता येते. पण बसल्यामुळे सकाळच्या कामाच्या घाईगरबडीत मोठ्यांना सामानाची ने-आण करायला मात्र त्रास व्हायचा. सुट्टीला आलेले नातवंड म्हणून कोणी रागवायची नाहीत. आज्जी सुद्धा नाही! कधी कधी सगळी नातवंड मिळून जीव वर आणायला लागले की मग मात्र आम्ही आई, काकू, काका, वडील, मामा, मामी यांच्या नावाचा उद्धार आमच्या आज्जीच्या तोंडून ऐकायचो… आपल्यापेक्षा मोठ्यांना पण कोणीतरी बोलणारं, रागावणारं आहे अस वाटायचं मग एकमेंकाकडे बघून फक्त आम्हालाच समजेल अस हळूच चोरून हसायचो. आजी रागवायची, बोलायची फक्त तेवढ्यापुरतंच. पण या मोठ्यांना रागवण्यातून लाडाचे प्रकार आम्हाला समजले होते. संदकामधून गाडग्यातले दही, तूप, गड्याने मागितलेला कासरा, वगैरे वगैरे वस्तू लादनीमधून आणायला आमच्या गोंधळामुळे जरा जास्त अडचण होऊ लागली की मग मात्र बाय खड्या आवाजात रागवायची ,” बगावं तवा लादनीच्या चौकटीवरच… शेणाने सारवलेले रानचें शेण काय तुमच्या अंगाला चिटकतय का? चौकटीवरून वली हो जराशिक!” असा आवाज आला की मग मात्र गुपचूप उठून कापडाने गाळून तयार केलेले राखुंडी मंजन एका हातावर तर दुसऱ्या हातात जाड काठाची चरवी घेऊन निघायचे दात घासण्यासाठी. तोंड, चेहरा, हातपाय धूण्यासाठी अंगणात चौकोनी पानाईच्या रांजणातून चरवीने पाणी काढायचे. शनिवारच्या कवायतीचा सराव दररोज सुट्टीत व्हायचा. अशी अधूनमधून शाळेची अचानक आठवण येऊन जायची. हा रांजण जरा तिरपा रोवलेला असतो म्हणून
कंबरेपासून अर्धे वाकून त्या रांजणात अर्धे शिरावे लागायचे.   तोल सांभाळताना पाय अधांतरी झाले की संपले!! मग शिर्षासनच!… पाय जमिनीवर घट्ट रोवून स्थीर रहायला हवे. नाहीतर नाकातोंडाने मिळून पाणी प्यायचे!!. दरचार दिवसात रांजणातून  आमच्या पैकी एकाचा तरी आवाज यायचाच! पाय ओढून बाहेर काढल्यानंतरची धाप, पिण्याचे पाणी खराब झाले म्हणून पहाणारी घरातल्या बायकांची नजर…. बापरे! वगैरे वगैरे पेक्षा जपून पाणी काढायचे कौशल्य महत्त्वाचे आहे. चरवी बुडवतांना गुडगुड, बुडबुड आवाज होतो. चरवी गळवट भरेपर्यंत हा आवाज येतो… हा आवाज ऐकत ऐकत प्रतिध्वनीसुद्धा कसा येतो हे ऐकायचे. अर्धा रिकामा रांजण अर्धा भरलेला आणि त्यामध्ये पूर्ण वाकून एकमेकांच्या चिडीचे दिलेले आवाज…. चरवी गळवट भरेपर्यंतच्या दहापंधरा वेळेसच्या प्रयत्नशील वेळेत एखादी कवितेची ओळ, बहिणभावंडांना जोरात ओरडून दिलेला आवाज, आपलं नाव म्हणताना कसं वाटतयं म्हणून आपणच आपल्याला हाकही देऊन व्हायची. प्रतिध्वनी सोबतच मधल्या पोकळी मुळे आवाज घुमतो देखील. पाणी प्यायचा तांब्या, चरवीचे दुमडलेले बोथट, पसरट काठ पाहून वाटायचे हे कोणी तयार केले असतील ? आणि का आणलेत ? कारण आमच्या अख्या घरातील बहीण-भावंडा पैकी कोणालाच याने न सांडता पाणी पिता येत नव्हते. तोंड लावून प्यावे तर बाजूने गळ्यापर्यंत दोन धाराच आणि वरून प्यावे तर तोंडा सोबत नाकात पाणी आणि ठसका ठरलेलाच. हळूहळू सरावाने पाणी पिण्याचा फक्त प्रयत्न होऊ शकतो. हा प्रश्न सोडवता सोडवता दुसरे प्रश्न तयार असायचे. आजीला चोरून काही करावं तर नेमके तिला त्याच वेळी कसं कळतं? हा अजून मोठा प्रश्न पडायचा. हळूच वाटीत टाकून पाणी पिलं की मागून आवाज यायचा ,” लक्षिमनला कर्ज करती ही पोरगी !” कर्ज म्हणजे काय ? आम्ही मग एकमेकांना विचारायचो. एकदा तिच्या कानावर आमच्या गप्पा पडल्या मग तिने सांगितलं कर्ज म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेल्या उसन्या पैशाचा डोंगर. पुन्हा विचार यायचा वाटीने पाणी पिण्याचा आणि कर्जाचा संबंध कसा काय असू शकतो? अशा खूप गोष्टींचा संबंध लागत नव्हता, लावता येत नव्हता. शाळेत बाई बोलत असलेल्या भाषेतील शब्द आणि इथले शब्द शेजार्‍यांच्या पदार्थांची नावे, इथली नावे… वगैरे वगैरे तर कधी कधी तर पुस्तकातले धडे त्यातल्या गोष्टी वाचून समजायचेच नाहीत. कधी कधी वाटायचे इथलं वर्णन का नाही आपल्या पुस्तकात ? किती भारी आहे. असा विचार करत करत त्या रांजणावरच्या पालत्या झाकलेल्या टोपल्यावर चरवी उपडी ठेवायची आणि चुली समोरच्या मोकळ्या जागेत येऊन दोन पायावर बसायचं दुधासाठी…. दुध पितांना पाण्यासारखीच गत व्हायची. थोड्या धारदार काठाच्या पितळी परातीत दुधाची धार काठोकाठ भरून आणि आजीचा आगरेव वरून न टळणारी गोष्ट ! पार केलचं पाहिजे. परातीतलं दूध,न्याहारी आणि जेवण एकाच परातीत आणि एकच नियमही असायचा म्हणून तर आम्ही दुसऱ्याच्या ताटाकडे बघून काहीच घ्यायचो नाहीत. आपली भूक, गरज केवढी तेवढचं परातीत नाहीतर आज्जी पुन्हा जेवायला बसलं की दहावेळा तरी खालीवर पहायची आणि सरतय का? का! भदं ठेवायचय ? विचारायची. मग हे सगळं मनात आलं की गुपचूप भानावर येऊन मोठे घोट घेत घेत दूध संपवण्याकडे वाटचाल… पण खरंतर आम्हाला सगळ्यांना हवा असायचा तो लाल हारावरच्या किटलीतला चहाच…. दुधाची परात दोन्ही हाताने सांभाळत सांभाळत ओठाला लावलेली पण नजर मात्र आजीकडे आणि मध्येच त्या चुलीतला हार बाहेर काढून त्यावर ठेवलेल्या चहाच्या किटलीवरच असायची. एवढ्या नातवंडापैकी एक दोघे जण तरी दररोज हिम्मत करून लाडाचा आव आणून म्हणायचेच “बाय ! ये बाय! असं करकी, थोडा चहा या दुधात टाकून देकी लई राहिला उलसाचं दी. यावर आजी डोक्यावरचा पदर समोर घेत सगळ्यांवर नजर टाकत म्हणायची “काय तरी लेकरं माय ! एवढं निक्कं दूध सोडून त्या काळ्यापाण्यावरच ध्यान! थोडी भीती दाखवून बघायची “चहा पिला कि काळं होतंय बरका” ! आम्ही ,” हुवू दे काळं ! काय होतय ? तरी हट्ट सुरूच आहे म्हटलं की मग गरम असलेल्या पितळी किटलीला पदराने धरायची आणि पांढर्‍या शुभ्र दुधाचा रंग बदलेल इतकाच चहा प्रत्येकाच्या परातीत ओतायची. आम्ही मात्र तेवढ्यावरच खुश. दूध संपत आले की पुढचे विचार डोक्यात, मनात…. नाना प्रकारचे अफलातून खेळ, खेळाचा कालचा राहिलेला अर्धवट डाव, कोणावरचे राज्य होते, चिडकीरडीचे भांडण, साहित्य लपवून ठेवलेले लादणीतील अंधारातील अड्डे…. असे असंख्य विचार यायचे. तिथून उठलं की  ओसरीकडे….. मागे सारत सारत जातांना ….. आजूबाजूला दिसायचे निरश्या दुधाने भरलेल्या बिनग्या, चरव्या. चूल, परवराची केलेली पोतराभुई, दाराबाहेर उभा असलेला एखादा गडी आज शेतात काय करायचे आहे ? याची आप्पा सोबतची चर्चा… तिकडे चुलीवर चहाची किटली, तापवलेले दूध, पिवळी ज्वारी, बाजरीच्या भाकरीची चवड या सगळ्यांचा येणारा वास, एकीकडे मोठ्या चूलवनावर आंघोळीसाठी बाहेरून चिखल लावलेले मोठे पितळी भांडे, त्याची वाफ, वातावरणात पसरलेला थोडासा धूर, कोवळे ऊन, थंडी, कामाची लगबग, पहाटे गायीच्या शेणाने सडासारवण केलेले अंगण, गोठ्यातल्या गाय वासराचे आवाज, हंबरने, लादणीपासून अंगणापर्यंत मांजर आणि तिच्या पिल्लांचा बिनधास्त वावर आणि बाहेर रात्रभर जागल्या मुळे पेंगुळलेल्या डोळ्याने, पोट खालीवर करत, हात पाय पसरून, थकून झोप लागल्यासारखा पहूडलेला आमचा खंड्या. हे सगळं पहात पहात… रमतगमत…. अंगण ओलांडून जात असताना समोर दिसायचे ते मोठ्या दरवाजातून येणारे सकाळचे कोवळे ऊन आणि बाहेर जाणारा थोडासा धूर एकमेकात मिसळले जायचे. सकाळपासून समोरच्या दारातून आणि दुपारी मागच्या दारातून येणारा एकमेकात मिसळणारा हा ऊजेडधूर एक पासून तीनशेसाठ अंशाचा कोन तयार करायचा. कोनमापकाने मोजता येईल का ? कंपासपेटीची आणि गणिताच्या सरांची आठवण यायची पण क्षणापुरती. मग मात्र दुपारची भूक लागेपर्यंत फक्कड खेळाचे डाव मांडायला सुरुवात…..

कोणताही चिरा काढून कुठेही बसवला तरी इंचभरही फरक पडणार नाही इतके अखीव रेखीव चौकोनी चिरे आप्पांच्या वाड्याला आहेत. 17 खण लादनी आहे. न्हानीसहीत सगळी व्यवस्था जागच्या जागी होती. सगळी माणसं जणू हिरे अन् आजोबांनी या सगळ्या हिऱ्यांना एकत्र कोंदणात बसवण्यासाठी जणू बांधलेली ही लादनी! कालांतराने माणसं शहराकडे वळली. पुढच्या पिढीची घरं वेगळी झाली. आजोबा गेल्यानंतर वाडा भकास जाणवू लागला. आता सगळ्यांचे येणे जाणेही कमी झाले. कदाचित बालपणाचा काळसरला की सगळे व्यवहारिक होतात.  लादनीतल्या पाळण्यापासून अंगणापर्यंत आले की उडून जातात……

( शिक्षण विवेक अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 thoughts on “2. लादनीपासून अंगणापर्यंत…”