जिथे कोणताही प्रश्न उरत नाही,रहात नाही… अशी अतिउच्च परीक्षा पास झाल्यावर, पार केल्यावर काय होत असेल? ज्याला प्रश्नच रहात नाही तो केवळ उत्तरे द्यायला सज्ज असतो का? अशी स्थिती कधी प्राप्त होत असते का? का ? कायम मनात प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात तर कधी नाही, कधी शोधावी लागतात तर कधी सोडून द्यावी लागतात. हा उत्तरे, अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. स्वतःच स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे जीवन तत्त्वज्ञान हळूहळू पचवणे असते. असा प्रसंग आनंदाचा असेल की काहीही न उरणारा असेल! ज्याला असे अर्थ शोधण्याचे… सापडण्याचे….
परमेश्वराचे वैभव मिळाले आहे अशी वैभव संपन्नता प्राप्त झाल्यानंतर आपल्याला स्वतःसाठी काही करायचे आहे अशी स्थिती राहतच नसेल! सर्वकाही आपोआप घडत जाते. उदा. एखादी अतिउच्च पदावरील व्यक्ती आपल्या घरात, गावात येणार म्हणून पोलीसांची चौकीदारी सुरू होणार… सोबत घर सजवले जाईल…. रस्ता देखील साफ केला जाईल…. यासारख्या अनेक गोष्टी आपोआप होतील…. अर्थात हे सर्व लोकचं करतील आपल्याला यातले काहीही करावे लागणार नाही, मग ज्याच्या मनात, हृदयात प्रत्यक्ष भगवंत रहायला आले असतील तर! काय अवस्था असेल! असेच तर घडते त्या व्यक्तींसोबत. जगात या प्रकारची जी भावना उभी राहिली आहे. हा विश्वास उभा राहिला आहे की भगवंताची कृपा दृष्टी माझ्यावर आहे….तो जो काही करेल चांगल्यासाठी. या भावनेसाठी भगवंत देखील विश्वासास पात्र होण्यासाठी आत्मीय दृष्टीने या सगळ्यांकडे बघतो. हा विश्वास ज्याचा डोळसपणे अधिक दृढ झाला तो भगवंताचा लाडका! भक्तासाठी तो काय करत नाही! तो या लाडक्यासाठी त्याच्यासोबत इतरांचीही व्यवस्था करत असतो. हे प्रथमदर्शनी अशक्य वाटेल पण हे अशक्य नाही वस्तुस्थिती अशीच आहे.
एखाद्या गोष्टीसाठी अनेक गोष्टी घडलेल्या असतात घडत असतात. उदा. आपल्या घरी विशेष व्यक्ती येणार असेल तर जेवणातला गोड पदार्थ त्याच्या आवडीचा बनवतो. एक वाटी का होईना एक घास का होईना त्याने खावा म्हणून आग्रह करतो. पण तो एकटाच खातो का ? नाही, त्याच्या सोबत आलेले सगळे खातात. खरे तर त्याच्यासाठी केलेले आपण सर्वजण खातो. तसेच आणि त्याच प्रकारे घडते. आपण समजून घ्यायचा खरा प्रयत्न करत नाही. सृष्टी उभी केली ती अशा मुलांसाठी….त्याच्या लेकरांना आनंदाने जगता यावे म्हणूनच…मग यासाठी तोच प्रयत्नही करतो हा प्रयत्न एकासोबत अनेकांना त्याच्या सोबत जोडतो कारण माझा लाडका मुलगा शिकावा, जीवन दर्शन व्हावे, चांगले कर्म घडावे, चुकांचा पश्चाताप होऊन योग्य तो बदल व्हावा, स्वतःसोबत इतरांचा विचार व्हावा, दुसऱ्यांमध्ये स्वतःला तर कधी स्वतःमध्ये दुसऱ्याला पहावे, सर्व भेद मिटून सर्वजण एकच आहोत ही भावना निर्माण व्हावी. मग या एकट्या सोबत अनेकजण हे शिकले तर आणखी काय हवे त्याला ! जसे जुन्या काळातील लोक आपला मुलगा शिकावा म्हणून गावात शाळा काढत असत त्यासोबत इतरांची मुले शिकत असत तसेच.
थोडक्यात काय ! तर या भक्तासाठी केलेले प्रयत्न, काम त्याच्यासोबत इतरांनाही उपयोगी असतो. आपण अशा पद्धतीने भगवंताचे प्रिय बनण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले की नक्की आपल्यासोबत इतरांचेही भले होणार हा विश्वास असला पाहिजे. हा विश्वास आपल्याला सर्व कृतींसाठी, प्रयत्नांसाठी प्रेरणा देत असतो. भगवंताची हीच वृत्ती असते की, माझ्या या भक्तांसाठी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या त्याला मिळाव्यात म्हणून माझा प्रयत्न आणि या प्रयत्नाने इतरांचेही भले होत असेल इतरांनाही उपलब्धता मिळत असेल तर काय हरकत आहे ! आणि म्हणून अशा व्यक्ती, अशा व्यक्तींना केलेले सहकार्य त्याच्यासोबत आपलेही चांगलेच करत असते, घडवत असते. हे सगळे आपोआप घडत जाते न ठरवता, न नियोजन करता आपण हे ओळखून घेण्यासाठी कमी पडतो.
आयुष्यात उलट-सुलट मोहाचे जबरदस्त प्रवाह चालूच असतात. हा प्रवाह आपल्याला कधी बाहेर फेकतो, कधी ताडतो, कधी नुकसान करतो. व्यक्ती स्वभावानुसार परिणाम करतो. परंतु हा उलट-सुलट प्रवाह कितीही जबरदस्त असला तरी ज्याचे मन भगवंताशी एकाग्र झालेले आहे त्याला तो प्रवाह सुरळीत करता येतो. कारण त्याने अशी जागा मिळवलेली असते की त्याला सर्व एकरूपच जाणवतात. व्यक्तींशी वैर नसते तर समत्वयोग साधण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रयत्नाचे समाधान असते. तो खऱ्या अर्थाने जगतो. किमान खरा अर्थ शोधत जगण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न भगवंताला फार प्रिय असतो. असे प्रयत्न करणाऱ्यांना त्रास होत नाही, कष्टात देखील आनंद असतो.
भगवंताप्रति श्रद्धा असते की माझ्या क्षमता सिद्ध होण्यासाठी, मला घडविण्यासाठी त्याचे प्रयोजन नसेल ! आपण जर त्याचे लाडके असू तर नक्कीच ही कृपादृष्टी आपल्यासाठी सर्व काही बरेवाईट करत आहे. माझा प्रयत्न किती आणि कसा आहे, कशाच्या आधारावर आहे यावर त्याची कृपादृष्टी ठरते…..
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
8 thoughts on “समत्वयोग….”
सुंदर स्पष्टीकरण चांगले वागणे म्हणजे भगवंताला प्रिय होणे👌.
खरयं
सुंदर….
खुप छान लिहिते आहेस वर्षा अभिनंदन
Chan👍👌👌
खूप छान👍
छान
Khup ch bhavpurn .
apratim chintanshil