अर्थपूर्ण खेळ….भाग 3

शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीचा हा वेळ मुले क्रियाशील होण्यासाठी, नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी  खूप उपयोगी असतो. पण बहुधा हा वेळ पालक शालेय विषयाच्या तयारीत घालवतात उदा. चौदाखडी वाचन, लेखनाचा सराव खरेतर शिकवण्यासाठी घाई झालेली असते. परंतू हाताच्या बोटांचे स्नायू सक्षम झाल्याशिवाय हे करणे योग्य नसते. ऐकणे, कान तयार झाल्याशिवाय बोलणे आणि वाचन व्यवस्थित होऊ शकत नाही.. आणि हे सर्व घडण्याची प्रत्येक मुलाची गती वेगळी असते. तो त्याच्या गतीने शिकतच असतो. विनाकारण अवेळी केलेला अट्टाहास ताण वाढवतो, मूलाचा आत्मविश्वास कमी करतो…आणि हळूहळू यातील आवड कमी करत जातो. मुले कंटाळा करू लागतात. ज्याप्रमाणे खेळाची पातळी आणि फेरी कल्पकतेने, कौशल्याने वाढवून खेळाडूंची ताकद आणि क्रियाशीलता मोजली जाते.  खेळ चढत्या क्रमाने रंजक आणि अवघड होत जातो तसेच या वयामध्ये देखील विविध कौशल्य हळूहळू आत्मसात करत जात असतात. यासाठी काही गोष्टी पालक म्हणून नियोजनपूर्वक करता येतात. सरावाने सोप्याकडून कठीण, उदाहरणावरून नियम, निरीक्षणातून वैशिष्ट्य, व्यायाम, योग्य आहार, पाठांतर, याचा उपयोग विविध खेळांची मांडणी करून करता येतो. खेळ म्हणजे फक्त परिचित खेळच खेळावे असे नाही. तर हे खेळ तयार करता येतात. ‘आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत’ हे वाक्य मुलांची उत्सुकता वाढवते. छोट्या छोट्या कलेमधून आनंद मिळवता येतो, उदा. मातीचे छोटे मडके हवे तसे रंगवू देण्याचे स्वातंत्र्य दिले की एकाग्र होऊन ती कृती करतात. स्वयंपाक घरातून विज्ञान आणि वस्तूंची ओळख करून देता येते उदा. गोल आकाराच्या वस्तू कोणत्या? कमी वेळात कोण जमा करतो? आईबाबांनी देखील त्यांच्या सोबत शर्यत लावणे, खेळणे आवश्यक आहे. दरवेळी सोबत समवयस्क मित्र असतीलच असे नाही. मुलांना हा सहभाग खूप आवडतो. शुभंकरोती, गणपती स्तोत्र, बडबडगीते, पक्षी प्राण्यांच्या गोष्टी अभिनयासहीत सांगणे, नक्कल करणे, वेगवेगळे आवाज काढणे, पाठांतर, संस्कार आणि उच्चारशुद्धता कौशल्य मूल शिकत असते. एके ठिकाणी बसून हे काम कर किंवा हे पाठ कर यापेक्षा ‘आपण एक खेळ खेळूया’ असं फक्त सांगायला उशीर मुलं आवडीने यामध्ये सहभागी होतात. खेळातून या गोष्टी सहज शिकवता येतात. या खेळाचे भावविश्व देखील प्रत्येक मूलाचे वेगळे असते. ठरावीक वस्तू, गोष्टीतील पात्र, ठरावीक खेळ यामधून ते स्वतःच्या भावना व्यक्त करतात. एका मैत्रीणीची मुलगी दोन वर्षाची असताना तिला चांदोमामा आणि त्याची आई याचे फार आकर्षण होते. प्रत्येक वेळी ती हट्ट करत असताना तिला सांगितले चंदामामाची आई म्हणाली ‘आता असे करा’ की सगळे ऐकायचीच. चंदामामाची आई आणि चंदामामा तिच्या खेळातील अविभाज्य घटक आहे. प्राणी, पक्षी, गाड्या, भातुकली, बाहूली, अगदी कोणतीही खेळली जाणारी वस्तू ही त्यांची खेळणी ….या खेळण्याशी त्यांचे भावविश्व जोडलेले असते. राग आला की तोडफोड करतात, आणि कधी झोपताना ती खेळणी सोबत लागते तर उठल्याबरोबर नजरेसमोर हवी असते. हे  भावविश्व सोडून नियंत्रित वेळात ते शाळेत येणार असतात.  म्हणून शाळेच्या सुरूवातीच्या दिवसात मुले रडतात, घरी जायचे म्हणून हट्ट करतात, शाळा कधी सुटणार ? सारखे विचारत असतात.  सोबत असणारी आईबाबा, बहीण भाऊ,  निवांतपणा…आवडीचा खेळ, खेळणी सोडून बसावे लागते म्हणून लवकर समायोजन होत नाही. यासाठी शाळेतील शिशूविहार गटात खेळ, खेळणी, खेळातून शिक्षण याला महत्त्व आहे. हल्ली पालकांचा या गटासाठी सुद्धा हट्ट असतो. “लिहायला, अभ्यास द्या”!

घरात राहून देखील कल्पकता वापरून विविध उपक्रम, खेळ म्हणून घेता येतात यासाठी पालकांनाही विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हावे लागते. सकाळी सोप्या योगासनाच्या सरावा पासून दिवसभराचे दिनक्रम वेळापत्रक तयार करणे. स्वतः विषयी माहिती सांगता येणे. छोट्या छोट्या गोष्टींचे नाट्यीकरण करणे, आवडीची चित्र रंगवणे, चित्रांचा क्रम लावून गोष्ट तयार करणे, नातेवाइकांची नावे सांगता येणे, बालगीतांवर सहजसोप्या हालचाली करू देणे,  ठराविक शब्दांच्या भेंड्या खेळणे उदा. फक्त फळांची नावे, छोटी कोडी सोडवणे,  खेळामध्ये हे प्रकार घेऊन नक्कीच उपयोग होतो. घर म्हणजे एक प्रयोग शाळा आहे अनेक गोष्टी  शिकण्यासाठी, विविध कलांची ओळख होण्यासाठी. उदा. रूमालाची घडी घालण्यापासून ते अगदी लिंबू शरबत तयार करायला या वयात खेळातून शिकवता येते. स्वावलंबन, स्वतःची कामे स्वतः करणे पाणी भरून घेणे, झाडून काढणे, भाजी निवडणे ही कामे करतांना सुद्धा कौशल्ये लागतात आणि त्यांच्या सोबत संवाद करत खेळत खेळत सहभागी करून घेता येते. पूजा करणे, हार तयार करणे, कुंडीत बी, छोटेसे रोप लावून त्याची वाढ कशी होते याचे निरीक्षण करणे व जोपासना करणे. यामध्ये रोजच्या उपयोगी येणारे  कोथिंबीर, पुदिना लावता येतो. मुलांना या कृतीतून आनंद होतो. त्यांच्या खेळाला दिशा दिली की हा खेळ अनेक गोष्टी शिकवत जातो. उदा. घरातील प्रत्येक वस्तूंची नावे आणि त्याचे उपयोग सांगता येणे. स्वयंपाक घर ज्ञानाचे भांंडार आहे आणि या वयात आई सर्वात जास्त वेळ मुलांसोबत असते. आई आपल्या मुलांना चांगले ओळखते म्हणून कोणत्या गोष्टींचा खेळ म्हणून कसा वापर करावा हे कौशल्य निसर्गतःच असते. आईने हा वेळ गुणवत्तापूर्ण देणे आवश्यक असते. विरघळणे, वितळणे, वाफेची शक्ती, विविध आजारांवरील घरगुती औषधे, मसाल्याचे पदार्थ, कडधान्ये व पिष्टमय पदार्थ, जीवनसत्वे या सर्वांची ओळख करून देणे. पारंपरिक खेळाची ओळख करून देणे, श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी चांगली भाषणे, बडबड गीते, बालगीते, स्थानिक भाषेतील संवाद, बोधकथा. आपले घर, गल्ली, गाव याचा नकाशा तयार करणेे. गावातील रस्ते त्याचा नकाशा यावरून चालणारी त्याची खेळातली गाडी…. या प्रकारचे खेळ तयार करता आले पाहिजे. दिशा ज्ञान मुलांच्या नकळत कल्पनेत येते. खेळाच्या माध्यमातून  ही नवनवीन माहिती मुलांना निश्चितच ऐकायला आवडते. शेतीच्या अवजारांची ओळख, दिवसा आणि रात्रीच्या आकाशातील गमती जमती आणि निरीक्षण. मुले  टीव्ही, मोबाईलसाठी हट्ट करणार नाहीत. टिव्ही, मोबाईलला पर्याय देत नाहीत म्हणून या गोष्टींंसाठी हट्ट धरतात. याबाबतीत माझा स्वतःचा अनुभव खूप चांंगला आहेे टीव्ही बंद असल्यामुळे इतर अनेक चांगले पर्याय त्यांच्यासमोर होते. हे सर्व पर्याय प्रत्यक्षात आणण्यासाठी टीव्ही बंद मुळे भरपूर वेळ मिळत होता. मुले लहान असताना जेवताना दररोज एक गोष्ट असायची. ती गोष्ट पुस्तकातली असावी असा काही अट्टहास नव्हता ‘आज कशाची गोष्ट’? मुलांनी जो विषय, वस्तू ,नाव सांगितले तीच गोष्ट तयार करायची आणि सांगायची. खेळाचेही तसेच…. तोच खेळ !  टीव्ही, मोबाईल मुळे हरवत चाललेले खेळ व खेळातून शिकणे, पर्याय दिले की सापडतात….. वरील उदाहरणांशिवाय अनेक प्रकारे पालक कौशल्याने हाताळत असतातच. भौतिक साधन पेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची असते. या सर्व खेळांमधून अवयवांचा समन्वय, एकावेळी दोन कृती करता येणे, स्वची जाणीव, प्रयत्नातून यश, नवीन मूल्य, सरावाने कौशल्य ठराविक गोष्टींसाठी ठराविक कृती करावी लागते म्हणजेच काही पद्धती, अनुकरण, स्वतःचे विचार तयार होणे निरीक्षणातून ज्ञान यासारख्या अनेक गोष्टी मुले या खेळांंतून शिकत असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

17 thoughts on “अर्थपूर्ण खेळ….भाग 3”