क्षमता….

व्यक्तींच्या अंगीभूत असलेल्या क्षमतेएवढी कामे होतात. या क्षमतेचे, योग्यतेचे प्रमाण प्रत्येकासाठी सारखे असू शकत नाही.समजा धावताना एकाच्या पायात काळजी घेणारे बूट असतील आणि दुसऱ्याला अनवाणी धावावे लागत असेल तर ! क्षमता आणि मूल्यमापन हे सारख्या परिस्थितीत, समान योग्यतेच्या व्यक्तींचे असते. नियंत्रित परिस्थितीत केलेले मूल्यमापन काही ठरावीक क्षमतांचे आणि तात्पुरते असते. पूर्णतः भिन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. सारख्या असणाऱ्या, वाटणाऱ्या आणि केवळ दिसून येणाऱ्या गुणांचे, कामांची तुलना कदाचित होऊ शकेल. नेहमी पुढे असणारा पुढे कसे राहता येईल? आणि हे कसे टिकवता येईल! याचा प्रयत्न करत असतो? चांगली गोष्ट आहे. परंतू जिंकणारा केवळ एकच आहे म्हणून बाकीचे हरलेले नसतात. कालच्यापेक्षा मी आज कसा पुढे जाईल याचा प्रयत्न करत असतात. कदाचित क्षमता असूनही मागे असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असल्यामुळे एकाच क्षमतेवर केंद्रित झालेले नसू शकते. व्यक्तीपरत्वे कारणे, परिणाम बदल असतात.
कामाचा हेतू केवळ क्रमांक पद्धतीने यश मिळविणे यासाठी असतो का किंवा तसे यश प्राप्त करणारे सर्वच बाबतीत श्रेष्ठ असतात का? कदाचित नाही ! म्हणून या क्रमांक स्पर्धेपेक्षा वैयक्तिक कौशल्य विकास याला महत्त्व असते. क्रमांक स्पर्धेमुळे ताण वाढतो व कायम हे टिकवण्यासाठी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्ट करताना कामातील आनंदापेक्षा सादरीकरण किंवा इतरांपेक्षा काय वेगळे करू असा विचार होतो. याऐवजी मी सर्वश्रेष्ठ काय करू शकतो हा विचार आवश्यक आहे….खरेतर हा विचार करून स्वंयमूल्यमापन आणि आत्मचिंतन आवश्यक असते. थोडक्यात कामातील आनंद टिकवणे व क्षमता वर्धनाच्या दृष्टीने विचार आहे की, मी माझे काम आवडीने चांगले करेन. याउलट क्रमांक स्पर्धा असली की, मी सर्वांपेक्षा चांगले काम करेन, मीच सर्वांपेक्षा चांगले काम करतो आणि माझेच काम चांगले आहे…. हा प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास दुसरे कोणी काम करतच नाहीत इथपर्यंत येऊन पोहोचतो. यामुळे स्वतः चे विचारच आपली योग्यता कमी करत असतात. कधी कधी गुणवत्तादेखील कमी करत जातात. नवीन विचार स्वीकारायला तयारी नसते. स्वतःमध्ये गुरफटून जातो.  आणखी गुणवत्ता घसरते. आपले ध्येय काय आहे ? त्यासाठी कधी थांबायचे आहे, कधी चालायचे आहे आणि कधी गती वाढवायची आहे हे आवश्यक आहे. स्वतःला क्षमता कोणती आणि किती आहे हे समजले की इतरांशी तुलना करणे संपते. याशिवाय अपेक्षापूर्ती आणि नकारात्मक विचार देखील कमी होतात. विचार आणि कृती या दोन्ही मध्ये अंतर जास्त पडले की तणावाचा आलेख वाढू लागतो. या अपेक्षा पूर्तीपेक्षा फक्त प्रवास आनंददायी असतो. कारण पूर्णविराम म्हणजे थांबणे यामुळे सक्रियता कमी होऊ शकते. सक्रीय निती, स्थिती, गती यासारख्या गोष्टींवर संधीची उपलब्धता असते, यामुळे योग्यतेपेक्षा मोठे काम, संधी मिळाली तर ताण येतो, आणि योग्यतेपेक्षा कमी काम, संधी मिळाली तर हतबलता, नैराश्य, नकारात्मकता येऊ शकते.अश्या वैयक्तिक विचारांची व्यक्तिनिष्ठता आली की काम बाजूला राहते आणि त्याला इतर अनावश्यकता जोडल्या जातात. एखाद्या सामुदायिक कार्यक्रम, उपक्रम व योजनेवर तर परिणाम होतोच याशिवाय नकळत स्वतःच्या क्षमतेवर, गतीवर देखील परिणाम होत असतो.
अंगीभूत असलेल्या क्षमतेऐवढे काम होण्यासाठी स्वतःहून केलेला बदल जास्त प्रमाणात उपयुक्त ठरतो. या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करणारे बाह्य घटकांपेक्षा स्वनियंत्रित करता येणारे घटक जास्त असतात. म्हणून स्वंयप्रेरणेने केलेले काम…प्रत्येक गोष्टीतील सहभाग उत्स्फूर्तपणे दिसतो तसेच अपयश पचविण्याची मानसिकता ठेवून असतो. कारण स्वतःच्या क्षमता माहिती करून हाती घेतलेले काम अपयश आले तरी पुन्हा उभारीने करावे ही इच्छा निर्माण करते. स्वतःच्या कामाची पद्धत, काय बदल करू शकतो, किती प्रमाणात काम…. यासारख्या गोष्टी प्रामाणिकपणे ओळखता येणे, ही स्वतःच्याच इतर क्षमता वाढविणारी पहिली आवश्यक क्षमता असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 thoughts on “क्षमता….”