पावसाच्या थेंबाचे दान मातीला
मातीचे दान वेलींना
फुलोनि वर्षाव मातीत
तरी फुलावे लागते….
पायरी चढणे नसे इथे…
एकेक पायरी उतरावे लागते… जीवनाला जगावे लागते.
असे कितीतरी नकळतपणे घडणारे निसर्गदान, जीवन दर्शन अन् त्याप्रती ऋणभाव, आभार, धन्यवाद असतो. कृतज्ञेपोटी विचार, कृतीतून, वागण्यातून नित्य व्यक्त होत असतो. आयुष्य कधीच एकट्याचे नसते. अचानक, नकळत, स्वार्थ विरहित कोणाचे कांहीतरी देणे लागतो यासाठी केलेले छोटे काम देखील एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे असते तर याउलट एखाद्याला कितीही मदत करणे उपयोगाचे नसते. असे कोणाचे, कोणते ऋण जीवनात आहे ? असा विचार येतो तेव्हा सर्वप्रथम लक्षात येते ते म्हणजे हे जीवनाचे दान फक्त भौतिक वस्तूंमधे जसे पैसा, इतर वस्तू स्वरुपात नसते. ते दान यापेक्षाही वेगळे असते. व्यक्तींना, समाजाला नाही तर, ते जीवनाला द्यावे लागते.
ही जीवनाची ऋणकृतज्ञ संकल्पना नकळत घडते तर कधी ठरवूनही घडू शकत नाही म्हणजे नेमके काय !
जे जगावेच लागते, ते आनंदाने दान देत आणि घेत ! मग कशाचे दान देतो आणि घेतो ? अमूल्य वेळेचे, कष्टांचे, प्रयत्नांचे, मनावरचे ओझे उतरवण्यासाठी, हलके करण्यासाठी आधार , भावनिक मदतीचा आधार… नैराश्यग्रस्त असलेल्या, हरलेल्याला दुःखीकष्टी वेदनेला…. उत्साहाचा, सकारात्मक, विचारांचा मदतीचा हात देणे म्हणजे सुद्धा जीवनाला दान देणे होय. निर्जीव झालेल्या जगण्याला नवसंजीवनीचे दान जीवनाला द्यावे लागते. ही जीवनवर्षे, अमूल्य वेळ कधी वापस येत नसते. पश्चात्ताप करण्यापेक्षा हेच जीवनदान होते हा विचार करून त्याग, दुःख भोगून आनंदाचे दान द्यावे लागते. या दानाचे पारडे कधीच समतोल रहात नाही. काटा कमीअधिक होतच असतो. काट्यावर तोलूनमापून घ्यायचा फार प्रयत्न केला की, पदरी निराशा येते….म्हणून हा हिशोब बिनधास्तपणे घोळात ठेवून सोबत कायम एक विचार उपयोगात येतो, तो म्हणजे “जीवनाला दान द्यावे लागते तरी जीवनाला आनंदाने जगावे लागते”. जगतांंना आलेला अनुभव भोग नाही तर काहीतरी शिकवण्यासाठी आलेला योग आहे. कोणाचे तरी देणे लागत आहोत म्हणून जे जे देऊ शकतो ते दान, ऋण, कृतज्ञता असा विचार केला की भाव बदलतो. हा बदलेला भाव आपल्याला समाधानाच्या जवळ घेऊन जात असतो. समर्पण म्हणजे हेच की, एकदा मनात विचार आला की, अर्पिले….दिले ! दिले…ते पुन्हा विचारात घेणे नाही…ते आपल्यासाठी संपलेले असते. त्याच भावनेतून सगळ्या कृती घडायला लागतात. वाईट आठवणींचे, विचारांचे विस्मरण व्हायला लागते. चांगला भूतकाळ सोबत करतो चांगलेे घेण्याचे आणि देण्याचे स्मरण व्हायला लागते आणि जीवन रडगाणे होण्याऐवजी….जीवनाला आनंदाने जगावे लागते हे समजते… जसे कांंही ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी पुन्हा जन्मेन ‘, या गीतातील ओळीप्रमाणे घडते.
मातृऋण न फिटे कधी…
जन्मभूमी उतरीन ऋण तुझे..
कृतज्ञ मी ग्रंथाप्रति..
त्यांची शब्दऋण,अर्थऋण किती..
ऋणानुबंध हे अपुले किती !
अश्या कितीतरी व्यक्ती, गोष्टी आपल्या आयुष्यात दान म्हणून येतात आणि आपणही नकळत देत जातो.. या सर्वांचे आभार प्रदर्शन करण्याची पद्धती खरेतर आपली नाही, तर हे सगळे जगत असताना, घडत असताना कृतज्ञतेच्या जाणिवेची आहे या ऋणातच रहाण्याची आहे. ‘वापरा आणि फेका’ च्या जमान्यात कृतज्ञतेची जाणिव जीवनात, शांती कर्तव्यनिष्ठा, त्याग, दानशूरपणा, समर्पण, दुसऱ्याच्या आनंदातही समाधान, सहकार्य, यांसारख्या चांगल्या जाणिवांना निर्माण करते.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
13 thoughts on “जीवनाला जगावे लागते….”
खरेच आहे, जे समोर मांडले ते जगावे लागते तेच आनंदाने जगणे अतिशय सुंदर लेखन
कराव्या लागणाऱ्या कामांचा भाव बदलला की अर्थ बदलतो खूप छान
जीवनाला आनंदी करणारे आनंदीगाणे
भाववर्षा 👌👍💐 खूप भावगर्भ विश्लेषण
छान
👌👌
👌👌🙏🙏
आनंददायी जीवनाचा पाया देणे घेणे👍👍
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🙏
देणाऱ्याने देत जावे…
👍👌👌👌
जीवनाला नवसंजीवनी देणारे विचार👍