काय गरज आहे?….

 

“दान दीन बनवते, काम नवनिर्माणाला प्रवृत्त करते”.
हे वाक्य लक्ष वेधून घेते. याचा अर्थ असा नाही की दानाला महत्त्व नाही, दान करू नये, तर ते कुठे आणि कशा पद्धतींची वृत्ती बनवत आहे जसे आळशी,आयते बनवत आहे की कायम मदतीची अपेक्षा करत आहे? दान कोणती नवनिर्मिती करत आहे ? यावर त्याचे महत्त्व ठरते म्हणजे सत्कर्मी होते. कामाला, कष्टाला, श्रमाला चालना देणारे दान आवश्यक आहे. याबरोबरच या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा या मागचा विचार आहे. केवळ एखादी सुविधा चांगली करण्यापेक्षा सुविधा नसलेल्या ठिकाणी किंवा एखाद्या नवनिर्माणाची प्रवृत्ती तयार होणार आहे अशा ठिकाणी हे नक्कीच उपयोगी ठरते. मग ते दीन बनवत नसते तर काहीतरी साध्य करण्याची वीण बनवते.
कष्टातून, श्रमातून नवीन काहीतरी निर्माण करण्याचा आनंद अनुभव ज्याने घेतला नाही तो बिनदिक्कतपणे अश्या वीण, कृती, काम… उध्वस्त करायला तयार होत असतो. कदाचित यासाठीच प्रयत्न करत राहतो. म्हणून वैयक्तिक, कुटुंबात, समाजात श्रमाला प्रतिष्ठा असली पहिजे. पूर्वी कष्टाने, श्रमाने संस्कारित झालेल्या किती वस्तू वापरतो, कामे करतो यावर अभिमानाने चर्चा होत असे. आता तेच कमीपणाचे लक्षण समजल्या जाऊ शकते. व्यक्तीकडे सर्व सुखसोयी असताना त्याचा वापर न करता, साधेपणाने जगत असताना आश्चर्य व्यक्त केले जाते. काय गरज आहे? कशासाठी?….
शेतातून येणार्‍या धान्यांवर किती संस्कार होत असतात! अगदी शेतातील धसकटे काढून, नांगरून, कोळपून, पेरणी, खत टाकणे, तण काढणे, फवारणी, कापणी, मळणी, मग परत पाखड ,निवड, दळण, पीठ… पोळी आणि भाकरी काय काय! हे एक उदाहरण झाले. अशा प्रत्येक होणाऱ्या कार्याला, नवनिर्मितीला अनेक प्रक्रियांमधून जावे लागतच असते. यासाठी किती जणांनी ओझे उचलेले असेल, भर पावसात गुडघ्यापर्यंत चिखलात कामे केली असतील! प्रत्येक कामाचे स्पष्टीकरण इथे अपेक्षित नाही परंतू यामागची नेमकी भूमिका हीच की कष्टाला पर्याय नसतो ते त्याच पद्धतीने करावे लागते. हा विचार मनात आला की मग अन्न वाया जात नाही, त्याच्या एका घासाचेही महत्त्व समजू लागते. त्याचे मूल्य, प्रतिष्ठा समजायला लागते. नकळत इतरांना हे सांगण्याची प्रवृत्ती बनत जाते. तसेच इतर कामांच्या बाबतीतही असेलच हा सुद्धा विचार सुरू होतो…. हा विचारसंस्कार मात्र लहानपणापासून आवश्यक असतो, महत्त्वाचा ठरतो. नाहीतर कष्टाला पर्याय मिळाला की  मूळ उद्देश विसरला जातो. किमान तशी शक्यता तरी निर्माण होतेच! नवीन तंत्रज्ञान, सुविधा सहाय्यक आहेत. या पर्यायाला विरोधही नसावा. वेळ आणि कष्टाची बचत होते परंतू या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने, तंत्रज्ञानामुळे आपल्याला आळशी बनवून श्रमप्रतिष्ठेपासून दूर घेऊन जाऊ नये.
निसर्गाने एकाच मानवी शरीरात ज्ञानेंद्रिये याबरोबर तितकीच कर्मेंद्रिये कशासाठी ठेवली आहेत ?….
याचसाठी त्याचा पुरेपूर उपयोग करून उपलब्ध उर्जेतून काहीतरी चांगले निर्माण व्हावे…याचसाठी हे श्रमाचे मूल्य जाणने आवश्यक मग अवघड काम सोपे होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 thoughts on “काय गरज आहे?….”