एक क्षण….

 

 


स्वतःला अलिप्तपणे व तटस्थपणे समजून घेणे ऊर्जा वाढवणारे असते. समजून घेत असताना अभिनिवेश, व्यक्तिनिष्ठता नसावी. निर्लेपपणे समजून घेण्याचा प्रयत्न असावा. जे जे निःशुल्क परंतु मौल्यवान आहेत याचा अनुभव जेवढा घेता येऊ शकतो तेवढे आपण समजून घेऊ शकतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी जर से.मी.ची छोटी पट्टी वापरली तर चालेल काय? आयुष्याचही तसेच असते. आयुष्याचे मूल्य कोणत्या परिमाणात आपण करतो याचा परिणाम होतो. समजून घेणे आणि जगणे या योगात गफलत होते…मग आयुष्याची परिमाणं कोणती ?
मिळालेले श्वास सर्वात मौल्यवान. हवा, पाणी वगैरे म्हणजे निसर्गदत्त, ईश्वरनिर्मित प्रत्येक गोष्ट तसेच
प्राणी, पशुपक्षी यासोबतच मानवही आहेच.
भौतिकगोष्टी विरहीत व्यक्तीचे वर्तन, व्यक्तित्व, झोप, शांती, हास्य, आनंद, हे देखील मौल्यवानच. दुःख, वेदना, संवेदना यासारख्या सर्व प्रकारच्या भावनांनी कमी अधिक प्रमाणात युक्त असा प्रत्येकजण  असतो. हे सर्व गृहीत धरून किती अलिप्तपणे आपण जीवन अनुभवाकडे पहातो तेवढे आपण समजू शकतो. यासाठी प्रत्यक्ष अनुभवावेच लागते अर्थ सांगून समजत नसतो. म्हणजे अनुभवसमृद्धता जास्त तेवढे अर्थसमृद्धता जास्त होईल का? नक्कीच नाही ! कारण त्या अनुभवांना व्यक्ती कोणत्या दृष्टीने जाणतो यावर हे अवलंबून आहे म्हणून काही जणांची पाटी कोरीच म्हणतात आणि याउलट…काही जणांना एक क्षण ही पुरे आयुष्याचा साक्षात्कार होण्यासाठी…
या एका क्षणाच्या अनुभूतीने, अनुभवाने, ज्ञानाने, जाणीवेने आयुष्याचा सार जाणणारे, आत्मज्ञान होणाऱे समाजसेवक, सुधारक, देशभक्त, थोर स्त्रीपुरुष, संत मंडळी मानवी जन्माला येऊन देवत्वाला सिद्ध झाली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

13 thoughts on “एक क्षण….”