विशालकाय लाटांवर लाटा…. सांजवेळी किनाऱ्याची भेट घ्यायला येतांना स्वतःचे मोठेपण लहान करत करत….शेवटी विरघळून जातात, शांत होतात. आपल्या अस्तित्वापूर्वी आणि अस्तित्वानंतरही… अश्या एकानंतर एक लाटा येण्याचे चक्र सुरु आहे आणि सुरू रहाणारचं आहे.
उत्साही उसळते….एकमेकात मिसळणारे…. फेसाळते उधाण, वाळूच्या किल्ल्यांसारखे क्षणात सगळं शेवटी पाण्यात ! असे काहींसे, खट्याळ, खोडकर मस्ती, खेळकर, बालीश… पण तितकाच खोल, गंभीर, अथांग अनुभव…. म्हणजे समुद्राची गाज.. साद…आवाज…
जे दुर्लभ असते त्याचे आपल्याला फार अप्रूप वाटते. सागराच्या भेटीला गेले की, तो क्षण, तो सहवास कधी संपणार असतो हे माहिती असल्यामुळे आपणही भरभरून जगून घेतो, अनुभवून घेत असतो. तो हवाहवासा अनुभव वाळू सारखा निसटणार असतो… अगदी देहभान विसरून अनुभव यायला लागतो. आठवतयं ? समुद्रकिनार्याचे पहिले दर्शन…रूप… ! नजरेत न सामावणारा……
घर, गावं, उंच पर्वत, पहाड, डोंगर, घाट, रस्ते, नदी, जंगल, हे सगळं सगळं सोडून…. त्या विशालकाय लाटांसारखं हलके होत होत, स्वतःला लहान करत करत, एक बिंदू होऊन, खाली उतरून आणि ओलांडून…. नारळ, सुपारी, काजू, फणस, करवंद याची चव चाखत…. अनेक झाडे-वेली, अनोळखी रंगीत पक्षी, सगळं सगळं दृष्टिआड होऊन सागराची भेट घ्यायला जात असताना जणू कांही सगळं सोडूनच त्याच्या भेटीला जावे लागते…..
हा विराट सागर जाणीव करून देतो आपल्या थिटेपणाची. विराटतेचे दर्शन होण्यासाठी सगळे सोडून जमिनीवर यावे लागते. त्याच्यासमोर आपण एक बिंदूही नाहीत याची जाणीव होते. पण या सोबत तो किती भरभरून देत असतो. शिकवत असतो. नजरेत न सामावणारे आकाश आणि क्षितिज जणू कांंही जमिनीवर जसेच्या तसे पहुडले आहे. आपल्यासाठी खाली आले आहे आणि लाटांच्या रूपाने पायाशी लोळण घेत आहे, भेटीला येत आहे. आपणही संकोच न करता या लाटांचा स्वीकार करत स्वतःला झोकून देतो. हा पहिला अनुभव दरवेळी येऊन एक नवा अनुभव येत असतो. आकाशाचे रंग आणि त्याचे सागरातील प्रतिबिंब यामुळे दिवसभरात विविध रूपात समोर दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्त यांची विविध रूपे पहायचे असतील तर, यासाठी संयमाने आणि अचूक वेळ काढून वाट पाहत बसण्याची तयारी असावी लागते. नेमका तो क्षण टिपण्याचे कौशल्य, हा क्षण अलगद मनात उतरला की, या आठवणी सोबत आणण्यासाठी… कॅमेरामध्ये टिपण्यासाठी… प्रयत्न आपोआप होतात. अगदी पहाटे ढगाळ धुक्यात आकाशात हळूहळू पिवळसर गुलाबी रंगापासून सुरुवात करून केशर गोळा होते यावेळी सागर शांत पहुडलेला असतो. या आकाश आणि सागर दोन्हीच्या किनाऱ्यांवरून, मधल्या रेषेवरून आपण चालत आहोत असा भास होतो…. हे भल्यापहाटेचे दृश्य पहाण्यासाठी… निसर्गभक्तच व्हावे लागते.
“निसर्गराजा ऐक सांगतो”. तो काय सांगतोय कळाले की….ध्यान अवस्था निवांत, एकांत क्षणाची…
खरेतर किनाऱ्याच्या रेषेवरून आपण फिरतो आहोत ? की कोणती जादू आपल्याला फिरवते आहे? लक्षात येत नाही. चौफेर नजर फिरवली तरी तेच असते. जसजसा दिवस वर येतो सागराचा उत्साह, जोश अनुभवण्यासारखा असतो. लाटांवर स्वतःचे नियंत्रण करत, झोकून देत असताना हे सगळं पेलवायचे आपले प्रयत्न किती तोकडे असतात…. हे मागून अचानक धडक देणारी लाट सांगून देते आणि त्यामधून सावरत नाही तोपर्यंत दुसरी लाट ढकलून द्यायला तयारच असते. आपल्या नाकातोंडात पाणी आणि भुईसपाट केल्याशिवाय सोडत नाही. पण लगेचच हळुवारपणे पायाखालून वाळू सहित माघार घेत आपल्याला किनाऱ्याकडे ढकलत असतो. या मजेशीर, फजिती होणाऱ्या खेळातून लाटांवर स्वार होऊन, आनंद घेण्याचे शिकवत असतो. सरावाने मग आपल्याला आपली मर्यादा कळते. सागर कोणतीही बाहेरील, त्याची नसलेली गोष्ट स्विकारत नाही. किनार्यावर आणून फेकतो. परंतू त्याच्या आत असलेल्या गोष्टींची ,विश्वाची एक रेषही पृष्ठभागावर उमटू देत नाही. त्यासाठी आपल्याला आत प्रवेश करावा लागतो. नवीन विश्व पाहायला मिळते सुंदर, विलोभनीय, आश्चर्यकारक, चंदेरी, रंगीबिरंगी दुनिया असते. प्रत्येक किनारा प्रत्येक वेळी वेगळा भासतो. गणपतीपुळ्याचा किनारा फेसाळ लाटा उसळत असतो. किनाऱ्यालगतची खोली आणि अचानक पायाखालची वाळू सरकवणारी शक्तीशाली लाट, आपल्या मर्यादा जरा स्पष्ट, खड्या आवाजात सांगून दूर लोटतो. हरीहरेश्वरचा किनारा अगदी शांत, निवांत आवाजात शिवमंदिरातील गुढ गाभार्याचा एकांत उजळून टाकतो. सगळं काही विसरून समाधान देतो. तारकर्लीचा किनारा इतिहासाची आठवण करतो… शिवरायांच्या हाताचे ठसे, संकटकाळी गुप्तमार्ग आणि खाऱ्यापाण्यातील किल्यावरच्या गोडपाण्याच्या विहिरी तर आश्चर्याचा धक्का देतात. सगळं पाहून वल्हव्याची बोट धक्क्याला लागली की स्वतःचा तोलसावरत किनाऱ्यावर येऊन थाांबते. प्रत्येक किनाररेषेचा आकार, रूप, झाडी आणि लाटांची किमया वेगळी….हे सगळं सोडून येताना पुन्हा जडपणा येतोच… हे वापस येणे नको असते…..बैठे है किनारे पे।
मौजोंके इशारो पे।
इथपासून सुरू झालेला प्रवास…..
मांंजी छोड जाता है।
साहिल छूट जाता है।
हे सत्य स्वीकारावेच लागते. वापस यावे लागते. मग शंखशिंपले, विविधरंगी वाळू आणि छोटे आकर्षक गोटे…लहान ते अगदी वयस्क सुद्धा संग्रह करून सोबत आणतातच. सागराला सुद्धा हे निसर्गप्रेमी प्रियच असतात… म्हणून तर तो आपल्या नकळत त्याची सोनेरी क्षणांची सोनेरी वाळू आपल्याला सोबत देतो, …कितीही टाळली, झटकली तरी सोबत येतेच …पुन्हा नजरेस पडली की तीच साद, तीच गाज सागराची ! ओढ भेटीची !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
10 thoughts on “सागरीसाद….”
मस्त ! सागराची साद ऐकू आली मनातून मनापर्यंत आणि जायची पुन्हा इच्छा झालीच
खूप छान. समूद्र किनाऱ्यावर खूप खूप मज्जा करून आलोय असे वाटले.मांडणी कौशल्य उत्कृष्ट👍👌
अप्रतीम
निसर्गमाया जादू करतेय मायावी आहे निसर्गाचे अनोखे वर्णन जाणवते अनुभवी वाटते केवळ काल्पनिक वर्णन नाही खरा आनंदानुभव आहे
waicharik प्रदूषण aaplya वास्तववादी lekhamule नाहीसे होते aaplya ya सेवेबाबत विनम्रतापूर्वक कृतार्थता your karto
अप्रतिम वर्णन
Watching Seashore / Beach is an experience that can not be compared with anything else… It is absolutely introspective and meditative !!!
Nice
सागराचा आणि मनाचा मेळ छान घातला.सागराची गाज कानात घुमू लागली.👌👌👌
छान वाटले .बरे झाले सागराला भेटवलंत .कोरोनामुळे कुठेही फिरायला गेलो नाहीत नां .मनाने तरी फिरुन आले.👍🏻😊😊