सामुहिकता !….


प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अथवा सर्व गुण कधीच नसतात. काही लोकांकडे  कल्पना क्षमता असते पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन नसते तर कधी अधिकार नसतो. शक्ती असते पण तिला योग्य दिशा नसते. संघटनक्षमता असते पण निर्णयक्षमता नसते जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकते. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो. सर्वोत्तम यश देखील गाठता येत.                                                                  एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य, भव्य दिव्य कांंही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्यांंच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी क्रियाशीलता ! परंतु हे क्वचितचं घडून आलेलं दिसतं. अनेकदा प्रतिभा, नेतृत्व, हुशारी, बौद्धिक क्षमता, क्रियाशीलता व्यवस्थेमध्ये व्यवस्थित बसवून नष्ट होत असतील. कोणाचं नुकसान? या शक्ती आणि व्यक्ती कार्य करतच असतात, परंतु  कधीकधी  कार्यक्षेत्र बदण्यास नाईलाजास्तव प्रवृत्त होऊ शकतात. काम करणाऱ्यांना योग्यतेनुसार किमान कामांची संधीची उपलब्धी नसेल तर? क्रियाशीलता व्यर्थच! अशी उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडतो हे पाहून त्याला मदतं करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. यश मिळवायचं असेल तर असे गुण, गुणी माणसं वेचणं आणि टिकवणं फार मह्त्वाचे! अश्यावेळी ज्याच्या जवळ जे आहे त्याचा, त्याच्या गुणांचा वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे महत्वाचे असते. यामध्ये कधी कधी गती कमी असते पण दिशा पुढचीच असते.                                 सामूहिकतेमुळे कितीही बिकट वाट, कठीण घाट असला तरी….मोठ-मोठी व भव्य दिव्य कार्यांची ध्येय पार पाडली जातात.आपल्या इतिहासात पुरातन काळात याची असंख्य उदाहरणे आहेत. अगदी सहजपणे बिकट रणांगणही जिंकता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले स्वराज्य, त्यांना मावळ्यांनी दिलेली साथ. श्रीकृष्णाचा काल्याचा प्रसाद सामूहिकता निर्माण करण्यासाठी तर आयोजित होता. प्रभू श्रीरामचंद्रानी बांधलेला सेतू त्यातील खारीचाही वाटा महत्त्वाचा आहे. याच पद्धतीने क्रियाशीलता वाढवताना, सामूहिकरित्या प्रत्येकाच्या कौशल्यानुसार, क्षमतेनुसार सर्वांना सोबत घेत पुढेेे जावे लागते.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

16 thoughts on “सामुहिकता !….”