सरिता, निश्चल शीतल
रेत उष्मा, स्तब्ध अविचल।
सरिता शैल, संघर्ष हर मील
सरिता मौन, पनघट सिसके
जान ले कौन ?
सरिता जीवन, नीत नये वन
अनुभव से जाने मन मन ।
तिमिरत्यागी, फिर नभ मे
सुखदभोर, पंछी गुंजते
मान ले कौन ?
हरियाली किनारे आये कहांसे
गिले किनारे, पैर धंसे ।
ठान ले कौन?
पांव के निशा मिटाए कौन?
आये किनारे वापस जाये कौन?अर्थ ःः नदी आणि स्त्री जीवन सारखेच…उगमाच्या ठिकाणी नद्या या जास्त हालचाल न करणाऱ्या, छोट्या स्वरूपात असतात. काही नद्या खडकाळ कठीण प्रदेशातून म्हणजे संघर्ष हाच प्रवास सुरूवातीपासून तर काही थंड प्रदेशातून काही काळ गोठलेल्या असल्यामुळे निश्चल असतात. थंड प्रदेश म्हणजे सुखासीन आयुष्य, निष्क्रियता याचा अर्थ त्या थांबलेल्या नसतात. तर ते थांबणे, शांत राहणे, गोठणे अनिवार्यता असते. पर्याय नसतो. कारण नदी म्हणजे पाणी मग पाण्याचे गुणधर्म ती पाळते. ज्या परिस्थितीत, आकारात, स्थितीत राहावे लागते ती राहते. तिच्या किनाऱ्याच्या मर्यादा तिला माहिती असतात. म्हणून तिथेच गोठलेली असते. खरेतर हे गोठणे तिला नको असते. स्वतः चा प्रवास तिला करायचा असतो. ज्याप्रमाणे वाळवंटातील रणरण उन्हाने तापलेली वाळू उष्ण असते तसे तिला तिचे तीर जाणवतात. यामुळे तीरापलीकडे जाता येत नाही. या मर्यादा जाणवायला लागतात. इच्छा असूनही मुक्तपणे वाहता येत नाही. या तीरावरती खडकांना फोडून झालेली, वाहून आलेली वाळू असते तसेच भावभावनांचा अनुभव सोबत असुनही एकटीच असते. एकटी वाटते आणि उगमाचा थंडपणा जास्त वेळ सहन केला की त्याने सुद्धा दाह होत असतो. मग उष्ण काय आणि थंड काय अवस्था एकच होते. म्हणून ती स्तब्ध होते गोठून बसते तरीही विचलित होत नाही. स्वतःचे अस्तित्व संपवत नाही कारण ही तर सुरुवात असते उगम असतो. इथेच थांबले तर पुढचा प्रवास खूप मोठा आहे आणि तिला तो पुर्ण करणे आवश्यक आहे. ती निश्चयी आणि विचलित न होणारी आहे निश्चल आणि शांतपणे निरीक्षण करणारी आहे. पर्वता सारखी दृढनिश्चयी आहे ठराविक अंतरावर, काळाने, प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी संघर्ष आहे. त्या ठिकाणी पर्वताप्रमाणे, खंबीरपणे वादळ पाऊस काय! कोणत्याही ऋतूत दिमाखात वाहत असते. चंचलता अवखळता, स्वच्छंदीपणा, नाजूकपणा असूनही हा पुरुषी स्वभाव अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला असतो. पर्वताचा गुण असणे हा नदीचा मूळ स्वभाव नाही पण तिला तिचा जीवनप्रवास पूर्ण करावयाचा असेल तर हे स्वीकारावे लागेल हे माहिती आहे म्हणून नदी आवश्यकतेनुसार बदल करत जाते. मार्गक्रमण करत जाते पण सगळं मौन धारण करून म्हणून काही ठिकाणी तिचं पात्र खोल शांत आणि गंभीर असतं. तर काही ठिकाणी काचेसारखा स्वच्छ, आवाज नाद करत तर काही ठिकाणी रौद्ररूप धारण करत असतं. जसं तिला काही सांगायचं आहे पण ऐकणार कोण आहे? जे दिसतं तेच खरं रूप समजणारे सगळे तिचा आवाज म्हणजे ती नाहीये मग असं कोण आहे ? जे तिला जाणणार आहे तिला माहिती आहे म्हणून ती पुन्हा स्वआधाराने, निश्चयाने, खोल डोहाच्या रूपाने मौनशांत होते. तिच्या पूर्ण प्रवासात रोज नव्याने, उगमापासून येणाऱे नवीन प्रदेश धुंडाळत असते. प्रवाहाच्या रूपाने काठाला लावत पुढे जात असते. तिचा प्रवास खूप अनुभव समृद्ध होत जात असतो. काय नसतं तिच्या या प्रवासात ? जमिनीवरची निसर्गाची विविधरूपे, खाच-खळगे, किनार्यावर येणाऱ्या व्यक्ती, मंदिरं, जगणारे प्राणी, शेती, पक्षी, निसर्ग अगणित गोष्टी. या सगळ्यांचा अनुभव घेते. त्यामुळे ती प्रत्येकाला आणि प्रत्येक परिस्थितीला ओळखते आतून खऱ्या स्वरूपात. नदी म्हणजे जीवन सर्व भावना जाणते. ती पोहायला येणाऱ्या छोट्या मुलांचे खेळ, प्रियकर प्रेयसीच्या आणाभाका यापासून ते अस्थिविसर्जन पर्यंतचा सगळा प्रवास तिच्या ओळखीचा. उगमाच्या वेळी ज्याप्रमाणे ती स्वतःमध्ये मग्न असते आणि थांबलेली असते परंतु आता मात्र ती आलेल्या अनुभवाने विस्तारलेली असते. कधी कधी त्यासोबत आलेल्या अनुभवाने विचलित ही होत आहे म्हणून बांध घातला की तो फोडून नैसर्गिक ऊर्मीने वाहत जावे असे वाटते. तर त्याच वेळेला अतिक्रमण करणाऱ्या किनाऱ्यावरील लोकांना रौद्ररूप धारण करून निसर्ग नियम दाखवून देते. तिला तिच्या किनाऱ्याच्या मर्यादा हे येणारे अनुभव तोडण्यास भाग पाडतात. नदीची अवस्था आलेल्या अनुभवांमुळे जरी काही काळापुरती विचलित झाली तरी तिने तिचा मूळ गुणधर्म सोडला नाही. धरती आणि नदी समांतर आणि इतक्या सहवासिनी की एकमेकींशिवाय अस्तित्वच नाही. त्यामुळे काही गुणदेखील सारखेच आहेत. क्षमा…. सगळं पोटात घेते आणि पुढच्या प्रवासाला निघते. पण हे एका मर्यादेपेक्षा जास्त झाले आणि यातच कधी अंधार पडला काळोख झाला. समोरच सगळ अंधुक दिसायला लागलं लक्षातच आलं नाही. भयान काळोख… अस्तित्व नष्ट होण्याइतका समोरचा मार्ग दिसत नाही तरी देखील तिचं अविरतपणे अखंडपणे वाहणे सुरूच असतं. तिमिरत्यागी तिची सोबत करणारा… तिच्या प्रवासाचा मार्गदर्शक… जसं नदीचं नातं धरतीशी. तसंच जवळचं सूर्याशी. पक्षांचा आवाज सगळं सकारात्मक, आत्मविश्वास वाढवणारे. पहाटेचं वातावरण पक्षांचा किलबिलाट, किनाऱ्यावरची झाडंवेली, मंदिरं अजून बरच काही जे जे चांगले ते सर्वकांही. तांबूसपिवळा, कोवळा प्रकाश पडू लागला त्या सर्वांवर आणि नदीला पुन्हा एकदा उत्साह आणि प्रेरणा मिळाली. त्यागी सोबत असतो. किती दूर… तिच्यापासून. ती जमिनीवर इतकी घट्ट की तिथून किंचितही हालचाल करू शकत नाही. आणि सूर्य तर एका ठिकाणी स्थिर. तरीही एकमेकांचे कायम सोबती. नदी आणि सूर्याचे रोज दर्शन व्हावे म्हणून ही धरती रोज फिरते न चुकता ठरलेल्या वेळी. सूर्य, सूर्याप्रमाणेच प्रत्येक वेळी वेगळे रूप पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि अगदी रात्री सुद्धा. दिसत नसला तरी सर्व रूपे नदीला माहिती आहेत सूर्याने भर दुपारची आग ओकली तरी पुन्हा सांजवेळ आणि पुन्हा दिनचक्र. या आगीच्या उन्हात तिच्या पाण्याची वाफ होते. इतर वेळी किंचितही मर्यादा न सोडणारं तीचं पाणी…. वर आकाशी झेप घेऊन न शकणार पाणी… या उष्णतेने उत्कटता वाढवते, इतकी की वाफ होऊन ती आकाशात जाते आणि सूर्याला भिडण्याचा प्रयत्न करते. वाफेच्या रूपातलं नदीचं पाणी सूर्याला थंडावा देतं. सूर्याच्या याच थंडावल्याने पुन्हा पाणी होतं म्हणजे मूळरूप स्विकारते. आणि परत पावसाच्या रूपाने पाणी होऊन नदीत वाहते. रिमझिम ,भुरभुर, झडं, मुसळधार…. नदीची आणि सूर्याची भेट होत नाही ! त्यांच्या दिसणार्या रूपाची आकाराची होत नसेल पण भेट होते. परिपूर्ण भेट. पण हे मानणारं कोण आहे ? की सूर्य नदीचा कर्मयोगी आहे तो तिच्या वाहण्याची, मानसिक, आंतरिक प्रेरणा आहे. हे सहज आणि निसर्गचक्राला अनुसरून आहे. पुन्हा उत्साहाने आणि प्रेरणेने नदी सिद्ध होत असते. नदी खूप दाट भावनांनी व्यापलेली आहे. सर्व भावभावनांचा कल्लोळ अर्थस्वरूप आहे. डोळ्यांच्या पापण्या जशा कधी ओलावतात कधी आनंदाश्रू तर कधी संवेदना म्हणून अश्रू दरवेळी ते रडणेचं नसते. त्यामुळे तिचे किनारे ओलेच असतात. मग घनदाट भावनांची, गवतांची हिरवागार थंडावा देणारी…. किनाऱ्यावरची हिरवाई आणि ओली जमीन पाहून पाय फसेल म्हणून कोण येणार आहे ? ही भावनेची हिरवाई आणि अश्रूंचा ओलावा तर तिचा शेवटपर्यन्तचा सोबती आहे. हा काठचं सोबती आहे. पण जर कोणी ठरवलं यायचं तर नक्कीच पाय धसणार, घसरणार , भुलणार कारण तो ओलावा आणि हिरवाईचा तिचं किनाऱ्यावरच सौंदर्य वाढवतात. पाय टाकणार त्याला दुसरा पाय टाकायला भाग पाडत आहे. तो स्वतःलाही रोखू शकणार नाही म्हणून स्वतःला अडवून घेणारा ठाम निश्चय करणारा कोण आहे ?आहे का कोणी ज्याला हे गंभीर, सत्यगोष्टी प्रिय आहे. तो नदीपेक्षा किती समृद्ध असेल. ओल्या मातीत पाय रोवत आहे. ओल्या मातीत पाय टिकणे अवघड असते आणि पावलांचे ठसे कायम असतात. ओली माती वाळली तरीही… कोरडी पडली तरीही… याच असतात पाऊलखुणा… कोणीच मिटवू शकत नाही या खुणा… मग वापस जाणे इतके सोपे आहे काय ! इतक्या आत प्रवेश केल्यानंतर जाणे हे जाणे म्हणता येईल का ? ते कायमचे येणेच असते ! म्हणूनच सुर्य तिच्या वाहण्यात, स्वच्छ पाण्यात… प्रतिबिंबीत होत असतो.. तिने त्याला सहप्रवासी म्हणून सामावून घेतलेले असते…. आणि तोही स्वखुशीने हा प्रवास स्विकारतोच !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
5 thoughts on “संघर्षसरिता….”
Awesome writing skill
सूरजसरिता👌
अप्रतिम !
Khup sundar 👌👌👌👌
स्त्री व सरिता यांची स्वभाव वैशिष्टे अगदीच हळूवार व तितक्याचं ताकदीने कवीने मांडले आहेत. रसग्रहण खूप छान .