सांजवेळी नित्य निळ्या निळाईचे…
क्षणात लोपणे केशरकाल्याचे…
शब्दफुलांचे गंध दरवळती साठवणींचे…
क्षणभराचे अस्तित्व अर्थांचे…
शब्दांचा शोध घेती भावमनीचे…
अर्थ खेळ सारे चालती गुढरेषांचे…
प्रकाशने नीत घडती कवितांचे…
लोप पावणे भासे का चांदण्यांचे…
विखूरणे अंती गोफ चंद्रिकांचे… प्रकाशकण जणू अक्षर काजव्यांचे… आभाळभर तेजक्षण आठवणींचे…
परि अस्तित्व लाभतेे कधी क्षणभंगूरतेचे…
ओजसपहाट लोलक दवबिंदूंचे…
ओघळणे नीरव नयनबिंदूचे…
पहाटधुके अंधुकसे भासे कशाचे…
शब्दधूर, धूळ लोट का कवितांचे…
ओसरेल हे रूप नीतव्यक्ततेचे…
फिरुनी लाभले काव्यास क्षण अंतबिंदूचे…
का भाग्य लाभेल काव्यास क्षण अंत्यबिंदूचे !!अर्थः संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी एक क्षण असा असतो, की क्षणात निळ्या रंगांंच्या विविध छटा केशरी रंगामध्ये मिसळल्या जातात. रंगाच्या अर्थाप्रमाणे वातावरण भासते, शांततेकडे रात्रीची वाटचाल सुरू होते…
खरेतर सांजवेळ पासून ते पहाटे पर्यंतचे आकाश, त्याचे रंग, वातावरण हे सर्वांना वेड लावणारे. मनामधे वर्णन करण्यासाठी शब्दांची गर्दी करणारे. ते सौंदर्य, चंद्र, चांदण्याची काळोखातील चंद्रकळा… यातून तयार झालेली काळ्याकुट्ट ढगांची चंदेरी किनार… शितलता, निरवता, नजर भरून मावणारे आभाळ…. मग या अश्या कितीतरी साठवणीतल्या शब्दांची फुले होऊ लागतात. ती केवळ अक्षरे रहात नाहीत त्याचे विविध अर्थ, आकर्षक, सुंदर वर्णन करण्यासाठी एकत्रित येण्यासाठी धडपड करू लागतात. काहीतरी नवनिर्मितीचे, विविध भावनेचे सुगंध त्यातून येऊ लागतात. म्हणून ती अक्षरफुले, शब्दफुले फक्त शब्दसंग्रह नसतो तर ते त्यांच्या अर्थांचे अस्तित्व असते. लिहिणाऱ्याला, वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला त्याच्या अर्थांंचा दरवळ जाणवत असतो.
योग्य पद्धतीने नेमकी भावना, या भावनेपर्यंत पोहोचण्याची शब्दांची निवड, मांडणी यासाठी शोध सुरू होतो. शोधायची आवश्यकता पडतच नाही. खरेतर हा शोध असतो अनेकात एक कोण ? नेमकेपणा ! कारण हा सगळा खेळ शब्दांचा नसतो तर अर्थांचा असतो. आणि हे सगळे गुढपणे, अखंडपणे मनात सुरू असते. अक्षर, शब्द म्हणजे रेषांना आकार देऊन काढलेली वाक्ये नसतात तर हा गुढखेळ जीवनाचा, निसर्गाचा, कवी मनांचा असतो. ते सगळे मांडण्याचा एक प्रयत्न असतो. या प्रयत्नात सर्वोच्च आनंद असतो. कवितेचे प्रकाशन कधी होते ? ती मनातून कागदावर अवतरली की प्रकाशली जाते. ती क्षणभरासाठी प्रकाशमान होते.भारावून टाकते. कल्पनेतून साकारली आणि शब्दरूपात अवतरली की लिहिणारासाठी तिचा उजेड होत असतो.
पण प्रत्येक नवनिर्मितीच्या बाबतीत असे होत असेल का ?
कधी कागद फाडलेही जात असतील. कधी दिशा बदलावी लागत असेल. कधी जरा आखीव रेखीवपणा येण्यासाठी योग्यता असलेल्या शब्दांनाही नाकारावे लागते. कधी हे सगळ करूनही त्यांना नश्वरतेचे भाग्य लाभलेले असेल तर भस्मही होत असतील.
मग प्रत्यक्षात अश्या कितीतरी नवनिर्मिती समोर येत नसतील ! म्हणूनच तर संध्याकाळ ते पहाटे या सृजनाच्या वेळी प्रत्यक्षात अवतरलेल्या कल्पना लुकलुकणाऱ्या आणि सकाळी लोप पावणाऱ्या चांदण्याप्रमाणे भासतात. एकत्रित गुंफलेला शब्दांच्या गोफ मग तुटतो. तो क्षणात गुंफलेला गोफ, अक्षर अक्षर वेगळे होऊन विखूरतो, तो पुन्हा त्याच पद्धतीने गुंफला जात नसतो. मग ती विखूरलेली अक्षरे नजरेसमोर काजव्याप्रमाणे क्षणभरासाठी चमकतात आणि लुप्त होत जातात. पुर्ण आभाळभर पसरत जातात हे काजवे, या चांदण्या. आभाळाएवढे मनात न मावणारे असं पण आभाळभर अस्तित्व उरतं त्या आठवणींचं…. रात्रभर त्या आठवणी मनात साठत जातात. पण त्यांच्या अस्तित्वाचे भाग्यचं जर क्षणभंगूर आणि नश्वरतेचे लाभलेले असेल तर दुःख करण्यात अर्थ नसतो. क्षणिक परंतु दुर्लभ अश्याही काही गोष्टी असतातच. मग या ओजस्वीपहाटे पानांना हिरेजडित करणाऱ्या दवबिंदूप्रमाणे भासतात. ती अर्थपूर्ण पाने हलताना लोलकाप्रमाणे भासतात. अल्पकाळ परंतु विलोभनीय. सगळे भास, कल्पना इतरांसाठी. पण प्रत्यक्ष कल्पनेला अनुभवसदृश्य केलेले असते या ओळींनी. या ओळींंना नश्वरतेचे भाग्य लाभले म्हणून किंचित भावविभोर होऊन दोन थेंब ओघळले नाहीत तर ! तर ते नयनबिंदू कसले आणि कविमन कसले?…. प्रिय गोष्टींचे अस्तित्व संपत असताना हे होणारच असते. म्हणून प्रयत्न संपत नसतात आणखी तीव्रता वाढवतात. ते वाहणारे अश्रू नवीन कल्पनांना निर्माण करण्याचे सामर्थ्य देत असतात. खरे तर हे दुःखी अश्रू नसतात. अभिव्यक्तीची साथ करणारे क्षण सोबती असतात.
दवबिंदू सोबत पहाटधुके असणारच. संध्याकाळ पासून रात्रीच्या आभाळभर झालेल्या या कल्पनेचा खेळ पहाटे संपत आलेला असतो. हे धुके आहे की ती सगळी धूळ, की धूर ? सगळ अंधूक दिसत असतं. कारण ते धूके, धूळ, धूरामधे लोट असतो तो शब्दांचा , कवितेचाच…
मग हे अस व्यक्त होणं, त्याचाच ध्यास.. यासाठी शब्दांचा ठाव घेण्याचा प्रयत्न कधी ओसरेल का ? ते जर इतके प्रिय आहे. अर्थांंगण आहे स्वतःचे !
का शेवटापर्यंत सरेल ? इतके ते सामर्थ्यवान आहे का ? की नश्वरतेच्या, क्षणभंगुरतेच्या भाग्यातच सरून जाईल, संपून जाईल… या अश्या अपूर्ण, अपूर्व कल्पनांना , शेवटाचा, प्रत्यक्षात अवतरण्याचा दुर्लभबिंदू होण्याचे भाग्य लाभेल का ? की त्याचा शेवट करण्याचे, होण्याचे भाग्य आहे. नेमका कोणता अंत्यबिंदू आहे… हे कोणीही ठरवू शकत नाही.अगदी त्यांना लिहिणारासुद्धा. जी प्रत्यक्षात साकारली जाते त्या कवितेचे भाग्य…..तिचेच गीत मुक्ततेचे….उरलेल्या कल्पनांना भाग्य नश्वरतेचे…दवबिंदूचे !….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
14 thoughts on “ओजसबिंदू….”
खूप छान
कविता अतिशय सुंदर शब्दांनी सजली आहे जणू काही
शब्द शब्द ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन,,,,
अतिशय आशयगर्भ कविता उच्च दर्जाची शब्दरचना कोळीन ओळींमध्ये सुरेख शब्द पेरणी शेवटच्या दोन ओळी तर क्या बात है अप्रतिम कविता
कवी मनाचे अतिशय सुंदर विश्लेषण
व्वा ! क्या बात है …👌👌💐 सुंदर
निसर्ग आणि भावनांची कवीदृष्टी ….लेखनशैली… , वेगळेपण आणि आणि कठोर हृदयाला सुद्धा हात घालणारे…👌👌👌
कवितेचे रसग्रहण आवडले!
Khupach chan
खूप छान
khup sunder Kavita👌👌👌👍👍👍
खूप छान!सोनवणे
हळूच या हो हळूच या
गोड सकाळी ऊन पडे
दवबिंदूची पडती सडे
हिरव्या पानातून वरती
येऊनी फुललो या जगती
परि गंधाच्या मधे राशी……
अशी बालकवींची कविता आठवली.
खूप छान केलय लेखन
जागतिक कविता दिनी कविता निर्मिती मागची प्रेरणा आणि निसर्गाच्या विविध छटांचे अगदी नेमक्या शब्दात वर्णन केले आहे
खूपच छान👌👌
हा लेख वाचताना हरवून गेले खुप च छान