बसंत बहार….

नववर्षाच्या खूप खूप आधी मनःपूर्वक शुभेच्छा ! …. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी आपली संस्कृती , सर्वांना आपलसं करून घेणारी परंपरा….अभिनंदनीय आहे परंतू तेच आपलं समजण्याचा , मानण्याचा नकळत गैरसमज होऊ शकतो. ….                                                     

काय काय शिकवलं या कठीण काळाने ? हरवलेलं शोधावं लागतं ! तरच ते सापडतं ! काय हरवलं होतं आपलं ? आणि आणखीनही आहे ते हरवू नये म्हणून शोधण्याचा छोटासा प्रयत्न ! सर्वांनी घरीच राहून घरासाठी आणि घरातून बाहेरचे कामं देखील केली. काही हातांना दिवस-रात्र कष्ट, काही हातांना आराम. या आरामाचे नव्याचे नऊ दिवस सरले आणि हळूहळू गांभीर्य कळू लागले. घरात राहून नेहमी टिकेचे धनी असलेले टीव्ही, मोबाईल वगैरे आता अभ्यास , नातेवाईकांना काळजीचे दोन शब्द , मनोरंजन वगैरे यासारख्या अनेक आवश्यक गोष्टींसाठी आधार ठरले. कधी कधी एखाद्याला टीका सहन करावी लागते योग्य वेळ आली की मग महत्त्व समजते….अशीच वेळ निसर्गाने मानवाला जाणीवा होण्यासाठी आणली. निसर्गाने सगळं चक्र फिरवलं आणि जीवनाचे महत्व समजावलं. स्वतःच स्वतःला निसर्गाने प्रदूषण मुक्त करत करत निरभ्र आकाशासोबतच मानवी मने स्वच्छ केली. पक्षी, प्राणी मुक्त फिरू लागले. माणसाला घरात अडकवलं. या घरालाच पिंजरा मानणाऱ्यांना….अशा कितीतरी भ्रम , जाणिवांना बदलून टाकले. आपल्याच माणसाच्या अंतिम मुखदर्शनाला….निरोपाला माणूस मुकला. तर काही जणांनी परक्यांना आपलं मानून मुखी घास भरवला. आईचं कष्ट सगळ्यांनी पाहिलं आणि बाबांची अगतिकता ही अनुभवली. आजी-आजोबा , छोटी मुलं केविलवाणी आणि त्रस्त, दुरवर असलेले नातेवाईक घरी सुरक्षित कसे पोहोचतील यात व्यस्त… एकमेकांना कधी भेटता येईल या आठवणीत…

खूप काही चांगल्या गोष्टींची सुरूवात करून गेला हा काळ. सगळ  बंद बंद !…. सगळी ताळेबंदीच झाली होती जीवनाची…. काही काळापुरतं का होईना सगळेच विखुरलेले होते पण जसजसा काळ व वेळ पुढे सरकत होता….  सगळं मागे सारून आतून-बाहेरून निखरले आहेत, यातून सावरले आहेत. हॉटेलातलं खाणं कमी झालं, स्वच्छतेचे नव्याने भान आलं आणि अर्धी दुखणी इथेच कमी झाली. खरेदी, फिरणे, वस्तूंचा संग्रह, हव्यास याशिवाय जगता येतं याची जाणीव झाली. मोठमोठ्या कार्यक्रमांना टाळून मोजक्या खर्चातही आनंदोत्सव साजरा करता येतो हे समजून घेतलं. स्वतःतील कौशल्य शोधण्यात सगळी घरे गुंग झाली. मला स्वतः साठीच वेळ नसतो ! अस सांगणारी माणसं वेळ कसा घालवावा ? या प्रश्नांकडून….अनेक नवीन गोष्टी शिकण्याच्या उत्तरापर्यंत पोहोचली आहेत. सुट्टी मिळाली म्हणून आनंदणारी मुलं घरातून कधी सुटका होणार म्हणून वाट पाहू लागली. घरातल्यासोबत सहवास, गप्पा आणि जीवन कौशल्यांचा विकास करून घेऊ लागली आहेत.

सर्वांनाच जीवन मुल्यांचे नव्याने भान आले….
साध्यासुध्या, छोट्या छोट्या गोष्टीत पण समाधान मानू लागली….. पारंपारिक पद्धतीने  शाळेतून गिरवलेे जाणारे अभ्यासाचे, धडे मूल्यशिक्षणाचे पाठ किती महत्त्वाचे आहेत हेेे ऑनलाइन पद्धतीनेच सिद्ध करून दाखवले… काही पारंपारिक गोष्टींना पर्याय नसतो त्या पद्धती अधोरेखित पणे जपल्या पाहिजेत हे मात्र प्रत्येकाला पटले.

“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?” हे मात्र  सर्वजण शिकले. नवीन वर्षात वसंत ऋतूत बहार येतो त्याप्रमाणे सगळं कसं पुन्हा भरून येईल आणि येत आहे हा आपल्या जीवनसंस्कृतीचा विश्वास ! सार्थ आहे. सगळ्या जगात महामारीने मृत्यूचे थैमान घातलं आणि इथे मात्र हे वादळ का मागे सरले असेल ? या भूमीवर, या वातावरणात या माणसांमध्ये, या आचार-विचारांचा पद्धतीमध्ये असं काय गुपित आहे की ज्यामुळे त्याला मागे सरावंं लागलं असेल ? आपली हात जोडून नमस्काराची पद्धत सुद्धा किती विचार पूर्वक…सुरक्षित अंतर ठेवणारी ! आहार विहारांच्या सवयी मुळे आलेली रोगप्रतिकारकशक्ती. ईश्‍वराने बहाल केलेले नैसर्गिक वातावरण, लहानपणापासून मोकळं ऊन, हवा, मातीशी असलेली नाळ या सर्वांमुळे आलेला कणखरपणा…. ऋतूनुसार दिनचर्या, ईश्वरावर श्रद्धा, विश्वास यामुळे एकमेकांना दिलेला आत्मविश्वास “काही होत नाही”. “काळजी घ्या पण काळजी करू नका” सांगणारे, मदत करणारे…. सर्वचजण मानसिक बळ देत होते.

केवळ अनुकरण म्हणून दिनविशेष साजरे करण्यापेक्षा हे आपलं ऋतूंचे बहरणे, निसर्गाने दिलेेेला संदेश आपणच जपायला हवा. आकर्षक , नवीन, वेगळे काहीतरी स्वीकारता स्वीकारता , काय फरक पडतो ? म्हणून  तेच तर जपले जात नाही ना ! आणि साजरा केलं तर काय हरकत आहे? जाऊद््या म्हणून गृहीत धरता धरता आपलंमात्र विसरले जात नाही ना ! सृष्टीचा वसंत जेव्हा बहरतो तेव्हा सगळ्यांच्या स्वागताला सर्वांगाने, सर्वार्थाने बहरून निसर्ग सज्ज असतो. मुक्तपणे उत्साहाची उधळण करतो. निसर्ग आतासारखा थंडीत गोठून बसत नाही. अंतर्बाह्य बहरण्याचा सकारात्मक संदेश  देत असतो.

 गुढीपाडव्यापासून विविध रंगांची वर्षभर उधळण करणारे रंगपंचमी पर्यंतचे उत्सवच तर प्रेरणा, आनंद , उत्साह देतात. कोणतीही गोष्ट अशी एक दिवसाची न करता पूर्ण वर्ष अशा जीवनदायी संदेशातून समर्थ संस्कृतीचे दर्शन घडवतात. किती विचार करून पुर्वजांनी या परंपरा निर्माण केल्या असतील ? ज्या आजही कोणत्याही नैसर्गिक संकटातून, कोणत्याही नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सक्षम तर आहेतच शिवाय आरोग्य, सामाजिकदृष्ट्या आणि वैयक्तिक सुद्धा आनंदद्विगुणीत करणाऱ्या आहेत….एक वेळ
नवनिर्मितीची क्षमता नसली तरी चालेल पण… निर्माणक्षम परंपरा जपण्याची क्षमता आपल्यामधे आणण्याचा, जपण्याचा मिळून प्रयत्न करूयात…
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वसंत बहरला की नक्कीच देऊया!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

14 thoughts on “बसंत बहार….”