मैत्री आहे तशीच असते…


आयोजन, योजनेशिवाय, नकळत होते ती मैत्री !…..
मैत्री होणे, असणे आणि टिकणे कधी घडते? मित्र-मैत्रिणींना काय वाटते माझ्याबद्दल? असा प्रश्न कधीच मनात येत नाही ती मैत्री! स्वतःला प्रामाणिकपणे काय वाटतं? काय अनुभव येतो..तितकीच आणि तेवढीच मैत्री असते! मैत्री कधीच बदलत नाही, ती आहे तशीच असते! जी बदलते, ती मैत्री नसतेच कधी! मनमोकळेपणाने स्वतःला व्यक्त केल्यानंतर आपली चूक आहे हे नजरेतून सांगणारी आणि समजणारी मैत्री. कितीही भांडण झाले, एकमेकांचा राग आला तरी काही क्षणात बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, बिनकामाचे काहीतरी सांगण्यासाठी…. मन अधीर होणे, कितीही गप्पा मारल्या तरी…अजून बोलायचच राहिलय वाटणे… म्हणजे मैत्री. एखादी गोष्ट आवडली की, तिलाच घ्यावी असे वाटणे म्हणजे सुद्धा मैत्री….मैत्री टिकवण्यासाठी फार औपचारिकता बाळगण्याची आवश्यकता नसते पण तरीही असे विचार येतातच…मिळून कुठेतरी जाऊ…निवांत गप्पा करू…एक कप चहा आणि एक कप कॉफी मग अगाध, अनावश्यक चर्चा, चर्चेतून वादविवाद…कोणताच निर्णय नाही… मग कॉफी सोबतच माफी…अर्धवट वाक्याला..पुर्णविराम. तुला काय करायचय? आणि मला काय करायचय? अस म्हणायच, पण तिच्यासाठी काय काय करता येईल ह्याच प्रत्यक्षात नियोजन करायचे….आणि आश्चर्याचा धक्का द्यायचा…काय समजायचय ते समज! मैत्रीही मग काय समजायचय ते समजून गप्पच…अशी महान मैत्री अनुभवायला अगोदरच्या जन्मी बहुतेक पुण्य करावे लागते… न सांगता,न विचारता…बरोबर ओळखून कृती करणारी मैत्री जिगरीच असते…ही दोस्तीच… फक्त आपली हस्ती ओळखून असते….कारण इथ काही जिंकणं,हारणं ध्येय, साध्य, ध्यास नसतो.. तर भाव असतो. बडबड.. बकवास! कधी कधी फक्त डोळ्यातलं पाणी बाहेर न येता…विरून जावं म्हणून….
विचार, मतं, आवडनिवड भिन्न असली तरी आपल्या समाधानासाठी कौतुक चाललंय सगळं! हे लक्षात आले तरी तितक्याच आवडीने दोन कप चहा जास्त घेणारी मैत्री. एकमेकांचा स्वाभिमान जपणारी मैत्री. मुळात मैत्रीत कधी कशाचीच स्पर्धा नसते. किती हुशार, कोणतं पद, किती श्रीमंती, कसली अपेक्षा, कशाची मदत वगैरे वगैरे असं काही असत नाही. मग मैत्री कशासाठी आणि काय आवश्यकता मैत्रीची, मित्रमैत्रिणींची ? सकारात्मक ऊर्जा असते ज्या ठिकाणी व्यवहारी जगाचा लवलेश नसतो. निखळ, निर्लेप नातं असतं एकमेकांना चिडवून, विनोद करणे, रागात आणने असतं…. पण उणेदुणे काढणं हा हेतू नसतो तर कोषाच्या बाहेर काढणं असतं. जीवनात स्वतःवर विनोद करून, मनमुराद हसून हसवणारी, डोळ्यात पाणी आणणारी मैत्री असते. हे क्षण टिपायला आणि अनुभव द्यायला आपणही तयार असलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे… यानेच मैत्री घट्ट होत जाते. हे रागावणे, चिडणे, कान उघडणी करणे, सल्ले, चुका सांगणे या मागे “शब्दांच्या पलीकडले” अर्थ असतात. हे अर्थच मदत करत असतात व्यक्तिमत्त्वाला सर्वांगीण करण्यासाठी, आपली बलस्थानं उभी करण्यासाठी, उणिवा दूर करून आत्मविश्वास देण्यासाठी. खरे तर परिपूर्ण कोणीच नसतो मैत्रीही आपल्याला परिपूर्ण करेल असेही नाही, पण या अपुर्णतेतही आनंद असतो, मजा असते…जीवनात आनंद निर्माण होतो… परंतु त्यामागे जो भाव असतो ना! तो महत्त्वाचा, तो जगात कोणत्याही नात्यात मिळू शकत नाही… प्रामाणिक प्रयत्न असतात, एकमेकांना समजून घेण्याचे, कुठल्याही बंधनाशिवाय, अपेक्षे शिवाय, मानसिक आधार असतो! तू करू शकतोस! तू करू शकतेस! असा आत्मविश्वास देते ती मैत्री. असे मैत्रीधन मिळणं परमभाग्य असतं.अशा मैत्रीला टिकवणं आपलं परमकर्तव्य असतं. यासाठी कोणताही त्याग, कष्ट, विचारस्विकृती करण्याची आपली तयारी असावी. हे सांगण्याची आवश्यकता पडतच नाही ते नकळत घडत जाते आणि मग निर्माण होते खरी मैत्री. न सांगता, न बोलता परिस्थितीला समजून घेणारी मैत्री. वस्तू, औपचारिक भेट याचा हिशोब ठेवत नाही मैत्री! याचाच काय कोणताच हिशोब मैत्रीत असत नाही. माझ्याबद्दल कोणी कितीही सांगितले तरी माझा मित्र/मैत्रीण अशी नाहीच!! असे ठसक्यात सांगता आले की झालंच! हा विश्वास म्हणजे मैत्री आणि दुसरा हा विश्वास सार्थ करतो म्हणून तर मैत्री टिकते आणि मैत्रीत सार्थता येते. कशाची आवश्यकताच राहत नाही. विश्वासावर अवलंबलेली, पुस्तकातल्या पानासारखी एकत्रित बांधलेली, एकानंतर एक अर्थपूर्ण सुसूत्रता असलेली मैत्री. इथेच तर आपण आपल्या मनातलं अगदी कशाचाही विचार न करता, न ठरवता, अखंड बोलत असतो. बोलताना गृहीत धरतो मित्र/मैत्रीण ऐकतच आहे बिचारे.आपल्याला माहीत असतं इथे मूल्यमापन नाही तर समजून घेतले जाणार आहे. कधीकधी दादागिरी,जबरदस्ती,हट्टीपणा असतो. मैत्रीत आपणही स्वाधीन होतो जाऊ दे! होऊ दे तुझ्याच मनासारखं! तू म्हणशील तसंच! तरीही आनंदच असतो…कारण मी तू असा विचार गळून पडलेला असतो.. तुझ ते माझं पण माझं ते तुझचं ही विचारप्रक्रिया स्विकारलेली असते.. जे सांगशील ते खोट नसणार! हे माहिती असतं. चूकांची प्रांजळ कबुलीही देतो याचा अपमानही वाटत नाही! मैत्रीतील हक्क तर आपल्याला ‘जन्मसिद्ध हक्क आहे’ वाटतो! फिरकी सुद्धा तितकीच अचानक गिरकी घेते….हे खरेच समजून भांडणाचा शेवट काहीतरी कबुली दिल्याशिवाय होत नाही. केवळ स्वतःला चांगले समजून फक्त प्रतिमांचा विचार करत करत…दोषांकडे दुर्लक्ष करून होणारी चूकीची दिशा बदलण्याचे काम करते ती मैत्री…जिथे दोष, चुका, दुर्गुण, अज्ञान, अपमान,फजिती मान्य करतांना अभिमान, स्वाभिमान सारख्या संकल्पना मनाला स्पर्श न करता…अलगदपणे आपल्या पासून हे दुर्गुण दूर केले जातात तीच खरी मैत्री….दोन अर्धवट, अपूर्ण, अर्ध गोल एकत्र येऊन शून्याचा गोल न होता… अर्थपूर्ण वर्तुळ बनत जाते. या अर्थपूर्ण वर्तुळाचा परीघ…वाढत वाढवत जातो तीच खरी मैत्री…हा परीघ वाढवताना आपले प्रयत्न कामी येतात. मैत्री सगळ्यांशीच होत नाही…कारण ती नकळत, आपोआप होते यासाठी वयाचं, परिस्थितीच कशाचंही नियंत्रण नसते…. इथे कोणताही भेद रहात नाही… आणि मैत्री कोणत्याही बंधनात ठेवतही नाही! बंधमुक्त असुनही जीवनाच्या बंधनात ठेवणारी…. स्वतः दुःखात असलं तरी मैत्रीला आनंदी ठेवणारी….निराधार असूनही भक्कम सहकार्य, आधार देण्याचा प्रयत्न करणारी…..केवळ शब्दांमधून, अर्थांमधून खंबीर बनवणारी… आयुष्याला मैत्रीचा अर्थ सांगणारी मैत्री अर्थपूर्ण मैत्री अनुभवली आहे… हा अनुभव घेण्यासाठी आंतर एक झाले की, अंतराची मर्यादा आडवी येत नाही…अशी ही मैत्री माझी प्रेरणा आहे, मला समजून घेणारी आहे, माझे दोष बिनधास्त सांगणारी आहे, मीच का आधी बोलू? असा विचार करणारी नाही! माझ्या आवाजावरून, नजरेतून माझं मन ओळखणारी मैत्री….काहीही झाले तरी, मी आहे! हा मानसिक आधार…. या आधारांवर..अनुभवांवर…माझ्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मैत्रिणी…
अश्या सुवर्णक्षणांची मालिका माझ्या आयुष्यात नित्य अनुभवण्यासाठी आली ती आपल्यामुळेच….माझ्या सर्व मैत्रीणींची,सखींची, खूप खूप आभारी आहे…..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

28 thoughts on “मैत्री आहे तशीच असते…”