लाख मोलाची गोष्ट

आई-वडिलांची….सात पिढ्यांचा उद्धार करणारी एकुलती एक लाडाची लेक, त्यांच बावन्नकशी सोनं! हा ‘बी’…. घडवलेला दागिना आणि फक्त मुलगा म्हणून लहानपणापासूनच, दीड शहाणा लाडोबा असलेल्या दोघांचे दोनाचे चार हात केले की बहुतेक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात की काय?असा एक उगीचच झालेला समजं! एक दीड शहाणा आणि एक दुप्पट शहाणी असा साडेतीन शहाणपणा एकत्र आला की चारी मुंड्या चितची लढाई सुरू! पाककलेचे विविध प्रयोग नव्याचे नऊ दिवस होऊन राहतात. नंतर रागातले, तावातावाने बनवलेले लाडू बत्तीशी कधी पाडतील सांगता येत नाही. दोघांनाही माहिती असतं एका हाताने टाळी वाजत नाही पण गद्धेपंचविशीतच शहाणपण कसे येईल? एकमेकांच्या नातेवाईकांकडे समारंभाला जाणं म्हणजे हात दाखवून अवलक्षणचं. ती तयारी, तो सोपस्कार निमंत्रणापासून ते वापस येईपर्यंत ….रात्र थोडी सोंगे फार… एकही प्रसंग बेरीज, वजाबाकी केल्याशिवाय जात नाही. पुन्हा स्पर्धाच असते एकमेकांचे अठराविश्व दारिद्र्य दाखवायची…लंकेची पार्वती कशी आहे? हे पटवून देण्याची. तरीही सतरा वेळा सांगून न समजणंका काय असतं तेच होतं. एकाची अवस्था ठरलेलीच…. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. अशावेळी सगळे नाही पण अत्यंत हितचिंतक असलेले बोटावर मोजून ठेवलेले, अंकीत सगेसोयरे षटकर्णी नाही झाले तरच नवल! असे हितचिंतक संसारातील अश्या प्रसंगाचा आलेख चढता ठेवतात बरं!
आणि यांच्या प्रगाढ चर्चांमधून त्यांच्या अगाध संसाराचा उद्धार असा करतात की, जस काही त्यांचा संसार म्हणजे लाख मोलाची गोष्ट आहे.. खरेतर ती झाकली मूठ सव्वा लाखाची असते. जमा झालेली ही साडेसातीचिंतनिका अष्टौप्रहर जागरण करून करून सांगते काय काय शहाणपणा असावा लागतो ते! अशावेळी हे ऐकून घेणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच! पण का कोण जाणे आपल्याला मात्र उगीचच साठी बुद्धी नाठी होणारच हे या चौकड्यांकडे पाहून पटल्याशिवाय रहात नाही…हसून हसून पुरेवाट झाली की कपातलं वादळ एक कप चहा अर्धा अर्धा आणखी घेतला की शमणारचं असतं…पण तरीही मजा घ्यायची असेल,फारच अळणी वगैरे वगैरे वाटतं असेल तर अशी मसालेदार फोडणी द्यावी. एखाद्या समारंभात प्रयोग करायला काय हरकत आहे.. संसारात कसं प्रयोगशील असावं! फक्त हा ठरवून केलेला प्रयोग आहे हे शेवटपर्यंत ध्यानात ठेवावं नाहीतर !
शांततेसाठी कदाचित एकजणाला खरेदीसाठी नोटा मोजण्याची आणि एकाला उलट अंक मोजायची वेळ येऊ शकते…
स्वतः सहीत ते सोन कसं तावूनसुलाखून निघालं… याच वर्णन उपस्थित असलेल्या चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे…अशी उदाहरणे..ऐकून बिचारा लाडोबा मात्र नेहमीच ताडोबांच्या निशाण्यावर….असणार हे ठरलेलं…
इथ कोण बरोबर कोण चूक वगैरे प्रश्न नसतोच!
मग फक्त चार डोळ्यांची एकच नजर झाली की समजतं… बाकी शुन्य… भागाकार करून आपण मोकळे झालो आहोत म्हणून…
पण शाब्दिक गणिताचा गुणाकारच करा आता…म्हणून
डोळ्यासमोर साक्षात चित्र उभे केल्याशिवाय आपल्या आजूबाजूच्या हितचिंतकांच्या दाही दिशा काही केल्या मोकळ्या होत नाहीत. अश्यावेळी कायम लक्षात ठेवावे चूकीचं शाब्दिकगणित ऐकून सोडवायचा प्रयत्न केला की बाकी चुकचं रहाणार. विनाकारण छत्तीसचा आकडा मध्ये येतो. छत्तीसचे त्रेसष्ट व्हायचं गणित खरेतर मनात सुटलेलेच असते. छत्तीसचा आकडा उत्तर समजून अबोला धरुन बसतो न बसतो तोच दोघांपैकी एकजण चारीमुंड्या कसे चीतं केले म्हणून खुशीत असतो आणि एक जण कोणतीही वस्तू उगीचच आपल्या दिशेने येऊ नये म्हणून सर सलामत तो पगडी पचास म्हणत म्हणत साळसूदपणे सातासमुद्रापलिकडे गेल्याप्रमाणे दृष्टीस न पडू देता मित्र-मैत्रिणी नावाच्या शिडाच्या जहाजात बसून निघून जाणे स्विकारतो. या जहाजात बसलं की मग मात्र स्पर्धा बेचाळीस पिढीचा उद्धाराची. अश्या पिढ्यांचा उद्धार वाढत आहे लक्षात आले की काहीजण सातव्या पिढीपासून वापस येतात. खरेतर प्रत्येक जण घरी गेल्यास शंभरी भरण्याच्या भीतीने ग्रस्त असतोच मनातून. वरून खोटं खोटं आपण कसे शेरास सव्वाशेर आहोत हे दाखवत असतात. आपल्या आपल्या घड्याळी शुभअंकाची कोणती मर्यादा आहे हे पाहून गृहप्रवेश केला जातो. सहसा शुभांक रात्री नऊच्या आतच कसा असतो हे समजत नाही? काही गोष्टी समजण्यासाठी, उत्तर मिळेपर्यंत समीकरणाप्रमाणे xyz गृहीत धरायच्या असतात.समजा समजलंच नाहीतर शेवटी हितचिंतकांनाच पाचामुखी परमेश्वर मानावे, मनोभावे त्यांना नमस्कार करावा….आणि दोन पावलं मागे जावे म्हणजे चारपावलांना घेऊन पुढे जाता येते…
तेरड्याचा रंग तीन दिवस आणि पळसाला पाने तीनच असतात हे हळूहळू तीनअंकी उत्तराकडे आपण जातो तसतसे स्वतःला म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान समजून येऊन सगळं कसं चक्रव्याढ व्याजाप्रमाणे वाढलय लक्षात येत आणि दर साल दर शेकडा नफा वाढत असतो लक्षात येते.कारण लक्षात आलेले असतचं सब घोडे बाराटक्केच… असंच xyz प्रमाणे समीकरण गृहीत धरून समजत, समजून घेत घेत सोडवत…एकमेकांच्या शुन्याच्या पाठीमागे अंक जोडत…किंमत वाढवत.. लाखमोलाची गोष्ट अनमोल होत असते….. करायची असते….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 thoughts on “लाख मोलाची गोष्ट”