श्यामची आई….

श्यामची आई’ वाचली, समजून घेतली की किती सहज दैनंदिन काम, दिनचर्या, संसारात आलेल्या अडचणीतून, परिस्थितीतून श्यामला घडवत होती हे लक्षात येतं. ‘आईचा शाम ते श्यामची आई’ प्रवासच सांगतो की ही आंतरक्रिया किती परस्परपूरक होती. यासाठी आईच्या, यशोदेच्या नजरेतून श्याम पाहिला पाहिजे. थोर व्यक्तिमत्वसुद्धा सुरुवातीला अजाण बालक असते. त्यांचे हे बालपण समृद्ध होत असते ते आई-वडिलांमुळे. त्यांच्या आचरणाच्या निरीक्षणातून अनुकरणातून थोर व्यक्तिमत्त्वाला आकार येत असतो. श्यामसुद्धा इतर बालकांप्रमाणेच वर्तन करायचा. वडाला प्रदक्षिणा घालताना “आई ! मला लाज वाटते”, म्हणायचा. पोहायला शिकत असताना घाबरायचा, लपून बसायचा, पळून जायचा मग आईचा कधी कधी मारही खायचा. परत आईचा राग, मार विसरला की आईला घट्ट मिठी मारायचा. आईचा राग ओसरला नाही हे पाहून मग लाडीगोडी लावायचा. स्नान केले की पायाची घाण पदरानेच पूस!, कडेवरच घरात घेऊन चल! म्हणून हट्ट करायचा. अधाशी, अधीरपणाने गुलबक्षीच्या सगळ्या मुक्या कळ्या तोडून आणायचा. दुसऱ्यांसाठी एकही कळी  ठेवायचा नाही. यशोदा श्यामच्या हट्टाला -आज्ञाधारकपणा, अधीरपणाला- संयम, अधाशीपणाला- त्याग, लपून बसण्याऐवजी धीटपणा, भितीला- आत्मविश्वास, संकटाला घाबरून पळून जाण्यापेक्षा समर्थपणे प्रतिकार, हे सगळं शिकवायची. तिचा श्याम कसा शिकतो आहे याचे कौतुक तिच्या नजरेत दिसायचे. या गोष्टी शिकण्यासाठी यशोदाताई प्रेरणा, योग्य वळण देत होती आणि श्याम प्रतिसाद देतो याचा तिला अभिमान देखील वाटत असे. याच अनुभवातून श्याम जीवनशिक्षण घेत होता. मोरी नावाची गाय पायलाग रोग होऊन कायमची सोडून गेली. तेव्हा यशोदेला अन्नाचा घास जात नव्हता. शाम जमेल तसं सांत्वन करायचा   “आई ! तू जेवली तरच आम्ही जेवणार”. कधी काही वाईट प्रसंग घडला की घरात शांतपणे काम करणाऱ्या आईचं निरीक्षण करायचा. आईची सहनशिलता, जबाबदारी ओळखून मदत करायचा. झेपेल तेवढा चिमूटभर आधार द्यायचा आणि भार कमी करायचा. लेकराच्या या चिमूटभर धीराने आईचं मन मात्र ढीगभर भरून यायचं. यशोदा हिवतापाने आजारी होत्या “आई ! पाय चेपून देऊ का?” विचारल्यावर अपूर्ण राहिलेले व्रत श्यामला पूर्ण करायला लावलं. हाती घेतलेले व्रत एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण करायचं असतं हा धडा इथेच गिरवला श्यामने.गरिबीमुळे नातेवाईकांकडे रहात असताना,

“दुसऱ्याच्या घरी मिंधेपणाने राहण्यापेक्षा स्वतंत्र झोपडीत राहू”. असं आई श्यामसमोर वडीलांना रागारागात म्हणाली पण या रागानेच श्यामला स्वाभिमान, स्वातंत्र्य हाच खरा मौल्यवान दागिना आहे हे समजले. गरिबी आली म्हणून सारवलेल्या घरात राहत असताना “आई! हे बघ आपले घर पाहण्यासाठी आकाशातला चंद्र, चांदण्या आले आहेत”. हे ऐकून आई श्यामकडे आश्चर्याने पहात होती. श्यामची नजर शामला सकारात्मक दृष्टी देत होती. श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणत टाळ, रिकामे डबे वाजवून, नाचून भजनासोबत गोंधळ करणारा श्याम, या त्याच्या आवाजात, भजनात बालभक्ती नाद असतो हे आईच ओळखू शकते. म्हणून तो गोंधळ तिच्या श्यामच्या ह्रदयात भक्तिबीजाची पेरणी करत होता हे ती ओळखून होती. रामरक्षा लिहिण्यासाठी मित्राला वारंवार मागणी करूनही न मिळालेले पुस्तक , आपल्याकडे पुस्तक नाही म्हणून अख्खं पुस्तक लिहिणारा  श्याम . जे नाही ते स्वकष्टाने मिळवावे आणि स्वावलंबी व्हावे शिकला. ज्ञान मिळवण्यासाठी ते दुसऱ्याकडे मागितले तर तो कमीपणा नसतो हे शिकला. साने गुरुजींच्या लेखनाची बैठक इथेच तयार झाली असेल. पुण्याला मामाकडे इंग्रजी शिकण्यासाठी राहत असताना मामांनी तक्रार केली की आईला वाटायचे माझा श्याम खोड्या करतो, चहाड्या करतो का ? शेवटी करामतींचा त्रास होऊन आई घरी घेऊन आली. आईचा शाम आज्ञाधारक होता. आईला कधी कधी पाणी भरणे, अंगणातली झाडलोट करणे, धुणे धुण्यास मदत करणे यासारखी मदत करायचा. तिला हलके वाटायचे. ती तिचा मायेचा हात गालावरून फिरवायची, बोटं मोडायची दोघांनाही खूप आनंदी आनंदी वाटायचं. जात्यावर दळत असताना श्यामचा हात आधी ठेवायची आणि मग वरुन आपला हात ठेवायची. श्यामच्या मनाला, विचारांना, हातांना गती यायची. हात दुखला तरी श्याम म्हणायचा “आई ! नाही गंं दुखत माझा हात”. हे आईच्या पण लक्षात यायचं. ओव्यांमध्ये ‘श्याम बाळ’ नाव गुंफायची. मुलगा असून सुद्धा दळतोय म्हणून शेजारच्या काकू हसल्या तरी कोणतंही काम करत असताना लाजायचं नाही हे शिकला होता. आईचं मन पदराने दृष्ट काढायचं. पाऊस पडावा म्हणून महादेवाच्या मंदिरात शंकराला कोंडायचे होते तेेव्हा , ” मला नाही उचलणार ते मोठे मोठे हंडे आणि घागरी, मी नाही बाबा जाणार”. म्हणणार्‍या शाम आईला आता रोज पाणी भरू लागत होता. आईचा मन किती भरून येत असेल? शामने काकांच्या खिशातली नोट घेतल्यावर “नाही हो ! श्याम नाही घेणार आणि चूक केली तर कबूल करतो तो, कधी कुणाच्या वस्तूला हात लावत नाही”. आईचा केवढा विश्वास ! श्यामवर आधी घेणारच नाही आणि घेतले तर कबूल करेन ! हे ऐकून श्यामच्या जीवाची कालवाकालव आईच्या नजरेतून सुटली नाही. आईचा विश्वासघात मी का करू? “आईला माझ्यावर किती विश्वास आहे”. या विश्वासामुळेच तर बालकांना चूक कबूल करावीशी वाटते, माफी मागावी वाटते. छोट्या भावाला आणलेल्या कोटामुळे आईला पाहायला मिळाले श्यामचे बंधुप्रेम वयाच्या मोठेपणापेक्षा तिचं लेकरू मनाचा मोठेपणा शिकलं होतं. आई म्हणेल तो शब्द श्यामसाठी अंतिम होता. सर्वांचे सानेगुरुजी…. आईचा मात्र श्यामबाळ, लेकरू, निरागस, घाबरणारा, अल्लड, हट्टी, खेळकर आईचा श्याम आहे आणि साने गुरुजींना घडवणारी आपल्या नजरेतली श्यामची आई त्यांच्या पेक्षा काकणभर सरस आहे.म्हणून श्यामची आई घडायला, घडवायला हवी….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 thoughts on “श्यामची आई….”