लोकदेव….


“काळा पाषाण पण मंदिरासाठी घडवला आणि घाव सोसले की त्यात प्राण”. जुन्या मंदिरातील गाभाऱ्यात अद्भुत शक्ती असते. महाराष्ट्रात अश्या विविध शक्तींची मंदिरे खेड्यापाड्यात, छोट्या गावांमध्ये पुरातन काळापासून आहेत. यापैकी एक, महाराष्ट्राची लोकधारा जपणारे हे मंदिर, श्रद्धास्थान म्हणजे  खंडोबाची जेजुरी आहे. लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव म्हणून लोकदेव असेही म्हणतात.                                                                      सोमवती अमावस्याच्या दिवशी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या खास दिवशी दर्शनाचा योग अचानक आला म्हणून आनंद झाला पण गर्दी पाहून पायात गोळे येवू लागले. पहिली पायरी चढलो आणि  जेजुरीगडावर कधी पोहोचलो समजलेच नाही. गर्दी अशी पुढे ढकलत होती की पाय आपोआपच वरच्या पायरीवर, काही पर्याय नव्हता देवाच्या दारी आलं की पुढे आणि वरच जावं लागतं हे मात्र आम्ही एकमेकाकडे बघून हसत हसत सगळ्यांनी मान्य केलं. पूजेसाठी पायऱ्यांच्या कडेला नाग आणि गारूडी होते. नागांच्या जवळून आलो आहोत याचे भान गडावरून ते गारुडी, परडी पाहिल्यावर पुन्हा आले. मग मात्र पायातला गोळा पोटात येऊ लागला. मुख्य मंदिरासमोर सभामंडप आहे.  बेलभंडारा “येळकोट, येळकोट जय मल्हार”! आणि भंडाऱ्याची उधळण …..सगळीकडेच वातावरण एकदम बदलंलेलं. भारावून टाकणारं! जोडीला भर वाद्य, गीतं…. पहिल्या पायरीपासून साथ देतच होती. इथे एवढ्या गर्दीत, आवाजात लोकांमध्ये स्वतःची तल्लीनता होती. अतिशय पुरातन अशी जड तलवार जास्तीत जास्त वेळ उचलून धरण्याचा रंजक खेळ खेळला जातो आणि यासाठी बक्षीस दिले जाते. दूर दूर वरून दर्शनासाठी आलेल्यांचे समाधान होतं. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. देऊळ अतिशय सुंदर आहे. गडाचे शिखर आणि दगडी कमानी  याचा अतिशय सुंदर समतोल साधला आहे.गाभारा असलेल्या या देवळात शंकराचा अवतार शोभावा अशीच खंडोबाची मुर्ति वर्णन ऐकलेल्या प्रमाणेच आहे. जोडीला म्हाळसा, मनिमाला या देवतांच्या मुर्ती आहेत.जतन करून ठेवलेले तलवार, डमरू, परळ आहेत. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन शक्तीदेवतांचे एकत्रित रूप आहे. मराठी मंदिर वास्तूकला परंपरेच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात.चिरेबंदी वाड्याप्रमाणे चौकोनी चिरे  पुरातन काळाची आठवण करून देतात. अवतीभवती निसर्गाचे सानिध्य आहे या निसर्गासोबत काही क्षण निवांत नक्कीच अनुभवता येतात. मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर जो भाव मूर्तीत आहे ती शक्ती ,आशीर्वाद भक्तांमध्ये नक्कीच पोहोचतो. साध्या, भोळ्या, सर्व लोकांना पावणारा असा लोकदेव म्हणजे खंडोबा. वापस येताना तोच भास पुन्हा-पुन्हा होत होता. विजयी, यशस्वी, खंबीर, खडी, निग्रही, आग्रही, प्रखर, तेजोमय मूर्तीचे दर्शन एक नवा भक्तिभाव जागवून आहे.                                                             जुनी मंदिरे, वास्तू, किल्ले, वाडे, या वास्तूंंचे काही ठिकाणचे भग्न अवशेष, ऐतिहासिक माहितीसोबत तेथील स्थानिक परंपरा व  लोककला, प्रत्येक जागेचे भौगोलिक वैशिष्ट्य, निसर्ग अनुभव समृद्ध करून जाते. त्या समजून घेण्यासाठी  स्थानिक लोकांशी संवाद करणं महत्त्वाचं असते. 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 thoughts on “लोकदेव….”