एकीकडे उंच डोंगर दुसरीकडे खोल दरी, नजरेसमोर नागमोडी रस्ता…..सगळं नजरेआड होताना थंडगार थंड थंड झुळूक अंगाला लागली की मनाली आली समजायचे. निसर्गाने खोल दरीपासून थेट क्षितिजापर्यंत बांधलेली इमारत हळूहळू ढगांपर्यंत पोहोचलेली दिसते. नजर जसजशी वर जाते तसेच तिथेच नजरबंदी करण्याची किमया, जादू म्हणजे मनाली. ह्या इमारतीचा पाया म्हणजे व्यास नदीचे काचेसारखं, गुळगुळीत गोल गोल दगडांनी पायाला गुदगुल्या करणारे नितळ थंडगार पाणी ! अंगात शिरशिरी आणणारा अनुभव घेऊन पाण्याच्या बाहेर पाय टाकला की नजरेत भरतो मऊशार, हिरवागार हिरवळीचा गालिचा. “जरा विसावू या वळणावर”, म्हणेपर्यंत नजर ठरत नाही तोपर्यंत समोर दिसतात ते फुलांचे राजे, राजा सारख्या थाटात, विविध रंगात, दिमाखात, आकारात गुलाब. फक्त हॉटेल समोर नाही तर अगदी रस्त्यावर, कुठेही भरगच्च गुलाबांचे ताटवे… अगदी नाजूक कळीपासून सुकेेपर्यंत…. झुडुपाच्या भोवती हे गुलाब पाकळ्यांचे ओझे झाले म्हणून त्याच पाकळ्या सुकायच्या आधी वर्षाव करून हिरवळीवरील निसर्गाचे रंगभरण करतात. यासाठी प्रत्येक ताटव्याची जणू चढाओढ. एकही गुलाब असा नाही की दोन-चार फुले आणि बास्स ! फुलण्याचा, बहरण्याचा कंटाळा नाही. पूर्ण रंगानी बहरलेले गुलाबांंचे सौंदर्य पहावे तर मनालीलाच. हे अप्रूप सगळ्यांच्या नजरेत असतं बरं का! त्यामुळे हे असं का पाहत आहेत? वगैरे वगैरे.. म्हणून कोणी आपल्याकडे पाहत नाहीत. निसर्गाचा आनंद घेताना हा विचार करायचा पण नसतो. स्ट्रॉबेरी, चेरी, लिची, सफरचंदाच्या बागा यांचे लाल भडक रंग इशारा करतात. रसरशीत, बेधडक चव मनसोक्त घ्यायची कारण ती पुन्हा मिळणार नसते. भडकपणा, आकर्षक रंगाची नगरी पाहून झाली की निसर्ग हिरवा रंग दाखवायला सज्ज असतो. उंच उंच सरळ, रांगेत सूचीपर्णी हिरवेकंचं ओक, देवदार वगैरे आणि त्यातून डोकावणारी सूर्याची किरणं. किरणांना फार कसरत करावी लागते जमिनीवर पोहोचण्यासाठी. येथे मात्र शब्दशः पटतं की “जे न दिसे रवी ते ते दिसे कवि”. हिरवी हिरवाई, विविध रंगसंगतीची गुलाब फुले आणि ह्या सगळ्यांच्या वर बर्फाचे पांढरेशुभ्र चमकणारे डोंगर. परावर्तित होऊन, चमकून सूर्याची किरणं पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात हिरवळीवर येण्याचा पण प्रयत्न व्यर्थच. शेवटचा मजला ढगांचा, पिंजलेल्या कापसाचा, निळसर निळाईचा. सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी.. अलौकिक कुंचल्याने मनमुरादपणे कोणतेही नियम न पाळता दररोज वेगवेगळे मारलेले रंगांचे फटकार…आपल्याला बाद करण्यासाठीच.. मग थंडीत गोठलेल्या चांदण्याप्रमाणे शांती. दिवसा किरणांचा आणि रात्री चांदण्यांचा हिरवळीवर येण्याचा प्रयत्न. या प्रयत्नातून पर्यटकांना मिळतो मनसोक्त आनंद. एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रंग पेटीचा पुरेपूर वापर करून तयार केलेले निसर्ग चित्र म्हणजे मनाली. कोण असेल हा चित्रकार? यासाठी हिमाचल म्हणजे देवभूमी म्हणतात… नक्कीच दैवी चित्रकार असणार!
Latest posts by Varsha Karhad - Munde
(see all)
13 thoughts on “निसर्गाची नजरबंदी….”
👌👌
Nice
सुंदरच ..
खूप खूप सुंदर वर्णन केले आहे,जणू काही मनालीला जाऊन आल्याचा आभास झाला.आणि सध्याच्या वातावरणात कोणी जाऊ शकत नाही म्हणून,तुम्ही केलेले अप्रतिम वर्णन वाचून मनाला आनंद मिळाला.
लेखिकेने जणू मनालीची सफरचं घडवली
Nice
अप्रतिम शब्द रचना, साक्षात मनालीचे निसर्ग सौंदर्य डोळ्यासमोर उभे राहिले.
Superb write up,ur writing takes everyone to the places u r discribing.keep it up , great work
मनाली पाहिली नाही पणहे वाचत असताना डोळ्यासमोर मनाली कशी दिसते हे उघड्या डोळ्यानीसुंदर स्वप्न पाहात आहे वाटत होते
अतिशय बोलके वर्णन……न जाता सुद्धा मनालीची सफर अगदी सहज घडली…… व्यास नदीतील गुळगुळीत दगडांचा स्पर्श, तसेच गुलाबांच्या पाकळ्यांचा हिरव्यागार जमिनीवर पडलेला सडा ……. ढगांचे बदलणारे रंग…… असे वाटत होते की आपण मनालीत जाऊन ह्या गोष्टी पाहत आहोत ……अतिशय सुंदर👌👌👌👌
वाचून पुन्हा एकदा मनालीत गेल्याचा भास झाला.अगदी लालित्यपूर्ण
शब्दांत टिपलं आहे मनालीचे सौंदर्य ..
सारिका गुंडरे
खुप सुंदर….