अनुसया आक्काचे एक एक पाऊल संसारात पुढे, तर मनाला विरक्ती आल्यामुळे तिचा घरधनी माणिक याचे दिंडीतून एक एक पाऊल कायमचे पंढरपूरच्या दिशेने पडत होते.
“विठ्ठल विठ्ठल”, म्हणत म्हणत तो कधी विठ्ठलमय झाला तिला समजलेच नाही. अचानक एक दिवस सगळा संसार अर्ध्यावर सोडून कायमचा पंढरपूरला निघून गेला.कधीतरी मुलांची आठवण आली की गावाकडे वर्षभरात एक दोन वेळेस येेेेेेेेेणे व्हायचे. पहिल्यांदा आल्यानंतर गावातील कोणी त्याला ओळखले नाही. आक्काने मात्र पदराआडून सुद्धा ओळखले की तो आला आहे. पारावर बसला होता. सगळ्या गावाची चौकशी केली. गाठीशी जमा झालेले थोडे पैसे, सोबत आणलेल्या सर्वांच्या आवडीच्या वस्तू होत्या. मुले, आक्का, आई वडील यांना दिल्या. आई वडीलांचे दर्शन घेतले. पोरांनी महाराज म्हणून त्याचे दर्शन घेतले. मुलांना माणिकची ओळख वडील म्हणून होण्याआधीच तो अनोळखी झाला होता…
“बर चाललय न् पांडुरंगाच्या कृपेने”, आक्काकडे पाहून विचारले.
चूलीवरच्या ऊतू जाणाऱ्या दूधाकडे एकटक पहात मान हलवून हो ! नाही ! काय म्हणाली समजले नाही. पण त्यानेही लगेच उत्तर दिले,” रामकृष्ण हरी! “तो असल्यास मला काय चिंता? जेवनखाण आटोपून सोबत दोन दिवसाची भाकरी कपड्यात बांधून दुपारच्या बसने पंढरपूरला निघून गेला.
तो अचानक असा सुखाच्या वादळासारखा यायचा पण दुःखाचा धक्का देऊन निघून जायचा.अश्यात येणंजाणं अगदीच कमी झाले होते. तिच्या भरल्या डोळ्यांनी पसार्याचा भरलेला संसार पहात होती.
देवा पांडुरंगा!! संसार अर्ध्यात् मोडायचा होता तर मांडला कशाला ? एवढेच सगळ्यांना ऐकू जाईल असे बोलली. बाकी आवंढा गिळूूून मनाशीच बडबड करत होती.
दोन लहान मुले, लादणीतले धान्याचे पोते, शेतातल्या जागरणाची सोय, यावर्षी अर्धवट राहिलेले घर नीट करायचे होते.अजून किती कामे अर्धवट आणि अपूर्ण होती. दिवसभर कामासोबत सारखा विचार! विचार!…हाकेच्या अंतरावर असलेली नदी पावसाळ्यात काठोकाठ भरून घरापर्यंत पाणी आणायची. आज आक्काचे विचार असेच काठोकाठ भरून बाहेर वाहत होते आणि नदीपर्यंत पोहचले. गुजगोष्टी करायला निघाली. कधीकधी नदीवर कपडे धुण्याच्या निमित्ताने गावातील बाया-बापड्यांसोबत मन मोकळे व्हायचे, कोणाच्या अनुभवातून खंबीरपणा, सहनशीलता, आधार मिळायचा तर कोणाचा पदर अनेकींचे दुःख पुसायचा. हातासरशी कामे उरकायचे कौशल्य, निगुतीनं संसार कसा करायचा यासारख्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या, शिकल्या जात होत्या.
अशात तिची कामाची पद्धतसुद्धा बदलली होती. कधी काठवटीतले पीठ जास्तच मळले जायचे, चूलीला उभी केलेली भाकरी करपायची. तर दावणीला बांधलेल्या गायीला रागवायची,”तुला काय सगळं जागेवर आयतं पाहिजे”. एक एक दिवस मागे पडत होता वर्षानुवर्षाच्या कष्टातून घर-दार उभे केले, माणसे जपली, मुले शिकून-सवरून सरळ मार्गाला लावली. आक्काची माया म्हणजे भाऊ, वडील, नातू ,पंतू पर्यंत सारखीच होती. पंचमीला येणाऱ्या पोरी भेटल्याशिवाय जाणे अशक्य. स्वतःला मुलगी नव्हती. एकतरी मायबहीण असावी म्हणून गावच्या सगळ्या पोरीबाळींना जीव लावत होती अन् लावून घेत होती. आक्का शिकलेली नव्हती परंतु सर्वांना जीवन शिक्षण देत होती. एकटी स्त्री असूनही घर-दार, शेती, मुलांचे शिक्षण या जबाबदारी पार पाडण्यात कधी अडचणींचा पाढा वाचला नाही, कधी हार मानून बसली नाही. खंबीरपणे, सक्षमपणे आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देत होती.
तरुण असताना, लहान मुलांना वाढवताना, घरातील वृद्धांची सेवा आजारपण पार पाडणं, आणि स्वतःच्या स्त्री म्हणून असलेल्या भावना इच्छा मारुन जगणं एवढं सोपं होतं का हे?
गावातील पार ओलांडून जातांना “आक्का बरय का?” एवढे तरी प्रत्येकजण विचारणार! अर्ध्यारात्री पोरांनी हट्ट करावा आणि तिने तो पुरवावा. कारण लेकरांचे आईवडिल तीच होती. तिच्या हाताने चूलीवर बनवलेल्या जेवणाची सर कोणालाच नाही… शेवटपर्यंत तिच्या पद्धतीमध्ये एक कणभर सुद्धा फरक नाही… खवा टाकून बनवलेले रव्याचे लाडू, मासवड्या यासारख्या अनेक पदार्थांची चव पुन्हा नाहीच मिळाली.
शेतात चोरं, कोल्हे, रानडुक्कर, लांडगे, घूस, जंगली पशूंपासून उभं नगदी पीक स्वतः जागरणं करून राखायची.
सोबतीला थंडीसाठी एक घोंगडी, शेकोटी, स्वरक्षणासाठी काठी आणि काठी टेकत टेकत चालणारी सासू मानसिक आधारासाठी.
तिला कधी घाबरलेले पाहिले नाही की थकून कोणते काम लांबणीवर टाकताना पाहिले नाही.कपड्याला छोटे छोटे आरसे लावणे, वेगवेगळे टाके टाकून विणकाम, भरतकाम करत असे. आणि हो! स्वतःची चोळी स्वतः शिवायची. दुपारच्या गप्पागोष्टी करत गावातील महिलांना या कला शिकवत होती. म्हणून तर गावातील मुलींचे लग्न असलं की रुखवत कसा भारी! उठून दिसायचा!
सतत कामात राहून मनाला गुंतवणूक घेत जगणे. गावातील बायांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
पाण्याखालची शेती ! काय कमी आहे तिला? आता पोरं मोठी होतील.सगळा शीण निघून जाईल तिचा. सुना नातवंडानी घर भरून जाईल…अस मैत्रिणी बोलल्या की, तिला “पाण्याखालची शेती” एवढाच शब्द कानावर पडायचा लक्षात यायचा. कोणत्या पाण्याखालची शेती होती तिची? डोळ्यातले पाणी दिसू नये, आतल्या आत जिरावे म्हणून बारीक डोळे करायची पण त्यामुळेच तर समोरच सगळं दोन दोन दिसायचे. धुसरवाट दिसायची….कारण सगळ्याजणींंपेक्षा दुप्पट काम तिला करावे लागायचे. तिने हिमतीने, जिद्दीने, स्वकष्टाने आणि स्त्री म्हणून कोठेही आत्मसम्मानाला ठेच लागू न देता आयुष्याची धुसर, अंधुक वाटेला स्वतः ची पाऊलवाट निर्माण केला होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास म्हणून गोंंधळ घालून पळवाट शोधणाऱ्या काहीजणी ! आणि वाट नसताना पाऊलवाट तयार करून नवीन मार्ग दाखवणारी अनुसया. तिचे पूर्ण जीवन सगळ्यासाठी पाऊलवाट ठरावे इतकी ती परिपूर्ण जगली…
तो वारकरी! टाळ घेऊन दिंडीतून सगळ्यांची सेवा आणि इतर वेळी पंढरपूरला राहून भजन, कीर्तन, सेवा … मुखी गजर विठ्ठल! विठ्ठल!….
आक्का दररोज झोपताना, उठले की पहाटे पहाटे… पांडुरंगा, विठ्ठला, ज्ञानेश्वरा.. सगळं तुला सांभाळायचय म्हणत दिवसभराच्या कामासाठी सज्ज !
संसार मांडताना दोघेही एकत्र आले. एकाने कर्म आणि एकाने भक्तीने आपापल्या पाऊलवाटा जपल्या.आयुष्यात तिच्या वाट्याला आलेली एक अन् त्याने जगलेली एक पाऊलवाट….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
11 thoughts on “पाऊलवाट….”
मन हेलावून सोडणारी व्यथा
अश्या कितीतरी स्त्रिया आहेत त्यांचे दुःख दिसत नाही. खूप छान लिहिले आहे..
खूप सुंदर लेख आक्का मनाला भावली…
Chan
सुंदर
खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे पाऊलवाट………..
स्त्री जन्मा तुझी कहाणी👌👌
खुप छान
Khup chan Reality of women life
Khup sunder lihile
Khup sunder lihile