भाग २/ प्रार्थना ते ध्यान कथा क्र.२ वेमण्णाची भक्ती
भोवती फिरूया! स्वतः फिरूया! स्वतःभोवती फिरूया! हे कसं शक्य आहे आणि का फिरायचं? कसं फिरायचं?
कामं, नाते, घर, समाजात वावरत असताना, इतरांशी व्यवहार करत असताना कुठेही, कधीही आपण काय काय करतो यामुळे काही दोष निर्माण होऊ लागतात. ज्यामुळे हे स्वतःभोवती फिरणं विसरून जातं. स्वतःभोवती फिरणं म्हणजे याची एक विशिष्ट व्याख्या नाहीये परंतु ही एक संकल्पना आहे. कोणत्या गोष्टी अश्या आहेत ज्यामुळे आपण जड होत आहोत ; तर चुकीचे गृहीतक धरणे, परिपूर्णतेचा अतिरेकी अट्टहास, अपेक्षेची हाव, स्वतःची चूक मान्य नसणे आणि सगळ्यात महत्त्वाचे फक्त स्वतःचाच विचार करणे…… ही काही महत्ताची कारणे .
मग याचा अर्थ असा का, की कामं पूर्ण करायचे नाहीत, उद्दिष्टं ठेवायचे नाहीत, तर असा अजिबात नाही. परिणाम, निर्णय येईल तो येईल परंतु काम करत असताना प्रयत्न शंभर टक्के करावेत. एक साधं सोपं उदाहरण देते एक विद्यार्थी कोणत्याही परीक्षेचा पेपर देऊन आल्यानंतर पेपर पुन्हा हातात घेत नसे, आले किती? गेले किती? किती येतील? काय निकाल? कधीच चर्चा करत नसे आणि करूही देत नसे… त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा देऊनही त्या स्पर्धा परीक्षां पूर्वतयारी, पेपर दिवशी आणि नंतर निकालाचा कधीच ताण येत नसे.तो म्हणतो पेपर दिला की विषय संपला! तो विषय त्याच्या लेखी संपला! एकदम निवांत! दुसर्या अभ्यासाकडे वळणार 100% साठी फक्त प्रयत्न! ही सवय झाल्यामुळे परीक्षा म्हणजे ताण आणि आपल्या नंबरिंगच्या प्रतिमेतून तो स्वतः कायमचा बाहेर आलेला होता. कायम अभ्यास! अभ्यास ! घोकणं आणि संपली एकदाची परीक्षा म्हणून सुस्कारा टाकताना कधीच नव्हता. त्याच्या कडून ताणतणावाचे वातावरण घरात निर्माण होत नव्हते. कारण आपल्या क्षमता आणि मर्यादा माहिती असणे. आणि महत्त्वाचे म्हणजे अनुभव तर सर्वांसारखाच जमा होत असेल ना! हाच नियम कोणत्याही औपचारिक आणि अनौपचारिक दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टींना लागू केला की हळूहळू मोठमोठ्या तणावाच्या स्थितीतही गणपती सारखं (पृथ्वीला फेरी मारायला सांगितले तरी शांत, निवांत रहाता येतं.) दुसरं म्हणजे घडणारे प्रसंग, अनुभव, कृती, प्रत्येकातील शेवटच्या परिणामांचा विचार केला की मग आवश्यक तेवढाच कृतीशील तणाव निर्माण होतो; जो काम योग्य गती आणि चांगले होण्यासाठी उपयोगी पडतो. (बाकी कुणी कितीही घाबरवून सोडू द्या. गणपतीचं chilled smile आठवायचं!) गांभिर्य असलेले,दुःखाचे प्रसंग सोडून बरं! (मात्र यातलाही नाटकीपणा सोडून द्यायचा)परिणाम साधत असेल तर पद्धती शोधायला काय हरकत आहे? स्वतः भोवती फिरलं की ती विकसित करता येते. इतकी काही अवघड नसावी.
स्वतःकडून पण फार अपेक्षा करायची नाही असं का? जबाबदारीत टिकायचं नाही का? काही घडायचं, घडवायचं नाही? असं तर अजिबात नाही! एक सेकंद, एक मिनिट, एक तास, दिवस, आठवडे, महिने मिळूनच वर्षे होतात. अशी देवाने आपल्याला दिलेली एकूण आयुष्यातील, वर्षातील तासं, दिवस पुढे निघून जात आहेत म्हणून याच क्रमाने जसे आपण परीक्षेत छोटे छोटे नियोजन तणाव विरहित करण्यासाठी करतो. तसंच क्रमाने अगदी स्वतः, कुटुंब, जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक,ओळखीचे, अनोळखी जग, अनौपचारिक संवाद, व्यवहार अनुभव यातून शहाणे होऊन कुणा भोवती किती फिरायचे,बंद कधी करायचे, नेमकं आपापल्या स्थितीनुसार ठरवायचे असते. स्वतःला नियम, बंधनं घालायची आणि ती पाळायची. जर दिवसांचे नियोजन केले तर वर्षांचे होते हे आपल्याला माहिती आहे.अगदी तसेच स्वतःचे केले की क्रमशः त्या पद्धतीने सगळ्या जगाचेही होत जाते.
सोबतची नाळ तुटते. आईशी नाळ तुटते शरीराने (मनाने नाही) पण तरीही आपलंही स्वतःचं स्वतंत्र एक अस्तित्व निर्माण होतंच. आपल्याला एक ओळख मिळते. आपोआपच काहीही न करता ,न बोलता आपले नातेसंबंध जोडले जातात.( बेरकीच दिसतं! रडकं! किरकिरं! शांतचं आहे! रडण्याच्या, हसण्याच्या आवाजाचं सुद्धा स्पष्टीकरण आणि हो! त्या लेकराला काही फरक पडतो का?) खरंतर बाळाचे फक्त पाय दिसतात हो सगळ्यांना पाळण्यात. यांना बाकी काही दिसत नाही. तरी एवढे अंदाजपत्रक!
मोठेपणी सुद्धा नातेवाईकांच्या बाबतीत हाच नियम लागू करायचा! काहीही म्हणाले तरी काहीच फरक पडू द्यायचा नाही.. कधी कधी त्या बाळाप्रमाणेच आपला दोष नसतो. अस स्वतःला समजून सांगायचं…बाळं हळूहळू जसजसं मोठे होत जाते तसतसं संस्कार, वातावरण, स्वभावानुसार देखील भर पडत जाते. परंतु शेवटी हे सगळं, ह्या सगळ्यांमध्ये समायोजन करणं आणि होणं यासाठी आपल्याला स्वतःला परिस्थितीनुसार काही कौशल्य शिकावीच लागतात. यापैकी एक भन्नाट कौशल्य म्हणजेच स्वतःभोवती फिरणं.
जसं लाल, निळा, हिरवा रंग आपल्याला दिसतो कारण त्या वस्तू मधून तोच रंग परावर्तित होतो म्हणून आपल्याला त्या वस्तूचा तो रंग दिसतो. पण त्यात इतर रंगही असतात. अगदी तसेच आपण जे काही आपल्यातून दिसतं, दृश्य स्वरूपात ते म्हणजेच आपण आहोत असं जगाला वाटू शकतं, वाटू लागतं परंतु जसं रंग उडतात, काही रंग वरकरणी असतात तसेच ह्या कृतीतून दिसणारे आपण वरकरणी असे असू शकतो. कारण दोन प्रकारची आपली व्यक्तिमत्व असतात. प्रत्येकाच्या अंर्तमन व बाह्यमनामुळे अस होत. साधं सरळ सरळ होता येत नाही. कोणी कितीही जरी नाकारलं तरी आपण काही जशी आहोत तसेच स्ट्रेट फॉरवर्ड जगा समोर जात नाहीत.
काय फरक पडतो! कोणाला लाल रंग, कोणाला हिरवा रंग, पांढरा रंग आवडतो. कोणी वरून हात खाली दिलाय तर आपण खालून हात वर द्यावा. तरच आपणही आपल्या खालच्याला हात देऊ शकू! पुढे करू शकू! पण सहसा स्व स्वरूप फक्त दाखवण्याच्या हावरटपणामुळे होतं काय? आपण स्वतःभोवती फिरू शकत नाही. हळूहळू दुसऱ्यांच्या भोवती फिरायला सुरुवात करतोय. इथं अगोदर घरातल्यांच्या, मग मुलांनी माझ्याच मनासारखा ऐकलं पाहिजे, अगदी त्यांची कपड्याची आवड आपणच ठरवायची, त्यांना काय करायचे तेही आपणच ठरवायचं, त्यांनी कोणतं काम करायचे, वगैरे वगैरे….. सुनेने कशा पद्धतीने पूजा करावी, तिने कसं प्रेझेंट व्हायचं, ( मी फक्त सर्वसमावेशक अगदी पाहिलेली उदाहरणे दिली आहेत बाकीची उदाहरणे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे आठवावीत! ) कार्यक्रम कसा घ्यायचा ही एकमेव यादी अंत ना पार अशी आहे. ती आधी सरळ टराटरा फाडून टाका बरं! (फाडली असं समजून थोडं पुढं जाते) तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढं दुसऱ्या भोवती फिरायला लागतो! आधी घरात फिरतो, पती,पत्नी, मुलंबाळं, आई, वडील, भाऊ, सासू सासरे,जावा,ननंद, मेहुणा, काय! सगळेचं पुरुष, महिला, शेजारी वगैरे वगैरे पुढं तुमच्या आवडीची नावं सुद्धा लिहू शकता! (फक्त मित्रमैत्रिणी वजा करते हं! ते बिचारे आपल्याला स्वतः भोवती फिरायला शिव्याशाप देऊन, भांडण होऊनही मदतच करतात. पती-पत्नी जर मित्रमैत्रिणी सारखे असतील तर खुपच चांगले आहे.) मग यांच्याच भोवती फिरायला लागतो. हळूहळू हे फिरणे घरापासून बाहेरच्यांसोबत मग कामाच्या ठिकाणी अगदी अनोळखी लोकांच्याही….
परिपूर्णतेच्या अतिरेकी अट्टाहासापायी आपण काय करतो. प्रत्येक कामाची हाव वाढवून ठेवतो. हाव वाढली की लोकांवर आपण हावी होतो. लोकांवर watch ठेवतो. Follow करायला लावतो , lead घेऊ देत नाहीत. संशय निर्माण करतो. त्यांच्या मागे लागतो. कधीतरी याचा अतिरेक होतो. आपल्याही नकळत मग त्यांचे स्वातंत्र्य, अधिकार, मोकळेपणा, कामातील आनंद, नवीन invotive विचार वगैरे दूर होऊ लागतात! पण यासाठी स्वतःलाही आखडून घेऊ लागतो. यापेक्षा सहकारी नेतृत्व कधीही चांगले! कारण कामं केवळ ऑर्डर! ऑर्डर! ऑर्डरने होत नाहीत. स्वतःला बिनकामाचे ताण वाढवायच्या कामाला आपणचं लागतो. असं हळूहळू दुसऱ्या भोवती फिरणं वाढायला लागतं मग आयुष्यभर फिरतच राहतो…..ही संकल्पना मला वाटते हळूहळू आपल्या लक्षात येत असेल.
स्वतःभोवती फिरा म्हणजे स्वतःचा स्वार्थी विचार करा! अशी संज्ञा इथे अपेक्षित नाहीये. स्वतः mange म्हणजे स्वाधीन रहा( असा अर्थ समजू ). प्रत्येकाची एका मर्यादेपर्यंतची उर्जा आणि कौशल्य, इच्छाशक्ती असू शकतात. केवळ आणि केवळ कधीही न मिळणाऱ्या perfection साठी आपण स्वतः ला समजावले पाहिजे. कारण आपल्याला आपल्या पद्धतीने (म्हणजे कामाच्या आवश्यकतेपेक्षा व्यक्तीनिष्ठ पद्धतीनं) perfection हवं असतं; इथेच घोळ होतो. शक्य गोष्टीही अशक्य व्हायला लागतात. 50% गोष्टी आपण शांत राहिलो तरी आपोआप system नुसार होणारच असतात. गाढवाला सुद्धा ओझं वाहता येतं की!! हे त्याचही विशेष कौशल्य नाही का! आपण तर माणसं आहोत. काही नाते, काही कामं जन्मभर करणार असतो. सगळ्या जगासोबत तर मरेपर्यंत रहाणार असतो.. मग त्यात पुन्हा उशीर कशाला? ( काटा पुढे सरकत आहे आयुष्याचा आणि जड होण्याचा) त्यामुळे दुसऱ्या भोवती फिरणं कमी करण्याची, फिरण्यासाठी हलकं होण्याची हीच process आहे असं मला वाटतं. स्वतः भोवती फिरा काहीतरी हाती लागेल! आपलं अस्तित्व आपल्याला अधोरेखित करायचं असतं… पण दुसर्याभोवती फिरणाच्या रेषा ओढून नाही. स्वतः भोवती फिरून आपल्या उणिवा, जाणिवा, मर्यादा, क्षमता, चुका, बलस्थानं, आवड, नावड वगैरे वगैरे गोष्टी… शोधा. घरच्या जबाबदाऱ्या, आवडीची कामं, नौकरी, सेवा जे काही असेल त्याच्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुमच्या कामापासून परावृत्त तर करूच शकत नाही. तुमचा कामाचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही का करत आहात याचा अगोदर विचार करा. यासाठी फक्त तुमच्यात कामावर सरळ भक्ती असली पाहिजे. मग अशी भक्ती कशी असते? जी देव सोडून कामात, धर्मात, सेवेत, समाजकारणात, माणसात कुठेही लावता येते.
त्यासाठी आंध्रप्रदेशातल्या वेमन्ना नावाच्या संत, साहित्यिकाची एक अतिशय सुंदर गोष्ट आहे.
साधारण लोकांची सरळ भक्ती सुद्धा कामात प्रगती करून अशक्य ही शक्यतेत आणते.
वेमन्ना लहान होता. गुरुगृही राहत असे. थोडासा बुद्धू, अल्लड, वेंधळट थोडक्यात सांगायचे झाल्यास जगाच्या नजरेत अक्कलशून्य होता. इतका बुद्धू होता की काहीच समजत नव्हते ( याचा अर्थ समजत नव्हते असा नाही तर समजून घेत नव्हता असाही होतो ) फक्त एका वेळी एकच काम! दुसरं काम सांगितलं की पहिलं काम विसरून जाणार! सगळे लोक चिडवायचे, मजाक करायचे, गृहीत धरायचे, दुर्लक्ष करायचे, फक्त कामासाठी उपयोग करून घ्यायचे. गुरूंना मात्र त्याची खूप दया यायची आणि वाईटही वाटायचं कारण वेमन्ना इतरांसारखा smart नव्हता ना!
एकदा काय झालं गुरूजीनां गावाला जायचे होते. ते नदीवर स्नानासाठी गेले. वेमन्ना सोबत होता. त्याला म्हणाले,” हे बघ! मी स्नान करून येईपर्यंत माझे कपडे खाली पडू देऊ नकोस बरं! खाली चिखल आहे. खराब होतील. तुझ्या हातामध्येच ठेव. लक्षात ठेव बरं!
” ठीक आहे,” तो म्हणाला. दोन्ही हातामध्ये गुरुजींचे कपडे घेऊन उभा राहिला. थोड्या वेळानंतर गुरुजी स्नान करून आले; पाहता तर! कपडे खाली पडलेले होते आणि खराब झालेले होते. आता त्याने का खाली ठेवले असा प्रश्न गुरुजींच्या, आपल्या समोर!
तर स्नान करून आल्यावर गुरुजींनी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याला वाटले की, माझ्या गुरुजींना काहीतरी हवं आहे. त्याने कपडे खाली ठेवले आणि नदीकडे पटकन जाऊ लागला. गुरु बद्दलची सरळ भक्ती इतकी तीव्र! की दुसरं काही लक्षातच येत नव्हतं. एकावेळी एकच गोष्ट जमत होती दुसरी गोष्ट जमत नव्हती. आता कपडे की गुरुजी?
त्याला दोन्हीपैकी एकाला निवडायचं होतं मग त्याने गुरुजींना निवडलं आणि कपडे खाली ठेवून गुरुजींकडे गेला. अगदी त्याच्या नैसर्गिक सरळ भक्ती स्वभावाप्रमाणे वर्तन! पण गुरुजी चिडले, रागाने पाहिले आणि म्हणाले,” अरे अरे!! तुला किती वेळेस सांगितलं कपडे खाली ठेवू नकोस! मला गावाला जायचं आहे. खरचं! तू दुसरं काहीच करू शकत नाहीस बघ! एकदम बुद्धू आहेस! तुला काम तरी काय सांगावं? आता एकच काम कर! हा खडू घे! आणि या दगडावर राम राम लिहीत बस! तेही एकाच जागेवर गिरवायचे, वारंवार त्यावरच लिहायचे! यापेक्षा तू जास्त काही करू शकत नाहीस. कदाचित तुझ्यावर कृपादृष्टी होईल. हे ऐकून वेमन्नाला गुरुजींचा अजिबात राग आला नाही. ( कारण भक्ती) पण स्वतःची लाज वाटली. वाईट वाटले
१. येत नाही म्हणून?
२.बुद्धू आहे म्हणून?
३.शिक्षा केली म्हणून?
नाही! नाही!!
( सरळ भक्ती इतकी सोपी गोष्ट नाही)त्याला वाईट वाटले कारण गुरुजी आपल्याला एवढे सांगतात तरी माझ्यात का बदल होत नाही! गुरुजी माझ्यामुळे निराश होतात. गुरुजींना माझ्यामुळे त्रास होतो. गुरुजींचे माझ्यामुळे काम चुकीचे होते. मी का समजून घेत नाही!! गुरुजी बद्दल तर आदर, सन्मान आणि प्रेम वाटते.
पण आता आज्ञा पाळणे तर भाग आहे. त्याने लिहायला सुरू केले. गुरुजी गावाहून कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा वापस आले. त्यांनाही मनातून वाईट वाटत होतं. फारच कडक शब्दात आपण त्याला बोललो. (हा पश्चाताप सुद्धा भक्तीचाच परिणाम असतो) घरी आल्याबरोबर त्याच्याबद्दल चौकशी केली “अरे! कुठे आहे तो?” सर्वांनी पाहिलं तो आश्रमात नव्हता आणि तो आश्रमात नाही हे समजल्यावर ते नदीकिनारी बडबडत पळत सुटले….. अरेरे! मी त्याला राम लिहायला सांगितले त्यानंतर कोणताच निर्देश, आदेश दिला नव्हता.” गुरुजी नदी किनारी जाऊन पाहतात तर तो अजूनही तितक्याच मग्नतेने त्या दगडावर श्रीराम! श्रीराम! श्रीराम! असे लिहीत होता. खोल व्रण त्या दगडावर पडत होता. खडू तर केव्हाच संपलेला होता. त्याचे खडू पकडलेले दोन बोटं अर्ध्यापर्यंत रक्तबंबाळ झालेले होते. तरीही लिहीत होता. श्रीराम! श्रीराम! ही झाली खरी सरळ भक्ती!
गुरुजींनी त्याला जवळ घेतले मिठी मारली. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. वेमन्ना त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला होता. गुरुजी मी आजपासून समजून घेणार….
आणि त्या दिवसापासून सगळं बदललं हे वेगळं नको सांगायला…
गुरुजींनी त्याला जवळ घेतले गळाभेट घेतली.. गुरूने हे जवळ घेणं म्हणजे नुसती गळाभेट नव्हती तर त्याचा अर्थ जवळून ओळखले तो काय आहे! त्याची कौशल्य कशात आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला “इसमे कुछ तो बात है! जो सबसे बहोत ज्यादा है। जो इसे आगे लेके जायेगी।
आणि याच वेमन्नाने शेकडो अद्भुत अश्या अध्यात्मिक कवितांचे लेखन केले. संत साहित्य निर्माण केले. फक्त कामात जीव ओतण्याचा मार्गाने त्याला गुरूंचे पुर्ण मार्गदर्शन मिळवून दिले….
(उगी महितीस्तव! तसं सरळ भक्त होणं धोकादायकही असतं. आपल्याला लोक कदाचित smart समजणार नाहीत एवढचं! परंतु आपल्याला स्वतःभोवती फिरण्याची प्रक्रिया यामुळे खुप सोपी जाते) मग कामाचा आनंदही घेता येतो.
अपेक्षाही ठेवायची नाही! शंभर टक्के परिपूर्तीही नाही! गृहीतही धरायचं नाही! मग कामाचा आनंद कसा घेणार? तर कामाचा निखळ आनंद घेता येण्यासाठी प्रयत्न 100% करायचे.
यासाठी एक सोपा मार्ग कामात वेमन्ना सारखी सरळ भक्ती लावा. आता खरा भारतीय शिक्षणाचा विषय येतो. भक्तीचा साधारण अर्थ लावतात तसा इथे घेऊ नका भक्ती म्हणजे देव देव, भक्ती म्हणजे पूजा, भक्ती म्हणजे प्रार्थना, अर्चना ,देवदर्शन वगैरे वगैरे….या गोष्टीतून काय लक्षात आले.
व्यक्तीपरत्वे बदलणारे अर्थ इथे अजिबात अभिप्रेत नाहीत. सरळ भक्ती आपल्याला स्वतः शिवाय ( स्वतः चे व्यक्तिगत व्यक्तित्व विसरून)स्वतःभोवती फिरायला फार उपयोगी पडते असं मला वाटतं. काम कोणतही असो लेखन, वाचन, फिरणं, धर्म, समाजकारण, उद्दिष्ट, ध्येय, व्यक्ती, ऑफिस, शाळा, संस्था, स्वप्नं, ईश्वर, गरीब, अपंग कोणीही असू द्या आणि कोणतीही परिस्थिती,कामे असू द्या. यापैकी जे काही तुम्ही करतात यासाठी भक्ती लावा. तुमची भक्ती नेमकी कशावर आहे हे शोधा. भक्ती काय करते! आधी स्वतः शिवाय विचार करायला लावते. भक्ती सुद्धा विशेष बुद्धिमत्तेची एक शाखा समजू आणि ही सरळ भक्ती आपल्याला आपल्यापेक्षाही खूप मोठी बुद्धिमत्ता इतर सगळीकडे आहे याची जाणीव करून देते. आपल्यापेक्षा छोटा असो मोठा असो, भेटणारी कोणीही व्यक्ती असो, अगदी आपली विरोधी व्यक्ती, नावडते नातेवाईक घरी आले तरी ( मुळात असा विचार करणार्याला दुश्मन कोणी रहातच नाही. असले तरी काही फरक पडत नाही. फक्त स्पष्टीकरणासाठी कळीची उदाहरणे द्यावी लागतात.) प्रत्येकाकडे आपल्यापेक्षा वेगळी कोणतीतरी एक विशेष बुद्धिमत्ता आहे याची जाणीव भक्ती करून देते. कारण भक्ती मुळे आपण जीवनाशी असे जोडले जातो जिथे स्वतःचे अहम व्यक्तित्व विसरल्या जाते. आपण कामाशी जोडल्या जातो. या अश्या काम करणाच्या पद्धतीमुळे कामाचा परिणाम चांगला होतो. मग हातचे कामही सोडू नका.
स्वतः भोवती फिरणे महत्त्वाचे वाटत असेल तर परिणामांचीही फारशी चिंता करू नका. (कारण काय असतं माहिती का! दृश्य स्वरूपातल्या परिणामाला जग महत्त्व देते. आणि असे परिणाम सहसा व्यक्तिनिष्ठ असतात.) आपल्याला फार पुढे जायचे आहे. म्हणून निंदा, चाडी, राजकारण, धूर्तपणा, अपमान, टोमणे, कामात खोडा, अडथळा, विरोध, परेशानी वगैरे आपण पुढे जाण्याच्या योग्य मार्गावर असण्याचे संकेत आहेत आणि byproducts आहेत हे कायम लक्षात ठेवू….
भारतीय शिक्षणाच्या आधारे हे फिरणं…. शरीर, मन,भावना,ऊर्जा, जप,तप,साधना,योग आणि ध्यान म्हणजे *प्रार्थना ते ध्यान* इथपर्यंत घेऊन जाणारे आहे. याद्वारेच मी जेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करते तेवढं जमेल त्या पद्धतीने सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन..मलाही परत एकदा उजळणी…. आणि आपल्या अभिप्रायमधून चुका सुधारण्याची संधी!!
क्रमशः
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
16 thoughts on “वेमन्नाची भक्ती”
खुप छान आकलन
सोपे शब्द , सहजपणे समजावून सांगण्ययाची भुमिका छान
ध्यानापर्यंत ,ध्यान शेवटपर्यंत वाचायला नक्कीआवडेल
सोप्याकडून अवघडाकडे
उदाहरणाकडून नियमाकडे
व्वा ताई
विषय नवीन आहे सर्वांसाठी.. आपली सहज मांडणी विषय सुकर करते..
या पद्धति च्या लिखाणासाठी विचारशक्ति अणि वाचन प्रगल्भ तुमचे खूप छान आहे तुम्हाला खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
रेणापुरकर
नैसर्गिक पणे प्रामाणिक असेच विचार असतात मनात आणि बोलतो वेगळेच कळतच नाही किती दिवस आपण खरचंस्वतः शी बोलतच नाहीत
स्वतः शी बोलावं लागत हेच लक्षात येत नाही
विचार वर्षा
भाव वर्षा
स्वभाव वर्षा छानच
नमस्कार बाई,
स्वतः भोवती फिरणे विषयाची मांडणी मोजक्या शब्दात, योग्य उदाहरण दैनंदिन जीवनातील विविध अनुभवांची गुंफण छानच केली आहे 🌹🌹
अगोदर वाचन प्रगल्भ असेल तरच असे लेखन होते. खूप सुंदर मांडणी…
उत्तम अभ्यास
खूपच अभ्यास 👌👌मस्त
Vichar Varsha
Khupach Chan ani abhinav
Vachayla aawdel🙏
अभ्यासपूर्ण लिखाण.
गोष्टी सह स्पष्टीकरण खूप छान👌👌👌👍👍
सोपे शब्द , गोष्टी रूपाने समजावून सांगण्ययाची कला, खूपच छान ताई👌🎉
खूप छान लेखन केले आहे.
खुप छान,चिंतन वेमन्ना गुरुभक्ती पूर्ण समजुन घेण्यासाठी व्यक्तिगत अनुभवांची जोड सुरेख चिंतन व कल्पनापूर्ण अविस्कार. दोनवेळा वाचलेतर अर्थ स्पस्ट होतो. असेच लिहित रहा. खुप शुभेच्छा.