पावसाची झड

पावसाची झड
एकसारखी पावसाची झड सुरू होती…. अन् शेणानं सारवलेल्या अंगणात सात महिन्याच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून, खाली मान घालून बसलेली उर्मिला. ती वाहणाऱ्या पाण्याचा विचार करत होती. जमिनीवरच्या, डोळ्यातल्या की अंगाला चिटकून बसलेल्या जीर्ण लुगड्याला भिजवणाऱ्या माहिती नाही ! तिच्या मनात नेमके काय असते ? अजून तिला हालचाल न करता दिवस मावळतीला जाईपर्यंत बसून राहायचं होते. लेकराला मात्र ती थोडीशी पुढे वाकून कोरडे ठेवण्याचा कोरडा प्रयत्न करत होती.  तिला याची सवयच झाली होती. वेळ आली की आईला हिरकणी व्हावंच लागते मग कितीही अवघड कामे तिच्यासाठी सोपी वाटायला लागतात. खरेतर तिला मिळणारी ही नेहमीचीच शिक्षा होती. हळूहळू तिने यामध्ये कौशल्य प्राप्त केले होते विना तक्रार, आवाज न करता अगदी शांतपणे शिक्षा भोगायची. तिचा दोष आणि गुन्हा काय असायचा? हे तिलाही माहिती नव्हते, फक्त कधी कधी बाळानी रात्री जागवले म्हणून उठायला उशीर व्हायचा मग सडा-सारवण करायला वेळ लागायचा. दूध पीते लेकरू आणि काम करून जरा इतरांपेक्षा लवकर भूक लागायची. सालगड्याच्याही आधी जेवण करायचे नाही चुकून केलेच तर ठरलेली शिक्षा होतीच. यासारख्या असंख्य क्षुल्लक गोष्टी दिवसभरात घडायच्या आणि घडवून आणल्या जात होत्या. भांड्याला राखा लावत असताना पितळी भांडी चमकली नाही की उन्हाळ्यात हे काम भर दुपारच्या उन्हात बसून कराव लागायचे म्हाळाच्या महिन्यात गहू सडून तीनेच तयार केलेली खीर खरवड उरेपर्यंत वाड्यात वाटायची, पातेल्याच बुड लागलं की मग तिचा अधिकार! असाच अधिकार आणि एवढीच सत्ता तिची तिच्याच संसारात होती. सासू, लेकरं, नवरा अगदी वस्तूंवर सुद्धा होती. जात्यावर दळताना ओव्या फार सुंदर म्हणायची. आवाज, सूर लागत नव्हता पण खूप तल्लीन होऊन म्हणायची आणि त्यामध्ये भावना ओतायची. रामायणातील फक्त सीतेचा केलेला त्याग आणि अशोक वाटिकेतील एकांत एवढ्यावरच ओव्या म्हणायची.
“सीता अरुण्या वनामदी राहिली कशी”
” थकून झोपली तिने दगडाची केली उशी”
असं काय काय म्हणत असायची. बहुतेक ती स्वतःचेच सांत्वन करून घेत असेल. या सकाळच्या ओव्या तिला दिवसभर कदाचित सगळं सहन करायला खंबीर बनवत असतील का? सालगड्याच्या बायको सोबत वर्षाला दोन लुगडी आणि सणावाराला घालण्यासाठी दोन लुुुगडी वळणीवर निऱ्या घालून टाकून दिलेली असायची. एक लाकडी पेटी मध्ये कुंकू, घरी तयार केलेलं मेण, फणी, आरसा असायचा. नवीन पोरींच्या साडीला पिको करताना कापून तयार केलेली रिबीन बाजूची अंती तिला नेहमी देत असायची. तेल, साबण वगैरे नवऱ्याची आणि सासूची परवानगी असली तरच वापरायचे. उर्मिला लेकराकडे पाहून मात्र हसायची त्याला बोलताना ती सगळे विसरायची पाठीवरचे आणि मनावरचे दोन्ही घाव. कुठून येवढी सहनशीलता, त्याग आणि तरी झीजतच जाणेे…. शेवटपर्यंत न सुटलेलं कोडे ! कधी दुःख झालं की तिचे उदाहरण द्यावे तिला आठवावं अस आजूबाजूच्या बायका कुजबुज करायच्या. तिच्याकडे बघा! जरा शिका! अस एकमेकींना सांगून त्या सुद्धा स्वतःचे सांत्वन करून घेत होत्या. सासूचा त्रास, नवऱ्याचं दुर्लक्ष, समोर दोन्ही मुलांचा मृत्यू, सुनेचे आणि स्वतःचे विधवापण….. थोडक्यात काय तर रावाचा रंक होणे काय असतं हे अनुभवलय तीने आयुष्यात, कारण माहेरची लाडाची कौतुकाचे आणि आता कायमची दुर्लक्षित….. कधी देवाकडे तक्रार करताना कोणी पाहिले नाही आणि कधी गाऱ्हाणे करताना ऐकलेही नाही. दररोजचा नित्यक्रम तोच, तेच काम पण स्वतःला शांत, समाधानी ठेवत विनातक्रार जगत असते. सोबत कोणी आहे काय? नाही काय ? समोर आले त्याला सारीत जाणे, मागे टाकत जाणे आणि प्रवास सुरु ठेवणे एवढेच काय ते तिला माहिती आहे. आजही आयुष्य तेच…. फक्त कामाची गती थंडावली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “पावसाची झड”