मराठवाडी म्हणवा…

मराठवाड्यातील बोली भाषेतील म्हणी म्हणजे मराठी भाषेचा अस्सल झणझणीत तडकाच. चपखल, मार्मिक नेम धरून काय म्हणतात ते सगळं या म्हणी मध्ये लपवलेल आहे. समजणाऱ्याला अर्थ समजून सांगण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच त्या भाषेतील शब्दांचे नेमके अर्थही माहिती असावे लागतात. बोली भाषेतील शब्द कोणत्या संदर्भाने घेतलेले आहेत हे देखिल शोधावे लागते. एखादी विशेष व्यक्ती, कृती, त्या व्यक्तीच्या वर्तनातून वारंवार दिसून येणारे तिचे गुण, अवगुण आणि त्यासाठी खोचकपणे वापरलेले शब्द यामध्ये मिश्किलपणा खूप असतो. शब्दफेक करण्याची एक खुबी, लहजा असतो. यातून ग्रामीण खास शैली तयार होत असते. सगळ्यांसमोर बिनधास्तपणे आत्मविश्वासपुर्वक हे बोलणं परिणाम देखिल साधते.
म्हणजे काय? समोरचे गुपचुप ऐकून घेऊन नीट्ट कामाला लागतात, कधी खजील होऊन चूक कबूल केली जाते, कधी कधी हसून हसून पुरेवाट होते. बोलण्यात संकोच न रहाता थेट विषयाला हात घालण्याचे कौशल्य या म्हणी साध्य करतात असे वाटते.
नशिबाने लहानपणापासून  गावाकडच्या काही इरसाल मंडळीचा सहवास भरपूर लाभला. लहानपणापासूनच खालील म्हणी वारंवार कानावर पडत असत…त्यातून
सहज लक्षात राहिलेल्या काही म्हणी…

1.खुटउपडं कुठलं- बुडासकट नायनाट करणारा

2.खपूरफू – एखादी गोष्ट नष्ट करून पुन्हा तिचा पुरावा नष्ट करणे. प्रश्न कायमचा निकालात काढणे. किंवा एखाद्याची चांगली जिरवणे.

3.अशील खसतयं अन् निलटं पोसतयं- सत्यासाठी अस्सल असले तरी धास्तीने खचत जाणे आणि चुकीचे असले तरी निर्लज्ज पोसल्या जाणे.

4.निनांदी अन् फुटलं कपाळ बांदली चिंदी- स्वतःची चुक झाकण्यासाठी अनेक नाटकं करणे.

5.भिक्कार्याला वक्कारा- जवळ काहीच नाही तरी बिनकामाची ऐट/रुबाब

6.मोटेपणा भारी अन् चिंद्या खालीवरी – केवळ मोठेपणा सांगणे प्रत्यक्षात वस्तूस्थिती वेगळी असणे.

7.निस्ते वजे अन् कुटके मोजे- स्वतःचा भार दुसऱ्यावर आणि तरीही कंजूषपणा, व्यवहाराची चौकशी करत बसणे

8. मिशीला तांदूळ लावून फिरणे- परिस्थितीचा दिखावा करणे.

9.काळतोंडी अन् शिवार धुंडी- चेहरा न दाखवता ( खरा चेहरा लपवून) सगळीकडचा शोध घेत फिरणे

10.खाऊन खाती न् नकटीची आणं वाहती

11. बोलायला टक रागु कामाला आग लागू

12.पसारावारी न् बोलून सारी

13. एकला कसा जाऊ सारा गाव हाकून नेऊ – स्वतः कामाची जबाबदारी न घेता सगळ्यांना गोळा करून केवळ गोंधळ निर्माण करणे.

14.खायला कोंडा झोपायला धोंडा –

15.आता होती कुटं गेली तिचं नाव चट्टाफुली – फिरस्तीवर असणारे

16.येडा ठोंब अन् कामाची बोंबाबोंब- कामाचे कोणतेही कौशल्य नसलेले

16. यडं उठलं अन् जावयाला भेटलं – रीतभात, सोपस्कार, पद्धती, संस्कार नसलेले

17. उट गं कळी बस पाटकुळी- आपणहून भांडणाला निमंत्रण

18. कळी कळी कुठे चालली पळी घेऊन उकरायला- खोडसाळ व्यक्ती भांडण लावणारे, विनाकारण चर्चेला उधाण आणणारे

19.कुटं गेले तं कुटचं नाही अन् काय आणलं तं काहीच नाही!- बिनकामाच्या गोष्टीत वेळ घालवणे.

20. हळूच पोळी आरडून गुळवणी- स्वतःच्या सर्वसाधारण गोष्टी न सांगणे/लपवणे, फक्त विशेष गोष्टी सगळीकडे सांगत सुटणे.

21. लांब नाक अन् गाढव राख-
सुंदरता केवळ दिसण्यात कामं मात्र अनावश्यक आणि मुर्खपणाची

22. यडी हळद भाजीचा सत्यनास- अविचारी कृतीने कामाचा नाश करणे

23. नाका वाचून मोती शोभना अर्थावाचून पोती कळना

24. सासू नाही सासरा ,धाक लावि दुसरा – काहीही संबंध नसताना विनाकारण लुडबुड

25. सुगरण साताची हिरव्या दाताची- खुप आव आणने पण प्रत्यक्षात कृतीशून्य

26.नवरा नाही घरी जीव बिनघोरी- राबत्या घरात जरा विसावा

27.मोट्या घरी मुंगूस कारभारी- व्यवहारात मेळ नसणे

28. नग नग अन् पायलीच्या माग माग – मनापासून इच्छा असणे परंतु वरवरचा नकार

29.माय लेकी लोकाच्या आतभाष्या एकाच्या- आई आणि मुलीचे गुण सारख्या नसू शकतात परंतु आत्या आणि भाची सारख्या गुणाच्या असतात.

30. सयपाक करती अनुसया बरकत देई देवराया- अन्नपूर्णेच्या भावनेतून स्वयंपाक बनवून खाऊ घातला की देव कमी पडू देत नाही.

31.मनाला टरका चुलीकडं सरका – स्वतःहून घरातील स्वयंपाक, जेवण वगैरे कामाच्या वेळा पाळणे.

32.मला कोण नवाजी घरचाच बुवाजी- स्वतःच स्वतःचे कौतुक करणे.

उगीच मनवा पडला नाही…

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “मराठवाडी म्हणवा…”