अभिव्यक्ती….

 

अभिव्यक्तीचे माध्यमं कितीतरी…..प्रत्येक माध्यम प्रभावीच ! प्रत्येकाला रूचणारं आणि त्याच्यामध्ये रुजलेला फक्त प्रकार बदल… का व्यक्त व्हावे असे वाटतं असेल विविध प्रकारे ?….

स्वतः चे विचार सांगण्यासाठी, अनुभव शब्दबद्ध , कृतीयुक्त करण्यासाठी की  परिचय व्हावा म्हणून ! की केेेवळ अभिव्यक्तीसाठी ! निसर्ग हट्ट करतो का?  की माझ्या निसर्गोत्सवात सर्वांना सहभागी होऊ द्या. अश्रूंमधून अर्थ वाहून लेखनीत उतरत असतात. हास्याचा खळखळाट इतरांनाही सामील करा सांगत असेल का? माझे तेच सगळ्यांंचे या जाणिवेतून वेदनेेेची तीव्रता कमी करत प्रेरणा बनतेे का ही लेखनी? वेदना सुंदर बोलते तर कधी प्रसंग अस्वस्थता वाढवतात… 

प्रत्येकच अनुभव आलाच पाहिजे असे काही नाही. सहसंवेदना जागृत झाली की विविध भावनांची गर्दी जमते त्या गर्दीला ओळीत बसवण्याचा शाप असेल का ? कारण शिस्तीत बसवण्याचा अट्टाहास करावा लागतो. प्रत्येक भावनेच्या, समस्येच्या मुळाशी जाऊन मनातील खोल आवर्तने आणि त्यांना अर्थात मांडल्याशिवाय…ही स्वस्थता लाभतच नसेल का !

मुखवटे घेतलेल्या भूमिकांमधील खऱ्या व्यक्ती, गुढ, अनाकलनीय, सत्य परंतू आक्रमक असे काहीतरी मनाला पटत नाही. परंतु लेखनीला मात्र ते उलगडायला आवडत असेल का!  खरेतर वेदनाच सुंदर बोलते…नेहमी आनंदी, प्रसन्न, हसतमुख, प्रेरणादायी, सकारात्मक, वगैरे वगैरे असच असत का? आपण का मुक्तपणे व्यक्त होत नाहीत..खरच ! मांडणी करत असताना व्यक्त व्हावे की नको ?

प्रतिमा आणि प्रतिभेच्या द्विधामनस्थीत कधी कधी लेखणी अडकते. यामध्ये क्षणभर थांबते.. का ? दिशा बदलण्यासाठी की धारदारपणा कमी करण्यासाठी ? लेखनीला दिशा कोणी द्यावी. स्वतः की इतरांनी, अनुभवांनी की केवळ कल्पनांनी ! लेखन सर्वमान्य व्हावेच का ? मग पूर्ण व्यक्ततेचे समाधान मिळत नाही..अनुभव फक्त स्वतः चाच असतो का ?… एकाचे दुःख दुसऱ्याच्याही आरपार जाऊ शकते…मग विचार मनात क्षणभरही ठरत नाहीत. हे एका क्षणात कागदावर लिहून मोकळे होणे असते का? लिहिण्याचा एक क्षण असतो पण यामागे जगलेले, अनुभवलेले, निरीक्षण, सहसंवेदना असतात. वाचणाऱ्याला त्या अनुभवापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो. लिहिण्याचा मोह, इच्छा, मान्यतेपेक्षा ते स्वतः सोबत वाचणाऱ्याचे सांत्वन असते. किंचित दाटून येणारे आसू आणि हासू जीवनगाणे शिकवत शिकत जाणे असते. हलके होत जाणे असते.

भावनेच्या कोणत्याही प्रकारापर्यंत घेऊन जाणारे लेखन भावते. भावनेची कधी स्पर्धा असत नाही. भावनेची प्रत्येकाची पातळी वेगळी, जाणीव वेगळी आणि म्हणूनच प्रत्येकाची लेखनी स्वयंभू ! लिहिणारासाठी तितकीच प्रिय ! म्हणून ती कागदाच्या रंगमंचावर लेखकाने दिलेल्या भुमिका साकारते. प्रेक्षक किती, प्रतिक्रिया काय?  यापेक्षा तिला नवनिर्मितीचे समाधान असते आणि अर्थापर्यंत पोहोचलेल्यांचा आशीर्वाद तिला लाभत असतो. विचांरानी भरलेले मन हलके करत जाणे असतेे. त्या त्या वेळी झालेल्या भावनांचा ओलावा असतो. यामुळेच तर विविध भावनांना स्पर्श करणाऱ्या लेखनीतून साकारलेल्या भुमिका असतात.. या भुमिका पाहून , वाचून तर जगण्याची उभारणी करतात. जे कोणीतरी जगलेले असते, अनुभवलेले असतेच… ते लेखनीला शोधता आलं पाहिजे ! या शोधामध्येच तर लेखनी असते. तिच्या शाईला संपायच्या आत…खूप काही मांडायचे असते…. अंदाज घेत घेत… कधी उपमा देऊन… कधी स्पष्टपणे..कधी विचारपूर्वक ….कधी मुक्तपणे रंगाची उधळण करत…कधी प्रतिकार.. कधी सहसंवेदना… कधी मुखवटा…कधी साद तर कधी प्रतिसाद निर्जीव असूनही तिच्या कडून  मानवी भावनांचा ओघवता  जीवंतपणा अनुभवता येतो….मनामनांचा विविध भावनांचा एक भाव होऊन समभाव  निर्माण करण्याचे भाग्य तिला लाभते….म्हणूनच कोणत्याही भाषेच्या अक्षरांना, शब्द, वाक्य यांना शब्दार्थ, वाच्यार्थ, भावार्थ आणि व्यंगार्थ प्राप्त होत असतो…. या विविध अर्थापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करणारी लिहिणाऱ्याची खरेतर अभिमित्र असते लेखनी ! कायम सोबत समजून घेत घेत समजून सांगणारी… आत्मविश्वासपुर्वक, नवनवीन भावप्रदेशात फिरताना अर्थपूर्ण रचना समृद्ध करणारी ! सदैव शांतपणे सोबत करणारी लेखनी ! प्रत्येकाचं अभिव्यक्तीचे माध्यम त्याला व त्याच्या सोबत इतरांना सहभागी करत करत….सकारात्मक उर्जा नक्कीच देत असेल ! 

 


 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 thoughts on “अभिव्यक्ती….”