नदीच्या आठवणी..

शिक्षण विवेक, पुणे दिवाळी अंक आयोजित लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक प्राप्त लेख… नदीच्या आठवणी

दीपावली सुट्टी! वाणनदीशी गट्टी!
माझ्यावर अगदी लेकीसारखं प्रेम करणारी माझी मायाळू आत्या, माझी हक्काची अक्का!अक्काच्या घरी दिवाळीला माझा भारी थाट असायचा. आवडीची फुलं,रंग असलेल्या कापडापासून शिवलेले फुग्यांचा बाह्यांचे झगे, परकर पोलकं आवडीचे कपडे, काचेच्या बांगड्या, रंगीत टिकलीचे पॉकेट, गळ्यातल्या माळा अजून बरचं काही…. आत्या मला सगळं माझ्या आवडीचचं घ्यायची.
खायलाही मस्त! चुलीवर लोखंडी कढईत खवा टाकून केलेले रव्याचे लाडू, गुलगुले, बुंदी, सोजीच्या अन् तिळाच्या करंज्या, बाजरीच्या कापण्या, लाप्शी, काय काय! सगळं कसं अस्सल चवदार! अजून नाव काढलं तरी चव जीभेवर रेंगाळतेय…
शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यासाला बसण्याआधी गावाकडे जायची पिशवी भरून ठेवायची. परीक्षा संपली की ओढ असायची ती नदीत खेळायची आणि वाट पाहायची आक्काच्या गावच्या बसची. मांडेखेल पर्यंत फक्त बस; पुन्हा पायीच जायचे अस्वलअंब्याला….
अस्वलंबा गावाच्याकडेने वाहत जाणारी नदी गुळगुळीत, गोलगोल गोट्यांनी आणि निच्चळ (नितळ) पाण्यामुळे खुपच आवडायची. ती काचेसारखी भासायची. त्या काचेसारख्या पाण्यात खाली वाकून पाहिलं की स्वतःची सावली अन् चेहराही दिसायचा.
सुर्याची किरण त्या पाण्यात आरपार जायची आणि तळाच्या दगडांना भेटायची. त्या तळाशी असलेली दगडगोटे सुद्धा उंच आकाशातून किरण भेटीला आले म्हणून आनंदाने प्रकाशात न्हाऊन चमकत असत. ती किरणं परावर्तीत होऊन नऊरंगी पाण्यात न्हाऊन निघायची. गावाच्या जवळच नागापूरचे धरण आहे. धरण आणि नदी गावाच्या अगदी जवळच असल्यामुळे दिवाळीत कडाक्याची थंडी असायची. कधी दाटधुके पडले की वाटायचं सुर्य येऊन भेटून गेला,आता धुक्याचे ढग भेटायला आले आहेत. भवती दाट झाडी, वर धुके आणि पाण्याचा खळखळ आवाज…. अंगात हुडहुडी भरायची.
सकाळचे आठ वाजले तरी शेकोटी समोरून उठायची इच्छा होत नसे. अक्काचा मात्र नियम सकाळी सातच्या आत सगळं आवरलं पाहिजे. घरातल्या, बाहेरच्यांचा वावर सुरू होतो. पोरीबाळींनी कसं! सगळे उठायच्या आत आंघोळ वगैरे उरकून तयार असावं. अक्का अंघोळीसाठी वाफाळलेलं कडक पाणी द्यायची पण एका क्षणात ते पाणी थंडगार व्हायचं. दगडं, तुराट्या रचून आडोसा केलेली न्हाणी आणि अश्या थंडीत तिथं अंघोळ म्हणजे जिवावर यायचं, पण पर्याय नव्हता.
मग चहा, न्याहरी झाली की आमची सवारी नदीकडे वळायची. त्या गावातील मंदाकिनी माझी खास मैत्रीण. मी सुट्टीला बाहेरून आलेली म्हणून जरा माझ्याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. माझे कपडे, वस्तू, अभ्यास,शाळा याचं तिथल्या मैत्रिणींना भारी कौतुक वाटायचं. घरातील सगळ्यांचे कपडे घेऊन आम्ही नदीवर जायचो. निमित्त कपड्यांचं खरे तर सगळ्या जणींना खेळायचे असायचे. सगळ्या जणींना घरी खूप कामं असायची. त्यांचे आई, वडील, काका, काकू सगळे शेतात कामाला जायचे. या माझ्या मैत्रिणींना घरातील लहान बहीण भावंडांना सांभाळणे, भांडी घासणे, स्वयंपाकातील कमी जास्त पहाणे, पसारा आवरणे अशी अनेक काम असायची.
शाळा,अभ्यास वगैरे याचं त्यांना काही देणंघेणं नव्हतं. त्यांची सगळी काम झाल्यावर कपडे धुवायला जायचे. मला आत्याची नऊवारी साडी धुता येत नसे. त्याचा खोसाटा मारता येत नसे. मी छोटे कपडे धुवायचे. नदीच्या कडेला खरखरीत दगड निवडून ठेवलेली असायची. गुडघ्यापर्यंत पाण्यात उभ राहून हा कपडे स्वच्छ करण्याचा कार्यक्रम सुरू असायचा मुळ हेतू नदीत खेळणे बाजूला होऊ द्यायचा नाही. कपडा वाहत्या पाण्यात सोडायचा पळत जाऊन पकडायचा वगैरे सुरू असायच.
माझी पद्धत पाहून सगळ्याजणी हसायच्या आणि म्हणायच्या,” जाऊ, दे! तुझं सगळं धुणं आम्ही धुवून देतोत”. पण तू आम्हाला तुझ्या शाळेबद्दल सांग न्! गाडीबद्दल सांग! तुमचं घर कसं आहे? शाळेमधल्या गोष्टी ऐकायला त्यांना खुप आवडायचे. सगळ्या जणींचे कपडे धुऊन झाले की बाजूच्या गवतावर कपडे झटकून फटकून आरामशीर आडवे टाकायचे. त्या कपड्यांचे अंगावर पडणारं गारगार पाणी आणि तो झटकतानाचा गारवा सुद्धा मस्त वाटायचा.
आता आमचा खरा खेळ सुरू व्हायचा. वाहत्या पाण्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागणाऱ्या डोहातच आम्ही खेळायचो. पुढे जायची हिंमत नसायची. मुलं मुली मिळून आमचा सात आठ जणांचा गट खेळण्यासाठी तयार असायचा. मोठ्यांनी भीती घातलेली होती याच्यापुढे जायचं नाही. भवरा आहे. गोल गोल फिरवतो आणि सोबत घेऊन जातो. आमची काय टाप! पुढे जायची! त्या पाण्यात आमचे वेगवेगळे खेळ सुरू…
खेळताना गुळगुळीत गोटे, छोट्या मासळ्या, शेवाळे, वाळू यांचा मऊशार स्पर्श व्हायचा. मध्येच चंचल मासोळ्या गुदगुल्या करायच्या.
धुवायला आणलेले गमजे घ्यायचे या गमजाची झोळी करायची आणि मासे पकडायचे.
आता असं वाटतय फार कौशल्याचं काम आहे.
झाडावरून नदीत उडी मारणे. पकडापकडी, दोन पायावर बसून मान पाठ वाकवून तोंड पाण्यात घालायचे किंवा पालथं पडल्यासारखे करून श्वास रोखून धरायचा. कोण जास्त वेळ श्वास रोखून धरतो याची शर्यत. आणलेल्या कपड्यांपैकी काही मोठे कपडे अंगात घालून पाण्यात वल्हव्यासारखे हातवारे करून, पाणी ओढून कपड्याचे फुगे करून पाण्यावर क्षणभर तरंगायचे. आमची एकमेकींना पोहायला शिकवण्याची सुरुवात या नदीत झाली आणि शेवट मात्र बोधे गावच्या तळ्यात झाला. स्वयंअध्ययन पद्धतीने पोहणे असेच शिकत असतील का? पाणी एकमेकांच्या अंगावर, ओंजळीत घेऊन वर फेकणे आणि ते पुन्हा स्वतःच्या तोंडावर घेणं. मज्जा यायची.
हातापायांना भिजून भिजून सुरकुत्या पडायच्या…
पाण्यात इतकं चालायचं, धावायचं,खेळायचं की स्वप्नात सुद्धा ती नदीच यायची.
घरी गजगे, चिंपोळ्या, काचकूरं, कांदाफोडी खेळताना भास व्हायचा आपण अजून पाण्यातच आहोत.
या गावातील प्रत्येकाला आपल्या शेताकडे जाताना या नदीतून जावे लागते. जसं काही मंदिराच्या आत जाताना पाय आपोआप धुतले जातात तसंच मलातरी ते अगदी तसंच वाटतं. मला आठवतंय एका सुट्टीला धुण्याचे टोपले घेऊन आम्ही जाऊ लागलो. मी सगळ्यात समोर होते पायवाटेवरून जाताना अचानक समोर एक काळा भला मोठा साप फणा काढून बसलेला दिसत होता. त्यावेळी भीती वगैरे काही वाटली नाही. आम्ही तो निघून जाण्याची वाट पाहत तिथेच उभ्या. त्या वयात जेवढे सर्पज्ञान होतं त्यावरून सर्वजणींना सांगितले हा असा शंकराचा साप असतो. आपण त्याची खोडी नाही काढली तर तो आपल्याला काही करणार नाही. गुपचूप निघून जाईल आणि समजा गेलाच नाही तर आपण ओम नमः शिवाय म्हणायचं मग महादेव त्याला त्यांच्याकडे बोलवतात. कदाचित महादेवाने बोलवले असेल दोन-तीन मिनिटात तो निघून गेला.
ती वाणनदी, दाट झाडी, हळूवार विरळ होत वरवर जाणारे धुके, नदीकाठची रानफुलं, एकमेकात गुंतलेल्या वेली, कवटाची उंचच्या उंच झाडं, गाभुळ्या चिंचा, रसरशीत, अर्धकच्ची, लगडलेली बोर, शेतातील कोपट्या, शेकोट्या, अहोरात्र काम करणारी बाया माणसं सगळं कसं जशच्या तसं आठवतं. चित्र काढताना आठवून आपण चित्र काढतो न् तसं आठवतयं आणि अगदी चित्रातल्यासारखे मनामध्ये बसलेले आहे. थंडीच्या कडाक्यात जागरणाला शेतात चाललेली अक्का, तिचा हात धरून चालणारी मी….
त्या वाटेवरती तो क्षण,तो काळ अजूनही थांबलाय, माझी वाट पहातोय…
रातकिड्यांचा आवाज, काजव्यांचे प्रकाशकण, नदीच्या पात्रातून चालताना पाय टाकले की उठणारे तरंग, हळूवार पाण्याची हालचाल जणू चंद्राचाच प्रवासी प्रवाह!
झाडातून डोकावणारे वटाऱ्या डोळ्याचे घुबड, पिंपळाच्या पानांची सळसळ ऐकली की छातीत धस्स व्हायचं आणि पोटात गोळा यायचा. पायाखाली नदीचे थंडगार पाणी क्षण सुद्धा गोठल्यासारखे होत असतील. तेव्हा आता सारखे मोबाईल नव्हते लगेच बॅटरी ऑन करायला. दाट झाडीच्या जाळीतून येणारा चांदण्या आणि चंद्राचा प्रकाश अन प्रत्येकाच्या शेतातील कोपटीला लटकवलेले कंदील हेच मार्गातील सोबती… अक्का मग माझा हात घट्ट धरायची आणि म्हणायची चल की लटलट अशील खसतय नी निलटं पोसतय. मला काय म्हणायची कळत नव्हतं. पण तिच्या बोलण्याने हिम्मत यायची. बाजेखाली कोळशाचा हार करायचा (पेटलेला कोळसा लाल ठेवायचा पण जाळ होऊ द्यायचा नाही) अंथरून पांघरून घोंगडीच.
कोल्ह्यांचा आवाज, नदीतून येणारा बेडकांचा आवाज, कुत्र्यांचे लांब सुर काढून ओरडणे… ऐकून काय काय विचार यायचे?
मग मित्र मैत्रिणींनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी आपोआपच आठवायच्या. हळूहळू मी स्वप्नांच्या स्वाधीन अन् अक्काच्या जवळ विचारात कधी झोप लागायची ते कळायचं नाही….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 thoughts on “नदीच्या आठवणी..”