खेळ मांडायचा का !…..

खेळ मांडायचा का!...

शाळा सुटली की घरी येताना मैत्रिणींचा बेत ठरत असतो. आज काय खेळायचे!

भातुकली, लपंडाव, लगोरी, कंचे, गोल गोल राणी, झिम्मा फुगडी, आंधळी कोशिंबीर, लोखंडपाणी, डोंगराला आग लागली, तळ्यात-मळ्यात, संत्रलिंबू, विषामृत, रंग रंग कोणता रंग, आट्यापाट्या, सुरपारंबी, विटी-दांडू, काचकुऱ्या पकडा-पकडी....
या सारख्या अनेक खेळांची नावे पटापट सांगितली जायची. शेवटी घर येईपर्यंत अंतिम निर्णय व्हायचा. पाऊस, परीक्षेचे दिवस, सणवार पाहून घरच्यांची मुलांना खेळण्यासाठी परवानगी मिळायची. मग खेळ खेळले जायचे.

आज खेळभांडे खेळायचे का!! असे गटातील एकीने जरी सुचवले की सगळ्या एक सुरात तयार होऊन, आपण खेळ भांडेच खेळुयात गं! आणि मग मांडणी सुरू होत असे....

ही भातुकली, हे खेळभांडे, घर घर खेळण्याचा वेळ म्हणजे लहाण्यांनी मोठ्यांच्या भूमिकेत शिरून जगण्याचा क्षण. हा भातुकलीचा खेळ एकदा रंगात आला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सहा सहा तासांपर्यंत सलग चालतो. एरव्ही कधीही खेळला तर कमीत कमी दोन तास तरी खेळला जातो. आजचा अपूर्ण खेळ उद्या पूर्ण करता येतो. अगदी जिथं अर्धवट मोडला तिथूनच मांडायचा, पुन्हा सुरुवात करायची खेळात ठरवलेले कार्यक्रम, कृती पुर्ण करायची मग खेळाचा शेवट गोड करायचा.

आश्चर्य आहे की नाही?
पहा! आजकाल मुले सलग एक तास स्थिर शांत बसू शकत नाहीत. बोर होतय! कंटाळा आलाय!  मी काय करू? म्हणून पालकांना  भंडावून सोडतात. यासाठी मुले मग्न किंवा कृतिशील रहावीत म्हणून पालक, शिक्षक देखील प्रयत्नशील असतात. सध्या लहान वयोगटातील मुलांनी घरी राहून काय खेळावे? काय खेळता येईल! अशा चर्चांना उधाण आलेले दिसते. सध्या मुलेमुली इंनडोअर गेम म्हणून खेळत असलेले सर्वच खेळ कौशल्यपूर्ण आहेत का! त्यांचा काही उपयोग होतो का! आपणच विचार करायला हवा की नाही! सद्यपरिस्थितीत  बहुदा मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्स त्यांच्या वेगवेगळ्या लेवल( आभासी क्षमता) आणि त्या नुसार दिले जाणारे टास्क ( अचकट विचकट ध्येय, उदिष्ट) पुर्ण करताना मुले दिसतात. काही जागृत पालक, शिक्षक वेगळा विचार नक्कीच करतात आणि तो कृतीतही उतरवतात. प्रयत्नशील असतात. खरेतर याचीच आवश्यकता आहे.

हा वेगळा विचार म्हणजे नेमके काय? या वेगळ्या विचारदृष्टीने या भातुकलीमध्ये विशेष काय आहे?

भातुकली हा बालकांच्या भावविश्वाला समृद्ध करत जाणारा खेळ आहे. या बालवयात अनेक संस्कार करणारा आहे. शैक्षणिक क्षमता विकसनाला सहाय्यभूत होणारा खेळ देखील आहे. यादृष्टीने हा खेळ कसा उपयुक्त ठरू शकतो, नव्हे ठरला आहे. याच खेळातील टप्प्यानुसार विचार करूयात.

अंगणात, ओसरीवर, व्हरांड्यात, परसबागेतील झाडाखाली, गच्चीवर आडबाजूला खोलीत.... भातुकलीचा खेळ मांडण्यासाठीची जागा मुलेमुली निवडतात. कारण बालकांना खेळताना स्वतंत्र, मुक्तपणे खेळणे आवडते. खेळात व्यत्यय नको असतो. सुरक्षितताही आवश्यक वाटते म्हणून घर आणि घराला लागून असलेली जागा निवडली जाते. मोठ्यांच्या नकळत देखरेखीखाली परंतु तरीही स्वतंत्रपणे खेळला जाणारा हा खेळ जागानिवडीच्या निमित्ताने सारासार निर्णय घ्यायला शिकतात.सहसा समवयस्क गट खेळ खेळत असतो एकसारख्या वयोगटातील मुलांच्या भावविश्‍वातील गरजा जवळपास सारख्या प्रमाणात असतात. या दृष्टीने त्यांचे व्यक्त होणे हे नैसर्गिक व तणाव विरहीत होते. या खेळातील बोलण्यातले विषय आणि गप्पा यावरून त्यांच्याबद्दल माहिती घेता येते. अभ्यास, गृहपाठ, परीक्षा या विषयांच्या
वेळा व्यतिरिक्त मुले एकमेकांसोबत सलग खूप वेळ असतात यामुळे खेळताना एकमेकांसोबत समन्वयाने कृती करायला शिकतात.एकमेकांच्या मदतीने अनेक गोष्टी शिकतात.

खेळातील मोठ्या वस्तूंच्या लहान प्रतिकृती हाताळायला सहज, सोपे जाते. हे हाताळत असताना मुलींना वाटते की आई सारखेच आपण खरेखुरे वागत आहोत. दूधवाला, किराणा दुकानदार, बाबा, आजोबा, भाजीवाला यांसारखे पात्र निभावताना मुले देखील तंतोतंत भूमिका वठवताना दिसतात. स्वतःला आवडणारी नावे, आडनावे देखिल ठेवली जाते. याच नावाने एकमेकांना बोलावतात.  हे सगळे निरीक्षण आणि अनुकरणातून घडत असते. यातून निरीक्षणात्मक नजर आणि अनुकरण देखील मुले शिकत असतात. या सर्व कृती, निरीक्षण, अनुकरण हे कुटुंब, घर आपापसातील नातेसंबंध जपणे या दृष्टीने महत्त्वाचे संस्कार करत असतात. घरातील प्रत्येकाची कामे, जबाबदारी लहान वयापासून कळायला लागते. घरातील कामे सर्वांनी मिळून तर करायचीच असतात याशिवाय गटात काम करत असताना स्वतःची वैयक्तिक जबाबदारी देखील लक्षात यायला लागते. मुलांच्या क्षमता तपासत असताना निरीक्षण, अनुकरण आपल्यालाही लक्षात यायला लागते, बदल अनुभवायास येतात. घरातील एकट्या बालकांचे एकटेपण जाऊन सामाजिकरण व्हायला सुरुवात होते. मुले अनुकरण करता करता स्वतःच्या कल्पनाशक्तीचा विस्तार देखील करत असतात....

हा खेळ खेळताना कधी कधी एखादी मनाजोगती, आवडीची भातुकलीसाठी आवश्यक असणारी वस्तू उपलब्ध नसते. मग काय करायचे? कसे खेळायचे!  इथेच खरे कल्पनेला घुमारे फुटतात. वस्तू नाहीत म्हणून या छोट्या कल्पनाशक्तींचे काहीएक अडत नाही. उपलब्ध वस्तूलाच त्यांच्या भातुकली मधली हवी ती वस्तू समजून, गृहीत धरून ही मुले खेळतात. आपले काम वस्तूंमुळे अडत नसते अडचणींवर मात करावी लागते, सामंजस्यपणा इथेच शिकता येतो. या वस्तूंचा उपयोग करत असताना तर  कौशल्य आणि कल्पना यांची सुंदरशी सांगड घातल्या जाते. टाकाऊ साहित्याचा पुरेपूर वापर कसा करायचा हे शिकवण्याची आवश्यकता रहात नाही.

एक नजर टाकूयात ही मुले उपलब्ध साहित्याचा कसा उपयोग करतात.

एकदा खेळ मांडायचा ठरले की जुन्या साड्या, बेडशीट, टॉवेल तर कधी कोरड्या मातीच्या दोन्ही हातात मावेल तेवढी माती घेऊन (शाळेत खेळांच्या स्पर्धेसाठी पांढरी फक्की वापरून आपण रेषा आखतो तश्याच पण थोड्या उभार असलेल्या  रेषांच्या भिंती)  खोल्या बांधल्या जातात. आवश्यकतेनुसार खोल्या, अंगण, स्नानगृह, स्वयंपाकघर, बैठक वगैरे अगदी मोठ्यांच्या संसारासारखे चित्र कदाचित  त्यांच्या मनात अगोदर उभे रहात असेल आणि मग डोळ्यासमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील. नाही का!

अगदी बाहूली आणि आणि तिच्यासाठी झोपाळा किंवा झोळी देखिल बांधली जाते. स्त्रियांना लांब केसांचे भारी आकर्षण असते. हे आकर्षण लहानपणापासूनच असते. हे भारतीय स्त्री सौंदर्याचे लक्षण आहे. हा संस्कार देखील मनावर नकळत होत जातो. कारण त्या शिवाय का? भातुकली खेळणारी प्रत्येक मुलगी डोक्यावर पातळ टॉवेल, गमजा, ओढणी, लुंगी किंवा छोटा कपडा केस म्हणून गुंडाळून ठेवते, आईचे अनुकरण करत असते. कारण ती आता भातुकलीच्या खेळात आई झालेली असते. साडी म्हणून  यापैकीच एक कपडा फ्रॉकच्या वरून गुंडाळलेला असतो आणि पदर घेतलेल्या असतो. पूर्ण भातुकली होईपर्यंत कधी छोटीशी बास्केट, बांबूची छोटी फुलारी, बाहुली सोबत घेऊन याच वेशात मुली  वावरत असतात. यासोबतच झटक्यात मान वळवणे, नाक मुरडून बोलणे, आजी, काकू, आई, मामी यापैकी अगदी मनापासून ज्यांची भुमिका आवडते तिच्या सारखे अनुकरण करत असतात.  मुले देखील टोपी, चष्मा, काठी किंवा घरातील माणसांची विशेष वापरली जाणारी वस्तू आणून किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे आहे त्या वस्तूला पाहिजे ती बनवण्याची कल्पना वापरून नक्कल करतात. फारच गमतीचा खेळ आहे. संसाराचा खेळ म्हणता येईल.

जीवनमूल्यांचा देखील हा खेळ आहे. पूर्वी भातुकली खेळणाऱ्या मुलामुलींकडे कौतुकाने बघितले जायचे. खेळात मदतीच्या निमित्ताने सहभाग होता. या खेळाला पालकांची मान्यता असे. याचा स्वीकार होत होता यामुळे तर मुलांनी केलेला खोटा स्वयंपाक खाल्ला जायचा. व्वा! मस्त झाला स्वयंपाक!! ढेकरं देऊन  दाद दिली जायची. भावी आयुष्यात होणाऱ्या संसाराच्या विणेचा पहिला धागा इथेच गुंफायला सुरुवात व्हायची. आणि या धाग्यांची वीण अशी हळूहळू मनात घट्ट होत होती. आजचे काही संसार अर्धवट मोडलेल्या भातुकली सारखे का वाटतात? भातुकली तरी पुन्हा मांडली जाते शेवट गोड करून डाव पुर्ण केला जातो. पण संसाराचे काय? नाही पटले की मोड संसार! वर्षाच्या आत सगळे संपवून  सगळे वाऱ्यावर सोडण्याची एवढी घाई का होत आहे? चिंतन करायला लावणारी गोष्ट आहे. काही पालकांना  मुलींनी भातुकलीचा खेळ मांडलेला आवडत नाही. हल्ली  असा शेवट गोड करण्याचा  दृष्टिकोन फारसे पालक ठेवत नाहीत. कारण मुळात मोठ्यांच्याच  संसाराच्या कल्पना बदललेल्या आहेत. काही ठिकाणी व्यक्ती स्वांतत्र्याच्या अवास्तव कल्पना संसारात अपेक्षित असतात. आधुनिकतेच्या नावाखाली अनेक अनावश्यक इंनडोअर गेम मुले खेळतात त्यापेक्षा एक चांगला खेळ म्हणून या  भातुकलीला घरच्या घरी उपलब्ध साहित्यात खेळता येणाऱ्या  खेळांच्या यादीत समाविष्ट करायला काय हरकत आहे. हा खेळ खेळायला प्रोत्साहन द्यायला काही हरकत नाही. मुला-मुलींना या खेळातील मजा अनुभवता यायला पाहिजे. सांगता आली पाहिजे. कोणत्याही देशातील खेळ हे त्या देशातील आजूबाजूचा परिसर, समाज, लोक परंपरा, सहज, नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध साहित्य याचा वापर करून तयार झालेले असतात. त्यामुळे  असे खेळ तिथल्या  समाज मनाच्या परिस्थितीशी, व्यवस्थेशी कायमचे जोडल्या जातात. विचार व कृती यांमध्ये प्रत्यक्ष आणि आभासी असा विरोधाभास जाणवत नाही.  अशा पद्धतीचे अनुभव बालमनावर वरवरचे न राहता मनावर कोरले जात असतात. मनावर कोरले गेल्यामुळे या आठवणी कायम स्मरणात राहतात. मोठे झाल्यावरही जपल्या जातात. हे खेळभांडे जपून नवीन पिढीलाही दिले जातात. एक हळवा भावनिक बंध तयार झालेला असतो. यामुळे नातेसंबंधांमध्ये नकळत संवेदनशीलता देखील वाढीस लागते. या आठवणी या साहित्यांच्या किमतीपेक्षा त्यामागच्या भावनिक मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात. याचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यासाठी होतो. मनोरंजन, शारीरिक, मानसिक, बौद्धिक व्यायाम होतो. आई-वडिलांची न आवडणारी गोष्ट, रागावणे, भांडण खरेतर मुलांना या भावना नकोशा असतात. यामुळे दबाव भिती ताण येतो. परंतु काही घरातील अतिशय कडक शिस्त यामुळे प्रत्यक्ष उत्तर किंवा प्रतिक्रिया देण्याचे धैर्य या छोट्यांमध्ये नसते. दिनक्रमातील न आवडणारी एखादी कृती, गोष्ट लहान मुलांच्या दृष्टीने अशा बऱ्याच गोष्टी असतात की जिथे मोठ्यांच्या वर्तनाचा परिणाम या लहानग्यांवर होतो. ताण येतो. हा ताण कमी होण्याच्या दृष्टीने, या नकारात्मक गोष्टींचे विरेचन होण्यासाठी भातुकलीतील संवाद, मुलामुलींचे भूमिकेशी एकरूप होऊन  केली जाणारी कृती फार महत्त्वाची असते.  मुलांमध्ये संवेदनशीलतेच्या जाणीवा वाढीस लागतात म्हणून  भातुकली हा एक चांगला पर्याय वाटतो. मुले-मुली या खेळात खोटं खोटं भांडण देखील करतात. अशावेळी  मनातील  साचलेपणा बोलून मोकळे होतात. नंतर काही वेळाने एकमेकांकडे पाहून, तोंडावर हात ठेवून, तर कधी डोळे मिचकावून आपण कसे आई बाबांना रागावलो! जे आवडत नाही ते सांगता आले! असे एकमेकांना बोलतात. हसतात आणि तिथेच विसरतात. अश्याच पद्धतीने  बालपण समृद्ध होत जात असते. निरागसतेत जगता येते. निरागसता टिकवता येते. ही निरागसता सध्या कमी होत चाललेली अनुभवास येते. बालवयातून कुमारवयाकडे होणारा प्रवासातील काही नैसर्गिक भावना देखिल व्यक्त होतात....

या खेळभांड्यात माती, लाकूड, पितळ, तांबं, बांबूच्या कामट्या पासूनच्या छोट्या वस्तू, भांडे बनवले जातात. हे साहित्य तयार करणे एक भारतीय हस्त लघु उद्योग देखील होता. कुंभार बोळकी, झाकणी तयार करत  असे तर सुतार पाट, पाळणा, रवी, बाहुली, पोळीपाट. बुरुड फुलारी, सुप अशी अनेक प्रकारची खेळणी बनवून देत असत. सध्या यंत्राच्या साह्याने स्टील, प्लॅस्टिकची आकर्षक भांडे, फर्निचर बनत असलेले दिसून येते. हरकत नाही काळ बदलला चुलीच्या जागी गॅस आले तसे या भांडयांच्या जागी किचन सेट! बाजारात अनेक प्रकारात मिळतो. पण हा किचन सेट एकटी मुलगी सुद्धा खेळू शकते. कारण यामध्ये सगळे साहित्य परिपूर्ण असते. पूर्वी असे नसायचे. पूर्ण भातुकलीचे खेळ  साहित्य कोणाकडेच नसल्यामुळे मिळून खेळणे होत असे. प्रत्येकाचा थोडा थोडा सहभाग मिळून या खेळाला पूर्णता येत असे. यालाच तर व्यवस्थापन कौशल्य म्हणतात ना!हा बाळकडू या खेळातून मिळतो. एकमेकांची गरज भागविणे, मदत करणे, देणे-घेणे, वापरणे, मिळून काम केले की लवकर पूर्ण होते हे न शिकवता देखील मुले शिकतात.

कधी कधी भांडणंही फार जोराची होतात. मग हा खेळ, हा डाव अर्ध्यावरती मोडतो पण भांडणारांची गट्टी करून दिली जाते. कारण कट्टीचा अबोला खेळात चालत नाही. मुक्त संवादाशिवाय हा खेळ रंगात येत नाही. भातुकली खेळणाऱ्या प्रत्येकाला असा संवाद साधायचा असतो. या संवादातून घरांमधले गोष्टीनां अभिप्राय, प्रतिक्रिया मुक्तपणे देण्याची संधी  असते. पुन्हा डाव मांडला जातो. पुर्ण केला जातो.

भातुकलीमध्ये मांडलेला डाव आणखी रंगात येण्यासाठी सणसमारंभाचे देखील आयोजन असते. आमच्या घरी हळदी कुंकवाला या!
आमच्या बाहुलीच्या बारशाला या! इथपासून ते बाहुला बाहुलीच्या लग्नापर्यंत हा खेळ चालतो.

एकदा लग्न ठरले की, या  खेळात कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग सुरू होतो. आजी, आजोबा,आई, बाबा, मोठी ताई, दादा  सर्वजण मदत करतात. शिंप्याकडच्या काठपदर असलेल्या कपड्यांचे उरलेले तुकडे, तुटलेल्या माळेतील मणी, तारा, बांगड्या, हरवून राहिलेले एखादे कानातले, बुगडी, त्याचे मोती, घरातील लग्नाची जुनी मुंडावळी, काळ्या पोतीतील शिल्लक मणी, पोवळे या सारख्या अनेक टाकाऊ वस्तूं पासून लग्नाची सजावट, दागिने आणि साहित्य तयार केले जाते. कडब्याच्या पेर कांडापासून  दागिने, चिंध्या पासून छोटी गादी, उशी आणि फुलांचे दागिने बनवून वापरले जायचे. हस्तकौशल्य, पर्यावरणपूरक टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, विनाखर्चात मुले शिकतात. लहानपणी असे अनेक खेळ न खेळल्यामुळे आत्ताच्या  पिढीला माहिती नसलेली भातुकली कालबाह्य होऊ नये एवढीच तळमळ वाटते. या लग्नासाठीचा खीरपुरीचा स्वयंपाक देखील मोठ्यांच्या मदतीनेच तयार होतो. जमेल त्या पद्धतीने यथासांग हा विधी पूर्ण व्हायचा. रुसवे, फुगवे, खाऊची वाटणी, नवरीबाहुलीचा नट्टापट्टा कोणी करायचा यासारख्या अनेक गोष्टीसांठी भांडणं, कट्टी,बट्टी व्हायची हे भांडण सोडवणारे देखिल त्याच वयाचे... काही जणांच्या अंगी फारच समजूतदारपणा यायचा. खूप रडणाऱ्याला सगळे समजावून सांगायचे.."जाऊदे! गं रडू नकोस! आपण पुन्हा एकदा लग्न लावू तेव्हा तुझीच बाहुली नवरी होणार." खाऊची खीर थोडी जास्त मिळायची.

या खेळात फार मजा येते, गमतीजमती होतात..  काल्पनिक पद्धतीने खेळणीशी एकरूप होत होतच ही मुले निभावत असलेल्या भूमिकांशी एकरूप होतात. आपणही मोठे आहोत. अधिकार आहेत. घरात आपले म्हणणे ऐकून घेतले जाते. याच गोष्टींमुळे हळूहळू आत्मविश्वास, अभिव्यक्तीची सुरुवात होऊ लागते.

भातुकलीचे कोणतेच साहित्य उपलब्ध नसले तरीदेखिल हा खेळ थांबत नाही. हा खेळ मांडला जातोच. फुटलेल्या माठाचे खापर, संक्रांतीची बोळकी, पणत्या, फरशीचे तुकडे, झाकणी, घरातील छोटे चमचे, औषधाच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे बूच, फुटलेल्या काचेच्या बरण्यांचे  झाकण, तेलाच्या  बाटल्यांना कापून, आकार देऊन वेगवेगळी भांड्यांचे आकार तयार केले जातात, कान तुटलेला कप, सामानातील छोटे पत्री डबे, रूखवतातील छोट्या डब्या, पुजेच्या साहित्यातील वापरात नसलेल्या छोट्या आरत्या किंवा इतर वस्तू मुले वापरतात.   मुलींना मोठी झाल्यावर काटकसरीने संसार करायची व प्रत्येक वस्तू वापरा आणि फेका पेक्षा शेवटपर्यंत पुनर्वापर कसा करायचा हे लहानपणापासून या खेळातून शिकायला मिळाले. अगदी खोलगट दगड मिळाला तर त्याचा देखील भांड्यासारखा, वाटणं वाटायला  उपयोग केला जातो.

देवपूजेसाठी उभ्या आकाराचे दगड देखील चालतात. शेवटी भाव महत्त्वाचा असतो असेच म्हणतो ना आपण! नाही का?

हे टाकाऊ साहित्य जरी उपलब्ध नसेल तरी हा खेळ थांबू शकत नाही. ही धडपडणारी मुले मातीचा चिखल करतात आणि जमेल तशी भांडी, साहित्य तयार करतात. भातुकली  खेळतात. क्रियाशीलता आणि प्रयत्न आणखीन वेगळे असतात का हो?

खाऊ म्हणून चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे नाहीच मिळाले तरी यांच्या पाककलेतून तयार झालेले पदार्थ अफलातून असतात. पाककृती अगदी प्रत्येकाच्या कल्पनाशक्ती प्रमाणे वेगवेगळी असते. गोल आकाराची झाडाची पाने  मिळाली नाही की मग पेरू, सिताफळाचे पान तोडून काचेच्या बाटलीच्या झाकणाने दाबून गोल गरगरीत आकार करायचा. त्याला काडीने टोचे द्यायचे. यांच्या पोळ्या तयार होतात. चिंचेची, बाबळीची पाने म्हणजे भात,खिचडी बनते. वरण, भाजी आवडता पदार्थ ज्यांची नावे माहिती आहेत, खाल्ली जातात ते पदार्थ कौशल्यानुसार चिखलापासून, उपलब्ध साहित्यापासून तयार करतात. हे सगळे पदार्थ पद्धतशीर वाढून घ्यायचे आणि हातात घेऊन तोंडापर्यंत नेऊन ओठांनी फक्त आवाज करत खोटं-खोटं खायचे. भांड्यांचा आकार व उपयोग, नावे समजतात. विविध पदार्थांची नावे त्याचा  वापर मुले नकळत शिकतात. भाजणे, शिजवणे, तळणे यासारख्या अन्न तयार करण्याच्या पद्धती देखिल माहिती होतात. हे परिसर अभ्यास मधील घटक शाळेपुर्वीच शिकतात. मुले स्वतःसोबत निसर्गालाही या खेळात बोलवतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बालभवनातून मुला-मुलींच्या अपेक्षित क्षमता विकसित  करण्यासाठी  हा खेळ शालेय वेळात समाविष्ट करून चांगल्या पद्धतीने उपयोगात येऊ शकेल असे वाटते. स्वतः वस्तू हाताळणे, निरीक्षण करणे, वापरून पाहणे, घरच्यासारखे वातावरण शाळेत जाणवणे यामुळे शाळेत लवकर मुले रमतात. गट पद्धतीने खेळल्यामुळे समन्वय लवकर होऊ लागतो, दंगा न करता एकाग्रतेने बसण्याची सवय लागते. मुलींसोबत मुलांचा सहभाग, मुलींची स्त्री म्हणून विकसित होत जाणारी कुटुंबातील वाटचाल, कुटुंबाचे व्यवस्थापन, व्यवहारज्ञान, स्वावलंबनाची आवडीने सुरुवात या खेळाच्या माध्यमातून होऊ शकते. स्त्री-पुरुष मतांचा आदरभाव तसेच अगदी दैनंदिन कामातील छोटीछोटी उद्दिष्टे या खेळाच्या माध्यमातून पूर्ण करून घेता येतील. उदाहरणार्थ, आरोग्यदायी सवयी, आहाराविषयक पौष्टिक खाऊ तयार करणे, दैनंदिन कामाचा परिचय, दिनक्रम कसा असावा, मराठीतील एखाद्या पाठाचे नाट्यीकरण, कविता देखिल प्रसंग निर्मिती करून शिकवता येईल. यासारख्या अनेक अपेक्षित गोष्टी या खेळांमधून साध्य करता येऊ शकतात. असा खेळ रंगणे आणि रंगवणे ही मजा स्वानुभवातच असते आणि हा अनुभव लहान मुलामुलींना देता यायला हवा. यासाठी प्रयत्न व्हायला हवा!

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “खेळ मांडायचा का !…..”