निमित्त साहित्याचे…

निमित्त साहित्याचे....

 

कोणत्याही व्यवस्था कशासाठी असतात. केवळ सोय, उपभोगासाठी नाही. कोणत्याही कार्यक्रमात व्यवस्थांसाठी समोर येणारे चेहरे, अन् पडद्यामागचेही चेहरे अगोदर आणि नंतरही नियोजनबद्धरितीने राबत असतात. हे केवळ औपचारिकता म्हणून केलेले नसते. दूरदृष्टीने नेमकी उद्दिष्ट ठेवून काहीतरी नवीन सुरू करण्याचा, सुरू ठेवण्याचा व सुरू राहील याचा पुर्ण प्रयत्न असतो.

अनिवार्य आहे म्हणून वारंवार सहभागी करून घेत हळूहळू स्वतःहून सहभागी होण्यासाठी मानसिकता तयार व्हावी याची प्रेरणा तर नसेल!!

विठ्ठल!! विठ्ठल!! गजरात  ग्रंथदिंडी 'कुसुमाग्रज' या खुल्या सभागृहात दाखल झाली आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या, खोलेश्वर महाविद्यालयातील मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.

संमेलन व्यवस्था, सत्र नियोजन, निमंत्रण, पाहुणे, पत्रिका, बॅनर, प्रमाणपत्र, स्टेज, मंडप, बैठक, प्रदर्शनी, विद्युत ध्वनी, शिस्त समिती, फलक लेखन, नोंदणी, भोजन, चहापान, फेसबुक वर लाईव्ह व्यवस्था, वाहनतळ, सुशोभिकरण, सत्कार साहित्य........ याशिवाय ऐनवेळीची धावपळ.... यासारख्या अनेक, बारीक-सारीक व्यवस्था सर्व काही आयोजित करणारी माझे गुरूजन साहित्यिक प्राध्यापक मंडळी होती.सहभागी होणारी देखील जेष्ठ ,श्रेष्ठ साहित्यिक सहकारी शिक्षक, प्राध्यापक मंडळी होती. जसे आपण लोकशाहीची व्याख्या करतो न् लोकांनी लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेले सरकार वगैरे वगैरे... अगदी त्याच पद्धतीने संस्थेतील शिक्षकांनी संस्थेतील शिक्षकांसाठी संस्थेतील शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ,काहीतरी वैचारिक नवनिर्माणाची प्रेरणा, ऊर्जा, उत्साह देण्यासाठी नियोजित व आयोजित साहित्य संमेलन.

काही कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, काही समाजासाठी, काही खास शिक्षकांसाठी....
त्रैवार्षिक शिबिर, कार्यशाळा, प्रशिक्षण, प्रासंगिक मार्गदर्शन, सामाजिक कार्यातील सहभाग, अभ्यास पूरक अंतर्गत नेमक्या कार्यक्रमांचे आयोजन प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयात नेहमीच होते. या सगळ्यामधून शिक्षक हळूहळू घडतो.

साहित्य संमेलनाची काय आवश्यकता होती! कशासाठी अट्टाहास! संस्थेच्या सर्व संस्कार केंद्रांमधून सहभागी होण्यासाठी दूरवरून प्रवास करून आलेले सहकारी कोणत्या प्रेरणेने येतात! हे तर वैशिष्ट्य आहे. स्पष्टपणे जाणवते प्रत्येक शिक्षक लिहू शकतो. विविध विभाग आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला लिहिता येते. तो लिहायला किंवा कोणतीतरी कला शिकतोच. समृद्ध करणारा अनुभव येतो. यासाठी स्वतः हूनही प्रयत्न होतो म्हणून देखिल घडते.
केवळ उत्सव नाही तर एक विचारांची चळवळ, त्याला दिशा देण्याचे प्रेरक काम इथे नेहमीच घडले जाते. शिक्षकांनी विविध प्रकारे समृद्ध व्हावे, सक्षम व्हावे. विद्यार्थ्यांसोबतच्या दैनंदिन अनुभवांच्या शिदोरीला व्यक्त करावे. ही शिदोरी दुसऱ्यांची प्रेरणा बनावी. शिक्षकांजवळ इतरांपेक्षा निश्चितपणे समाज मनाचा आलेख अगदी खऱ्या स्वरूपात असतो. विद्यार्थ्यांच्या मार्फत ते अनेक घराघरात पोहोचले जातात. हा अनुभव कामाची गती आणि नेमकेपणा वाढवतो.

महाविद्यालयाची मी माजी विद्यार्थ्यीनी आहे. जेष्ठ प्राध्यापक साहित्यिक मंडळी आयोजक होती परंतु कुठलाही अभिनिवेश जाणवला नाही. सहभागी झालेल्या प्रत्येकाने "आपल्यांसाठी आपण आयोजित केलेले साहित्य संमेलन आहे" या पद्धतीने सहभाग होता. इतरांचाही याच पद्धतीने सहभाग होणे त्यांना देखिल अपेक्षित असणे रास्त आहे. आपण आधी शाळेचे शिक्षक! मग साहित्यिक वगैरे वगैरे.... विविध भूमिका....
सर्व व्यवस्था, विषयांची निवड विचारपूर्वक केलेली होती.

उद्घाटन सत्रातील मा. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे शिक्षकांचा सहभाग कसा असावा याविषयीचे मार्गदर्शन अगदी समर्पक होते. संत सर्वज्ञ दासोपंत यांचे मराठी भाषेचे शब्द सामर्थ्य आणि विपुलता याविषयीची गोष्ट म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर घट या संस्कृत शब्दाला मराठीतील असलेले अनेक पर्यायी शब्दांची मांडणी सुंदर....

साहित्य संमेलन आयोजनामागची भूमिका केवळ उत्सवाची होती का! नक्कीच नाही. सर्व शिक्षक साहित्यिक एकत्र येऊन परिचय, वैचारिक देवाण-घेवाण, शिक्षक म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आपण कसे लिहिते झालो.
स्पष्टपणे वाटते संस्थेतील प्रत्येक शिक्षक लिहू शकतो, लिहितो. निश्चित स्वरूप देण्यासाठी प्रयत्न मात्र होत नाहीत.
मी वेळेची मिनिटांची मर्यादा लक्षात घेता आणि काही चर्चा कानावर पडताच! या व्यासपीठावरून नेमके काय जावे!! असा विचार केला ( लिहिलेले सगळे गुंडाळून ठेवले) जे मांडणे योग्य वाटले ते अनुभव मांडले. (कदाचित बोलता येत नाही म्हणून लिहित होते. आता लिहिते म्हणून बोलायला सुरुवात केली आहे. )
आपल्यातलेच आपण आहोत, एक आहोत मग वेगळेपणा कशासाठी? शैक्षणिक व्यासपीठावर सुचिता असायला हवी याचे भानही असावे. मी कोणीतरी बाहेरून बोलावलेली व्यक्ती आहे. अभिनिवेश कशाला! आधी शिक्षक! मग साहित्यिक! याच आशयाचे समर्पक मार्गदर्शन भालेराव यांनी देखिल केले. केवळ वेगळे सणसणीत शब्द, आणि सार्वत्रिक चर्चा न होणारा विषय देखील मी व्यासपीठावरून मांडू शकतो. असे शब्द वापरले म्हणजे वेगळेपण सिद्ध होते का? मुळात आपल्या परिवारात आपल्याला अश्या पद्धतीने वेगळेपणा सिद्ध कशाला करायला हवा! प्रत्येकाची बलस्थानं वेगळी!!

त्रैवार्षिक शिक्षण शिबिरामध्ये गीतमंचद्वारे संगीत कलाकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने अटलजींच्या कविता सादर केल्या. विविध प्रासंगिक उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धांच्या निमित्ताने आपण आपल्या सहकारी बंधू भगिनी शिक्षकांचे वेगळेपण आणि कौशल्य ओळखून आहोत, दिसून येते. माजलगाव येथे भरलेले ऐतिहासिक वास्तूंचे कला प्रदर्शनी असेल....विविध संघटना मार्फत सामाजिक कामातील सहभाग असेल.... शैक्षणिक गुणवत्तेतील यश असेल..... सर्वच उदाहरणे देता येणार नाहीत. विविध क्षेत्रात, आपापल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षक, पदाधिकारी कार्यरत आहेत.

मी स्वतः कोणत्याही इतर कार्यक्रमात सहभाग घेतला की...
काहीतरी राहून जातय असं वाटतं आणि मग.....
स्वतःलाच प्रश्न उपस्थित करते. माझ्यातील शिक्षक दूर जात नाही ना!!
सवंग प्रसिद्धीसाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी उगाचच पळत सुटलो नाहीत ना!! नकळत स्पर्धेचे तर स्वरूप येत नाही ना!!
मी करत असलेल्या कृतीतून आनंद, समाधान मिळतोय ना!!
की एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे??
मग तटस्थपणे विचार होतो आणि नेमकेपणाने कृती होते.

हा विचार चूक बरोबर माहिती नाही पण माझ्यासाठी तरी महत्त्वाचा!! शेवटी आपण सर्वजण संस्थेच्या एका छताखाली, शाळेच्या एका इमारतीत शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, स्वतःसाठी एकत्र आलेलो असतो. आपण सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांशी बांधिल आहोत. मूळ उद्देश बाजूला जाऊ नये एवढेच!

पूर्ण एक दिवस सर्व व्यवस्था राबवत असताना कोणत्याही व्यवस्थेच्या प्रमुखांना नकळत ताण येत असतो. त्यांनी व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिलेली असते आपल्याला केवळ सहभाग घ्यायचा असतो. आपला सहभाग देखील सक्रिय असावा. अशी अपेक्षा त्यांना असणारच.

समारोप सत्रामध्ये आदरणीय उद्धव बापू आपेगावकर यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये मार्गदर्शन केले. एका वाक्यातच सांगायचे झाले तर कला कोणतीही असो ती एकमेकांशी पूर्ण स्वरूपात एकरूप असते. ती आत्मविष्कारानुसार प्रत्यक्ष स्वरूप घेते....
नेमक्या, मार्मिक शब्दांत उसंतवाणीतून आपल्यापर्यंत नियमित पोहचणारे माननीय श्रीकांत उमरीकर यांनी परंपरा, संस्कृती, आशय,भावगर्भ, अस्सल साहित्याचे वाहते पाणी खोल, तळ दिसणारे, गाठणारे, निखळ राहावे. केवळ उथळपणाने सहभागी नसावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली.....

शेवटी काय !! स्वतःच्याच बदलत्या दृष्टिकोनाची गाळणी लावता यावी...गाळणीतील जाळी आवश्यकते नुसार योग्य वेळी बदलता यावी किंवा काही अडकले असेल तर काढून टाकावे..... गाळ,कचरा साचत नाही,खाली पडत नाही.... पारदर्शक, स्वच्छ धार तयार व्हायला लागते...

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने साकार झालेल्या  साहित्य संमेलनाचे आयोजक, संयोजक सर्वांचे खूप खूप अभिनंदन! धन्यवाद!!

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 thoughts on “निमित्त साहित्याचे…”