वाणनदी परिसरात आढळणाऱ्या खैर, बाभूळ, बोर, जांभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब या झाडांच्या लाकडापासून घरात, शेतात, वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करत असत.
आताही काही वस्तू या झाडांंच्या लाकडापासून करतात परंतु यामध्ये साग, सीसम यासारख्या अनेक झाडांचे लाकूड वापरत आहेत.
गावाकडे लाकडाच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मुसळ, रवी, रविखंबा, मोगरी, दाताळं, वावडी, लाकडी खेळणी, चाटू, काठवट, टेकण्या, वटकन, संदूक, दर्पणपेटी, फणी बैलगाडी, नळा, मोगं, पाळणा, खुट्टा, खुट्टी, मेक, गव्हाणी, विळा, कोयता विळी यांच्या मुठी, पोकळ काठी….
घरामध्ये स्त्रियांच्या मदतीला येणाऱ्या वस्तू…
मुसळ, सहसा मुसळ हे खैराच्या झाडाच्या लाकडापासून तयार करतात. मध्यभागी हाताने व्यवस्थित धरता येईल असा त्याला बारीक आकार दिलेला असतो. बुडाला जो भाग कुटण्यासाठी उखळात टेकणारा असतो त्याबाजूने दोन बोट अंतर सोडून लोखंडी पट्टी बसवलेली असते. या लोखंडीपट्टीला ईडी असे म्हणतात. ज्या मुसळाला अशी पट्टी बसवली जात नाही ते मुसळ कुटण्यासाठी योग्य नाही असे समजतात. कमीबुद्धी असलेल्या किंवा विचार न करता कृती करणाऱ्या व्यक्तीला उपहासात्मक बिनईडीचं मुसळ असे म्हणतात. वस्तूंची नावे, गुणधर्म आणि विशेषणं, वाक्यप्रचार, भाषा यांचा चपलख सुरेख संगम ग्रामीण बोलण्यात दिसतो. या वेगवेगळ्या वस्तूंच्या गुणांवरून व्यक्तींना उपहासात्मक बोलण्याची एक खास शैली ग्रामीण जीवनात आढळून येते. नेमकेपणा, खोचकपणा आणि विनोदी पद्धतीने एखाद्याचा दोष सांगण्याची खास मराठवाडी ठसकेबाज शैली आहे.
रवी ताक करण्याची वेगळी रवी होय. सध्याच्या रवी सारखी छोटी नसते. स्त्रियांच्या कमरे इतकी असते. भिंतीच्या कडेला एक लाकडी खांब रोवलेला असतो याला रवीखंबा म्हणतात. आणि या खांबाला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन गोलाकार दोऱ्या बांधलेल्या असतात. ज्या रवीने ताक करायचे असते त्या रवीला एक मोठी दोर, एक वेढा देऊन मोकळी सोडलेली असते. या दोरीला रविदोर असे म्हणतात. भिंती जवळच्या लाकडी रवीखांबाला ताक करून झाल्यावर ही रवी अडकवून ठेवलेली असते. लाकडी रवीखांबाच्या पुढे ताकाचा डेरा ठेवण्यासाठी एक आळ केलेले असते. या लाकडी खांबाच्या दोन हात लांब बसून दोन्ही हाताने रवीदोर ओढून स्त्रिया या डेऱ्यातील ताकाचे लोणी तयार करत असत. लोण्याचा गोळा कडवण्यासाठी चुलीवर ठेवला की लगेच या वस्तूंची स्वच्छता करतात.
ताकाचा डेरा, रवी, भांडी स्वच्छ करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. घासण्यासाठी पळसाच्या झाडाच्या मुळ्या काढून त्या भिजवून वाळवल्या जातात. नारळाच्या काथ्या प्रमाणे तयार होतात आणि या मुळीच्या घासणीने भांडी स्वच्छ केली जातात. पूर्णपणे स्वच्छ होतात आणि तेलकटपणा निघून जातो. तयार झालेले ताक, दही, लोणी, तूप जपून ठेवण्यासाठी सुद्धा लाकडाची एक पेटी असते. या पेटीला संदूक असे म्हणतात. या संदकाचा वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी देखिल उपयोग केला जातो. संदूक म्हणजे उंच मोठा पेटारा होय. याचे झाकण मात्र आवश्यकतेनुसार उघडता येईल असे झाकणाच्या फळीला कड्या बसवलेल्या असतात म्हणजे झाकण पाव,अर्धे, पुर्ण उघडता येते. समोर कुलूप लावण्यासाठी कडीकोंडा असतो. या संदकामध्ये विशेष वस्तू ठेवल्या जातात. काय ठेवावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. काही स्त्रिया आपली दर्पणपेटी ठेवतात. काय असतं या दर्पण पेटीमध्ये?
बाईचं सौभाग्य लेणं ! कोरीव ठसठशीत कुकूलेण्यासाठी सौरात…. पहाटे स्नान झाले की दर्पण पेटीच्या आरश्यात बघत बघत नववारीच्या पदराने कुंकू कोरुन कोरून गोल गरगरीत केले जाई. पुन्हा दिवसभर आरशात तोंड बघायला फुरसत कुठं असतेे.
या दर्पणपेटीमध्ये चंदन, लाकडी फणी असते. फणीला एका बाजूने बारीक आणि दुसऱ्या बाजूने थोडेसे मोठे दात बसवलेले असतात. याशिवाय कुंकू, मधाच्या पोळ्यापासून तयार केलेले मेन असते. येड्या बाभळीचा काटा पायात रूतला की खुरूप होऊ नये म्हणून हे मेन काटा रूतल्या ठिकाणी लावतात व दिवेलागणीच्या वेळी पायाला चटका बसेल असे शेकतात. हा काटा काढायला याच दर्पणपेटीत लाचकण ठेवलेले असते. स्त्रिया पळीचा एक प्रकार वापरत असत त्याला चाटू असे म्हणतात. लांबलचक दांडी व हाताच्या ओंजळीसारखा समोरचा भाग असतो. वाळवणाचे पीठ शिजवण्यासाठी, चीक शिजवताना, मोठ्या प्रमाणातल्या पुरण पातेल्यामध्ये हलवून व्यवस्थित एकजीव करण्यासाठी चाटूचा उपयोग केला जातो. जेवायला मोठ्या परातीत रस्साभाजी वाढल्यानंतर व्यवस्थित जेवण करता यावे म्हणून टेकण्या किंवा वटकन वापरत असत. योगासनाच्या एखाद्या आसनात बसल्याप्रमाणे दोन्ही पायाने काठवट तिचा गोलाकारच्या दोन बाजूला असलेल्या त्रिकोणी टोकावर पायाच्या बोटांनी जमिनीवर काठवटीला स्थिर ठेवत भाकरी थापण्यासाठी स्त्रिया बसत असत. दोन्ही हातांचा जोर पडल्यामुळे भाकरीचे पीठ चांगले मळल्या जात असे आणि म्हणून चुलीवरच्या भाकरीचा पातळ पापुद्रा निघून टम्म फुगलेली असते. लाकडाची खूट्टी कपडे अडकवण्यासाठी तर लाकडाचा खुट्टा म्हणजे जात्याचा दांडा होय. लहान मुलांसाठी लाकडी खेळणीचे सुद्धा विविध प्रकार आढळतात. यामध्ये दोन चाकाचा गाडा, पांगुळगाडा, लाकडी बोळ्या, मणी, लगोरी लाकडाची झाकणी केलेली असते. लाकडी बाहुली, पाळणा, वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार, मुखवटे… विविध प्रकारची खेळणी सुतार आपल्या कौशल्यानुसार बनवत असतात. शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या तुकड्यांमधून छोट्या छोट्या वस्तू तयार करतात. याचा उपयोग मुलांना खेळण्यासाठी होत असे. भातुकली मध्ये छोटासा खलबत्ता, जातं वगैरे बनवतात म्हणजे लाकडाचा छोटासा तुकडा देखील वाया घातला जात नसे. यानंतर येतो तो शेतीसाठीचा उपयोग गोठ्यामध्ये जनावरं बांधण्यासाठी त्यांच्या गळ्यातील दोरी गोठ्यामध्ये अडकवून ठेवण्यासाठी मेक ठोकली जाते. बोलत असतांना देखील बंधन करणे या अर्थाने एखाद्या व्यक्तीला ठराविक मर्यादापर्यंत बंदिस्त करणे म्हणजे मेक ठोकणे, मेक मारणे, बांधून ठेवणे या अर्थाने आपण हा शब्द, वाक्यप्रचार बोलीभाषेत वापरला जातो.
या मेकीसोबत गोठ्यामध्ये चारा व्यवस्थित टाकण्यासाठी, जनावरांनामध्ये तोंड घालून खाण्यासाठी गव्हाणी असते. ही गव्हाणी म्हणजे दोन्ही बाजूने लाकडाची फळी ठेवून मध्ये रिकामी जागा ठेवलेली असते. या जागेमध्ये कडबा, गवत टाकल्या जाते. बैलांना बैलगाडीला जोडण्यासाठी जो जू टाकला जातो त्या जुच्या दांड्याला खिळी असतात. या खिळी बसवण्यासाठी जूला दोन छिद्र असतात. लाकडी खिळ या जुच्या छिद्रांमध्ये घातली की बैलांना मान जरासुद्धा हलवता येत नाही. मानेवर घातलेला हा जू काढून टाकता येत नाही. एखाद्या कामात खिळ घालणे म्हणून हा शब्दप्रयोग वापरला जातो. कामांमध्ये अडवणूक करणे, हालचाल न करता येणे या अर्थाने बोलीभाषेत हा शब्द वापरला जातो.
बैलगाडी लाकडी असतेच परंतु गाडीवान जिथे बसतो त्याच्या बाजूला त्याला सहज घेता येईल असे आणि चाकाला वंगण करण्यासाठी नळा असतो. हा नळा खालच्या बाजूला बंद असतो आणि वर निमुळता होत जातो. आपल्या हाता इतका लांब असतो. बांबूचे वेळू ज्याप्रमाणे आतून पोकळ असतात त्याप्रमाणे आतून पोकळ बनवलेला असतो. यामध्ये तेल ठेवतात. बैलगाडीच्या साट्याला पट्टी असते. या पट्टीच्या जवळ हा नळा ठेवला जातो. हा नळा बैलगाडी सोबत कायम असतो आणि म्हणूनच आपण बोली भाषेत म्हणतो गाडीसोबत नळ्याची जत्रा! शेतामध्ये काम करण्यासाठी औताचे देखील तीन प्रकार असतात. औत, तिफन, कोळपे… एका प्रकारच्या औताला खाली पात असते. तिफन पेरण्यासाठी वापरतात. तीन दात असतात आणि त्याला मोगे जोडून पेरणीसाठी वापरतात. हे मोगं आतून पोकळ नळकांडी सारखे असते आणि पेरताना मुठीने धान्य या मोगंतून सोडत असताना हात व्यवस्थित मोगंवर स्थिर बसावेत अशा पद्धतीने बाजूला त्याची रचना केलेली असते. कोळपं म्हणजे छोटसं औत हाताच्या एकेक वितीच्या अंतरावर पिकांच्या पातींमधून हे कोळप कोळपणीसाठी फिरवत असतात. विशिष्ट अंतरावरून फिरत असल्याने पिकाला काहीही इजा न पोहोचता तण काढण्यासाठी याचा उपयोग होतो. रूमणं औताला जोडलेलं असतं. छत्रीच्या दांड्यासारखे दोन्ही हात ठेवून उभा राहून शेतातून जाता येते. हा औताचा प्रकार लहान मुलांना प्रिय आहे. शेतात पायपीट करत फिरण्यापेक्षा गाडीसारखे आयते बसून यावर चक्कर मारता येते शेतामध्ये फिरता येते. शेतामध्ये आलेले धान्य उधळण्यासाठी वावडी असते. वावडीला तीन पाय असतात. यावर उभेराहून धान्य उधळायचं असतं. खुसपट, भुस्कट, कुस काढतात. खोऱ्यासारखे परंतु दात असणारे दाताळं आवश्यकतेनुसार शेतीच्या कामासाठी वापरतात. याशिवाय गावाकडे लाकडी फळ्यांचा उपयोग गरजेनुसार कल्पकतेने करतात. कधी रांजण झाकणी, माळवदाला लावलेले खांब, कपडे टाकण्यासाठी बांबू, घर छोटे असेल तर घरामध्ये विभागणी करण्यासाठी……
एकत्र कुटुंबाच्या घराच्या विभागण्या सुरू झाल्या आणि या पारंपरिक पुर्वापार चालत आलेल्या गोष्टी, वस्तू मोडीवर आणि विसराळी पडू लागल्या…..
क्रमशः….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
8 thoughts on “6.दर्पणपेटी….”
खुपच सुंदर मांडणी आहे👌👌👌👌
👌
👍👌
👍🏻👍🏻
सुंदर👌👌
ग्रामीण जीवनाच सुक्ष्म सार्थ वर्णन👌👌👌
Khup chan👌🏻
दैनंदिन वापरात येणारी घरगुती आणि व्यवहारातली ही काष्ठ अवजारं आता तंत्रज्ञानाच्या युगात आडगळीला पडलीयेत.. खरंतर ‘आडगळ’ देखिल अनेकांना माहिती नसावी.. असो आपल्या लेखनातून अनेकदा असं विस्मरणात गेलेलं जीवन उजळून निघतं.. आपल्याला हे कौशल्य लिलया अवगत आहे ते आपणास प्राप्त डोळंस लेखन कौशल्यातून.. अप्रतिम.