कोणत्याही प्रदेशातील सण, उत्सव हे तेथील संस्कृतीचे दृश्य रूप असतात. या सण उत्सवात होणारे बदल हे सांस्कृतिक बदलांची जाणीव करून देतात. भारतीय सणांमधूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील प्रत्येक परंपरेतून देखिल *कृषी संस्कृती* सोबत दृढसंबंध जोडलेला जाणवतो.
स्वातंत्र्य पूर्व भारतात जवळपास 98 टक्के जनता शेतीशी आणि शेतीच्या जोडधंद्याशी आधारित होती. त्यामुळे सगळेजण आनंद साजरा करण्यासाठी, सर्वांसाठीचे अनेक सणवार, उत्सव, यात्रा, व्रत यांना शेतीची पार्श्वभूमी दिलेली आढळते. उद्देश एकच तो म्हणजे समाज, परिसर, निसर्ग, शेती आणि सोबत पशुपक्षी यांना एकत्र घेऊन आनंद साजरा करणे. ही दृष्टी, याची आवश्यकता एकमेकांना माहिती करून देणे. निसर्गाच्या चक्रात, रिंगणामध्ये स्वतःला सामावून घेत योग्य ती भुमिका निभावणे. पुढील पिढीला याची ओळख होणे, माहिती होणे आणि याच पद्धतीने हे निसर्गचक्र हे रिंगण सुरू राहणे. खरिपाची पेरणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी वर्ग आनंदी मनाने आषाढी वारीला जातो आणि परत येतो तेव्हा शिवारातली पीके त्याच्यापेक्षाही जास्त आनंदाने डोलत असतात.
आपण होणारे बदल स्विकारत असताना, शेतीच्या नवनवीन संकल्पनांची माहिती करून घेतो. पारंपरिक अन्नधान्याची शेती सोबतच मोत्यांची शेती, फुलांची शेती, रोपवाटिका, मशरूम, बांबूची, मध, रेशीम इ. नानाविध प्रकारची शेती… काळ, व्यवसायाची गरज बनत आहेत.
या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना आणि माहिती नसणाऱ्यांना कृषी पर्यटनाच्या निमित्ताने सांगता आली तर! प्रत्यक्ष सहभाग घेता आला तर!
आपला परिसर, पीकांविषयी माहिती, जित्राप, बारदाना, शिवार…वगैरे वगैरे
अगदी बांधाला बांध असणे म्हणजे काय? दाखवता आले तर !
खेडोपाडी पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले शेतकरी, कामकरी लोकं पीकपेरणी झाल्यानंतर या *पुनवेपासून पोळ्याच्या अवसेपर्यंत* समाधानाने वेदपुराणांच्या कथा ऐकण्याचे, सांगण्याचे उत्सव साजरे करतात. यामुळे घरगड्यासोबतच बैलांना देखील घटकाभर टेकायला मिळते. हिरव्या अकुंराने डोके वर काढलेले पाहून आता मालकाला रानात चिखल तुडवत जाण्याची काही आवश्यकता नसते. लेकीबाळी पंचिमीच्या निमित्ताने माहेरवाशिणी होण्यासाठी लगबग सुरु करतात. त्या येणार म्हणून आंबाडीच्या वळलेल्या दोरापासून उंच फांदीवर झोका तयार असतो. काही ठिकाणी झोका चढवतांना निबर दोर तळहाताला टोचू नये म्हणून मेंढीच्या जावळाच्या लोकरीची सोल बांधून प्रेमाने मामा झोका बांधतो.
दगडी शेपू, फांजीची भाजी, कर्टुलं, मेटंलं यासारख्या अनेक औषधी भाज्या, त्या चवदार होण्यासाठी केलेला निगुतीचा सायास जिभेवर चव रेंगाळत ठेवतो. या दिवसात नुकतेच यायला सुरुवात झालेले कारं, यरमुनं ,धामणं आणि काहींची नाव माहिती नाही पण पाहिलं की समजतं हे खायच असतं! या रानमेव्याची चव लई भारी!
गावाच्या चोहोबाजूंनी पाणवठे, पावसाळी झरे, ओढे, खाचखळगे, कपारी जिथं जागा मिळेल तिथं पाणी अगदी भरभरून वाहतं ! या सगळ्यांच्या कडेकडेने शेवाळ हिरवीगार मखमली गादी अंथरतात. जोराचा पाऊस आणि वावदान आलं की या मखमली गादीवर रानफुलं अलगद उडत येतात तर कधी पावसात निचीतीनं झोडपून वाहत कायमचे विसाव्याला येतात.
चूलवन, सरपण सगळच थंडगार झालेलं असतं. अश्या दनकूत आणणाऱ्या शिवारातल्या झोपडीत रहायच म्हणजे आतरायला अन् पांघरायला बाज आन् घोंगडीशिवाय कशाचा उपेग होत नाही.
तुरीच्या सनकाड्या पेटता पेटत नाहीत …
यावेळी भर उन्हाळ्यात जित्रापाचं शेण गोळा करून, दोन दोन डझन काचेच्या बांगड्या आणि चांदीचे बिलवर घालून सारखं आपलं डोक्याचा पदर सारत सारत… एक एक गवरी रचून आणि बंदिस्त करून ठेवलेला *उडवा* चूल पेटवायच्या कामाला येतो.
ज्या घरचा उडवा पावसाळ्याटाकतोर पुरन त्या खऱ्या सुगरीण आयाबाया! बाकीच्या साळकाया आन् माळकाया…
अशी अस्सल गावरानाची, शिवाराची सफर करायला आणि अस्सल गावरान पदार्थांची चव घ्यायला कोणाला आवडणार नाही!
क्रमशः पुढील लेखात….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
10 thoughts on “3 गावकुस शिवार….”
विद्यार्थ्यांना, पालकांना आवश्यक सुंदर वर्णन
ताई तुमच्या blog मध्ये निसर्गाचे वर्णन अतिशय सुक्ष्म पणे मांडलेले असते.. निरीक्षण खूप छान आणि मांडणीसुद्धा
धन्यवाद!
Sundar
Khupch Chan ….!
छान
👌👌👌 मस्त वर्णन
हो… छान सांगड घातली आहे.. प्रकृती आणि परंपरांची…
,,👌👍
खूप छान…..
आवडले.